नवीन लेखन...

भाऊबीज

डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं. आज जर ही गाडी चुकली असती तर सकाळचा साडे नवाचा इंटरव्ह्यू हातून गेला असता आणि पर्यायाने घराची दारं त्याच्या साठी बंद झाली असती कारण यावेळी त्याच्या वडिलांनी…अर्थात अप्पांनी त्याला निर्वाणीचा इशारा दिला होता . कारण संजीव चा स्वभाव पडला सरळ मार्गी, कुठला ही अन्याय, राजकारण आणि चापलुसी सहन न करणारा .त्यामुळे गेल्या दोन वर्षांत त्याने तीन नोकऱ्यांवर पाणी सोडलं होतं आणि मग आप्पा आता जाम चिडले होते, कुठल्या ही परिस्थितीत उद्याचा इंटरव्ह्यू यशस्वी करावाच लागणार होता.. याच विचारात तो त्याच्या बोगी नंबर एस फोर मधील सीट नंबर बत्तीस च्या शोधार्थ निघाला . यावेळी त्याला खिडकी जवळचा वरचा बर्थ मिळाल्याने तो खुश झाला, हा बर्थ एका बाजूला असल्याने मग गाडीत बाकी कोणाचा त्रास होत नाही, वर बॅग टाकून तिथे खालीच बूट वगैरे काढून ” आता सकाळी साडेसात ला दादर, मग एखाद्या छोट्या लॉज मध्ये थोडं फ्रेश होऊन साडे नऊला प्रभादेवी ला कंपनीत इंटरव्ह्यू साठी पोहोचायच बस् .. नो टेन्शन ” या विचारात बर्थ वर चढताना त्याने एकदा डब्यात कोण कोण आहे ते पाहायला सहज नजर फिरवली … समोर च्या बाजूला पाच सहा जणांचे एक मारवाडी की सिंधी कुटुंब जेवणाचे डबे उघडून जेवायच्या तयारीत होतं, पोरा बाळांचा दंगा सुरू होता, त्याच्या बर्थ च्या खालच्या बाकड्यावर दोन मध्यम वयीन माणसं आणि त्यांच्या मध्ये एक साधारण चौदा पंधरा वर्षांची मुलगी बसली होती तर समोरील बर्थ वर एक काळा सावळा पण बेरकी चेहऱ्याचा मनुष्य आडवा पडला होता .. थोड्या वेळाने त्या कुटुंबाचे जेवण वगैरे झाले आणि आता ते झोपायच्या तयारीला लागले, संजीव देखील एव्हाना बॅग उशी सारखी डोक्याखाली घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता तेव्हढ्यात त्याला ” अंकल ऐसे यहां हात मत लगाओ ना प्लीज ” असा आवाज आला आणि त्याने वरून मान खाली वळवत त्या खाली बसलेल्या मुलीकडे पहिले आणि तेव्हाच तिने संजीव कडे पाहीले, का कुणास ठाऊक त्या मुलीच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात त्याला एक प्रकारची व्याकुळता, असुरक्षिततेचे भाव जाणवले . संजीव ने तिच्या सोबत असलेल्या दोघांना विचारलं ” काय झालं? कोण आहे ही मुलगी? कुठे निघालाय? ”

त्या दोघांनी एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्या वरच्या बर्थ वरच्या बेरकी माणसाकडे पाहिलं आणि त्यातला एक जण म्हणाला ” कुछ नहीं साब, मुंबई जा रहे हैं , भतीजी हैं हमार, आप सो जाईये ! ” थोड्या वेळाने पुन्हा त्या मुलीचा आवाज आणि तिला त्या माणसाने दटावल्याचा आवाज आला आणि मग मात्र संजीव ला काही तरी ” काळंबेरं” असल्याची शंका आली आणि त्याने थोडा विचार करून बर्थ वरून खाली येत तडक विचारणा केली ” क्या हो रहा है? लडकी क्यो रो रही हैं? ”

तोवर तो बेरकी माणूस देखील खाली उतरून आला आणि या वेळेस त्याने उत्तर दिलं ” क्या हुवा साब, बोला ना आपको हमारी भतीजी हैं ये, उसके मामा के पास ले जा रहे है मुंबई, आप अपना अपना काम देखो ना ! जाओ सो जाओ ” त्याचा आवाज आता जरा चढला होता आणि त्या सोबतच दारूच्या वासाचा घाणेरडा भपकारा ही संजीव ला जाणवला ” डब्यातील इतर मंडळी आपण बरं आणि आपलं काम बरं या आविर्भावात या संभाषणापासून आलीप्त होती ….

थोडा विचार करून अखेर संजीव पुन्हा वर येऊन पडला, ते तिघे देखील दबक्या आवाजात कुजबुज करून आपापल्या जागेवर गेले ..

संजीव च्या मनातील संशय आता बळावत चालला होता, कदाचित त्या मुलीचं अपहरण करून नेत असावेत अशी शंका त्याला वाटत होती .. त्याने वरूनच हळूच मोबाईल मधून त्या सगळ्यांचे फोटो काढले आणि ” आता काय करायचं? ” याचा विचार करू लागला ….

काही वेळाने अचानक काही तरी सुचल्या प्रमाणे तो चटकन खाली उतरून डब्याच्या दरवाजा पाशी गेला आणि त्याने त्याच्या मित्राला … दिग्विजय ला फोन केला, दिग्विजय मुंबईत एका वृत्त पत्रात शोध पत्रकारिता करायचा आणि तोच काही तरी आपल्याला सुचवेल ही संजीव ला खात्री होती, पण नेमकं त्यावेळेस तो एका कामा निमित्त नाशिक ला गेला होता पण दिग्विजय ने सगळं ऐकून घेतलं आणि त्याला काही सूचना दिल्या,  संजीव ने मघाशी काढलेले सगळे फोटो त्याला व्हॉटसअप वर पाठवले आणि मग जरासा निर्धास्त आणि निवांत होत तो त्याच्या जागेवर आला .. डब्यात अंधार झाल्यावर मात्र तो अधून मधून खाली नजर टाकीत किंवा काही बाही आवाज करीत आपण अद्याप जागे आहोत घाबरु नकोस. याची जाणीव त्या मुलीला करून द्यायचा प्रयत्न करीत होता…

कशी एकदा सकाळ होते आणि दादर स्टेशन येतंय असं त्याला झालं … स्टेशन येताच तो पटकन बॅग घेऊन खाली आला, ती तीन माणसं देखील त्या मुली सहित उतरण्याची तयारी करू लागली …

बोगीच्या दारापाशी येऊन संजीव ने बाहेर नजर फिरवली आणि ती चार पाच जणं त्याच्या नजरेस पडली, सध्या वेशात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील करडेपणा पाहून संजीव ने ओळखले की हे दिग्विजय च्या ओळखीचे पोलिस आहेत, त्यांची आणि संजीव ची नजरानजर झाली आणि डोळ्यां नीच खुणावत संजीव ने त्यांना ती मुलगी आणि तीन इसम दाखवले, त्या पोलिसांनी चटकन पुढे येत त्यांना थांबवलं आणि ” टिकट दिखाओ … कहा से आये हो? ? और ये लडकी कौन है? ” अशी टिपिकल पोलिसी खाक्यात चौकशी केली ….

तिघांनी चपापून एकमेकांकडे पाहिलं आणि तेव्हढ्यात त्यांचं संजीवकडे लक्ष गेलं व एकंदरीत परिस्थिती ची त्यांना जाणीव झाली.. मग जरा सावरून त्यातील एक जण खिशातून तिकिटे काढत म्हणाला ” साब ये है ना टिकट ..देखो ना . ये भतीजी हैं हमारी ईसको मामा के पास छोडने आये है ! ” त्या मुलीकडे पहात एका पोलिसाने विचारले ” क्या नाम है इस लडकी का? ” ” गौरी … गौरी नाम है इसका साब ” त्या तिघांपैकी बेरकी माणूस उत्तरला … तसं इतक्या वेळात पहिल्यांदाच त्या मुलीने तोंड उघडलं ” नाही गौतमी नाव आहे माझं ” …

आणि मग ते तिघे ही गडबडले …. आणि अनुभवी पोलिसांच्या ध्यानात सगळा प्रकार आला आणि मग त्यांनी आपलं अस्सल रुप धारण करीत तिघांना ताब्यात घेतले व ही सगळी वरात पोलिस स्टेशन ला आली, तिथे पोलिसांना काही फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत आणि दोन चार दंडुके पडताच त्या तिघांनी तोंड उघडलं आणि मग गौतमी ने ही थोडंसं मराठी, थोडं हिंदी अस बोलत सर्व प्रकार कथन केला ….

” हुबळी जवळील शिवगिरी गावातील ती मुलगी होती. वयस्क वडील आणि सावत्र आई सोबत राहायची, महिना भरा पूर्वी वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने छळ सुरू केला, आणि अखेर चाळीस हजारासाठी पश्चिम बंगाल मधल्या एका टोळीला तिला विकून टाकली होती,  मुंबईच्या मामा कडे पुढील शिक्षण घ्यायला जायचं आहे असं सांगून या तिघांसोबत तिला पाठवण्यात आलं होतं, नंतर एक दोन दिवसात तिकडून एजंट लोक तिला तिकडे घेऊन जाणार होते ….

हे सगळं ऐकून संजीव च्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने पुढचा मागचा विचार न करता तिथेच त्या बेरकी माणसाच्या कानशिलात भडकावली ! बाकी पोलिस चौकीतील सोपस्कार पूर्ण होऊ पर्यंत साडे आठ वाजून गेले ..आता बहुतेक इथूनच तडक इंटरव्ह्यू ला जावं लागणार असा विचार संजीव च्या मनात आला तेव्हढ्यात तिथल्या इन्स्पेक्टर ने पुढील समस्या मांडली ” आता हिचं काय करायचं? ” गौतमी कडे बोट दाखवत त्याने संजीव ला विचारलं …

” म्हणजे? ? ” चक्रावून जात संजीव म्हणाला ” अहो साहेब आता या पोरीला परत तर त्या सावत्र आई कडे पाठवू नाही शकत, उलट तिलाच अटक करण्यासाठी आम्ही पथक पाठवणार आहोत, हिचे बाकी कोणी नातेवाईक पण नाहीत ….एक तर इथल्या पोलिस रिमांड होम मध्ये पाठवावं लागेल नाहीतर …एखाद्या संस्थेत …!” गौतमी च्या चेहऱ्यावरील व्याकुळ भाव, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुं मुळे गालावर आलेले ओघळ, यामुळे कुठे तरी संजीव ही कासावीस झाला, त्याला वाईट वाटत होतं पण तो ही हतबल होता . एकीकडे नोकरीचा पत्ता नाही, घरी परत जायला मिळेल याची शाश्वती नाही …त्यात हीची जबाबदारी कुठून घ्यायची? पण तिला एखाद्या अनोळखी संस्थेत, लोकांमध्ये किंवा रिमांड होम मध्ये पाठवावं हे ही त्याला पटत नव्हतं, हे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे होते …

तेव्हढ्यात गौतमी संजीव जवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली ” दादा..मी परत घरी नाही जाणार..नको पाठवू मला !” आणि रडू लागली ..

संजीव आता विरघळून गेला होता..

पुन्हा एकदा त्यानें मदतीसाठी दिग्विजय ला फोन करून सगळी परिस्थिती कथन केली आणि ही नवीन अडचण ही सांगितली ..

” अरे तुला आपल्या बॅच ची ती कविता आठवते का? आपण डॅशिंग डॉन चिडवायचो…. ” त्याने संजीव ला विचारलं ” कोण? ती बॉय कट वाली? कविता ठाकूर? ” संजीव ने आठवणींना उजाळा देत विचारलं …

” येस तीच …. ती सध्या बरच सामाजिक कार्य करते अनाथ किंवा दिव्यांग मुलांसाठी, तिची काही मदत होते का पहा… मी तुला नंबर व्हॉटसअप करतो…” दिग्विजय ने तोडगा सुचवला होता …

त्यानुसार मग कविताशी बोलणं झालं, तिने मदतीचे आश्वासन देत संजीवला एका तासाने फोन करायला सांगितला …

मग पोलिसांना तसं सांगून तो गौतमी ला घेऊन पुन्हा स्टेशन वर आला . पिशवीतून पाण्या ची बाटली काढून त्याने गौतमी समोर धरली तिने अधाश्या प्रमाणे ते पाणी गटागटा पिऊन घेतलं ..ते पाहून तिला भूक लागली असावी म्हणून त्याने विचारणा केली तसं चटकन मान होकारार्थी हलवत ती उत्तरली ” हो दादा… दोन दिवस काही खाल्लं नाही ” …

मग मात्र तो पुरता कळवळला, तिला घेऊन कॅन्टीन कडे गेला.. इंटरव्ह्यू ची वेळ एव्हाना उलटुन गेली होती डोळ्यांसमोर आप्पांचा चेहरा दिसत होता पण ” जाऊ दे जे व्हायचंय ते होऊ दे …पण या मुलीची योग्य ठिकाणी सोय होऊ दे मग बाकीचं बघू ” असा विचार करत त्याने गौतमी साठी वडा सांबार, डोसा वगैरे पदार्थ मागवले आणि दोन दिवसांच्या भुकेल्या गौतमी ला ते पोटभरून खाताना पाहताना त्याचे डोळेही नकळत समाधानाने पाणावले .. …

त्याने तेव्हढ्यात इंटरव्ह्यू च्या ठिकाणी फोन करून हा सगळा प्रकार सांगून इंटरव्ह्यू साठी दुसरी वेळ मिळते का याची चाचपणी केली पण ती कंपनी मोठी आणि बहुराष्ट्रीय असल्याने त्यांना वेळेचं महत्त्व भारी ! मग संजीव च्या विनवणी ला केराची टोपली दाखवली गेली, तश्याच परिस्थितीत तो मग टॅक्सी करून कविताने सांगितलेल्या संस्थेच्या ..अर्थात ” यशस्विनी ” या महिलांच्या संगोपनासाठी असलेल्या संस्थेच्या दिशेने निघाला …कविता ही तिथेच येणार होती.

टॅक्सी मध्ये बसल्यावर ” आता पुढे काय? नोकरी तर हातची गेली, आप्पांना काय उत्तर द्यावं? ” हे सर्व विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले, त्याच्या शेजारी बसलेली गौतमी थकल्या मुळे म्हणा किंवा सुटकेच्या समाधानाने निर्धास्त पणे तिच्या या नवीन दादा च्या मांडीवर डोकं ठेवून झोपली देखील .

तिने निर्धास्त पणाने आणि विश्वासाने असं झोपलेलं पाहून संजीव ला एक वेगळंच समाधान वाटून गेलं. एकुलता एक असल्याने एका बहिणींचं प्रेम, ती माया त्याला कधीच मिळाली नव्हती ..

या विचारात असतानाच त्याचा फोन वाजला, आप्पांचा फोन होता . तो विचारातून एकदम भानावर आला, ” आता यांना काय उत्तर द्यावं? ” असा विचार करत करत त्याने उत्तर देऊन टाकलं ” आप्पा इंटरव्ह्यू चांगला झाला, पण उद्या दुसरा राऊंड आहे, त्यानंतर फायनल कळेल ” असं नकळत पण खोटंच उत्तर देऊन उद्या पर्यंत ची वेळ मारून नेली तर खरं, पण उद्या काय करायचं? हा यक्ष प्रश्न होता . पण ” जाऊ दे उद्याच उद्या पाहू ” असा विचार करत तो खिडकीतून बाहेर पाहू लागला,  ” यशस्विनी ” च्या कार्यालयात पोहोचल्यावर कविता च्या ओळखीने त्या संस्थेत गौतमी साठी जागा तर मिळाली पण ती संस्था धर्मादाय नसल्याने गौतमी ला एखादं काम किंवा नोकरी वजा कोर्स मिळे पर्यंत तिच्या मासिक खर्चापोटी ठराविक रक्कम त्या संस्थेत दरमहा जमा करावी लागणार होती ! पण आता दुसरी कडे पुन्हा शोधा शोध कुठे करायची? आणि कविता च्या चांगल्या माहितीतील ही संस्था असल्याने गौतमी साठी ती सुरक्षित ही होती …. मग अखेर त्यासाठी ही संजीव ने होकार देत दरमहा ठरलेली रक्कम जमा करण्याचे वचन देत गौतमीचा निरोप घेतला …अर्थात कदाचित कुठल्या भयानक संकटातून ह्या ‘ दादाने ‘ आपली सुटका केली आहे ह्याची कदाचित तिला जाणीव नसली तरीही ” दादा मला इथे सोडून जाऊ नकोस, तू पुन्हा इथे येणार ना मला घ्यायला? ” रडकुंडीला येत अशी आर्जव करणाऱ्या गौतमी ला सोडून जाताना संजीव ला देखील भरून आल होतं, अर्थात आपल्याच भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज नसताना हीची जबाबदारी कुठून पार पाडायची? या विचारात तो तिथून निघून चौपाटीवर अथांग पसरलेल्या सागराच्या लाटा न्याहाळत वाळूवर बसून विचार करत बसला ” आता उद्याचं काय? आप्पांना काय सांगायचं? गौतमी चे दर महिन्याचे पैसे कुठून भरायचे? ” तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला ..आणि नंबर बघून त्याचा स्वतः च्या डोळ्यांवर विश्वास बसेना… ” सकाळी तिथला इंटरव्ह्यू त्याने चुकविला होता, त्या कंपनीतून फोन होता … ” आजचे इंटरव्ह्यू तर पार पडले होते पण ” आमच्या कंपनीच्या नवीन युनिट साठी आम्हाला अनुभवी अधिकारी हवाय, तुम्ही मुंबईतच असाल तर उद्या साडे नऊ वाजता ऑफिस ला या ” असे सकाळच्या त्या अधिकाऱ्याने सांगितले आणि आपल्या आजूबाजूला कोणी आहेत याचा विचार ही न करता संजीव ‘ या हू… ‘ असं जोरात ओरडला …

” च्यायला… म्हणावं तेव्हढ काही नशीब वाईट नाही राव आपलं ” असा विचार मनातल्या मनात करीत तो तिथून उठून चालू लागला…

अर्थातच संजीव ची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि एकंदरीत व्यक्तिमत्व या जोरावर त्याने तो इंटरव्ह्यू ‘ फत्ते ‘ केला आणि त्याची कंपनीच्या अहमदाबाद च्या युनिट साठी मॅनेजर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र त्याला मिळाले ….

घरी फोन करून आप्पांना ही खुश खबर सांगताच त्यांचा ही जीव भांड्यात पडला तर एकुलता एक मुलगा आता नोकरी साठी एव्हढ्या लांब जाणार म्हणून आई ला काळजी लागली, तर आता आपण ही स्थिर स्थावर होणार आणि कबुल केल्या प्रमाणे गौतमी साठी काही तरी करता येणार याचे समाधान संजीव ला होते …

त्याप्रमाणे मग आठ दिवसांचे ट्रेनिंग संपवून संजीव अहमदाबाद येथे रुजू झाला. इथे तो स्वतः च त्याच्या मर्जीचा मालक असल्याने मन लावून काम केले, थोड्याच अवधीत त्याच्या मुळे अहमदाबाद युनिट टॉप टेन मध्ये झळकले अश्या रीतीने संजीव ची जोमात प्रगती सुरू असताना मात्र तो गौतमी ला विसरला नव्हता, न चुकता दरमहा ठरलेली रक्कम ” यशस्विनी ” च्या खात्यात जमा होत होती, कविताच्या माध्यमातून त्याला गौतमी ची ख्यालखुशाली देखील समजत होती, गौतमी मुळातच हुशार आणि विनयशील असल्याने तिने त्या संस्थेत मनापासून अभ्यास आणि सोबत काम ही सुरू केलं, चांगल्या मार्कांनी दहावी आणि बारावी पास झाल्यावर संस्थेच्या माध्यमातून तिला मुंबईतच एका नामांकित हॉस्पिटल मध्ये मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी च्या कोर्स मध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच काम ही मिळालं आणि तिच्याच विनंती वरून ” यशस्विनी ” च्या पदाधिकाऱ्यांनी संजीव ला कळवले की आता गौतमी ला पुरेसा स्टायपेंड मिळत असल्याने आता तिच्या या ‘ दादा ला ‘ तिच्या साठी दरमहा पैसे पाठवायची गरज नाही …

” गौतमी आता मोठी झाली, स्वतः च्या पायावर उभी राहिली ” असा विचार संजीव च्या मनात आला आणि त्याला त्या रात्री ट्रेन मध्ये भेटलेली भेदरलेली गौतमी आठवली आणि मन अभिमानाने भरून आले…

अर्थात् काळ काही कोणासाठी थांबत नसतो, अनेक वर्षे अशीच निघून गेली, कंपनी ने आता संजीव वरील जबाबदारी वाढवली आणि प्रमोशन देऊन त्याच्या कडे स्पेन व इटली ची युनिट सोपविली आणि संजीव आता भारता बाहेर पडला, दरम्यान घरच्यांनी देखील त्याच्यावर सांसारिक जबाबदारी सोपवली होतीच, यथावकाश त्याचे लग्न झाले आणि आता त्याला तीन वर्षांचा एक मुलगा ही होता..

परदेशी स्थायिक झाल्या पासून आता त्याला गौतमी बद्दल वरचेवर माहिती मिळणं कठीण झालं, आता ती एका हॉस्पिटल मध्येच चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून व्यवस्थित सेटल झाली होती एवढंच त्याला समजलं होतं. कविता देखील लग्न करून आता दिल्लीत स्थायिक झाली होती त्यामुळे तिच्या शी ही संपर्क होत नव्हता ….

बऱ्याच वर्षांनी यंदा संजीव ला दिवाळीच्या तोंडावर सुट्टी मंजूर झाली होती आणि भरपूर म्हणजे तीन आठवडे तो ” सून बाई आणि नातवा” सोबत घरी येणार होता म्हणून आप्पा आणि आई चां आनंद गगनात मावेनासा झाला होता, ठरल्या प्रमाणे दिवाळीच्या आदल्या दिवशीच दुपारी तो स्पेन हुन मुंबईत पोहोचणार होता आणि रात्री ट्रेन पकडून दिवाळी च्या पहाटे त्याच्या गावात … घरी .

दुपारी मुंबईत आल्यावर रात्री पर्यंत बराच वेळ हातात होता ..आणि मग त्याने तडक टॅक्सी पकडून ” वरळी चलो ” असं टॅक्सी वाल्याला सांगून यशस्विनी च्या कार्यालयाचा मार्ग धरला, इतक्या वर्षांनी गौतमी ला भेटायला तो उत्सुक होताच पण त्याच्या हुन जास्त उत्सुक त्याची बायको ” सुनेत्रा ‘ होती . संजीव कडून गौतमी बद्दल, त्या ट्रेन मधल्या प्रसंगा बद्दल तिने इतकं ऐकलं होतं की कधी एकदा यशस्विनी ची बिल्डिंग येते आणि संजीव च्या या खास बहिणीला आपण भेटतोय असं तिला झालं होतं .

तिथे पोहोचल्यावर संस्थेच्या संचालिका मोहिनी गुप्ते यांनी संजीव ला लगेच ओळखले आणि त्याचे स्वागत केले ….

त्यांच्या सोबत जिना चढून ऑफिस मध्ये जात असताना अचानक संजीव ला छातीत एक कळ आली व भोवळ आली, जिन्याच्या कठड्याचा आधार असून ही तो जागीच कोसळला आणि एकच धावपळ उडाली, सुनेत्रा तर प्रचंड घाबरली तिला काही सुचेना … इतक्या वर्षांत असं काही पहिल्यांदाच घडलं असावं , गुप्ते मॅडम नी प्रसंगावधान राखत चटकन ऑफिस मधील एक दोन स्टाफ ला मदतीला बोलावले आणि अॅम्ब्युलन्स ची वाट न पहाता स्वतः च्या कार मधून चटकन संजीव ला ” जवळच्याच ‘ मेडी प्लस हॉस्पिटल ‘ मध्ये नेले, सुनेत्रा भेदरलेल्या अवस्थेत होती, त्यात ही तिने फोन करून आप्पा आणि आईंना परिस्थिती कळविली,  हृदविकाराचां कोणता ही पूर्वेतिहास नसताना संजीव ला हार्ट अटॅक आल्याचे निदान झालं होतं, एक छोटीशी सर्जरी करावी लागणार होती .. आय सी सी यू मध्ये दाखल करण्यात आलं, मेडि प्लस चे सर्व डॉक्टर आणि स्टाफ धावपळ करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या सुनेत्रा आणि तिच्या लहानग्या ची व्यवस्थित काळजी घेतली जात होती, दिवाळीच्या पहिल्या दिवशी संजीव च्या स्वागतास आतुर झालेले आई – आप्पा मिळेल ती गाडी पकडून मुंबई साठी रवाना झाले होते, वेळ न दवडता ऑपरेशन झाले आणि संजीव आता सुखरूप होता … त्याची दिवाळी मात्र दवाखान्यातच गेली, लक्ष्मी पूजन … पाडवा गेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला खूपच बरं वाटू लागलं, संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार होता, त्याच्या खोलीत आई आप्पा बसले होते, सुनेत्रा आवराआवर करीत होती, त्याचं पिल्लू त्याला बिलगून बसलं होतं आणि तेव्हाच राऊंड वर आलेल्या डॉक्टर मनोज कर्णिक यांनी सुहास्य वदनाने प्रश्न केला ” गुड मॉर्निंग … काय म्हणतोय पेशंट?  इज एवरिथींग फाईन? ” आणि संजीव चे रिपोर्ट्स पाहू लागले …

सुनेत्रा कडून संजीव ला समजले होते की डॉक्टर मनोज आणि संपूर्ण स्टाफ नी किती काळजी पूर्वक सर्व परिस्थिती हाताळून त्याची देखभाल केली होती … त्यामुळे संजीव ने ही अक्षरशः हात जोडून त्यांचे आभार मानले …व कृतज्ञता व्यक्त केली ” सुनेत्रा प्लीज कार्ड ने पेमेंट करून दवाखान्याचे बिल सेटल करून टाक …म्हणजे नंतर गडबड नको ” असे त्याने सुनेत्रा ला सांगितले आणि त्याप्रमाणे सुनेत्रा उठू लागली तेव्हढ्यात डॉक्टर मनोज हसत हसत म्हणाले …

” त्याची काही गरज नाही .. थांबा ! ”

” म्हणजे? का? ” आश्चर्य वाटून संजीव ने विचारले ” आमच्या हॉस्पिटल ची पॉलिसी च आहे तशी ” अजून हि डॉक्टर मनोज मंद स्मित करतच होते ” मला नाही समजले ” संजीव अजून ही प्रश्र्नंकित होता ” आमच्या हॉस्पिटल पॉलिसी नुसार स्टाफ च्या फॅमिली मेंबर्स चे पैसे आम्ही घेत नाही ” डॉक्टर मनोज ने अजून एक गुगली टाकली ….

संजीव अजून ही चक्रावलेल्या स्थितीत होता ..काहीच उलगडा होत नव्हता, पण मग त्याला फारसे अवघडून न ठेवता त्याच्या जवळ येऊन बसत डॉ. मनोज ने खुलासा केला ” संजीव दादा… हे हॉस्पिटल माझे व माझ्या पत्नीचे म्हणजे गौतमी मनोज कर्णिक चे आहे आणि मेव्हण्या कडून मी पैसे कसे घेऊ? ते ही आजच्या भाऊ बीजेच्या दिवशी?  अहो बायको मला कच्चा खाईल ” या वाक्यातील एक एक शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संजीव करीत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारे ते हरवलेले भाव पाहून डॉ मनोज हसत होता..

तेव्हढ्यात संजीव ला भेटायला गुप्ते मॅडम आल्या आणि त्यांनीं बाकीचा खुलासा केला ..

” गौतमी ने एका चांगल्या मार्कांनी शिक्षण पूर्ण केले, हॉस्पिटल मधला कोर्स केला, तिला आणि खूप मेहनत करून या हॉस्पिटल मध्ये ती जॉइन झाली, कामात तर ती हुशार आहेच पण मेहनती व लाघवी स्वभावा मुळे इथे थोड्याच अवधीत सर्वांची लाडकी बनली, डॉ मनोज च्या सोबतीने तिने हे हॉस्पिटल चांगलंच नावारूपाला आणलं आणि यथावकाश या दोघांच्या अनुरूप जोडीने आयुष्याच्या वाटेवर ही एकमेकांचे साथीदार बनण्याचे ठरवले ….

पण त्यासाठी गौतमीची एक अट मात्र होती ” यशस्विनी मध्ये राहणाऱ्या कुठल्या ही मुली कडून या हॉस्पिटल मध्ये उपचाराचे पैसे घ्यायचे नाहीत ” आणि आजतागायत हे इथ पाळलं जातं …

संजीव जी तुम्ही येणार आहात हे माझ्या कडून तिला समजल्या पासून तर तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं तुम्हाला सरप्राइज द्यायची तिची ईच्छा होती पण तुम्हाला अटॅक आल्याचं समजताच तिला स्वतः लाच मोठा धक्का बसला, मग इथे तुम्हाला आणलं आणि पुढची सगळी व्यवस्था तिनेच पहिली….

हे सगळं संजीव साठी खूपच सुखद आणि आश्चर्य कारक होतं .. त्याची नजर गौतमी ला शोधू लागली … ते लक्षात येताच डॉ मनोज हलकेच त्याचा हात दाबत म्हणाले ” येईल ती इतक्यात ….खास तुमच्या साठी एक भेट आणायला गेली आहे ती, आज भाऊबीज आहे ना !” आणि हे वाक्य पूर्ण होतंय तोवर खोलीचं दार उघडून एखाद्या नुकत्याच उमललेल्या बट मोगऱ्या प्रमाणे प्रसन्न हसत हसत गौतमी ने प्रवेश केला ” कसं वाटतंय दादा?  बरं वाटतंय ना? ” हा प्रश्न करीत ती संजीव समोर येऊन उभी राहिली आणि संजीव अविश्र्वासाने तिच्याकडे पाहू लागला ….

काही वर्षांपूर्वी ट्रेन मध्ये भेटलेली …. दादा सोडून जाऊ नको म्हणून विनवणारी दोन वेण्या घातलेली पोरासवदां गौतमी आता एक उंची पुरी सुंदर तरुणी झाली होती …बाहेर कुठे अशीच भेटली असती तर ओळखलच नसतं ! हां तिचे ते काळेभोर टपोरे टपोरे बोलके डोळे मात्र जसे च्या तसे होते … पाणीदार .. सर्व काही बोलून जाणारे !! तिने तिच्या खास ” दादा ” साठी आणलेलं सुंदर घड्याळ त्याला भेट दिलं .. कदाचित या अविस्मरणीय क्षणाला साक्षीदार म्हणून खूप योग्य होतं ते…

संजीव ने मग गौतमी आणि मनोज ला समोर बसवून त्यांचे आभार मानले पण ” अरे दादा आभार मानून आम्हाला लाजवू नकोस आज मी इथे आहे .सक्षम आहे स्वतः च्या पायावर उभी आहे …या सगळ्या आयुष्याचं श्रेय तुला जातं रे, कदाचित कुठल्या ही भावाने एखाद्या अनोळखी बहिणीसाठी एव्हढ केलं नसतं ” पुढचे शब्द मात्र तिला बोलता आले नाहीत कारण त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी आणि घश्यात आवंढा असं एकदमच आलं होतं या अश्या जगावेगळ्या भाऊ बीजे चे साक्षीदार असलेले त्या खोलीतील प्रत्येक जण थोड्या फार फरकाने अश्याच अवस्थेत होते..

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..