नवीन लेखन...

भावपूर्ण

भाव प्रकट होणं म्हणजे काय?
तुकोबा म्हणतात, “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.”
म्हणजेच माझ्या मनातले विचार, माझी मनोवस्था, मनातली चलबिचल, मनातले भाव चेहऱ्यावरून, शब्दामधून, अभिनयामधून, गायनामधून किंवा आपण करत असलेल्या कोणत्याही कार्यामधून समोर येत असतात. आपल्याकडे नाट्यधर्मी, रंगधर्मी, कलाधर्मी, चित्रधर्मी, काव्यधर्मी असे शब्द पूर्वी रूढ होते. त्या त्या धर्माचं आचरण करणारा तो धर्मी. या कलेच्या परिभाषा पुढे लुप्त झाल्या. शब्दमागे उभी असलेली पवित्र भावना अर्थाद्वारे आपलं स्पंदन प्रकट करत असते. जर भावनाच गेली तर शब्द निष्प्रभ ठरतात आणि नुसती अक्षरं उरतात. आज गानधर्मी, काव्यधर्मी हे शब्द वापरात नाहीत कारण तो भाव आता शिल्लक नाही. स्पर्धा, ईर्षा सोडून जेव्हा कला जोपासली जाते तेव्हाच तिथे नेमका भाव प्रकट होत असतो किंवा एखादा विनोद आपल्याला कधी हसवतो ? जेव्हा तो नेमक्या शब्द, वजन आणि शब्दफेकीतून समोर येतो तेव्हाच. पुलंचं साहित्य अगदी आजही उत्स्फूर्त हसवतं, नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतं, आजही तितकंच ताजं वाटतं कारण त्या लिखाणतले शब्द, भाव आपल्या रोजच्या जीवनाशी जोडले जात असतात. ते वाचत असतानाच आपण अंतर्मनात आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आठवत असतो, नजरेसमोर आणत असतो. पुलंच्या साहित्याशी आपण सहज जोडले जातो कारण ते भावबंध आपल्याशी जुळतात आणि वाचता वाचता अचानक आपण मनापासून हसतो, हसत रहातो. त्या हसण्यात लिखाणाशी शंभर टक्के भाव जुळल्याचं समाधान असतं.

अनेकदा एखादी कादंबरी सर्वांगाने आपल्याला भिडून जाते. भाषाशैली , पात्रयोजना, कथानक या सगळ्यामधून ती कादंबरी आपल्या मनाची पकड घेते, प्रचंड भावून जाते. परंतू त्याच कादंबरीवर काढलेला चित्रपट कित्येकदा तेव्हढा पकड घेणारा होत नाही. तसं पाहायला गेलं तर चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम. शब्दांमधले भाव, वातावरण निर्मिती यातून जास्त सशक्तपणे व्यक्त व्हायला हवी. पण तसं न होता कादंबरी जास्त प्रभावी ठरते. कारण शब्दातून लेखकाच्या मनातले भाव आपल्याला सरळ भिडतात. पण चित्रपट काढणारा कुणी दुसरा असतो. तो त्याच्या वाकूबाप्रमाणे कादंबरी समजून घेतो, लेखकाने लिहिलेली पात्र पडद्यावर साकारणारे कलाकार लेखकाने लिहिलेल्या पात्राला आपल्या अभिनयातून उभं करतातंच असं नाही. आणि मग शब्दातून भावलेल्या पात्राशी आपण पडद्यावरच्या पात्राशी तुलना करू लागतो. व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी कादंबरी किंवा पुलंची म्हैस ही कथा वाचताना आपल्याला जो जिवंत अनुभव देतात तो म्हणजे शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. बनगरवाडी मध्ये सुरवातीलाच कादंबरीचा नायक मास्तर अर्ध्या रात्री नोकरीच्या निमित्ताने तिकडे पायी जायला निघालेला आहे. उजाडण्यापूर्वी आणि उजाडायला लागल्यावरचं सृष्टीवर्णन माडगूळकरांनी केलंय ते वाचताना आपण त्या मास्तरबरोबर हे सारं पहात चालतोय असं वाटत रहातं. पुलंची म्हैस तर काय त्यातलं प्रत्येक पात्र जिवंत होऊन आपल्याला मनमुराद हसवत असतं. एसटी ड्राइवर, पुढारी, पोलीस, म्हशीचा मालक प्रत्येकजण शब्दातून आपल्याला नेमकेपणाने भेटतात आणि सहीसंही मनात उतरून हसवत रहातात. परंतू या दोन्ही कथांवर बनलेले चित्रपट मात्र चांगले कलाकार असूनही प्रेक्षकांना भावले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माझा एक मित्र हा उत्कृष्ट संवादिनी वादक आहे. बोटं सफाईने चालतात. अनेक मोठ्या गायकांना त्याने साथही केलेली आहे. पण येणारे स्वर हृदयापर्यंत पाहोचत नाहीत. कारण त्याचा स्वभावच मुळात कोरडा आहे. चेहऱ्यावर सदैव उग्र भाव घेऊन वावरतो. साथीला बसल्यावर आपण साथसंगत करतोय हे विसरून गायकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. गायकाच्या चुका शोधत असतो. या सगळ्यामुळे स्वतःच्या वादनाकडे दुर्लक्ष होतं. अहंभाव आला की कलेचा आविष्कार त्यामध्ये वाहून जातो आणि उरतात यंत्रवत उमटणारे भावहीन स्वर. अर्थात याला अपवाद असतातच. गोविंदरावांचं उदाहरण घ्या. चेहरा कोरा असायचा पण संवादिनीवर चालणारी जादुई बोटं मात्र नेमके शब्दस्वर बोलत असायची. आमच्या मित्रांमध्ये आमचा एक सनईवादक मित्र आहे. तो आपल्या कलेकडे, सादरीकरणाकडे गंभीरपणे लक्ष न देता इतर नको त्या गोष्टींमध्ये रमत असतो. तो काही काळ भारतरत्न बिस्मिल्लाखान साहेबांकडे शिकत होता. त्यांच्या दैवी सनईवादनाचा किती प्रभाव पडला कल्पना नाही पण ते करतात तशा गोष्टी, त्यांच्याप्रमाणे रहाणी हे मात्र तो सही सही करत असतो. वादन कसं व्हायचं भावपूर्ण?

सुधीर फडके, पं.भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले अशा अनेक दिग्गजांचे स्वर का भिडतात हृदयाला ? तर प्रचंड तपश्चर्येने ते सिद्ध केलेले असतात त्यामुळे पूर्णरुपी नेमके भाव घेऊनच ते आपल्यासमोर अवतरतात आणि आपल्याला भावपूर्ण गायन म्हणजे काय हे शंभर टक्के अनुभवायला मिळतं. सुधीर फडके हे तर माझे अत्यंत आवडते गायक. ते जेव्हा एखादं भक्तीगीत आळवतात किंवा भावगीत गातात तेव्हा ते इतकं भावपूर्ण असतं की अनेकदा आपले डोळे भरून येतात म्हणजेच तो स्वर आणि त्यामधला भाव एकरूप होऊन आपल्या हृदयात उतरलेला असतो.
आपण एखादा चित्रपट किंवा नाटक पाहिल्यावर उत्स्फूर्तपणे म्हणतो की त्या अमुक पात्राचा अभिनय अगदी नैसर्गिक होता. त्या भूमिकेला हवे असणारे भाव अगदी नेमकेपणाने व्यक्त केले. याचा अर्थ काय? तर ती भूमिका आपल्या जिवंत अभिनयाने आणि अगदी बारीकसारीक भावांसहित वठवून ते पात्र त्याने प्रेक्षकांच्या मनात सजीव केलेलं असतं. रसिकांना आपल्या अभिनयातून, गायनातून, नृत्यातून जो नेमकी भावसफर करून आणतो तोच खरा कलाकार.

आज अनेक रिऍलिटी शॊ मध्ये बाल कलाकारांना जड शब्द असलेली, वरच्या पट्टीतली आणि ज्या गीतांमधला अर्थही समजण्याचं त्यांचं वय नसतं अशी गाणी म्हणायला देतात. ती मुलं मेहनत घेऊन ती गाणी म्हणतातही. परंतू अर्थ न समजल्याने भाव पोहोचत नाही. मुलांनी म्हणावी, त्यांना सहज समजावी अशी अनेक गीतं आहेत. त्यांचे पालकही यासाठी आग्रह धरत नाहीत. एखादा दहा वर्षांचा बाल गायक /गायिका प्रणयगीत म्हणू लागतं तेव्हा ते कानाला खटकतच, कारण ते गीत नेमक्या चालीत म्हटलं जातं, गाण्यातील चढ उतारासहित गायलं जातं पण तो भाव मात्र उमटत नाही कारण त्या शब्दांतील भावाशी त्यांचा संबंधच आलेला नसतो. त्या गीतामधल्या कविने लिहिलेल्या शब्दांशी त्यांची ओळखच झालेली नसते. तोच प्रकार नृत्यामध्ये. बालकलाकारांना त्यांच्यासाठी अजिबात नसलेल्या गीतांवर कंबर अत्यंत विचित्र पद्धतीने लचकवत नृत्य करायला लावतात. मी एका लहान मुलांच्या नृत्याच्या रिऍलिटी शो मध्ये ‘बिडी जलयले जिगरसे पिया’ या गीतावर एका लहानग्या मुलीने नृत्य केलेलं पाहिलं होतं. मुलांनी नृत्य करावी अशी गीतंच नाहीत का? हे सगळं खूप वाईट आहे,परंतू कुणालाच याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही. ना चॅनलला, ना आयोजकांना आणि ना मुलांच्या पालकांना. प्रत्येकाला आपलं मुल टीव्हीवर दिसायला हवं असतं मग त्याने तिथे काही केलं तरी चालणार असतं.

पुलंनी यावरच त्यांच्या वाऱ्यावरची वरात या नाटकात फार नेमकी टिप्पणी केलीय. एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आठ आणि दहा वर्षाच्या दोन मुलांना दारूचे दुष्परिणाम यावर द्विपात्री अभिनय करायला सांगितलंय. आणि ती दोन मुलं ज्या विषयाशी काहीही संबंध नाही त्या विषयावरचे संवाद म्हणताना हावभाव कसे गंमतीशीर करतात याचं मुक्त सादरीकरण करताना कोणत्या वयाला काय करायला सांगावं आणि कोणत्या विषयावर करायला सांगावं हे न समजणाऱ्यांना हसत खेळत पण नेमकं उत्तर दिलंय.

भावपूर्ण सादरीकरण असेल तर ती व्यक्ती समोर नसली तरी बोलण्यातून आपल्या हृदयापर्यंत ती भाव पोहोचवू शकते याचं चपखल उदाहरण म्हणजे मुंबई आकाशवाणी कलाकार नीलम प्रभू. त्यांचे अत्यंत सहज आणि नैसर्गिक संवाद ऐकताना त्यामध्ये जराही नाटकीपणा जाणवत नसे. गुंतता हृदय हे या जयवंत दळवी लिखित नाटकाचं नाभोनाट्य रूपांतर खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं. नीलम प्रभू, बाळ कुरतडकर असे मुंबई आकाशवाणीचे बिनीचे कलाकार त्यात होते. नीलम प्रभूनी रंगवलेली नायिका, अखेर तिच्या आयुष्याची होणारी ससेहोलपट सगळं सगळं त्यांनी फक्त आवाजातून इतकं तंतोतंत आणि भाव ओतून व्यक्त केलं होतं की ते ऐकताना डोळे भरून येत होते.

पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन रेडिओवर असायचं. दूरदर्शन त्यावेळी अस्तित्वातच नव्हतं. बॉबी तल्यारखान, विजय मर्चंट ही मंडळी एकट्याने संपूर्ण दिवस समालोचन करायची. तल्यारखानांचं समालोचन ऐकण्याचा योग आला नाही पण माझे वडील सांगायचे की ते समालोचन करताना रेडिओसमोर बसलेल्या क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांसमोर आपल्या बोलण्यातून स्टेडीयमवर चाललेल्या सामन्याचा संपूर्ण माहोल उभा करायचे. ऐकणाऱ्यांना असं वाटायचं की आपण प्रत्यक्ष पाहतोय सामना. शब्दांवर आणि भाषेवर हुकमत हवी यासाठी.

संगीत मैफिलीत एखादा नवोदित गायक इतका सुंदर आणि तयारीने गाऊन जातो की आपण उत्स्फूर्तपणे म्हणतो,
“वाह ! काय आवाज आहे. भाव भिडले अगदी हृदयाला.”

हे झालं कलाक्षेत्राबद्दल. पण अगदी कोणतंही कार्य, आपलं दैनंदिन काम, कुणाला केलेली मदत जेव्हा हृदयापासून आणि निस्सीम भावनेने त्या गोष्टीशी समरस होऊन केली जाते तेव्हा ती शंभर टक्के यशस्वी होते इतकंच नव्हे तर त्याचा मनसोक्त आनंदही मिळतो. एखाद्या वक्त्याचं भाषण किंवा प्रवचनकाराचं निरूपण ऐकताना आपण त्यामध्ये रंगून जातो, कारण तो सांगत असलेला विषय मांडण्याची त्याची हातोटी, त्यामधल्या लहान लहान गोष्टी उलगडून सांगण्याची त्याची पद्धत आणि या सगळ्यातून आपल्या भावपूर्ण अस्खलीत वाणीने समोरच्या प्रेक्षकांना ज्ञानामृत देण्याचा त्याचा व्यासंग.
संतांनी घातलेल्या हाकेला भगवंत धावून जात होता कारण ती हाक निःस्वार्थीपणे, हृदयापासून आणि कुणाच्यातरी भल्यासाठी असायची. परमेश्वर भेटीची अंतरीची तळमळ अगदी हृदयापासून आणि सच्च्या भावनेने त्यांच्या अभंगातून उमटत होती. आम्ही देवाला नमस्कार करताना मनातले भाव बाहेर काढून ठेवलेल्या चपलांशी एकरूप झालेले असतात. मग कसं होणार ?

“भाव तोची देव”, “देव भावाचा भुकेला”, “भक्ती भाव” हे शब्द काय सांगतात ? तर जिथे भक्तीभाव प्रामाणिकपणे एकवटतात तिथेच त्या निराकार ईश्वराचं वास्तव्य असतं.

प्रासादिक म्हणे,

–प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..