भीमसेन जोशी म्हणजे ‘गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले. वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले. विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती. ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण. जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम. २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन. १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी. समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद. उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग. गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
२४ जानेवारीला भीमसेन जोशी यांची माहिती समूहावर आलेली आहे, त्यामुळे आज माहिती न टाकता काही दिग्गज व्यक्तीनी सांगीतलेल्या भीमसेन जोशी यांच्या आठवणी………..
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगीतले होते.
श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या. ‘अभंगवाणी ‘ यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला. त्यांनी संगीत दिलेल्या, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील – ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥’
आणि ,लताजींच्या आवाजातील – ‘सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ ‘
ही अशी रचना अशी आहे कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही.
गौतम राजाध्यक्ष यांनी भीमसेन जोशी यांची सांगितलेली आठवण
मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही ब-यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की गौतम सांगायचा, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.
किशोरी अमोणकर यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
आम्ही एका कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही ? त्याने ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही.
सुधीर गाडगीळ यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
“पंडित भीमसेन जोशी” म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण “ऑटोमोबाईल” म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले ‘बसा’. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून ‘हुश्श’ केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश.
पु.ल. : ‘घराणं’ या विषयावर तुमचं काय मत आहे?
भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु.ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
सचिन तेंडूलकर यांच्या आठवणीतील भीमसेन जोशी.
मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
“नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!”
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की ‘मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!’
लता मंगेशकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल आठवणी.
मला भारतरत्न मिळाल्यानंतर “या भारतरत्न’ असे
नेहमी म्हणणारे… “अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो’ असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी… ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
पं. संजीव अभ्यंकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दलची आठवण.
१९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply