भीती ही एक भावना आहे. ती प्रत्येक जीवांमध्ये असते. व्यक्तिनुसार ती कमी जास्त असते. भीतीची कारणे वेगळी असू शकतात परंतु भीतीचा भाव प्रत्येकाच्या मनात कायम घर करुन असतो. भीती जशी व्यक्तीस असते तशी ती एखाद्या समुह, देशाला असते. भीतीमुळे अनेक गोष्टी टाळल्या जातात. भीती कधी आवश्यक तर कधी अनावश्यक असते. भीती ही गंमतीशीर देखील असते. अनेक लोक वाघाला भीत नाहीत पण मांजराला भितात.
भीती जशी वाटते तशी ती दाखवली देखील जाते. भीती दाखवून देखील आपले इच्छित साध्य केले जाते. लहान मुलांना झोपू घालतांना खोटी भीती दाखवली जाते. शाळेत शिक्षक मुलांना मार देण्याची भीती दाखवतात. कनिष्ठ कर्मचारी वरीष्ठांना भिऊन राहतात. गुंडाची भीती बाळगली जाते. मुंगी पासून हत्तीपर्यंत सर्व भीतात. भीती दाखवणारे शुद्धा कुणाला तरी भीत असतात.
लहान सहान कारणाने देखील भीती निर्माण होते. शर्टमध्ये कीडा शिरला तरी मनुष्य जागेवर उड्या मारतो. घाटाच्या रस्त्यावर गाडी चालली की जीव मुठीत धरून आपण बसतो. रात्री चोरीची आणि चोरांची भीती असते.
नवरा बायको एकमेकांना भितात. पोलीसांची भीती, विंचू सापाची भीती. गाडी सुटण्याची भीती. वेळ चुकण्याची भीती. नापास होण्याची भीती. बदनाम होण्याची भीती. कुणी बघते काय याची भीती. कुणीच बघत नाही याची भीती. पैसे नाही मिळाले तर याची भीती. पैसे कुठे ठेवू याची भीती.
भीती स्वप्नात देखील वाटते. दचकून उठले जाते. नोकरी मिळवण्याची, नोकरी जाण्याची भीती. घसरून पडण्याची भीती. वीज वारा पावसाची भीती. अनेकवेळा भिण्याचे कारण नसते तरीही भय. भीती मन निर्माण करते. अंधारात भीती वाटते. मरणाची भीती तर कायमच असते. गुन्हेगारास पोलीस भीती दाखवून त्यास सत्य बोलायला लावतात.
गुंड भीती दाखवून लूट करतात. कुणी खोटी केस करण्याची भीती दाखवून शोषण करतात. आंदोलन करणारे शासनास भीती दाखवतात. पाण्याच्या टाकीवर चढून जीव गमावण्याची भीती दाखवतात. आमरण उपोषण करुन मरणाची भीती दाखवतात.
सगळे प्राणी भीतात देखील आणि भीती देखील दाखवतात. भीतीमुळे सर्व आपल्या मर्यादेत रहातात. भीती आवश्यक आहे म्हणूनच आहे. निर्भय प्रत्येकवेळी ,प्रत्येक ठिकाणी रहातात येत नाही. किमान भीतो असे दाखवावे तरी लागते. कधी भीत नाही, असेही दाखवले जाते.
पुढाऱ्यांना पराभवाची भीती, भ्रष्टाचार उघड होण्याची भीती. अधिकाऱ्यांना बदलीची भीती. उंदीर मांजराला भितो. मांजर कुत्र्याला भीते.
भीती ही भावना कायम आपल्या सोबतीला असते. तिचा योग्य वापर करता आला पाहिजे. निर्भयतेचे सोंग देखील भयातूनच होते. भीती दाखवणे आणि भिणे या दोहोंची आपणास गरज असते. याचे संतुलन साधता आले की काही भीती रहात नाही.
— ना. रा. खराद.
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
Leave a Reply