नवीन लेखन...

भोग सरंल, सुख येईल

मधुताई,

सप्रेम नमस्कार..

आज तुमचा वाढदिवस!! गेली पाच वर्षे मी तुम्हाला या दिवशी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकलो नाही, याचं फार वाईट वाटतं.. त्याआधी दरवर्षी मी फोन करीत असे. आपण देखील माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करुन, हसून धन्यवाद द्यायच्या.. गेल्या पाच वर्षांपासून, आपल्या आठवणी लिहून मी शुभेच्छा देत आलो आहे..

आज मात्र या पत्रातून आपणास शुभेच्छा देतो आहे..

मला आठवतंय ‘लक्ष्मी’ चित्रपटात मी आपल्याला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा मला स्वप्नातंही वाटलं नव्हतं की, काही वर्षांनंतर आपल्याशी माझा प्रत्यक्ष संपर्क येईल..

२८ जुलै १९५३ रोजी आपला जन्म झाला. कलाकार असलेल्या आई व मावशीनं आपल्याला वाढवलं. शाळेत आपलं मन काही रमलं नाही. सातवीपर्यंत शाळा करुन, अकराव्या वर्षी पायात चाळ बांधले व लोकनृत्याच्या परीक्षेत आपण पायरीपायरीने उत्तीर्ण होत, उत्तुंग यशप्राप्ती केलीत.

चौदाव्या वर्षी पांडुरंग घोटकर व लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवून, नृत्यनिपुण कलाकार झालात. प्रभाकर पणशीकरांच्या ‘पुत्रकामेष्टी’ नाटकात अभिनय करुन पदार्पणातच ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार प्राप्त केलात. त्यानंतर केलेल्या १९ नाटकांतून आपण प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सतीची पुण्याई, दगा, लक्ष्मी अशा चित्रपटांतून छोट्या भूमिका केल्यानंतर ‘शापित’ चित्रपटातील ‘बिजली’च्या भूमिकेने आपण मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळविले. या चित्रपटाने आपणास लोकमान्यते बरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. प्रत्येक कलाकाराला एखादा ‘गाॅडफादर’ भेटल्याशिवाय भरारी घेता येत नाही. आपणास ‘शापित’ चित्रपटापासून, त्या रूपात ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक, राजदत्त भेटले..

त्यानंतर आपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.

‘चल रे लक्ष्या मुंबईला’ या चित्रपटाच्या डिझाईनचे काम आम्ही केले होते. या चित्रपटातील आपण व लक्ष्याच्या ‘जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला..’ या सुप्रसिद्ध गाण्यामुळेच चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला.

‘रावसाहेब’ चित्रपटातील भूमिकेसाठी आपणास राज्य सरकारचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आपली कारकिर्द अशीच बहरत असताना ‘एक होता विदूषक’साठी, आपल्या वास्तव जीवनाशी साम्य असलेली भूमिका चालून आली. त्यातील बैठकीच्या लावण्यांमधील आपली अदाकारी पहाण्यासाठी, हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे.

आपण ‘काटा रूते कुणाला’ या अप्रतिम टेलिफिल्मची निर्मिती केली. सोनाली कुलकर्णी व अविनाश नारकर यांच्या अभिनयाने संपन्न असलेली ही टेलिफिल्म उत्कृष्ट आहे.

आपण कधी लक्ष्मीकांत बेर्डेची तर कधी अजिंक्य देवची आई झालात. मिळतील त्या भूमिकेचं सोनं केलंत. ‘सवाल माझ्या प्रेमाचा’ या अरविंद सामंत यांच्या चित्रपटाची आम्ही पब्लिसिटी डिझाईन केली होती. त्या निमित्ताने आपली सामंतांच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती.

दादा कोंडके यांच्या ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘येऊ का घरात’ व ‘मला घेऊन चला’ या चित्रपटातून आपण लक्ष्यवेधी भूमिका केल्या.

‘सखी माझी लावणी’ या अभ्यासपूर्ण प्रयोगातून आपण लावणीचे पारंपरिक दर्शन दिले. व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी झालेल्या या सर्वोत्तम कार्यक्रमासाठी आपण अगणित कष्ट घेतले होते..

२०१२ साली संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांनी आपल्या आत्मचरित्रपर ‘मधुरंग’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्याची संधी मला दिली. त्या निमित्ताने आपणाशी चर्चा व भेटी होत राहिल्या. २८ जुलै २०१२ या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा एस.एम.जोशी सभागृहात संपन्न झाला. चित्रपट व नाट्य क्षेत्रातील असंख्य मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ‘न भुतो न भविष्यती’ असा नेत्रदीपक सोहळा पार पडला.

त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आपण आठवणीने आम्हा बंधूंना शुभेच्छा देत होतात. कधी प्रत्यक्ष ऑफिसवर येऊन मनसोक्त गप्पाही मारत होतात..

डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात लावण्य संगीत सादरीकरणावेळी आपण रंगमंचावर बेशुद्ध होऊन पडलात..

तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करुनही आपण बऱ्या झाला नाहीत.. तीस वर्षे आपल्या नृत्य अदाकारीने व अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कलाकारास, देवाने असं का करावं? काहीच कळत नाही.

आपणास भेटण्याची इच्छा असूनही भेटण्याचं धाडस मला होत नाही.. कारण मी ऐकलंय.. कुणी भेटायला आलेलं दिसलं की, आपल्या अश्रूंचा बांध फुटतो… मला आपणास रडवेलं पहायचं नाहीये…

आपण आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लवकरच बऱ्या होणार, अशी मला खात्री आहे.. भोग सरंल, सुख येईल.. तेव्हा मी नक्की भेटायला येईन.. तूर्तास या शब्दरूपी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करावा, ही विनंती..

आपला,

सुरेश नावडकर.

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२८-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..