भरुनी येता आकाशी
मेघांचे थवे अफाट
मनी नसावे अनारोग्याचे
साचणारे धुके दाट!!
अर्थ–
पावसाळा! काहींना न आवडणारा शब्द तर काहींसाठी आनंदाचं उधाण घेऊन येणारा शब्द. मला पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजायला आवडतं, तर काहींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब व्हायला. पण, पावसाळा म्हटलं की कित्येक चांगल्या- वाईट गोष्टी तो घेऊन येतो. जगायला लागणारे अन्न धरणीतून उगवायचा उत्तम काळ हा पावसाळा तर प्रलय येऊन आयुष्य बेचिराख करायचा विनाशकारी ठरणारा हा पावसाळा. मग अशा पावसाळ्यात काय शिकायला हवे. मी नेहमी इतिहास हा शब्द केवळ ज्ञान प्राप्त करून घेणे यासाठी म्हणत नाही तर त्यातून शिकण्या सारखे काय असते यासाठी प्रयत्नशील असतो.
पूर्वीच्याकाळी पावसाळ्यात यमुना ओलांडता यायची नाही आणि मग चार महिने पावसाळा आला की मोहीमा थांबवल्या जायच्या. तर अशाच पावसाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटून घोडखिंडी मार्गे विशाळगडाला गेले. पावसाळ्यात मोगलांनी गडाला घातलेला वेढा शिथिल व्हायचा तर याच पावसाळ्यात कणखर वृत्तीच्या मराठ्यांनी( येथे मराठा जात हा अर्थ अपेक्षित नाही तर मराठा म्हणजे मराठी लोकं होय.) भर समुद्रात असलेल्या उंदेरी बेटावर दुर्ग बांधणीचे काम केले.
एकूण काय तर पावसाळ्याला कशा दृष्टीने पाहायचे हे जास्त महत्वाचे आहे. नवीन काही करण्यापेक्षा आहे ते टिकवणे जास्त योग्य आहे. येथे उंदेरी चे बांधकाम आधीपासून सुरू होते, त्यास पूर्णत्वास नेण्याचे काम पावसाळ्यात ही सुरू होते तेही इंग्रजांशी युद्ध सुरू ठेऊन. हे विशेष!
— सुमंत परचुरे.
Leave a Reply