नाशिकमध्ये माझा एक मित्र आहे. खलील जिब्राननं त्याला वेडं बनविलेलं आहे. जिब्रानच्या साहित्याचं मराठीत भाषांतर करून ते प्रकाशित करण्यासाठी मोठी पदरमोडही त्यानं करून घेतली आहे. एक चांगला वाचक, चांगला कवी असं त्याचं वर्णन होऊ शकेल. भविष्य हा
त्याच्या रोजीरोटीचा व्यवसाय. अपारंपरिक किवा पर्यायी औषध साधना हाही त्याच्या आवडीचा, संशोधनाचा विषय. अमावस्या वगळता आठवड्यातले सहा दिवस तो नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या अनेकांच्या भविष्यात डोकावत असतो किवा काही औषधे तरी देत असतो. सतत माणसात वावरणार्या या माणसाला स्वतःच्या पुस्तकाचं भविष्य मात्र पाहाता आलं नाही.
असो, तर या मित्राकडे जाऊन बसणं हाच मुळी एक जीवनानुभव असतो. डॉक्टरपढे जसा रुग्ण सहजपणे नग्न होतो तसंच माणसाचं भविष्य सांगणार्या या माझ्या मित्रापुढं अनेकांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांगून टाकलेल्या. आई-वडील-पती-पत्नी एकमेकांना सांगणार नाहीत, अशी गुपितं त्याच्या पुढ्यात खुली झालेली. माणूस कसा असतो? त्यागी, स्वार्थी, विकृत, बीभत्स की आणखी काही हे सारं त्याच्यापुढं उघड होणार्या आयुष्यात पाहता येतं. एकदा मी म्हटलं, ‘‘खलीलच्या भाषांतरांपेक्षा ही माणसांची कथा लिही, चांगला लेखक म्हणून गौरव होईल तुझा;’’ पण त्यानं ते ऐकलं नाही. असं बोलल्यावर तो फक्त हसतो, तसाच याहीवेळी हसला एवढंच. तर भविष्य अन् त्याची ओढ, त्याची उत्सुकता किती टोकाची असू शकते. याचा एक अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणून ही प्रस्तावना. अर्थात, हा अनुभव नाशिकमधल्या त्या मित्राचा नाही. तो आहे पुण्यातल्या एका स्नेहाचा. दोघांमधलं साम्य हेच, की भविष्य हाच त्यांच्या उपजीविकेचा भाग. पुण्यातला हा मित्र तर चक्क चार्टर्ड अकाउंटंट आहे; पण भविष्य हेच सूत्र महत्त्वाचं. असंच एका संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. दारातच थांबलो. कारण मित्रासमवेत एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते. बहुधा भविष्य हाच विषय असावा. मनात आलं, वयाची साठी ओलांडल्यानंतरही
भविष्याचं औत्सुक्य कायम असतं? मी म्हटलं, ‘‘चालू द्या. मी नंतर येतो,’’ मित्रानं थांबविलं. त्या वृद्धाला म्हणाला, ‘‘आपण पुन्हा भेटू, हे माझे पत्रकार मित्र आलेत, त्यांना वेळ दिली होती मी.’’ खरंतर मी त्याची वेळ घेण्याचा प्रश्न नव्हता; पण त्या वृद्धाला टाळण्यासाठी हे सारं होतं हे लक्षात आलं माझ्या. तो वृद्ध गेला. थोड्या वेळानं पुन्हा येतो म्हणाला. आता त्या वृद्धाचा विषय काढावा असं काही नव्हतं; पण मनातून प्रश्न जात नव्हता. मी दरवाजाकडे खूण करूनच विचारलं, ‘‘यांच
ं काय काम?’’ ‘‘होतं असंच काहीतरी’’ असं म्हणून मित्र ते टाळू शकला असता पण म्हणाला, ‘‘बस. सांगतो.’’ आतल्या खोलीत चहाची ऑर्डर दिली अन् त्या वृद्धाची कहाणी मी ऐकू लागलो.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply