नवीन लेखन...

भूलोकीचे वैकुंठ म्हणून नावाजलेले शेगांव.

प्रेमभक्तीचा प्रचंड महापूर शेगांव रस्त्यावर धो-धो वाहत होता. समुद्राला जणू भरती आली आणि लाटावर लाटा किनाऱ्यावर येऊन धज्ञकत होत्य, त्या लाटातील अमृतमयी सिंचनाने सारे भक्तगण न्हावून निघाले होते. टाळमृदंगाच्या गजरातील तो अनुपम सोहळा भावभरल्या अश्रुपूर्ण नंत्रांनी बघताना क्षण्काल काळाचे भान हरपले. कितीतरी वेळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंच डिव्हायडरवर निश्चल शरीराने भावपूर्ण अंत:करणाने सारे प्राण डोळ्यात साठवून घेताना मनात आल खरच देव अशा साध्या भाळ्या भाविकांच्या हृदयातच निश्चितपणे नांदतो.

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हातून, डोक्यावर खांदयावर स्वतःचा बोजा सावरीत दिंडीत सामील झालेले वारकरी आपल देहभान विसरून टाळ मृदंगाच्या लयदार गजरात नाचतांना पाहून मन तृप्त झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्यक्ष प्रेमभक्ती काय असते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रामनवमीला शेगावी होणारा दिंडी सोहळा याची देही याची डोळा अवश्य बघावा. तो बघायला मिळणे अनुभवणे खरोखरीच महद्भाग्याचं लक्षण आहे. ते महद्भाग्य सर्व भक्तगणांना आज शेगांवी निश्चितच मिळाले.

आज हजारो दिंड्या शेगांव रस्त्यावरून टाळमृदंगाच्या लयीत भजने म्हणत एकाच ओढीने चालत होत्या. लोहचुंबकाच्या कक्षेत येणाऱ्या लोखंडाला लोहचुंबक जसा आपल्याकडे ओढून घेतो तसे सर्व वारकरी श्री महाराजांच्या कक्षेत येताच ओढल्याप्रमाणे जावू लागले.

श्री महाराजांच्या पादकांच्या परिस स्पर्शाने आपल्या जिवाचं सोन करण्यासाठी लागलेली ओढ मनाला लागलेला ध्यास सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होता. हे सर्व दृश्य पाहून सांग पुलकीत होत होतं. दिंडीत घुसून मनसोक्त नाचावसं वाटत होत, परंतु श्री महाराजांनी दिंडीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवल्याने, वाहवून जाण योग्य नव्हतं, आणि शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध नियोजनाचा माझ्या भावनिक उर्मीने अजाणतेपणाने का होईना अपमान झाला असता. संस्थानचा आदर्श नजरेसमोर ठेवून वागणारा मी, मला असं करून कस चालेल? स्वतःच्या मनाला समजावीत जडअंतकरणाने सर्व विहंगम दृष्ये डोळ्यात साठवून मुक्कामाचा रस्ता धरला.

आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरीच सुवर्णदिन म्हणावा लागेल. श्री गजानन महाराज संस्थानकडून प्रसादरूपाने टाळ-मृदुंग मिळावेत ही बरीच वर्षे अतृप्त राहिलेली इच्छा श्री महाराजांनी आज पूर्ण केली. जणुकाही आमच्या सेवेला, भक्तीला पुर्णरूप प्रदान केलं. आता आणखी काही मिळवायची इच्छा राहिली नाही. मनात आलेल्या सर्व गोष्टींची महाराज लीलया पुर्तता करतात हे पदोपदी अनुभवतांना जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री महाराजांची सेवा ह्या पामराकडून घडो ती त्यांनी करवून घेण व श्रीचरणाजवळ स्थान मिळो एवढीच इच्छा ! साधे आचरण, निर्मळ अंतःकरण आणि निष्ठायुक्त भक्ती भगवंताला प्रिय असते असे सर्व संताच्या शिकवणीचे सार आहे. दांभिकता आणि कर्मठपणाबरोबरच भोंदुगिरी वर संतांना चौफेर हल्ले केले. जगद्गुरु तुकारामांच्या अभंगगाथेत, संत एकनाथांच्या भारुडात, असे कितीतरी दाखले मिळतात ज्यात बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती यावर कडाडून हल्ला केलेला दिसून येतो.

आजही धर्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या भाविकांना लुटण्याचे काम स्वतःला मठाधिपती, महाराज, संत म्हणवणारे लोक करीत आहेत. भोळ्या भाविकांनी अशा दांभिक गुरुंपासून सावध राहिले पाहिजे. श्री गजानन महाराजांकडे अनन्य भावानं शरण गेल्यास निश्चितच आजही ते योग्य मार्ग दाखवतात. भक्त पुंडलीकाला जसे सावध केले तसे आपणालाही करतील यात शंका नाही. त्या साठी आपली भक्ती पुंडलिकाप्रमाणे खरी व दृढ असणे गरजेचे आहे. वारी पुर्ण होऊ दे मग खुशाल ज्वर येऊ दे! नाहीतर मरण ते मी आनंदाने स्विकारीन असे म्हणणाऱ्या पुंडलिकाची पायदळ वारीवर किती प्रेम, किती निष्ठा होती. हे समजण्याकिरता पायदळ वारीच केली पाहिजे त्यात काय सुख असते हे आम्ही सलग दहा पदयात्रेत अनुभवलं आहे.

शेगावं संस्थानच्या श्रीरामनवमी उत्सवाला शेंगावी जाण्याचा योग मात्र अनेक वर्षांनी आज आला. उत्सवातील आनंद सोहळा बघून मन तृप्त झाले. रीरामनवमीला दुथडी भरून वाणाऱ्या नदीसारखा वारकऱ्यांचा दिंडीसमूह दरवर्षी श्री गजाननाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात लाखोच्या संखेनी शेगांवी येतो हे केवळ ऐकून माहित होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र आज होत होता.

प्रत्येक वारीत सहभागी असलेल्या दिंडीत २ ते ३ महिला डोक्यावर तुळस पाण्याची कळशी घेवून चालत असतात. आपले वय विसरून तुळाशीवृंदावन सावरत त्या आपल्या लाडक्या “गजानन बाबाला” भेटायला अधीर होऊन पळत असतात.

चालण्यचा थकवा असला तरी वरकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्ततेचा आनंद दिसतो. कडक उन्हा तडाखा सोसत दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगी असलेल्या सहनशीलतेचे आणि निरामय भक्तीचे आपणाला दर्शन घडते.

अतिशय शिस्तबद्धरितीने हजारो दिंड्या आपल्या वारकऱ्यांना घेऊन नगरप्रदक्षिणा करत असतात. ते सार दृश्ये इतकं लोभसवाणं असतं, इतकं मनोहारी असतं की त्यावरून जराही नजर ठळू नये.

संध्याकाळच्या श्री महाराजांच्या पालखी सोहळ्याच वर्णन करण हे लेखनीचं काम नव्हे. तो सोहळा प्रत्यक्ष बघणे भाग्यात आले तर त्यासारखा अत्यूच्च आनंदाचा क्षण नाही. प्रत्येक भक्ताने हा अनुभव घ्यावाच. साखर गोड असते हे सत्य असलं तरी त्याची गोडी ती खाल्याशिवाय कळत नाही.

हजारो दिड्यांचं शिस्तबद्ध नियोजन करताना कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अस्वच्छता नाही. भव्य अशा अनेक शामीयान्यात हजारो दिंड्यांची राहण्याची, जेवणाची चोख व्यवस्था संस्थानाचे सेवेकरी अतिशय श्रद्धेने, काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून सांभाळत असतात. महाराजांच्य सेवेबरोबरच त्यांच्य भक्तांची सेवा करण्यात संस्थानच्या सेवेकऱ्यांना धन्यता वाटते. एवढ्या प्रचंड गर्दीचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध रितीने करणारे व ते सांभाळणारे सेवक खरोखरच धन्य होत. दिंडीच्या मार्गावर शुभ्र वेषातील सेवेकरी हजारोंच्या संखेने संस्थानला नियमित सेवा देतात.

श्रीमहाराजांनी समाधिमूर्वी दिलेल्या वचनावर दृढ श्रद्धा ठेवून संस्थेचे कार्य अन्याहतपणे चालू असून ह्या सर्व सेवाकार्याच श्रेय श्री महाराजांना अर्पण करणारे, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे श्री महाराजांच्या चरणी वहिलेला समर्पित जीव. श्री महाराज प्रत्यक्ष भक्तांच्या हृदयात कसा नांदतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे प. पू. शिवशंकर भाऊ पाटील होय.

प्रचंड अशा कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि क्षमता त्यांना श्रीमहाराजांकडून भरभरून मिळाली याचं कारण त्यांची श्री महाराजांवर असलेली दृढ श्रद्धा होय. काटेकोरपणे नियमांच पालन, स्वच्छता व सुव्यवस्था असणारी भरतातील एकमेव संस्था म्हणजे श्रीगजानन महाराज संस्थान शेगांव होय.

सायंकाळच्या नेत्रदिपक पालखीचा सहभाग असलेल्या दिंड्यांच्या पुढे गावातील सर्व बॅण्डपथके आपल्या सर्व ऐश्वर्यासह दिंडीत सामील होतात. त्या मागोमाग मानाच्या दिंड्या, मधोमध श्री महाराजांचे तीन सजवलेले अश्व लयबद्ध पावले टाकीत चालतात. त्यांना सोबत असते डौलदार भारदस्त चालीच्या दोन हत्तींची. श्री महाराजांची वैभवशाली पालखी संस्थानच्या शिस्तबद्ध वारकऱ्या सोबत निघत असते. एका लयीत चालणारे ध्वजधारी उंच असे ध्धराज सरळ रेषेत उंच धरुन चालत असतात. परिटघडीच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखातील संस्थानचे वारकरी एका लयीत भजने म्हणत चालताना त्यांच्या कडक शिस्तीतून व्यवस्थानातील उत्तुंगता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

“श्री गजानन महाराज संस्थानचे वेवेकरी” हा खरोखरीच प्रबंधाचा विषय ठरू शकेल इतकी त्यांची सेवा नियमांचे काटेकोर बंधन पाळून अविरतपणे चालू आहे कारण “मी गेलो सेसे मानू नका । भक्तीत अंतर करू नका । कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच।।” या श्रीमहाराजांच्या वचनावर त्यांची दृढ श्रद्धा आहे. आपली प्रत्येक गोष्ट श्री महाराज बघतात हा उच्चतम भाव सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयात नांदताना आपणाला पदोपदी दिसून येतो. हा उच्चतम कोटीचा भाव आपल्या कुशल व कल्पक नियोनाद्वारे शेगाव संस्थान आज वर्षानुवर्षे जोपासत आहे आणि भविष्यातही जोपासत राहील यात शंका नाही.

“सर्वे भवन्तु सुखिन:” हे संस्थानचे घोषवाक्य असून या घोषवाक्याबरोबरच “शिवभावे जिवसेवा’ आणि “सेवा हीच साधना” या व्रताचा अंगीकार करता अनेक सेवाकार्ये अविरतपणे चालू आहेत. रंजल्या गांजलेल्यंना जीवनावश्यक वस्तू आणि मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात पुरवण्याचे कार्य खरोखरीच वाखणण्यासारखे आहे. संस्थानचे कार्य अनेकांनी आदर्श घ्यावा असेच आहे. भुलोकीचे नंदनवन शोभावे असा “आनंदसागर” प्रकल्प साडेतीनशे एकर जमिनीत अतिशय कल्पकतेने साकारला आहे.

हे सारं घडत ते कृपासागर असलेल्या श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि पेरणेने यावर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. श्री शिवशंकर भाऊ पाटील यांची नितांत श्रद्धा आहे. श्रीमहाराजांच्या चरणी संपुर्णतः शरणागत असलेले, संपुर्णपणे श्रीमहाराजांचे कृपापात्र असलेले भाऊ पाटील ज्यांच्या अंगी नम्रता, लिनता, कर्तव्यतत्परता यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो संपूर्ण महाराजमय झालेले प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे कार्तव्याचा, निष्ठेचा, प्रेमभक्तीचा महामेरू होय. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या विषयी लिहिण्यास लेखणी थीटी पडावी असे त्यांचे कर्तृत्व महानच नव्हे तर गगनाला गवसणी घालणारे आहे. सेवा, भक्ती, समर्पण आणि त्याग ह्य उच्च जीवन मुल्यांना १९६९ पासून आजतागायत अखंडपणे व्यवस्थापक ह्या पदावर कार्य करीत असताना जोपासले आहेत. अशा थोर विभूतीच्या केवळ दर्शनानेसुद्धा साधकाच्या हृदयात खऱ्या भक्ती प्रेमाचा उदय झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे. “शिवशंकर भाऊ पाटील । कारभार करी अंगे सकल । अतिप्रसन्न त्यासी भक्तवत्सल श्री गजानन महाराज ।।”

ज्या ज्या वेळी पालखी किंवा दिंडीचा विषय चर्चिला जातो त्या त्या वेळेस पाटील घराण्यातील एका तेजस्वी व्रतस्थ वारकऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ते व्रतस्थ वारकरी म्हणजे पुरूषोत्तम भाऊ पाटील होय.

श्री गोमाजी महाराज यांनी कुकाजी पाटलांना स्वप्न दृष्टांत देऊन मृत्यूपत्र करण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी सर्व संपत्तीची योग्य सोय लावावी व त्या बरोबरच “पंढरीच्या वारीचे व्रत वंश परंपरागत अखंड चालवावे” असाही संकेत दिला गेला. तो ही मृत्युपत्रात नमूद केला गेला. आजतागायत ते व्रत पाटील मंडळी जोपासत आहेत.

एक व्रतस्थ वारकरी म्हणून १९६८ ते १९८० एक तप सलगपणे श्री महाराजांच्या पालीखीसोबत श्री पुरूषोत्तम भाऊ पाटलांनी पायी वारी केली. यात कधीही खंड पडला नाही. प्रत्यक्ष द्वितीय चिरंजीव पांडूरंग पाटील यांच्या लग्न सोहळ्यास ते हजर राहू शकले नाहीत. कारण त्या वेळेस श्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत ते पायी वारीत होते. आध्यात्मिक कार्यास, प्रापंचिक कर्मा ऐवजी प्रथम प्राधान्य द्यावं हा आदर्शच वरील प्रसंगातून दिसून येतो.

श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या पायदळ वारीत संस्थानच्या नियमांचे काटेकोर आणि शिस्तबद्ध पालन करीत तब्बल १२ वर्षे श्री पुरूषोत्तम भाऊ पाटील यांनी श्रींची सेवा केली, श्री महाराजंच्या लीला महात्म्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार वारीच्या माध्यमातून केला. अनेक वारकऱ्यांना संस्थानशी कायमचे जोडले, त्यांच्यात डोळस भक्तीची ज्योत जागवली.

तीच धुरा आज समर्थपणे श्री गजानन महाराज संस्थान अतिशय सुत्रबद्ध नियोजनाद्वारे अविरतपणे सांभाळत आहे. आजमितीला शेगांव संस्थानरच्या प्रमुख उत्सवात लाखो दिंड्या येताना आपणास दिसतात त्याचे बीज खऱ्या अर्थाने पाटील वंशानेच “गुरुआज्ञा प्रमाण मानून पेरले. ” नियम, शिस्त स्वच्छता आणि कारभारातील पारदर्शकता यांचे काटेकोर पालन श्री कृपेने, श्री शिवशंकर भाऊ पाटील १९६९ पासून आजतागायत.

सर्वेसर्वा असूनही निष्ठावानसेवक रूपाने कार्य करीत आहेत. कुठलाही डामडैल न बाळगता तब्बल ४२ वर्षे श्रीमहाराजांची सेवा निष्ठेने अविरतपणे करीत आहेत. त्यांचे पुत्र श्री निळकंठदादा पाटील यांनीही आपले जीवन श्री चरणी वाहीले आहे.

श्री हरी पाटील ते श्री निळकंठ पाटील या प्रवासातील सर्व पाटील मंडळींनी शेगावमध्ये भक्तीप्रेमाचा सात्वीक मळा फुलवला, तो सदा टवटवीत राहील याची खबरदारी घेतली, त्याला शिस्त व नियमांचे कुंपण घातले. श्रीमहाराजांच्या सेवेबरोबरच श्रींच्या भक्तांची सेवा व्हावी हा परमोच्च विचार श्रीगजानन महाराज संस्थान करीत आहे. संस्थनच्या अनेक सेवा प्रकल्पातून आपणास ते दृश्य स्वरूपातून पहावयास मिळत आहे.

कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील म्हणजे सात्वीकता, नम्रता आणि त्यागाचं मुर्तिमंत प्रतिक म्हणून श्री महाराजांच दर्शन घेतल्यानंतर ओढ लागते श्री शिवशंकरभाऊंच्या भेटीची. प्रत्येक वारीस त्यांची भेट घेणं शक्य नसलं तरी त्यांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळतात. निष्ठा आणि कर्माचा सागर असलेल्या भाऊंना माझा कोटी-कोटी प्रणाम !

–श्री बाळकृष्ण कुलसंगे

संस्थापक: श्री गजानन महाराज मंदिर
उल्हासनगर – ३ जि. ठाणे

मो. ९४२२६७०४४८
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ३ रा (अंक २७)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..