संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरा करतात. बाकीचे सर्व धार्मिक कार्यक्रम आपण अंघोळ करून मगच करतो पण हा दिवस मात्र खास वेगळा आहे. त्यामुळे या दिवशी सकाळची कामे आटोपून एका सुपात हळदीकुंकूच्या पुड्या. वर्तमान पत्राच्या मोठ्या तुकड्यावर बाजरीचे पीठ. तीळ गुळ, खिचडी साठी तांदूळ व मुगाची डाळ. पान सुपारी. एका वाटीत खोबरेल तेल. तर दुसऱ्या वाटीत साजूक तूप. शिकेकाईची पूड. भज्जी करतात त्यासाठी वांगी. गाजर. पालेभाजी. मटार. उसावरील शेंग अशा अनेक भाज्या. आणि दक्षिणा. पूर्वी थोडा कापूस ठेवत असत.
मग अगोदर घरातील कुलस्वामिनीला हे सूप वाण द्यावे लागते. नतंर एखाद्या पोक्त सवाष्णीला बोलावून पाटावर बसवून ते सूप वाण दिल्यावर आपण तीळाचे उटणे लावून न्हायचे असते. आणि हो हे सूप देतांना सुपाच्या दोन्ही कडा आपल्या हातात व समोरच्या बाजूने देण्याची पद्धत आहे. अगोदर तिला हळद कुंकू लावून आपला पदर सूपावर झाकून देतात. त्या बाई पण घेतांना आपल्याला हळद कुंकू लावून ते सूप घेताना तिचा पदर झाकून घ्यायला हवे अशी पद्धत आहे. त्यामुळे अशा चार घरी मिळाले की त्यांचा एक दिवसाचा स्वयंपाक होतो. आणि संध्याकाळी बायका जमतात तेव्हा भोगविडे देतात एकमेकांना. सात विड्याची पाने सात सुपाऱ्या असे दोरीने सुतवतात. पण त्या आधी एक विडा आपल्या कुलस्वामिनीला आणि एक तुळशीमाईला मग इतरांना. पैकी एक विडा बुडीत द्यायला लागतो म्हणजेच त्या बाईकडून तिचा विडा घ्यायचा नसतो. आणि यातही बरेच काही करावे लागते. आरसा दाखवून फणीने थोडे विंचरणे. काजळ लावण्यासाठी डबी पुढे करणे. अत्तर. गजरा देणे. हे सगळे ज्यांच्या घरी जाऊन केले जाते तिथे आलेल्या बायकांना दूध किंवा चहा देतात…..
हे सगळे गावी जमले अनेक वर्षे पण ईथे आल्यावर हे सूप वाण कुणाला देणार मी हेच कळत नव्हते. सोसायटीत राहणारे सर्व हायफाय लोक त्यांच्या प्रेस्टीजचा प्रश्न असतो. त्यामुळे मी अगोदर हे सगळे घरी करुन ठेवायची व आम्ही दोघे जवळपास असलेल्या गजानन महाराज यांच्या मंदिरात पारायणला जात होतो तिथे एक कदाचित मंदिराचे व्ययस्था पहाणारे त्यांची बायको रोजच नैवेद्याचे ताट घेऊन यायच्या. मी विचारले की मला सूपवाण द्यायला कुणी ओळखीचे नाही इथे ठेवले तर चालेल का? त्या म्हणाल्या की मी गावी असतांना घेत होते पण इथे घर लांब असतात आणि मला गुडघे दुखी आहे म्हणून मी सोडून दिले आहे. मला खूप खूप आनंद झाला आणि दरवर्षी त्यांनाच देत होते. पण आता मीच बाहेर जाऊ शकत नाही म्हणून सून बाईसूप वाण तयार करून देतात कुलस्वामिनीला देवून त्याच्या पुड्या बांधून ठेवते आणि ज्या दिवशी आमच्या कडे हळदीकुंकूवाचा कार्यक्रम असतो तेंव्हा ते त्या पुड्या देते. भोग विडे बंद…..
माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून.. आणि अशा वेळी या निमित्ताने दिले तर त्यांनाही संकोच वाटत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत एक तीळ सात जणात वाटून घ्या अशी शिकवण आहे. हीच शिकवण आपण आपल्या पंरपंरेचा अभिमान ठेवून पुढे चालू ठेऊ या.
मी तर आमच्या मावशीबाईंना दर संक्रांतीच्या वेळी बांगड्या भरवते. या मागचे कारण म्हणजे त्यांची बचत होते व त्यांना संकोच वाटत नाही. सवाष्णीचा सण असतो म्हणून….
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply