१९३३ सालातील ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत, या ५ दिवसांत साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ कादंबरी लिहून काढली. या कादंबरीत, प्रारंभ धरुन एकूण ४२ रात्रीच्या कथा आहेत. या कथांमधून गुरुजींनी स्वतःबद्दल, आपल्या आई-वडिलांबद्दल, कुटुंबावर येणाऱ्या सुख-दुःखांच्या प्रसंगांवर, संस्कृती व शिकवण या विषयांवर आत्मकथन केलेलं आहे.
वीस वर्षांनंतर ही कादंबरी प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वाचनात येते व ते ‘श्यामची आई’ चित्रपटाची निर्मिती करण्यास प्रारंभ करतात. श्यामच्या भूमिकेसाठी एका मुलाची निवड केली जाते. चित्रीकरणास सुरुवात होते. मात्र या श्याम बरोबर काम करताना आईचं काम करणाऱ्या, वनमाला यांना हा श्याम, त्या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. शुटींग थांबवले जाते. पुन्हा श्यामच्या शोध सुरु होतो. पुण्यातील माधव वझे या मुलाला ही भूमिका मिळते. माधव वझेला घेऊन चित्रपट पूर्ण केला जातो. ६ मार्च १९५३ या दिवशी ‘श्यामची आई’ चित्रपट प्रदर्शित होतो…
या चित्रपटात माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. चित्रपटातील गीते वसंत बापट यांची तर त्या गीतांना संगीत दिलंय वसंत देसाई यांनी. खरा तो एकचि धर्म.., भरजरी गं पितांबर…, छडी लागे छम् छम्.. आणि आई म्हणोनी कोणी… ही चार गीतं अविस्मरणीय अशीच आहेत. या चित्रपटास १९५४ साली सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्ण कमळाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! शिवाय पहिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून माधव वझे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
मी चौथीत असताना भावे प्राथमिक शाळेतर्फे हा चित्रपट विजय टाॅकीजमध्ये सकाळच्या शो मध्ये पाहिला. संपूर्ण चित्रपट पाहताना मी आणि माझ्यासोबतची असंख्य मुले ‘श्याममय’ होऊन गेली होती.. शेवटच्या, आईला भेटायला निघालेल्या श्यामच्या तोंडी असलेलं गीत पाहताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता.. या चित्रपटानं आमच्या पिढीला संस्कारित केलं. त्यामुळेच आम्ही, नेहमी आईच्या आज्ञेत राहिलो. कधी कुणाला मदत हवी आहे, असं दिसल्यास स्वतःहून पुढाकार घेतला. पुढे पाठ्यपुस्तकातून व अवांतर वाचनातून साने गुरुजींचं साहित्य मनावर ठसत गेलं.
वर्षांमागून वर्षं निघून गेली. सिने-नाट्य जाहिरातींच्या व्यवसायात मी पडल्यावर एके दिवशी आॅफिसमध्ये पांढरी टोपी, खादीचा झब्बा व पांढरा पायजमा घातलेल्या एका सत्तरीतील व्यक्तीने प्रवेश केला. खुर्चीत बसल्यावर त्यांनी एक माहितीपत्रक करुन हवे असल्याचे सांगितले. त्यांना मी अनेकदा प्रदर्शनात, पुस्तक प्रकाशन प्रसंगी ‘श्यामची आई’ हे पुस्तक विकताना पाहिलेले होते. ते होते, दत्ता पुराणिक! साने गुरुजी, हाच त्यांचा ध्यास व श्वास होता. त्यांनी घरोघरी जाऊन ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकाची विक्रमी विक्री केलेली होती. प्रत्येक घरातून श्याम वाचला जावा, ही त्यांची प्रबळ इच्छा होती. जर एखाद्या दिवशी, एकाही पुस्तकाची विक्री झाली नाही तर ते जेवायचे नाहीत. कालांतराने बाजारात ‘श्यामची आई’च्या, व्हिडिओ सीडी आल्या. दत्ता पुराणिक पुस्तकांसोबत सीडींचीही विक्री करु लागले. मी त्यांचं माहितीपत्रक तयार करुन छापून दिलं. त्या निमित्ताने त्यांच्याशी भेटी होत राहिल्या. शनवारातील अमृतेश्वर मंदिराच्या रस्त्यावर नदीकाठी असलेल्या एका जुन्या वाड्यात ते रहात होते. त्यांची पत्नी काही महिन्यांपूर्वीच, हा इहलोक सोडून गेली होती. आम्ही दोघे बंधू त्यांना भेटायला गेल्यावर, ते अल्बममधील जुने फोटो दाखवत असत. काही तरी गोड खाऊ दिल्याशिवाय त्यांना रहावत नसे. निरोप घेताना ‘गाॅड ब्लेस यू’ असं न चुकता ते म्हणत असत… काही वर्षांनंतर ते गेल्याचं वर्तमानपत्रातून वाचनात आलं… आयुष्यभर साने गुरुजींचा आदर्श अंगी बाळगणारा, एक चालता बोलता ‘श्वास’ थांबला…
आचार्य अत्रेंच्या ‘श्यामची आई’ नंतर ७० वर्षांनी पुन्हा एकदा, सुजय डहाके नावाच्या तरुणाने ‘श्यामची आई’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले… इथे साने गुरुजी व श्यामची आई वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. त्या चित्रपटाशी, या चित्रपटाची तुलना करता येणार नाही… ज्यांनी अत्रेंचा पाहिला आहे, त्यांना हा श्याम कदाचित भावणार नाही.. ज्यांनी तो पाहिलेला नाही, त्यांना हा श्याम नक्कीच आवडेल.. या नवीन चित्रपटात श्याम साकारलाय, शर्व गाडगीळने. आईची भूमिका केली आहे, गौरी देशपांडे हिनं.. श्यामचे वडील झाले आहेत, संदीप पाठक. साने गुरुजींच्या भूमिकेत जीव ओतलाय, ओम भुतकर याने. चित्रपट पाहून काही प्रेक्षकांना असं वाटलं की, आताच्या रंगीत जमान्यात हा चित्रपट कृष्णधवल करण्याऐवजी रंगीतच केला असता तर निसर्गरम्य कोकणदर्शन, अधिक नेत्रसुखद झालं असतं.. हा चित्रपट कृष्णधवल असल्याने बरीचशी अंधारातील दृष्ये, ही डोळे फाडून पहावी लागतात… मोठी माणसे आवर्जून लहान मुलांना हा चित्रपट दाखवायला गेल्यानंतर ती, फ्लॅशबॅकच्या तंत्रामुळे गोंधळून जाऊन पालकांना सतत प्रश्न विचारुन भंडावून सोडतात.. पूर्वीचा चित्रपट हा मुलांना सहज समजणारा होता.. त्यांना आवडेल असे श्यामच्या तोंडी ‘छडी लागे छम् छम्’ हे गीत त्यामध्ये होते.. तरीदेखील आजच्या दिवसात सत्तर वर्षांनी पुन्हा ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती होते आहे, हेही नसे थोडके….
शेवटी या लेखाचा समारोप करताना एक ‘भरजरी आठवण’ आवर्जून सांगावीशी वाटते आहे… आचार्य अत्रे यांना ‘श्यामची आई’ चित्रपटास सुवर्ण कमळ, हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दलचे, दिल्लीहून अभिनंदनाचे पत्र आले.. आचार्य अत्रे, वनमाला, माधव वझे व दत्तू बांदेकर अशा सर्वांनी दिल्लीला जाण्याचे ठरवले. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी आणखी एका मित्राला सोबत न्यायचे ठरविले. तो मित्र म्हणजे मुंबईत सिनेमाची पब्लिसिटी करणाऱ्या समर्थ आर्ट्सचे संस्थापक, हरिभाऊ गुरुजी! आचार्य अत्रे यांनी त्यांना बोलावून घेतले व सांगितले की, ‘हरिभाऊ, तुला आमच्यासोबत दिल्लीला यायचे आहे.’ हरिभाऊंनी विचारले, ‘आपल्या सोबत मी येऊन करणार काय ?’ त्यावर अत्रे त्यांच्या भाषेत उत्तरले, ‘तू दिवसा या माधवला सांभाळायचे व ‘रात्री’ मला सांभाळायचे!!!’ हरिभाऊ गुरुजी या सर्वांसोबत दिल्लीला जाताना रेल्वेने व पुरस्कार सोहळा झाल्यानंतर विमानाने मुंबईला परतले.. त्या पुरस्कार सोहळ्यातील एकोणसत्तर वर्षांपूर्वीचे हे एक छायाचित्र. हरिभाऊंचे थोरले चिरंजीव, सुबोध गुरुजींनी माझ्याकडून ते फिनिशिंग करुन घेतले. त्यामध्ये हरिभाऊ गुरुजी, माधव वझे, आचार्य अत्रे आणि काही मान्यवर दिसत आहेत.. आजमितीला यातील माधव वझे यांच्याशिवाय कोणीही हयात नाहीत… आहेत ना खरंच या ‘भरजरी आठवणी’….
– सुरेश नावडकर,
पुणे २३/११/२३
मो. ९७३००३४२८४
Leave a Reply