मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र, सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. हे विधान वाचून कुणालाही वाटेल की, आज शंभर टक्के माणसातील माणूसपण हरविले नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. अर्थात, हे सत्य आहेच.. समाजातील फार थोडेच लोक विकृत प्रवृत्तीचे कृत्य करतात, मात्र त्या विकृतीवर दुर्लक्षितपणाची आणि वेळकाढूपणाची भूमिका घेणाऱ्यांना काय म्हणणार? दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरुन गेला. या नृसंश घटनेनंतर बलात्कारसंबंधी कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्याच्याही पुढे जाऊन जलदगती न्यायालयामार्फत वेगाने न्यायनिवाडाही करण्यात आला. मात्र, दशक पूर्ण व्हायला आलं तरी त्या निवाड्यातील आदेशाची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. याला वेळकाढूपणा नव्हे तर अजून काय म्हणावे? दिल्लीसारखीच हैदराबादमध्येही क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली असतांना सुरुवातीला एफआयआर दाखल करून घेण्यास संबंधित ठाण्यातील पोलिसांनी टाळाटाळ केली; एवढेच नव्हे तर हद्दीच्या मुद्यावरून या तरुणीच्या कुटुंबीयांना दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या चकरा मारावयास लावल्याची बाब समोर आली आहे. ज्यांनी आशा घटना रोखायच्या त्या यंत्रणा जागवूनदेखील जाग्या होत नाहीत. किंबहुना, थोडीशीही संवेदनशीलता त्यांच्याकडून दाखवली जात नाही. हे संतापजनक वास्तव यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
संपूर्ण देशाची मान शरमेने खाली झुकवी अशी क्रूर घटना हैदराबादमध्ये घडली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेली प्रियंका रात्री साडे नऊच्या सुमारास ड्युटीवर घरी जाण्यासाठी निघाली असतांना रस्त्यात तिची स्कुटर पंक्चर झाल्याचे तिच्या लक्षात आले. मदतीसाठी तिने आसपास बघितलं पण तिच्या बाजूला वेगळ्याच लोकांची गर्दी जमत असल्याचे तिच्या लक्षात आले. प्रियंकाने आपल्या बहिणीला फोन करुन आपल्याला भीती वाटत असल्याचे सांगितले. मात्र नंतर तिचा मोबाईल बंद झाला. तिला मदत करण्याच्या बहाण्याने तेथे असलेल्या चौघांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिने या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून तिचा गळा आवळून खून केला; पण तेवढ्याने बहुधा त्यांचे समाधान झाले नसावे. त्यामुळे त्यांनी पेट्रोल- डिझेल टाकून तिला जाळून टाकले. कोळसा झालेल्या तिच्या मृतदेहाची ओळख तिच्या गळ्यातील लॉकेटमुळे पटू शकली. या नृसंश हत्याकांडाने महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. निर्भया प्रकरणानंतर देशातील बलात्कार संबंधित कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र, ह्या सगळ्या गोष्टी महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दुरदैवाने अधोरेखित होत आहे. दिवसोंदिवस बलात्कारासाख्या घटनेत सातत्याने वाढ तर होत आहे, सोबतच बलात्कार पीडितेला संपविण्याची क्रूर मानसिकता वाढीस लागतेय. ही बाब मानवी समाजाला ह्रासाकडे घेऊन जाणारी म्हणावी लागले. त्यामुळे हे रोखण्यासाठी आता समाज आणि यंत्रणांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायद्याची प्रभावी अमलबजावणी जोवर केल्या जात नाही तोवर कायद्याचा धाक निर्माण होणार नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एका निष्पाप तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकल्या जाते आणि साधा गुन्हा नोंदविण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना चकरा माराव्या लागतात, ही प्रशासनाची निष्क्रियातच आहे. डॉ. प्रियंका हत्याकांडानंतर देशातील जनमत प्रक्षुब्ध झाले. त्यामुळे चार दिवस झोपी गेलेलं प्रशासन खडबडून जागं झालं. अगदी तत्परतेने डॉ. प्रियंकाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलं. जलदगती न्यायालयाच्या नेमणुकीपासून ते डॉ. प्रियंकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठीचे निर्णय तात्काळ घेतल्या गेले. ही तप्तरता उल्लेखनीय असली तरी त्याआधी चार दिवस पोलीस, प्रशासन आणि राज्यकर्ते झोपी गेले होते, हे कसं विसरता येईल ?
हैदराबादमध्ये जे काही अमानवीय कृत्य घडलं त्याकडे केवळ ‘घटना’ म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच बघ्याची भूमिका घेणाराही दोषी असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. समाजातील सभ्य लोकांना कुठल्याही कायद्याने नियंत्रित करण्याची गरज नसते आणि गुन्हेगार कायम कायद्याला बगल देऊन आपली कृत्ये करीत असतात, हे सत्य ग्रीक विचारवंत प्लेटो याने अनेक वर्षांपूर्वी मांडले होते. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर कायदा, आणि प्रभावी अंलबजावणीची हमी हे सूत्र प्रत्यक्षात उतरवावे लागेल. निर्भया, कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत आणि आता हैदराबाद ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक घटना सातत्याने देशभर घडत असतात. यातील बहुतांश प्रकरणामधील आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. म्हणजेच त्यांनी आधी देखील छोटेमोठे गुन्हे केले होते परंतु त्यांना तेव्हाच कठोर शिक्षा होऊन अद्दल घडली नाही. आणि म्हणून ते शिरजोर होत गेले. अश्या छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल. अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर व्यवस्थापरिवर्तनासाठी मेहनत तर घ्यावीच लागेल.
मुळात, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी नुसता कायदा कठोर असून चालत नाही, तर कायदा बनविणारे आणि राबविणारे हातही प्रामाणिक आणि निष्पक्ष असावे लागतात. आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईलच. हा धाक गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हायाला हवा. त्यासाठी जलद न्याय आणि शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. नीती, न्याय, प्रेम, विश्वास शब्दांचं मूल्य कमी होत असल्याने विकृत विचार माणसाच्या डोक्यात घर करू लागले असून त्याला निष्पाप जीव बळी ठरू लागले आहेत. हे भय कमी करायचं असेल तर समाजाची आणि व्यवस्थेची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.
— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
its very nice