आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..तसंच भाऊबिजेचंही..! भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक गहीरं करणारा हा दिवस मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..सर्वसंपन्न, सामर्थ्यवान पण ज्याला बहिण नाही असा पुरूष या दिवशी स्वत:ला रिता रिता समजत असेल यात शंका नाही..
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज… भाऊ बहिणीच्या घरी जातो..या दिवशी बहिण भावाला ऒवाळते..जर काही कारणाने भाऊ बहिणीच्या घरी जाऊ शकला नाही किंवा तीला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते… उगाच नाही चंद्रावा ‘मामा’ म्हणत..!
माझी आई देवगडची. सहा बहिणी आणि दोन भाऊ अशी सख्खी भावंडं..प्रचंड निस्वार्थी प्रेम या आठ भावंडांमध्ये..भावा-बहिणींमधल्या नात्याचं महत्व माझ्या मनावर आपसूक बिंबलं गेलं ते माझ्या आजोळी..आई तेंव्हा नेहेमी म्हणायची की भाऊ म्हणजे नागोबा असतो. ती तसं का म्हणायची हे कळायचं नाही. पण ती असंही सांगायची की नागपंचमीचा सणही भावांसाठी असतो..नागपंचमीच्या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमीचा उपवास करते..माझी आई माझ्या बहिणींना माझ्यासाठी उपास करायला लावायची..भाऊ ‘नाग’स्वरूप का हे पुढे मला आपल्या संस्कृतीचं स्वयंअध्ययन करताना काहीसं समजलं..
भाऊबिजेचा सणही आपल्या थोर ‘कृषीसंस्कृती’शी सुसंगत असून आपल्या प्राचिन संस्कृतीतील अनेक प्रतिंकांसारखं अद्याप शिल्लक असलेलं प्रतिक आहे..आपल्या संस्कृतित नागाला भाऊ मानलं गेलं आहे…भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून ओवाळते हे ही आपण वर पाहिलं..चंद्र आणि नाग दोन्ही शेतीसाठी उपयुक्त आहेत हे आपल्यापैकी अनेकांना ऐकून-वाचून तरी माहिती असेल…चंद्राचं महत्व आयुर्वेदाचा अभ्यास करणारांना अधिक चांगलं माहित असतं..शेती शोधलीच ‘स्त्री’ने आणि अशा बहिणरूपी स्त्रीने, तिला उपकारक ठरणाऱ्या नाग आणि चंद्र यांना भाऊ मानलं तर ते अत्यंत नैसर्गिक आहे..भाऊबिजेची प्रथा साजरी करण्यामागे हा महत्वाचा विचार आपल्या पूर्वजांनी केला होता असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही..या मागे आणखीही काही विचार आहेत परंतू ते इथं मांडणं अप्रस्तूत आहे. ते स्वतंत्रपणे पुन्हा केंव्हातरी सांगेन.
आता पुराणकथा काय म्हणतात ते पाहू…यमद्वितीया या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविलं होतं म्हणून ‘भाऊबीज’ हा सण साजरा करतात.
मला या कथेची सांगड पुन्हा नाग आणि चंद्राशी घालाविशी वाटते..’नाग’ किंवा सर्प हे तसं बघायला गेलं तर ‘यमा’चंच स्वरूप नव्हे काय? आणि अश्या ‘यम’रूपी ‘नागा’चा प्रसाद मिळालेला मनुष्य चंद्रा’वर’च पोचायचा (हे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे विज्ञानाने स्पष्ट करण्याच्या पूर्विचं रुपक आहे) ..म्हणून त्या यमाला प्रसन्न करून घ्यावं या अर्थाची अशी कथा लिहीली गेली असावी कदाचीत..
आपली प्राचिन कृषीसंस्कृती आणि मातृसंस्कृतीचा अभ्यास अत्यंत मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा आहे..हजारो वर्षांपूर्वीच्या संसकृतीच्या खुणा रुप बदलून का होईना अद्याप शिल्लक आहेत हे थोडंस बारकाईने पाहिलं की लक्षात येतं आणि माझां उर आपल्या संस्कृतीच्या अभिमानाने भरून येतो..
असो. वर्षभर ज्या सणाची प्रतिक्षा केली जाते तो दिवाळसण आला कधी न् संपला कधी हेच कळलं नाही. अर्थात दरवर्षी हेच घडतं म्हणा..! मला तरी प्रत्यक्ष दिवाळीच्या दिवसांपेक्षा दिवाळीचा आदला दिवस खुप आवडतो..’उद्या’ दिवाळी आहे ही भावनाच अंग रोमांचीत करते..रविवारच्या सुट्टीचा आनंद रविवारपेळा शनिवारीच जास्त होतो, तसंच काहीसं आहे हे किंवा ‘उद्या’ हा शब्दच आपल्या जीवनाचा जीवनरस आहे असं म्हटलं तरी हरकत नाही..
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply