चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।।१
वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे
आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।।२
घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा
मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।।३
भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला
कचरा आणि घरटे काढून खिडकीतुनी फेकला ।।४
काम संपवूनी सांज समयी घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे पाहून चकित झालो ।।५
पहाट होता चिमण्या उडाल्या काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस परी जिद न सोडी ते ।।६
चार दिवसाची सुटी घालउन गांवाहून परतलो
घरटे बघता संताप येऊन मुठी वळवूनी धावलो ।।७
घरट्या मधूनी चिमणी उडाली बसली पंख्यावरती
चिव चिव करुनी विनवू लागली दया दाखवा ती ।।८
परी मी तर होतो रागामध्ये चढलो माळ्यावरी
मन चरकले बघून अंडी छोट्या घरट्यामध्ये ।।९
असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज करुणायुक्त नयनी
यश मीळाले तिनेच शेवटी भूत दया जागवूनी ।।१०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply