नवीन लेखन...

भाषांचं आकलन

एखादी भाषा जेव्हा ऐकली जाते, तेव्हा तिचं आकलन अर्थातच मेंदूद्वारे होतं. हे आकलन होताना, मेंदूच्या ठरावीक भागात विविध क्रिया घडून येतात. हे आकलन कुठे होत असावं, याची माहिती संशोधकांना आहे. तसंच, त्या मागच्या क्रियांचीही थोडीफार माहिती संशोधकांना आहे. परंतु भाषा बदलली तर या आकलनाच्या मागे असणाऱ्या क्रियांत काही फरक पडतो का, हा एक मोठा प्रश्न संशोधकांना पडला होता. कारण आतापर्यंत यासंबंधी जे संशोधन केलं गेलं आहे, ते मुख्यतः इंग्रजी भाषेच्या संदर्भात केलं गेलं आहे. इतर भाषांचं आकलन होताना त्यात किती फरक पडतो, याची माहिती संशोधकांना नव्हती. आता मात्र मॅसेच्युसेट्स विद्यापीठातल्या सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या संशोधनाला विस्तृत स्वरूप दिलं आहे. भाषांच्या आकलनावरचं हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन ‘नेचर न्यूरोसायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या या संशोधनात विविध भाषांचा समावेश केला. यांतल्या काही भाषा या शब्दांवर भर देणाऱ्या भाषा होत्या, तर काही भाषा या उच्चारावर भर देणाऱ्या भाषा होत्या. शब्दांवर भर देणाऱ्या भाषांपैकी काही भाषांमध्ये या शब्दांचा वापर ठरावीक क्रमानं केला जातो, तर काही भाषांत शब्दांचा वापर विस्कळीत स्वरूपांत केला जातो. उच्चारावर भर देणाऱ्या भाषांत, शब्दाचा उच्चार बदलला की शब्दाचा अर्थ बदलतो. या संशोधनात, जगभरच्या एकूण पंचेचाळीस भाषा अभ्यासल्या गेल्या. या पंचेचाळीस भाषांत पाच भारतीय भाषांचा समावेश होता. या पाच भाषांपैकी एक भाषा मराठी होती. इतर चार भारतीय भाषा, हिंदी, गुजराथी, तामिळ आणि तेलगू या होत्या.

एखाद्या भाषेचं आकलन होताना, मेंदूचे जे भाग या आकलनात सहभागी होतात, तिथल्या पेशी सक्रिय झालेल्या असतात. या पेशी सक्रिय झाल्यामुळे, त्यांना अधिक प्रमाणात प्राणवायूची गरज भासते. ही गरज त्या भागात पुरवल्या जाणाऱ्या रक्तातील प्राणवायूची पातळी वाढवून भागवली जाते. त्यामुळे एखादी भाषा ऐकताना जर मेंदूतल्या विविध भागांतल्या रक्तातील प्राणवायूच्या पातळीची तुलना केली तर, त्यावरून त्या भाषेचं आकलन होण्यात मेंदूच्या कोणत्या भागाचा किती सहभाग आहे, ते कळू शकतं. मेंदूतील विविध भागांकडच्या रक्तपुरवठ्यातील प्राणवायूच्या पातळीतले बदल जाणण्यासाठी एफएमआरआय (फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग) हे तंत्र वापरलं जातं. हे तंत्र आपल्याला परिचित असणाऱ्या एमआरआय (मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग) या तंत्राचंच भावंड आहे. सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात प्रत्येक भाषेचा एकेकाकडून वापर करून घेतला; आणि त्यानंतर लगेचच त्या व्यक्तीच्या मेंदूचं एफएमआयआर तंत्राद्वारे निरीक्षण (स्कॅनिंग) केलं. या निरीक्षणांद्वारे या संशोधकांना, विविध भाषांमुळे मेंदूचे कोणते भाग किती प्रमाणात सक्रिय होतात, हे समजू शकलं.

सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनात प्रत्येक भाषेसाठी, एक पुरुष आणि एक स्त्री, असे दोन प्रतिनिधी निवडले. या प्रतिनिधींची वय १९ ते ४५ यादरम्यान होती. हे सर्व प्रतिनिधी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्समधील बोस्टनच्या परिसरात वास्तव्याला होते. ज्या-ज्या भाषेसाठी हे प्रतिनिधी निवडले होते, त्या सर्वांना ती-ती भाषा अगदी बालपणापासून अवगत होती. काही प्राथमिक तयारीनंतर, या सर्वांकडून एकाच कादंबरीतल्या काही भागांचे, त्या-त्या प्रतिनिधीच्या भाषेत केलेले अनुवाद ऐकवले गेले. या संशोधनासाठी लुईस कॅरॉल यांची ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ ही सुप्रसिद्ध कांदबरी निवडली गेली. ही कादंबरी निवडण्याचं एक कारण म्हणजे या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत – सुमारे १७० भाषांत!

संंशोधकांनी या कादंबरीतले अठ्ठावीस छोटे आणि तीन मोठे भाग या प्रयोगासाठी निवडले होते. यातील प्रत्येक छोटा भाग ऐकण्यास फार तर अर्धा मिनिट लागणार होतं, तर प्रत्येक मोठा भाग ऐकण्यासाठी सुमारे पाच मिनिटं लागणार होती. याबरोबरच तुलनेसाठी या प्रतिनिधींना अपरिचित असणाऱ्या भाषेतलं लिखाणही ऐकवलं गेलं. अपरिचित भाषेच्या तुलनेत, परिचित भाषा ऐकताना मेंदूतील पेशी अधिक सक्रिय होणं अपेक्षित होतं. हे सर्व करताना टप्प्याटप्प्यानं त्यांच्या मेंदूतल्या रक्तातील प्राणवायूच्या पातळीतले बदल एफएमआरआय तंत्राद्वारे नोंदवले गेले. याबरोबरच प्रत्येक भाषेच्या आकलनाला दिलेला प्रतिसाद कळण्यासाठी, या संशोधकांनी प्रत्येक प्रतिनिधीला त्याच्या भाषेतून काही गणितं सोडवायला दिली व त्या भाषेतल्या (स्मरणशक्तीशी संबंधित असणाऱ्या) काही चाचण्याही घेतल्या. यानंतरही या प्रतिनिधींच्या मेंदूतील विविध भागातल्या रक्तातल्या प्राणवायूच्या पातळीतले बदल एफएमआरआय तंत्राद्वारे नोंदवले.

सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. भाषा कोणतीही असो. तिचं आकलन होण्यासाठी मेंदूतले काही ठरावीक भागच सक्रिय होत असतात. हे सक्रिय भाग मेंदूतील पुढच्या, वरच्या तसंच खालच्या भागात वसले आहेत. किंबहुना सक्रिय होणाऱ्या भागांबद्दलचे हे निष्कर्ष अपेक्षितच होते. मात्र या निष्कर्षांतला दुसरा भाग हा लक्षवेधी होता. कोणतीही भाषा ऐकली, तर मेंदूतल्या विविध भागांतील रक्तातल्या प्राणवायूच्या पातळीत होणाऱ्या बदलांचं प्रमाण हे साधारणपणे सारखंच असल्याचं या संशोधनावरून दिसून आलं. मग ती भाषा कितीही गुंतागुंतीची असो, शब्दांवर भर देणारी असो वा उच्चारावर भर देणारी असो! मेंदूच्या डाव्या भागातील रक्तातल्या प्राणवायूच्या पातळीत भाषेगणिक होणारा बदल हा जास्तीतजास्त दोन टक्के, तर उजव्या भागातला बदल हा जास्तीतजास्त दीड टक्क्याच्या आसपास होता. इतका बदल तर जेव्हा एखादी व्यक्ती एकच परिचित भाषा ऐकत असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या बाबतीतही सतत घडून येत असतो! गणितावर आधारलेल्या आणि स्मरणशक्तीवर आधारलेल्या चाचण्यांवरून काढलेले निष्कर्षही अशाच प्रकारचे होते. हे सर्व संशोधन भाषेचं आकलन करून देणारी मेंदूतली यंत्रणा ही, ‘सर्वांगीण’ स्वरूपाची असल्याचं दर्शवत होतं. ही यंत्रणा सर्व प्रकारच्या भाषांचं आकलन करून देण्यास समर्थ असल्याचं प्रतीत झालं.

विविध भाषांचं मेंदूद्वारे होणारं आकलन जरी सारख्याच पद्धतीनं होत असल्याचं दिसून आलं असलं तरी, हे आकलन करून घेण्याची मेंदूची क्षमता भाषेनुसार वेगवेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेंदू एका वेळी एखाद्या भाषेतील किती शब्दांचं आकलन करू शकतो, हे या क्षमतेवरून ठरतं. उदाहरणार्थ, इंग्रजीच्या बाबतीत मेंदू साधारणपणे एका वेळी सहा ते आठ शब्दांवर प्रक्रिया करू शकतो. इतर भाषांच्या बाबतीत ही क्षमता वेगळी असू शकते. या संशोधकांनी आता याच मुद्द्यावर पुढचं संशोधन सुरू केलं आहे. हे नवं संशोधन आता केलेल्या संशोधनाला नक्कीच पूरक ठरणार आहे. कारण यातूनच मेंदूच्या दृष्टीनं विविध भाषांत काय फरक असतो, ते कळण्यास मदत होणार आहे.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Saima Malik-Moraleda, et al, Siemens/www.flickr.com, Saima Malik-Moraleda, et al

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..