अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply