हिमालयाला गायला सांगितले की तो ज्या पहाडी स्वरांमध्ये गडगडाटी गाईल, तसं भीमसेनजींचं गाणं मला सतत वाटत आलं आहे.
सोलापूरला भागवत थिएटर्स च्या पाठीमागील “मुक्तांगण ” च्या उदघाटनप्रसंगी १९७६ साली त्यांचा कार्यक्रम पहिल्यांदा (आणि शेवटचा) ऐकला – मित्रवर्य संजय नारायण झळकीकर यांची कृपा. त्याचे वडील भागवत थिएटर्स मध्ये कामाला होते,त्यामुळे अधून मधून आम्हांला चित्रपट तिकिटांची चिरीमिरी मिळे.
सोलापुरातील माझ्या उण्यापुऱ्या तीन वर्षांच्या वास्तव्यात सुमारे ६०-७० चित्रपट आम्ही दुकलीने भागवत मध्ये असे पाहिले.
भीमसेनजी हा बोनस होता. ती मैफील अजूनही कानात आहे.
त्यांच्या गायकीवर, कर्तृत्वावर, ” किराणा ” घराण्यावर बोलायची माझी पात्रता (खरं तर लायकी)शून्य. तसे मी लता आणि इतर मंगेशकर कुटुंबीय यांच्यावरही अधिकार नसताना लिहिलंय पण ते ” गोड मानून घ्या ” अशा विनावणीसह !
“लोकसत्ता “ने पं भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक अंक काढलाय. तो विकत आणला आणि वाचूनही काढला. त्यांचे विश्वव्यापी आलेख अन्य तितक्याच तोलामोलाच्या गायक-लेखकांनी काढले आहेत. एकप्रकारे माझी दिवाळी अंक वाली दिवाळीच कालपासून सुरु झाली.
गायन प्रवाही ठेवण्यासाठी अफाट मेहनत घेऊन त्यांनी जे “एव्हरेस्ट” शिखर गाठलं, ते तोंडात बोट घालून दुरून न्याहाळण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. असा शास्त्रीय गायक पुन्हा होणे नाही.
पं कुमार गंधर्व, पं जितेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, पं हृदयनाथ, पंडिता गानसरस्वती किशोरी ताई (पुण्याला एका दिवाळी पहाटेला त्यांना ऐकलं – प्रत्यक्ष सरस्वती समोर बसून गात आहे असं वाटत राहिलं), नव्या पिढीचे पं शौनक, पं राहुल देशपांडे (होय,हा तरुण आता पंडित पदवीच्या आसपास पोहोचलाय), पं महेश काळे कोणाकोणाची नांवे घ्यायची ? साऱ्यांनी माझे कान समृद्ध केले आहेत. या साऱ्यांना आकंठ ऐकलंय,ऐकतोय.
अर्धवट सेवानिवृत्तीनंतर एक संकल्प मनात केला होता- संगीत शिकायचे. वादन नाही,गायन !
माझे के एस बी तील वरिष्ठ स्नेही असेच सेवानिवृत्तीनंतर पुण्यातील भारत गायन समाजात गायला शिकले,काही परीक्षाही त्यांनी दिल्या. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर होता. एक-दोन क्लासेस कडे चौकशी केली. काल भीमसेन जोशी यांच्या वरचा अंक वाचताना तो संकल्प पुन्हा उसळी मारून वर आला. सध्या सगळं “उघडतंय “, बघू या संगीत गुहेची दारे माझ्या साठी केव्हा किलकिली होताहेत?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply