भाव व्याकुळ मनाचा
एक ढग तरंगत आहे,
भाव मन कल्लोळात
तो ही गडगडत आहे..
थिजलेल्या अश्रुत एक
सौदामिनी अंधारुन आहे,
निःशब्द घाव सारे अबोल
विद्युलता आकाशी चमकत आहे..
एक अबोध रात्र अवेळी
हरणी व्याकुळ भयचर आहे,
पुरुष तू उन्मत होशी कधीही
वासनेत बळी तिचा जात आहे..
एक गाय करुण अशी
हंबरुन वात्सल्य मायेत आहे,
एक स्त्री मोहक साजिरी बावरी
पुरुषी नजरेत फटाकडी मस्त आहे..
कधी रे सुटेल हे ग्रहण पुरुषा
अग्निहोत्र हे असेच चालू आहे,
अबला सबला तूच ठरवीशी
कुठली ही समीकरणे आहे..
श्वास मोकळा घेऊ दे तिलाही
स्त्री ती भावुक अबोल आहे,
तुझ्याही उदरात जन्म घेते एक
कळी फुलं ती ही होणार आहे..
सावरणारे हात तुझे न मजबूत
लाज पदरात स्त्रीची जपून आहे,
एक बहीण तुला ही असते तरीही
स्त्रीचे शील भयभीत का आज आहे..
काळ बदलला जरी खरा आता
तरी स्त्री अजून मुक्त न आहे,
पुरुषी वासनेचा बळी होते ती शिकार
हरणीची शिकार लांडगे अजुनी करत आहे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply