नवीन लेखन...

भिक्षापात्र

एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.”

राजा त्याच्याकडे बघतो आणि विचार करतो, याला काय बरे हवे असेल? तो फकीराला म्हणतो “तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. मला शक्य असल्यास मी तुम्हाला इच्छित भिक्षा देऊ शकेन.”

फकीर राजाला म्हणतो “विचार करा, तुम्हाला शक्य नसेल तर अगोदरच सांगा. मी दुसरीकडे जाईन.”

त्याच्या बोलण्याचे राजाला हसू येते. तो म्हणतो “काय हवे, ते सांगा तर खरे. ” फकीर आपल्या हातातले भिक्षापात्र राजासमोर धरतो आणि म्हणतो “या भिक्षापात्रात मावेल एवढीच भिक्षा मला घाला. तुम्ही सुवर्णनाणी घाला अथवा हिरे मोती घाला. माझ्या पात्रात मावेल एवढीच भिक्षा मला हवी आहे.”

राजा प्रसन्नपणे हसतो आणि म्हणतो “तुमचे पात्र फारच लहान आहे. माझ्याजवळ देण्यासारखे बरेच काही आहे. तुम्ही म्हणता की फक्त भिक्षापात्र भरेल एवढीच भिक्षा तुम्हाला हवी आहे. मी तुम्हाला बरेच काही देऊ शकतो. तुम्ही विचार करा आणि मला सांगा की खरोखर तुम्हाला एवढीच भिक्षा हवी आहे काय? ”

फकीर म्हणतो “मी माझ्या मागणीवर ठाम आहे. राजन, तुम्ही मला भिक्षा घाला. ती मिळाली की मी निघून जाईन.” राजा आपल्या सेवकांना आज्ञा देतो की फकीराच्या भिक्षापात्रात सुवर्णमुद्रा टाकण्यात याव्यात. सेवक राजाच्या आज्ञेचे पालन करतात. भिक्षापात्रात सुवर्णमुद्रा टाकू लागतात. काही केल्या ते भिक्षापात्र भरत नाही. राजा अधिकाधिक सोने, नाणे, हिरे, जवाहर टाकत जातो. फकीराचे पात्र मात्र भरत नाही.

बघता बघता संध्याकाळ होते. राजाही बुचकळ्यात पडतो. या फकीराकडे काहीतरी जादूटोणा असणार. त्याशिवाय हे एवढेसे छोटेसे पात्र भरायला एवढा वेळ का लागतो आहे? तो संशयाने फकीराकडे पाहू लागतो. फकीर शांतपणे आपले भिक्षापात्र भरताना पहात असतो. त्याच्या लक्षात येते की राजा अस्वस्थ झालेला आहे. आता त्याच्याजवळ देण्यासारखे काही उरले नाही.

फकीर राजाला म्हणतो “आता तुमच्या जवळ देण्यासारखे काही राहिले नाही. तुम्ही माझा वेळ व्यर्थ घालविलात. मला आधी माहित असते तर मी भिक्षा घेण्यासाठी इथे थांबलोच नसतो. तरी बरे, मी तुम्हाला आधी इशारा दिला होता.”

त्याचे बोलणे ऐकून राजा खजील होतो. तो हात जोडून फकीरासमोर उभा रहातो. फकीर भिक्षापात्रात भरलेले सगळे धन पुन्हा पात्र उलटून राजासमोर रिकामे करतो.

राजा आश्चर्याने त्याच्याकडे बघत रहातो. तो म्हणतो “महाराज, मला क्षमा करा. मी तुम्हाला इच्छित भिक्षा घालू शकलो नाही. जाण्यापूर्वी मला एक गोष्ट मात्र सांगा. हे पात्र एवढे छोटे दिसत आहे. मग त्यात सगळी राजसंपत्ती घातली तरी ते भरत का नाही? ”

फकीर राजाला म्हणतो “खरे ऐकून घेण्याची ताकद असेल तर सांगतो. हे भिक्षापात्र माणसाच्या कवटीपासून बनविले आहे. नव्हे, ही माणसाची कवटीच आहे. असे म्हणतात की माणसाचे मन त्याच्या कवटीत असते. हे मन कधीच भरत नाही. कधीच समाधान पावत नाही. त्याला जेवढे देऊ तेवढे त्याला कधीच पुरेसे नसते. त्याला सतत अधिक मिळविण्याची लालसा असते. म्हणून हे पात्र भरत नाही. त्यात तुझा काही दोष नाही. मी याचा शोध घेतो आहे की कुठल्यातरी एका क्षणी माणसाला मिळाल्याचे समाधान असावे.”

फकीराच्या बोलण्यातून जो बोध घ्यायचा तो राजा घेतो. आपल्यालाही ही कथा विचार करायला लावणारी आहे.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..