वाळू आणि धुळीचे प्रचंड लोट.
अस्मानाला भिडणारे .
दाही दिशा कोंदलेल्या . घुसमटलेल्या .
पाठीवर बांधलेल्या लहान मुलांच्या अंगावर , आसुडाचे फटके बसल्याने , उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांमुळे बिथरलेल्या उंटांच्या टापानी हादरून गेलेलं वाळवंट .
अगोदर स्वागत करणाऱ्या , नंतर गुलाम बनलेल्या आणि हत्यारांचे गाडे ओढता ओढता पाठीवर पडणारे कोरडे खाताखाता अर्धमेल्या असहाय जीवांच्या न ऐकवणाऱ्या किंकाळ्या .
घराघरात लपून बसलेल्या आणि सौंदर्य हा शाप वाटावा अशा मुलींवरचे , तरुणींवरचे अनन्वित अत्याचार , बलात्कार आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले भावविश्व .
वाळूत गाडल्या गेलेल्या मन आणि भावना .
समोर येईल ते कुस्करून , तोडून , मोडून , फोडून टाकून भीषण वादळ सुरू करून चाललेला मुजोर क्रूरकर्मा अफगाणिस्थानचा माजलेला सांड ,महंमद घोरी .
– अखंड हिंदुस्थान ज्याच्या नजरेत खुपत होता .
– अखिल विश्वानं जिचा हेवा करावा अशी स्वयंपूर्ण , प्रगत , समृद्ध संस्कृती पाहून ज्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पेटत जात होती .
– हिंदुस्थानातील आरस्पानी , स्वर्गीय सौंदर्याच्या वार्तांमुळे ज्याची नजर विखारी आणि वखवखलेली झाली होती .
– इथली मंदिरं , इथलं स्थापत्य , इथली बुद्धिमत्ता , इथला स्वाभिमान , इथलं शौर्य , इथली विद्यापीठं , इथली माणुसकी , सौजन्य , आर्थिक संपन्नता आणि इथला आरोग्यदायी निसर्ग केव्हा एकदा आपल्या राक्षसी पंज्याखाली चिरडून टाकतो , अशी घाई ज्याला झाली होती , तो आग्या वेताळ , महंमद घोरी , अफगाणिस्थानातून निघाला होता .
अखंड हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर एक भयंकर संकट , विकराल हसत उभं होतं .
महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाला , लोकप्रियतेला आणि प्रगतीला थोपविण्यासाठी जयचंदाने निमंत्रण धाडले होते महंमद घोरीला .
ते नुसतं निमंत्रण नव्हतं .
तो आत्मघात होता .
तो राष्ट्रीय एकात्मतेवरचा पहिला आणि शेवटचा घाला होता .
तो सूडचक्राचा , अनंत काळ सुरू राहणारा प्रवास होता .
तो आपल्या मुलीबाळींच्या , लेकीसुनांच्या चारित्र्यावरचा बळजबरीनं लादलेला कलंक होता .
तो आपल्या स्वाभिमानाला , शौर्याला , अखंडत्वाला चिरडून टाकणारा , वर्मी बसणारा घाव होता .
नादान , हरामखोर , देशद्रोही जयचंदाला फक्त स्वार्थ दिसला होता .
द्वेषानं आणि सूडबुद्धीनं आंधळ्या झालेल्या कपटकारस्थानी जयचंदाची दृष्टी जणू गेली होती . तो जणू बहिरा झाला होता . हातापायानं पंगू झाला होता . अक्कल गहाण पडली होती . आणि त्याचा स्वाभिमान , महंमद घोरीची विष्ठा चाटण्यात धन्यता मानत होता .
हे सगळं आत्ता , वर्तमानात घडतंय असंच वाटतंय .
भारताच्या उंबरठ्यावर घोंगावणारं भयंकर वादळ , अफगाणिस्थानमध्ये तालिबानच्या रूपाने नंगानाच घालत आहे .
बारा बारा वर्षांच्या लहानग्या मुलींवर बलात्कार करीत आहे . तान्ह्या मुलाला आईसमोर मारून टाकून आईवर अनन्वित अत्याचार करीत असल्याचा बातम्या , जीवाचा थरकाप उडवीत आहेत .
खेळ खेळत असल्यासारखे , ते जीव घेत आहेत . नासधूस , तोडफोड हे सर्रास चाललं आहे .तो उन्माद , जाहीरपणे व्हिडिओवरून प्रसारित करीत आहेत .
या बातम्या भयकंपित करणाऱ्या आहेत .
अशावेळी मला काय त्याचे ? ही वृत्ती सोडायलाच हवी .
कारण जगभर धुमाकूळ घालणारा तो राक्षस पुढे सरकणार नाही याची खात्री कुणी देऊ शकणार नाही .
आग पलीकडच्या घराला लागली आहे , मी सुरक्षित आहे . असेही म्हणून चालणार नाही .
हे जागतिक संकट आहे .
झळ सगळ्यांना पोहोचणार आहे .
अशा वेळी आपण काय करणार आहोत ?
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जयचंदी औलादी ओळखणार आहोत का ?
आपल्या हाती असणाऱ्या मोबाईलचा सदुपयोग करणार आहोत का ?
टुकार मालिका बघण्याऐवजी राष्ट्रीय न्यूज चॅनल बघणार आहोत का ? आपल्यापलीकडेसुद्धा एक विश्व आहे , याची खबरबात आपण घेणार आहोत की नाही ?
संभ्रम निर्माण करण्याऐवजी , खऱ्या खोट्याची पारख करणार आहोत का ?
आपल्या पुढच्या पिढीला आपला ऐतिहासिक वारसा सांगणार आहोत का ?
देश सर्वोपरी ही शिकवण , त्या अनुषंगाने येणारे संस्कार , नव्या पिढीवर करणार आहोत का ?
असे असंख्य प्रश्न तुमच्या माझ्या मनात उमटायला हवेत .
त्याची उत्तरे शोधायला हवीत .
त्यानुसार आपली वागणूक बदलायला हवी .
भयंकराच्या उंबरठ्यावर , महाबिलंदर श्वापद दबा धरून बसलेच आहे .
आपली अखंड सावधानता हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे .
महंमद घोरी कुठल्या रूपाने आपल्यावर चाल करून येईल ते सांगता यायचे नाही . काळ बदलतोय पण आक्रमकांची वृत्ती तीच आहे !
त्याला सामोरं जाण्यासाठी रक्त प्रवाही होऊ द्या .
त्यासाठी मनानं खंबीर व्हा .
त्या महाभयंकर इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही , याची दक्षता घ्या.
आणि हो , ताठ मानेनं जगण्यासाठी…
सावध ऐका , पुढल्या हाका !
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
—————
१४ ऑगस्ट २०२१
हा लेख फाळणीच्या वेदना स्मृतिदिनाला समर्पित !
Leave a Reply