नवीन लेखन...

भारूडरत्न निरंजन भाकरे

जन्म. १० जून १९६५ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे.

निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातुन, भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती.
सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा इ. अशा अनेक कार्यक्रमांमधुन निरंजन भाकरे यांनी रसिकांच्या मनात घर केले होते. “तुला बुरगुंडा होईल बया गं” या भारुडानं तर महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांनी गाजवुन टाकली होती.

खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोकां देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषधनिर्मिती कंपनीत १० रुपये हजेरीने कामाला लागले. लग्न झालं, आणि संसाराचा गाढा ओढत त्यांनी छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून पैसा कमवण्यास सुरुवात केली. अशातच कलापथकाच्या दौऱ्यावर असताना ठाणे जिल्ह्यात एक चहाच्या टपरीवर ‘लोकसत्ता’ वाचताना अशोकजी परांजपे यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि जणू त्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला. निरंजन भाकरेंनी अशोकजींची भेट घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. अशोकजींनी विचारपूस करत ‘तुला लोककलेबद्दल काही येतंय का?’असं विचारताच भाकरेंनी त्यांना भारूड म्हणून दाखवलं. त्यांना ते आवडलं व पुढे भाकरे त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे दर शनिवार, रविवार घरी जाऊ लागले. अशोकजींनीसुद्धा भारूड कलेबद्दल त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पुढे अशोकजींना सोंगी भारुडाचे शूटिंग करायचे होते. अशोकजींनी इंडियन नॅशनल थिएटरच्या तंत्रज्ञांच्या सोबतीने भाकरेंना घेऊन सोंगी भारुडाचे शूटिंग केले. त्यांना आणि आय.एन.टी.च्या कर्मचाऱ्यांना ते फारच आवडले. इथूनच निरंजन भाकरेंच्या भारूड प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भाकरेंची भारुडं महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. पुढे त्यांनी १९९६ ते २००० मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत चार वर्षे प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. अशीच यशाची उंच शिखरे गाठत असताना पुन्हा अशोकजींनी भाकरेंचे सोंगी भारूड मुंबईकरांना दाखवायचे ठरविले. त्या अनुषंगाने अशोकजी निरंजन भाकरेंच्या भारुडाची जाहिरातसुद्धा वर्तमानपत्रातून स्वतः प्रसिद्ध करत होते.

या प्रयोगानंतर निरंजन भाकरेंचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच पुढे दया पवार प्रतिष्ठान संकल्पनेतून तसेच डॉ. प्रकाश खांडगे यांच्या लेखणीतून “लोकोत्सव” हा कार्यक्रम ठाणे येथे संपन्न होणार होता. त्या कार्यक्रमातदेखील भारूड सादर करण्याची संधी भाकरेंना चालून आली. भाकरेंनी सादर केलेला बुरगुंडा अशोक हांडेंना खूप आवडला. पुढे त्यांनी “मराठी बाणा” या आपल्या कार्यक्रमात भाकरेंना बुरगुंडा सादर करण्याची संधी दिली गेली आणि भारूडकार निरंजन भाकरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. भारूडकार म्हणून प्रकाशझोतात असतानाच त्यांना २००७ चा राज्य सांस्कृतिक लोककला पुरस्कार त्यांच्या पत्नीसह जाहीर झाला.

‘मराठी बाणा’मुळे महाराष्ट्रसह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश इतकेच काय तर अमेरिकेतील शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली. परंतु या दरम्यान, वडीलभावाने भाकरेंना घर आणि गावापासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीचं वाटप व्हावं म्हणून तगादा लावला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सोबतीला असलेले कलावंत त्यांच्या पासून तोडले. पण त्याही परिस्थितीत शिवसिंग राजपूत या सोंगाड्या सहकाऱ्याने भाकरेंना मदतीचा हात दिला. हिमतीने भाकरेंनी पुन्हा पार्टी बांधली. पुन्हा एकदा एकनाथी भारूड गाजू लागले. त्याचेच फळ म्हणून अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतून त्यांनी आपले लोककलेचे सादरीकरण केले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत आहेत.

नुकतीच निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.

भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असे. रहिमाबादसारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. निरंजन भाकरे यांनी लॉक डाऊन च्या दरम्यान गरीब कुटुंबांना किराणा साहित्य मदत करून सामाजिक कार्य केले होते. त्यांनी आपल्या कार्यक्रमांद्वारे अनेकांना व्यसनमुक्त केले तसेच ते आजारी गरीब कलावंतांना वैद्यकीय खर्चाची मदत नेहमीच करत आले होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते.

निरंजन भाकरे यांचे २३ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/डॉ. गणेश चंदनशिवे

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..