‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. त्यांना ठाऊक नाही. खांब बघितल्यानंतर एक तंगडी वर करून घाण करणाऱ्या कुत्र्यांविषयी कविवर्य सुरेश भट म्हणतात, ‘जुना कुत्रा असो वा नवा कुत्रा, शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे.’ मला नेहमीच किंव वाटते. कारण मी रात्री अपरात्री फिरत असतो. पण असा प्रसंग माझ्यावर कधी गुदरला नाही. या कुत्र्यांकडे आपण नेहमी भूतदयेच्या दृष्टीकोनातून पाहणे हा आपला मानवी धर्म आहे. आपण या भटक्या कुत्र्याविषयी जाणून आहात. उष्ट्या खरकट्यां अन्नाच्या ढिगात स्वत:साठी अन्न शोधीत असतात. खाण्यालायक असेल ते खातात व न खाण्यासारखे देखील खातात. पण हा उद्योग करीत असताना त्या ढिगाऱ्यातून अन्य गोष्टी बाहेर फेकल्या जातात.अस्ताव्यस्त कचरा होतो. घाण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. एकट्या माणसावर धावून जाणारी कुत्री, गाड्याच्या मागे भुंकत पळणारी कुत्री, काही कुटुंब काबिल्यासह फिरणारी, तर टोळीने फिरणारी कुत्री…. यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा कोठे तरी बंदोबस्त व्हावा या दृष्टीने आज तरी प्रयत्नांची गरज आहे. एकूणच श्वान प्रेम आणि त्यांच्याविषयीचा कळवळा या गोष्टी कितीही खऱ्या असल्यातरी आपल्याला त्यांच्या दहशतीपासून दूर राहणे किंवा त्यांच्यावर काही उपाय करण्याची वेळ आली आहे.
वाघ आणि मांजर यात ज्याप्रमाणे साम्य आढळते त्याप्रमाणे लांडगे आणि कुत्रा यामध्ये साम्य आढळत आले आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. आपल्या धन्याची, घराची शेताची राखण आदि इमानेइतबारे सेवा करीत असतो. वेळेला स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचे प्राण वाचवितो. त्यामुळे काही मंडळीना भन्नाट प्रेम असते. ते नियंत्रणात असतात. स्वच्छ ठेवले जातात. वेळोवेळी डॉक्टर तपासतात. कुणाला घेतलेला चावा, गुरगुरणे मालकाला मात्र आपल्या बाब्या चिडला असं वाटत असतं. तर त्याने दुसऱ्याच्या जागेत जाऊन केलेली घाण आणि त्यातून उद्भवलेला तंटा… मालकाने म्हणावे ‘ह्यांना मुक्या जनावरांविषयी प्रेमच नाही.’ गमतीची एक गोष्ट आपणापुढे व्यक्त करू इच्छितो की, एका पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सिनेमात यापुढे ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ ‘कुत्ते की मौत मार दुंगा’ कुत्ते की औलाद’ अशी कुत्र्याची बदनारे संवाद उच्चारण्यास कायद्याने मनाई करावी आणि पालन न करणारावर ATROCITY अंतर्गत कारवाई करावी. ते पुढे असेही लिहितात ‘ कुत्ता मेरा साथी’ असे कुत्र्याचे महती सांगणारे चित्रपट काढेल त्याला ५०% अनुदान द्यावे. जसे वर्षातून विविध दिवस साजरे केले जातात त्याप्रमाणे भटका कुत्रा दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा. हे वाचून आम्ही धन्य झालो.
जानेवारी २०१४ मध्ये ह्युमन सोसायटी इंटरनँशनल या स्वयंसेवी संस्थेने ‘हाय-टेक’ साधनाचा वापर करीत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यात असे आढळले की, मुंबईत दर १३० माणसामागे एक भटका कुत्रा आहे. मुंबई एकूण ९५१७२ भटकी कुत्री वावरत आहेत त्यापैकी ६६ हजार ही रस्त्यावर आहेत तर २९ हजार गल्लीबोळात बस्तान ठोकून आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २००७ -०८ साली ४९ हजार भटकी कुत्री होती. आज दुप्पट झाली आहेत. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करूनही दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि त्याबरोबर त्यांचा वाढलेला उपद्रव चिंता करण्यासारखा आहे. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री जयराज फाटक यांनी सिंगापूर धर्तीवर भटके कुत्रे दिसताक्षणी ठार करा , असा आग्रह धरला होता. पण विधी खात्याने तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचे आव्हान पेलणे कठीण जाईल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे हा विषय अर्ध्यातच थांबला. घरी येणाऱ्या दैनिकात दररोज एकतरी भटक्या कुत्र्याची बातमी असते. मध्यंतरी एका खाजगी वाहनचालकाने गाडीखाली कुत्र्याला चिरडले म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. वर्तमानपत्रात कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही तर माणूस कुत्र्याला चावला, ही मजेशीर बातमी वूत्तपत्र उचलून धरतात. कारण तसे प्रशिक्षण दिलेले असते. गमतीची गोष्ट सांगायची झाली तर दहिसर कांदरपाडा येथून २४० क्रमांकाची बस लिंक रोडच्या दिशेने निघाली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहनचालक अर्जुन खरात याने बसचा वेग वाढविला होता. अचानक एक भटका कुत्रा धावत बसखाली आला. ब्रेक करकचून दाबला गेला. त्यामुळे प्रवाशी हादऱ्याने दचकले, काही उभे राहिले. काही उत्साही मंडळी खाली उतरली. तो भटका कुत्र्याची अखेरची धडपड सुरु होती. वाहनचालक नम्रपणे गाडीत बसा म्हणून विनवीत होता. पण प्रवाश्यांपैकी एकाने पावा संघटनेच्या कार्यकर्त्याला फोन लावला. अल्पावधीत संघटनेचा कार्यकर्ता हजर झाला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिचारा अर्जुन खरात यांना निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक झाली. पण ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात आली नाही की यावर विशेष विचारमंथन झाले नाही. इतकी दहशत भटक्या कुत्र्यांची पसरलेली आहे. हाड म्हणायला देखील नागरिक घाबरू लागले आहेत. दररोज श्वानदंशामुळे माणसेही मरत असतात. दर मिनिटाला एक अपघात होतो तर दर तीन मिनिटांनी एकजण मृत्युमुखी पडत असतो. रेल्वेच्या रुळावर दररोज दहाबारा जणांना मृत्यू येतो. त्याबद्दल कुणी फारसे दु:ख व्यक्त करीत नाही. एखाद्या माणसाने भटक्या कुत्र्यावर केलेला जीवघेणा हल्ला याबाबतीत आपण विचारमंथन का घडवून आणायचे. अंगावर धावून आलेल्या, चावा घेतलेल्या कुत्र्याला चोप देण्याचा स्व:सरक्षणात्मक अधिकार मानवाला असायला हवेत, याविषयावर चर्चा घडविली पाहिजे.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा तरी कसा….! यांच्या दहशतीला लगाम घालणार कोण…? उपद्रवी कुत्र्यांपासून संरक्षण देणार तरी कोण….? भारतीय लोकशाहीत हे तरी आजमितीला कठीण होऊन बसले आहे. प्राणीमित्र संघटना याला कडाडून विरोध करतील. विचार करा भविष्यात या भटक्या कुत्र्याची दहशत वाढण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. श्वानप्रेमी माझ्या लेखाविषयी गरळ ओकतील पण मी भटक्या आणि उपद्रवी कुत्र्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
Leave a Reply