
ताज्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वादविषयाला तोंड फोडले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आजवर बाळासाहेबांवर कधीही टीका न करणार्या राज ठाकरे यांनी या सभेत शरसंधान केले. त्याला बाळासाहेबांकडून लगेचच प्रत्युत्तर दिले गेले. पण भाऊबंदकी बाजूला ठेवून जनतेच्या समस्यांबद्दलच बोलायचे का ठरवले जात नाही ? मनोरंजनापेक्षा जनतेला रोजच्या प्रश्नांचा उलगडा हवा आहे.सध्या राज्याच्या काही भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यात प्रचाराचा गदारोळ, पैशाचा वारेमाप उधळपट्टी हे सारे सुरू आहे. पण याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. कारण सार्यांचे लक्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणूक जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला तर आश्चर्य वाटायला नको. पण असे
आरोप करताना तेथील नागरिकांच्या समस्या, त्या संदर्भात त्या-त्या पक्षाकडे असणारी संभाव्य योजना याची चर्चा अधिक व्हायला हवी. आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी समर्थ असतात, असा अजूनही जनतेचा समज कायम आहे. त्यामुळे निवडणुकीत जनतेच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला जावा अशी अपेक्षा असते.या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात मनसे आणि शिवसेनेत आपसातील आरोप-प्रत्यारोपांचेच युध्द रंगले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या प्रचंड जाहीर सभेला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेला झालेली गर्दी विक्रमी होती. राज ठाकरे यांच्या वाक्यावाक्याला मिळणारा प्रतिसादही ऐतिहासिक होता. सर्वसाधारणपणे महापालिकांच्या निवडणुकीच्या सभा एवढ्या प्रचंड होत नाहीत. त्या दृष्टीने विचार केला असता राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने एका विक्रमाची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या दसरा महोत्सवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी झालेली निवड राज ठाकरेंनीच केली होती,
असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. त्याशिवाय राज ठाकरे आपली नक्कल करतात, असेही त्यांचे नाव न घेता म्हणाले. अर्थात लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत काकांनी असे आरोप केल्यानंतर पुतण्याने डोंबिवलीतल्या विक्रमी गर्दीचा फायदा घेऊन त्या सर्व आरोपांचा समाचार घेणे साहजिकच होते. राज ठाकरे यांनीही त्याचा खास ठाकरी शैलीमध्ये समाचार घेतला. या निमित्ताने राज ठाकरे यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना लक्ष्य केलेच पण प्रथमच त्यांचे विडंबनही केले. शिवसेनेमध्ये भांडणे होऊन राज ठाकरे बाहेर पडले असले तरी त्यांनी आजपर्यंत तरी बाळासाहेबांवर कधी शरसंधान केले नव्हते आणि त्यांच्याविषयी आपल्याला आ
रच आहे असे आवर्जून सांगितले होते. यावेळी मात्र त्यांनी बाळासाहेबांवर टीकाच केली असे नाही तर त्यांची निर्भत्सनाही केली. मध्यंतरीच्या काळात ठाकरे जोडो नावाचे अभियान सुरू होत असल्याच्या काही बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. परंतु आता ठाकरे तोडो आंदोलन मोठ्या जोशात सुरू झाले आहे आणि या पुढच्या काळात ही भाऊबंदकी खास मराठी पद्धतीने कधीही जोडता न येण्याच्या पातळीला जाणार असे दिसू लागले आहे. मुळात बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली असली तरी आता राज ठाकरे यांनी ती प्रबोधनकारांची आहे असे म्हटले आहे. प्रबोधनकार हे माझेसुद्धा आजोबाच होते असे म्हणून शिवसेनेच्या मूळ मालकीसंदर्भातला वाद त्यांनी उकरून काढला आहे. दरम्यानच्या काळात खुद्द बाळासाहेब ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या सभेत उतरणार असल्याचे वृत्त आहे. ते मैदानात उतरले तर राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतील, अशी अपेक्षा आहे.एकंदरीत, शिवसेना आणि मनसे यांचा आधार मराठी माणूस आहे आणि तो संकुचित आहे असा विविध पक्षांचा आरोप असतो. आता तर हा आधार अधिक संकुचित होऊन केवळ ठाकरे कुटुंबातली भांडणे आणि भाऊबंदकी एवढ्यापुरताच मर्यादित होतो की काय, अशी शंका येऊ लागली आहे. बाळासाहेबांनी भाषण करताना राज ठाकरेंना लक्ष्य करायचे आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांवर टीका करायची एवढाच या दोन पक्षांचा अजेंडा राहिला आहे. लोकांना हे दोन पक्ष परस्परांवर अशी वैयक्तिक टीका करताना मजाही वाटत असेल, परंतु एवढ्या अजेंड्यावर त्यांचा पक्ष उभा राहणार आहे का ? घरातल्या या भांडणाचा त्यांनी एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. मुळात आता एकदा वाटणी झाली असताना, लोकांना राज ठाकरे यांचा राग काय आहे हे स्पष्ट झाले असताना हेच विषय उगाळत बसून दोन्ही बाजूंना नेम
े काय मिळणार आहे आणि जनतेच्या पदरी काय पडणार आहे याचा दोघांनीही विचार करायला हवा.राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्याला आता पाच वर्षे होत आहेत पण, ते या भाऊबंदकीच्या बाहेर यायला तयार नाहीत आणि बाळासाहेबही राज ठाकरे यांना अनुल्लेखाने मारून आपली प्रतिष्ठा सांभाळायला तयार नाहीत. अशा या पोरखेळात जनतेचे सारे आणि खरे प्रश्न बाजूला पडत आहेत. या दोन्ही पक्षांपैकी एकानेही महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आजच्या वाढत्या शहरांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय याबाबत एक चकार शब्दही उच्चारलेला नाही. खरे तर उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करणे योग्य की अयोग्य या प्रश्नापेक्षा डोंबिवलीतली गुंडगिरी, बकालपणा, भ्रष्टाचार आणि प्रदूषण हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत. केवळ याच शहराचे नव्हे तर अन्य नवशहरांमध्ये वाढत असलेली अतिक्रमणे, गुन्हेगारी, मुलभूत सुविधांचा अभाव आणि औद्योगिकरणामुळे होणारे प्रदूषण हे प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. जागांचे गगनाला भिडलेले भाव, त्यामुळे निवासाची निर्माण होणारी समस्या, वाढती बेरोजगारी, आरोग्याची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. पण त्यावर बोलले जात नाही. अन्य निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीसाठी विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिध्द झाले आहेत. आजकाल मतदारांना खूष करण्यासाठी जाहीरनाम्यात भरमसाठ आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात ती आश्वासने पाळण्यासाठी नसतात असाच समज आहे. त्यामुळे निदान
चर्चेतून तरी आपल्या समस्यांवर पुरेसा प्रकाश
टाकला जावा अशी जनतेची अपेक्षा असते. आणखी एक बाब म्हणजे अशा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधार्यांनाही जनतेच्या प्रश्नांची तीव्रता खर्या अर्थाने उमगत असते. जनतेच्या या समस्यांकडे राजकारण्यांचेही लक्ष असायला हवे. त्यांनी आपल्या व्यापक संघटनाचा वापर करुन स
स्यांची सोडवणूक करायला हवी. पण याही बाबतीत निराशा वाट्याला येत आहे.वास्तविक या निवडणुकीत आजवर जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयश आल्याबद्दल विरोधकांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले पाहिजे. त्यांची जनतेच्या प्रश्नांसंदर्भातली उदासिनता समोर आणायला हवी. पण तसे होण्याऐवजी प्रमुख पक्ष एकमेकांवर आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर हे दोन्ही पक्ष कधी काळी बोललेच तर आमच्या हाती सत्ता द्या, सारे काही सुतासारखे सरळ करतो अशा दमबाजीच्या भाषेच्या पलीकडे काहीही ऐकायला मिळत नाही. डोळ्यासमोर शहरांच्या विकासाची ठोस योजना नाही, आजच्या आणि उद्याच्या समस्यांचा अभ्यास किंवा चिंतनही नाही. अशा परिस्थितीत निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने लोकांची करमणूक करण्याचे काम मात्र जारी आहे. (अद्वैत फीचर्स)
— अभय अरविंद
Leave a Reply