गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे . कधी शेतात संध्याकाळी अंधारले की या ओढ्यातून अलीकडे यायची कोणाची धडगत होत नसे . या भीतीतूनच ओढ्याच्या पलीकडे याच गावाची वस्ती वाढली आणि पत्ता किंवा टपालाच्या सोयीसाठी भुते बुद्रुक असे या रानातल्या वस्तीचे नाव पडले . वस्त्या दोन दिसत असल्या तरी गाव एकच होते . कारण चावडी , ग्रामपंचायत , तलाठी ऑफिस , वार्षिक यात्रेचे भैरोबाचे मुख्य देवस्थान भुते खुर्दला होते . त्यामुळे बुद्रुकची बहुतेक मंडळी दिवसभर खुर्दला असायची . पण वाट्टेल ते झाले तरी अंधार पडायच्या आत परत आपलं घर गाठायची . अगदीच रात्री अपरात्री कधी संकट आले तर बंद गाडीतून किमान दहा – बारा गडी ओढा ओलांडायचे पण त्या आधी भुताला देणं म्हणून ओढ्याच्या पुलाच्या पहिल्या टोकाला चिलीम , गांजा , अंडरोट , पाच उभ्या शिरेची लिंबे आणि एक जिवंत कोंबडी दगडाखाली ठेवायचे . म्हणजे त्या कोंबडीला आडवी पाडून तिच्या दोन्ही पायांवर दगड ठेवायचे . परत येताना पाहावे तर तिथे फक्त कोंबडीची पिसे असायची .
तर असा हा वेताळ ओढा . या ओढ्याला फक्त पावसाळ्यात एकदाच पाणी येते आणि तेही फक्त एक दिवस . त्याच दिवशी रात्री भुतांच्या आंघोळी असतात . त्यांनी आंघोळी उरकताच हे पाणी अदृश्य होते . गेली कैक वर्षे हे अगदी नेमस्तपणे घडतेय . वर्षभर कोरडाठाक असणारा हा ओढा किंकर्तव्यमूढाप्रमाणे फक्त लांबलचक जागा अडवून आहे . त्यामुळे मोकळ्या मनात सैतान घर करतो तसे या कोरड्या ओढ्यात भुतांनी ठाण मांडले . एकेकाळी डोंगरापासून ओढ्यापर्यंत कुठेही भुते दिसत. म्हणजे ती त्यांची हद्दच होती . म्हणूनच या गावाचे नावही भुते पडले . खूप पूर्वी या गावाच्या शिवेवर मोठे युद्ध झाले होते ; पण यात कोणीच जिंकले नाही आणि कोणीच हरलेही नाही . कारण दोन्हीकडील योद्धे समोरासमोर लढले आणि सगळेच मेले . कोणीच वाचला नाही . प्रचंड कापाकापी झाली . सर्वत्र लटलटणारी धडे , तुटलेले हात , पाय आणि उघड्या डोळ्यांची मुंडकी असा खच पडलेला . रक्ताचे पाट वाहिले . हे रक्त इतकं होतं की ते या ओढ्यातून वहात गेलं . याच रक्ताची चटक या प्रेतांच्या भूतांना लागली आणि तेव्हापासून ही भुते इथंच राहू लागली . असा या भुते गावाचा आणि या वेताळ ओढ्याचा इतिहास आहे . परिसरातले वृद्ध लोक अजूनही या गोष्टी चवीचवीने सांगतात . हे ऐकताना साहजिकच नव्या पिढीच्या अंगावर काटा येतो आणि वेताळ ओढ्याचा इतिहास रोज जिवंत होतो .
हा वेताळ ओढा भुते गावाच्या स्मशानभूमीचेही काम करतो . कोणी गेले की या ओढ्यातच अंत्यविधी होतो . सावडण्याकरिता सर्व नातलग एकेक बादली वा कळशी भरून पाणी आणतात . पण एक नियम मात्र कटाक्षाने पाळला जातो तो म्हणजे माणूस केव्हाही गेला तरी विधी मात्र दिवसा . वेताळाच्या भीतीमुळे रात्री अपरात्री या ओढ्यात कधीच कोणाचे दहन केले जात नाही . या ओढ्याच्या काठावर एक अक्राळ – विक्राळ वडाचे झाड आहे . याला मुंजाबाचा वड म्हणतात . वडाच्या मुळाशी एक मोठा सपाट खडक आहे . दिवसभर या वडावर शेकडो वटवाघळे ध्यानस्थपणे लटकलेली असतात . हा वड इतका महाकाय आहे की त्याची सावली दुपारी भर बारा वाजता रात्री बाराचा अंधार दाखवते . त्यामुळे या वडाखाली सहसा कोणी जात नाही . याच वडाच्या मागच्या बाजूला मुस्लिमांची दफनभूमी आहे . म्हणजे भुते गावात रफी मुलाण्याचं एकच घर . त्याचा बाप रहेमचाचा पैगंबरवासी झाला तेव्हा त्याला इथं पुरला होता . त्यापूर्वी हे कुटुंब इथं नव्हतंच . रहेमचाचा या परिसरातला प्रसिद्ध धारवाला होता . ‘ विळी , चाकू , आडीस्ते ( अडकित्ते ) , कात्री धाहारवाला ss अशी त्याची आरोळी सर्वपरिचित होती . आणि हीच आरोळी या वडाच्या झाडात अगदी भर दुपारी ऐकू येते असे म्हणतात . तर असा हा वेताळ ओढा आणि त्याचा भयाण गूढ परिसर.
दिवसरात्र एखाद्या श्वापदासारखा सुस्तपणे पडलेला हा ओढा जसा वर्षातून एक दिवस आपल्या अंगावर पाणी मिरवतो तसा एक दिवस तो नैवेद्यांनी दुतर्फा भरून जातो . हो दरवर्षी गावाच्या मोड यात्रेला गावात बकरी कापली जातात . घरोघरी केलेल्या मटणाचा नैवेद्य म्हणजे देणं ग्रामस्थ एकत्रितपणे वेताळाच्या ओढ्याला घेऊन जातात . एक कलेजीचा तुकडा किंवा गुडदा , आळणी , मटण भात असा तो नैवेद्य असतो . का कोणास ठाऊक पण भुते तिखट खात नाहीत असे म्हणतात . मग हे भूताचं देणं ओढ्याच्या काठाला ठेवून परत मागे वळून न पाहता हे ग्रामस्थ बत्त्या बॅटऱ्यांच्या उजेडात घरी येतात . मागे वळून पाहायचे नसते . तरी एकदा नैवेद्य ठेवून परत येताना सुताराच्या दत्तूने मागे वळून पाहिले होते . त्याच क्षणी त्याला पान लागले . म्हणजे साप चावला आणि तिथेच तोंडातून फेस येऊन दत्तू गतप्राण झाला . तेव्हापासून या विषाची परीक्षा कोणी घेत नाही .
एकदा भूत्याची जत्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी गावात रात्री डान्सिंग पार्टीचा जंक्शन कार्यक्रम होता . खास मुंबईवरून पार्टी मागवली होती . जवळ जवळ तीस चाळीस कलाकारांचा हा संच दुपारीच भुते खुर्दला दाखल झाला . देवळासमोर रामतात्याच्या आवारात वडाच्या झाडाजवळ कार्यक्रमाचा भव्य स्टेज उभारला होता . स्टेज , लाईट्स आणि ध्वनि यंत्रणावाले कामगार लगेचच कामाला लागले . बाकीचे कलाकार आणि वादक पाटलाच्या घरी जेवणखाण करून शाळेत प्रॅक्टिसला गेले . तिकडे गावातल्या मुलांनी शाळेच्या भिंतींना गराडा घातला . दार लावलेल्या वर्गांना मुले मधमाशांसारखी लगडली होती . घुंगूर , ढोलकी आणि सिंथेसायझरच्या आवाजाने शाळा घुमू लागली . अन्नाचा कणही न खाता बॅकस्टेजवाले अविश्रांतपणे झटत होते . त्यातील काहीजण मधूनच चहा विडीवर चार्ज होऊन तन्मयतेने काम करत होते . झगमगाटातल्या कलाकारांना सोडून या तंत्रज्ञ कामगारांकडे कोणी बघत नव्हते . त्यांच्या जेवणाची साधी विचारपूसही कोणी केली नाही . आता जेवण मिळेल ते रात्री कार्यक्रमानंतरच संध्याकाळ झाली आणि लोक कार्यक्रमाकडे सरकू लागले . दहा वर्षांपूर्वी गावातीलच लोकांनी जत्रेत एक नाटक बसवले होते . पण नाटक ऐन रंगात आले असताना बाबू वाण्याचे घर पेटले आणि नाटकाचा पडदा पाडावा लागला . त्यानंतर आज ही डान्सिंग पार्टी भूत्यात उतरली होती . ओढ्याच्या धास्तीने उजेडीच बुद्रुकचे लोक इकडे येऊन बसले होते . ओढ्यातून परत जायला नको म्हणून अनेकजण इकडेच कलंडायला सोलापुरी चादरी , कानटोप्या अशा जय्यत तयारीत आलेले . तर काहीजण आपल्या भावकीत मुक्कामी आलेले . मात्र बुद्रुकच्या आझाद तालीम मंडळाची ढोल पथकाची मुले रात्री परत फिरायच्या इराद्याने बसली होती.
बघता बघता कार्यक्रमाची वेळ झाली आणि तमाम पंचक्रोशी पडदा उघडण्याची वाट पाहू लागली . ढोलकीचा तोडा कडाडला , घुंगरांचा झंकार झाला आणि सिंथेसायझरच्या फ्लोटिंग्ज् बरोबर पडदा उघडला . टाळ्या शिट्यांचा गजर झाला . एकेक करत दहा – बारा मदमस्त अप्सरा थिरकत स्टेजवर अवतरल्या आणि सारा आसमंत बेधुंद झाला . कार्यक्रम रीतसर बिनचूक सुरू झाल्याचे पाहून पडद्यामागील कामगारांनी सुटकेचा श्वास सोडला . ज्या साहाय्यकांचे आता काही काम नव्हते असे दहा – बाराजण तेथून थोडे लांब शाळेकडे गेले . एक दोघांनी विडी सिगारेट पेटवली आणि शाळेच्या व्हरांड्यात बुडे टेकली . पाचच मिनिटांत त्यांच्यापैकीच एक आब्बास मिस्त्री रेग्झिनची बॅग घेऊन आला . तो जवळ येताच सगळे खुश झाले . कारण महत्त्वाचा माल घेऊन तो आला होता . दहा – पंधरा दारूच्या बाटल्यांनी भरलेली ती बॅग खाली ठेवताच बाटल्यांचा आवाज झाला आणि सर्वांनी आवंढे गिळले . कधी एकदा प्यायला बसतोय असे सर्वांना झाले होते . पण शाळेच्या व्हरांड्यात , या पवित्र जागेत दारू कशी प्यायची म्हणून सगळे तेथून उठले आणि कार्यक्रम रंगात आलाय असे पाहून हळूच कडेच्या रस्त्याने वेताळाच्या ओढ्याकडे सरकले .
या नव्या गावात कोणती जागा कशी आहे याची यत्किंचितही जाणीव यांना नव्हती आणि असणे शक्य नाही . त्यामुळे अनभिज्ञपणे ते सगळे अगदी पूल ओलांडून ओढ्याच्या पलीकडे जाऊन सरळ मुंजाबाच्या वडाखाली त्या सपाट खडकावर बसले . बॅगेतील ऐवज मांडेपर्यंत दोन चारजण लघुशंकेला जाऊन आले . तोपर्यंत बाटल्या उघडून सज्ज झाल्या . सर्वांनी बाटल्या हेच ग्लास समजून चिअर्स केले . दोन दोन घोट घेऊन त्यातच बाटलीतले थोडे थोडे पाणी मिसळत मैफिल रंगात आली . इथवर ऐकू येणाऱ्या कार्यक्रमाचा कानोसा घेत पहाडी गप्पा मारत ही मंडळी नशेत दंग झाली .
फार्र फार्र काड्या ओढून विड्या पेटल्या . हा काड्यांचा उजेड आणि विड्यांच्या झुरक्यांचा धूर भकाभक वर वडाच्या झाडात जाऊ लागला . या अचानक बसलेल्या धुरीने वर बसलेल्या शेकडो वटवाघळांना जाग आली . म्हणजे मुळात हे लोक आल्यापासून वटवाघळे त्यांना पहात होतीच , पण आग आणि धूर पाहताच ती घाबरली . या धुराने जणू काही त्यांना ठसकाच लागला आणि झाड पेटतेय की काय या भीतीने एकाच वेळी प्रचंड कलकलाट करत शेकडो वटवाघळे या झाडावरून उडाली ती थेट गावात जिथे कार्यक्रम चालला होता त्याच्या मागील वडाच्या झाडावर आली . चाललेल्या ऑर्केस्ट्राच्या आवाजाच्या डेसिबलपेक्षा या वटवाघळांचा आवाज दुप्पट होता.
खाली ‘ कुण्या गावाचं आलं पाखरू ‘ या गाण्यावर एक गिर्रेबाज नृत्यांगना अगदी ठसक्यात नाचत होती . तिची अदा पाहून फिदा झालेले भुतेकर जोशात टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर करत होते . इतक्यात गगनभेदी फडफडाट करत आलेला हा काळ्या पाखरांचा थवा त्यांचा काळीज चिरून जाणारा कर्कश्श आवाज ऐकून तमाम भुतेकर अक्षरशः हादरले . समोरची नृत्यांगना वरून स्टेजवर काही कोसळले की काय असे समजून इतकी बिथरली की तिने चक्क त्यांच्या अनाउन्सरला जाऊन मिठी मारली . आता तिच्या पासून अगदी जवळ असणारे इतर साहाय्यक कलाकार सोडून ती विंगेजवळ असणाऱ्या अनाउन्सरलाच जाऊन का चिकटली हे एक अनाकलनीय कोडेच होते . शेवटी वटवाघळांच्या या गोंधळाने कार्यक्रम थांबवला . प्रेक्षकांमध्ये कुजबूज वाढली .
‘आबाबाबाऽऽऽ आरं ही वटवाघूळं कशी आन् कुठनं आली ? ‘ ‘ आरं नामा ही आपल्या वढ्यावली हैत . नक्की मुंजाबाच्या वडावली .. मी तिकडनंच येताना पायली . ‘ च्यायला बापू , आपला ह्यो आवाज ऐकून नक्की तिकडं भुतांनी कै तरी तमाशा केल्याला दिस्तोय .
ही कुजबूज आझाद तालीम मंडळाच्या पोपटने ऐकली आणि त्याने सगळ्या मित्रांना सावध केले . ‘रम्या , सत्या ये बबन्या ल्येका आता रिटर्न जायाचं कसं ? तिकडं वढ्यात भुतांनी तमाशा केलाय म्हंत्यात . ‘
‘लक्का मंग घाबार्तुइस कशाला . ही मान्सं काय बी बडबडत्यात आपून काय हांडगं है का ? आँऽऽ ‘ रम्याच्या या खुलाशावर सगळे शांत झाले . वर झाडावरची वटवाघळे पण शांत झाली . बहुतेक या नव्या झाडावर जागेसाठी भांडत असावीत . कुजबूज थांबली , शांतता पसरली आणि पुन्हा एकदा जोमाने डान्सिंग पार्टी सुरू झाली .
देवदासचं ‘ मार डालाऽऽ ‘ करत पुन्हा तीच डान्सर थिरकत आली आणि टाळ्यांच्या गजरात भुतेकर डोलायला लागले . जवळ जवळ रात्रीचे तीन वाजले होते . वटवाघळांच्या इंटरव्हल नंतर कार्यक्रमाने चांगलाच जोर धरला .
लोक तल्लीन झालेले पाहून रम्याने आपल्या मित्रांना इशारा केला , ‘ चला आपण निघू आता . तिकडं वढ्याकडं काय झालंय त्ये तरी बघू . कारण इत्की वटवाघळं हिकडं आलीच कशी ? आन् का ? ‘
‘चला … चला ’ किश्यानं दुजोरा दिला . आणि मंडळाची सगळी मुले लायटिंगच्या झिगझॅग प्रकाशात हळूच बाहेर पडली . पंधरा – वीस तरण्याबांड पैलवानांचा हा गट लगबगीनं बुद्रुकच्या रस्त्याला लागला . समोर हाकेच्या अंतरावरच ओढा होता . प्रत्येकाच्या काळजात थोडं धस्सं झालं पण आज माघार नाही . सर्वांनी ठरवूनच ठेवलं होतं की आज वाट्टेल ते झाले तरी ओढा ओलांडून घरी जायचंच . त्यात हे वटवाघूळ प्रकरण घडले त्यामुळे एक वेगळी भीती निर्माण झाली होती . पण किश्या आणि रम्या आज इरेला पेटले होते . प्रसंगी भूतांशी दोन हात करायची त्यांनी तयारी ठेवली होती. इतका वेळ शांत बसलेला पोपट पण आता चवताळला होता . गावाला पिढ्यान्पिढ्या छळणारी ही भुते आज कायमची सरळ करायची असा निर्धार सर्वांनी केला .
तिकडे डान्सिंग पार्टीचा कार्यक्रम आता जवळ जवळ संपत आला होता . निवेदकाने शेवटच्या गाण्याची घोषणा केली त्याबरोबर ओढ्यात झिंगत असलेली कामगार मंडळी जागी झाली . पांढरा पठाणी ड्रेस आणि गोल टोपी घातलेला आब्बास मिस्त्री उठला . त्याने उरलेल्या एक – दोन बाटल्या , फरसाण , वेफर्सची पाकिटे बॅगेत भरली आणि बॅग खांद्याला लावत त्याने सर्वांना उठवले , ‘ चलोऽऽ चलो … ऐऽऽ रमेशभाई उठोऽऽ उधर प्रोग्रॅम खतम हुएला है .. चलोऽऽ ऐ रमेशऽऽ ‘ असं म्हणत आब्बास दोन पावले पुढे झाला आणि नेमकी त्याच वेळेस आझाद मंडळाची मुलं समोर आली . समोरचं दृश्य पाहून त्यांची गाळण उडाली . आपलं नाव ऐकून रम्याची तर बोबडीच वळली . मुंजाबाच्या वडाखाली साक्षात रहेमचाचा आणि तोही मला हाक मारतोय . मुलांना पळता भुई थोडी झाली . ‘ बाबा बाबाऽऽ कित्ती भूतं पळा पळाऽऽ ‘ सगळं आझाद मंडळ ठणाठणा बोंबलत माघारी फिरलं .
तोपर्यंत कार्यक्रम सुटला होता . शाळेकडे , मागच्या पांदीला माणसांची वर्दळ सुरू झाली होती . पोरं का ओरडत पळतायेत , काय भानगड आहे म्हणून अनेक लोक गोळा झाले . पोरांनी झाली घटना सर्वांना सांगितली . सगळेजण दबा धरून अंदाज घेत ओढ्याच्या रस्त्याकडे पाहू लागले . पण पुढे सरकायची कोणाची हिंमत होईना .
इतक्यात रम्या जोरात ओरडला , ‘ आरं त्थी बघा त्थी बघा भूत भूतऽऽ रहेम चाचाचं भूत .. वर येतंय पळा पळाऽऽ ‘ . सगळे मागे मागे पळत त्या वाटेकडे पाहू लागले . तर खरंच विडी ओढत रहेमचाचा ओढ्यातून वर चढण चढून येत होता . शेकडो माणसांचा जमाव डोळे ताणून ताणून त्याच्याकडे पहात होता . लगेचच त्याच्या मागून बाकीची मंडळी वर येऊ लागली तसा हा जमाव बिथरला .
‘आँऽऽ लेका सगळीच भूतं हिकडं येत्यातऽऽ तरीच हिकडली वटवाघळं मघाशी गावात आली . ‘ आबाबाबा पळा पळा ऽऽ असे गर्दीचे आवाज वाढू लागले . पण जमाव प्रचंड मोठा असल्याने तो भिऊन मागेही सरत नव्हता . आता पहाटे पूर्वीची अत्यंत अंधुक अशी संधी प्रकाशाची आभा पसरू लागली होती . अनेकांना रहेमचाचाच्या खांद्यावर बॅग दिसली .
तेव्हा रफी मुलाणीच ओरडला , ‘ अरे डरो मत ये मेरे आब्बू नैं है . आब्बाजान बिडी तो कभ्भी नै ओढते . ये बंदा कोई औरच है , ‘ बोलेपर्यंत समोरची भूत मंडळी चांगलीच वर आली आणि सुस्पष्ट दिसू लागली .
इतक्यात डान्सिंग पार्टीतले चार – दोन लोक आले . हे लोक का जमलेत , समोर कोण आहे , हे काय पाहतायेत . याचा यांना मागमूसही नव्हता . नेहमीच्या सहजतेने त्यातील एक दोघांनी समोरून येणाऱ्या भुतांना हाळी दिली , ‘ येय्य आब्बासभाय .. रमेशभाय आं जल्दी चलो . पैले खाना खाके जल्दी पॅकअप करो चलो …
‘ त्या बरोब्बर सगळे पळतच आले आणि त्यांना पाहून समस्त भुतेकर अक्षरशः बावचळून पोट धरून हसू लागले . गुरवाच्या नवनाथने त्यांना थांबवून विचारले , ‘ आपकू डर नहीं लग्या क्या ? ‘ यावर हसतच आब्बास म्हणाला , ‘ कैसा डर ? ‘ ‘ वो … हमारे वढेमें वेताळ है .. भूत है . ‘ यावर आब्बास आणि सगळेच पोट धरून हसले . ‘ अरे भूत बीत कुछ नहीं होता भाय . ये सब डरावनी बातें होती है .. जो मर गया वो फिर वापस कभ्भी नहीं आता . अगर आता भी है तो अपने बेटे की कोख से ‘ ‘ और वो हमारी वटवाघळे ? ‘ नवनाथच्या या प्रश्नावर हसत रमेशभाय म्हणाला , ‘ आहो काय घाबरताय .. आम्ही सिगारेट पेटवली तो उजेड आणि धूर बघून ती बिच्चारी पाखरं उडाली . दुसरं काय . घाबरू नका . आमच्या सारखं धीट व्हा . तुमच्या ओढ्यात भुतं असली तरी त्यांचे बाप आहोत आम्ही . कष्ट केलं , घाम गळला की भूक आणि झोप चांगली लागती . भुताची आठवण पण होत नाय . चला … चला .
‘आता चांगलेच उजाडले होते . ग्रामस्थ घरी जायच्या ऐवजी ओढ्याकडे पळाले आणि मुंजाबाच्या वडाखाली खडकावर निर्भीडपणे नाच नाच नाचले.
-लक्ष्मीकांत रांजणे
(सेवानिवृत्त बँक ऑफ महाराष्ट्र , वाई)
Leave a Reply