व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता
१ ॥ गीत
वाहते नसानसांतून
तुझ्या ऋतूंचे गीत
घेते रंग रूप नवे
माझे झडलेले जिवित
रुजते माझ्या डोळ्यांत
तू पेरलेले आकाश
जसे किरणांचे कोंब
फुटे पालवी मनास
धरतात दाही दिशा
छप्पर माझ्या माथ्यावर
तुझ्या दिठिचे क्षितिज
नेते मला दूरवर
रक्ताच्या थेंबातून
माझे प्रकाशते गीत
मातीच्या गर्भातून
माझे दरवळते जिवित…
२॥ भिरी
भिऱ्यांचे स्तोत्र
तिन्हीसांजेला
रुखावळीच्या
पानापानांत.
देशांतराची भिरी
माझ्या अंगणात आली
तुझ्या दृष्टांताची गाणी
गाऊन
उडून गेली…
वार्याचे मूळ शोधत
सैरभैरल्या भिर्यांना
ठाऊक नसतं :
वार्याचा गाव
त्यांच्या वसलाय पंखातच…
३॥ नक्षत्र कशी
नक्षत्र कशी
प्राजक्ताची फुलं
रात्रभर
स्वप्नांच्या गावात
परिमळतात
आणि
आगळ्याच तृप्तीन
पहाटेच्या ओंजळीत
झडतात…
४|| घेतो मनात भरून
मनात भरून
निळे रितेपण
फेडायला ऋण
श्वासांचे या
वज्रदेही कुडी
स्फुलिंग अग्नीचे
जीवन विजेचे
नका म्हणू
नभास भिडला
अग्नी हा सगळा
प्राणास पांगळा
नका करू
मूळ कोंकणी कवी : माधव बोरकर
मराठी अनुवाद : गीतेश गजानन शिंदे
Leave a Reply