नवीन लेखन...

भेटवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

शायर हफ़ीज़ होशियारपुरी म्हणतो ,
दोस्ती आम है लेकिन ऐ दोस्त
दोस्त मिलता है बडी मुश्किल से।

अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा लॉकररुममध्ये अभिषेक आणि डॉ. पटवर्धन सचिनबद्दल जनरल बोलत होते. ( सचिन म्हणजे अर्थातच एकमेवाद्वितीय मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर. सकाळी सकाळी सचिन पिळगांवकरबद्दल बोलायला ते काय मराठी सिनेमांचे वितरक थोडेच होते ?) सचिनबद्दल बोलण्याचा आपल्याला जन्मसिध्द हक्क आहे असे मानणाऱ्या शंभरएक कोटी लोकांपैकी मी एक असल्यामुळे ( अर्थातच ) मी चर्चेत तोंड खुपसले. सचिन एकदा ( तो आत्ताचा ” द सचिन ” झालेला नसताना ) ठाण्याच्या सेन्ट्रल मैदानात एक सामना खेळायला आला होता. तेव्हाच्या त्याच्या दोन आठवणी अतुल सुर्वेने काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत लिहिल्या होत्या.मी जणू त्या मीच लिहिल्यासारख्या रसभरीत शैलीत ऐकवल्या आणि मग त्या एन्ट्रन्स एक्झामच्या बळावर अभिषेकने मला त्यांच्या ” गोल्ड परिवारात ” आनंदाने सामावून घेतले.

मला मॅरेथॉन धावायला ( की चालायला ? ) भरीस पाडले ते अभिषेकने.खरे तर मॅरेथॉन हा काही माझ्या आवडीचा पदार्थ नव्हता. काही आगापिछा नसताना वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी अचानक मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा म्हणजे काय ? पण एकदा अभिषेकने तुम्हाला “आपला माणूस” म्हंटले की तुमच्यापुढे फारसे पर्याय उपलब्धच नसतात. त्याच्या उत्साहाचा धबधबाच इतका प्रवाही आणि वेगवान असतो की त्यात तुम्ही ( मॅरेथॉनचे ) पाच दहा किलोमीटर सहज वाहून जाता. सातारा मॅरेथॉनचे बुकींग पुढील अर्ध्या तासात फुल होणार हे लक्षात आल्यावर त्याने स्वतःच्या डेबिट कार्डवरुन माझे पैसे भरले आणि शेलारमामांसारखे माझे परतीचे दोर कापून टाकले. पण नंतर सातारा मॅरेथॉनच्या ढगाळ पावसाळी व उत्सवी वातावरणाच्या मी इतका प्रेमात पडलो की गेल्या वर्षी ( अभिषेक सोबत नसताना देखील ) पंढरीच्या वारीप्रमाणे मी सपत्नीक सातारा मॅरेथॉन वारी केली. त्याच्याच आग्रहावरून मी गेल्या दोन वर्षात दहा बारा मॅरेथॉनचा तरी अबीरबुक्का कपाळी लावला.

मॅरेथॉन हा एक विषय झाला. पण कुठल्याही बाबतीत कुंपणावर किंवा परिघावर बसणे त्याला मान्यच नाही. त्याचा ओढा सतत केंद्रबिंदूकडे. एक दोन उदाहरणेच देतो.

हेमामालिनीने ( ‘शोले’च्या कालखंडात ) धर्मेंद्रवर केलं नसेल त्याच्या कैकपटीने अभिषेकचे संपूर्ण देओल खानदानावर प्रेम आहे. धरमपाजी , सनी देओल ही त्याची निरंतर श्रद्धास्थाने आहेत. त्याच्या श्रद्धेसमोर “चाहता” हा फारच अळणी आणि पचपचित शब्द आहे. माधुरी दीक्षितसमोर मयुरी कांगो किंवा सनी गावस्करसमोर देवांग गांधी असावा तसा. मग त्यासाठी तो देओल घराण्याचं होम प्रॉडक्शन असलेला ” पोस्टर बॉईज् ” सारख्या तद्दन भंपक व पडेल ‘बी’ ग्रेड सिनेमाचा खास शो देखील आपल्या मित्रांसाठी (स्वतःच्या खिशाला चाट लावून) मोठया भक्तीभावाने प्रायोजित करेल. त्याला पर्याय नाही.एका सिनेमात दिलीपकुमार जॉनी वॉकरला म्हणतो पहा … “यह दिलवालोंकी बात है मुरली , सिर्फ दिलवालेही समझ सकते है !”….आमच्या अभिषेकचेदेखिल अगदी तसेच आहे. पण असा “भक्त” मिळणे हे कस्तुरीमृगाच्या बेंबीतील कस्तुरी मिळण्याइतकेच दुर्मिळ आहे आणि ही “ढाई किलोच्या हाथाची” गेल्या जन्मीची पुण्याई आहे हे मात्र निश्चित.

संदीप सामंत.

२९ एप्रिल २०२०

Avatar
About संदीप सामंत 19 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..