एका शेतकरी होता. पण होता गरीबच. एक छोटा जमिनीचा तुकडा होता त्याच्या मालकीचा. थोडा भाग टेकडीच्या उतारावरचा आणि थोडा सपाट पाणथळीचा असं होतं त्याचं शेत. त्या दिवशी तांबडं फुटता फुटताच निघाला होता शेत नांगरायला. न्याहारीसाठी कारभारणीनं रात्रीच्या जेवणातला उरलेला भाकरतुकडा आणि कांदा दिला होता. शेतात पोचल्यावर त्यानं अंगातली बंडी काढली तिच्यात ती न्याहारी गुंडाळून एका झुडपात ठेवली आणि बैलाला नांगराला जुंपून कामाला लागला. सकाळचं ऊन तापायला लागल्यावर त्याचा बैल दमला आणि तो स्वत:ही. भूक लागली. तशी त्यानं बैलाला मोकळा करून चरायला सोडून दिलं आणि आपण झुडपाजवळ जाऊन बंडी आणि न्याहारी घ्यायला गेला.
आधी अंगावरला घाम पुसावा म्हणून त्यानं बंडी उचलली. न्याहारी काढून ठेवायला गेला तर होती कुठं न्याहारी? भाकरी नि कांदा दोन्ही गायब. बंडी झटकली, इकडं तिकडं बघितलं पण न्याहारी खरंच गायब झालेली. ‘अरेच्या, गेली कुठं माझी न्याहारी?’ शेतकरी विचारात पडला.
“काय आक्रीतच म्हणायचं की,” तो स्वत:शीच पुटपुटला, “आपण तर कुणालाच इथं आलेलं बघितलं नाही. मग कुणी नेली असेल भाकरी? जाऊ द्या झालं. आलं असेल कुणीतरी भुकेलेलं आपलं लक्ष नसताना आणि नेली असेल त्यानं भाकरी भूक लागली म्हणून.”
खरं तर भाकरी नेली होती एका भुतानं. शेतकरी नांगरत असतानाच ते तिथं येऊन झुडपामागं लपलं होतं. उद्देश काय? तर शेतकरी जे अपशब्द बोलेल ते ऐकायचे आणि त्याचं ते पाप आपल्या मालकाला – म्हणजे प्रधान पिशाच्चाला – सांगायचं, हे काम होतं त्याचं.
शेतकऱ्याला न्याहारी कुणीतरी नेल्याचं तसं वाईट वाटत होतं खरं. पण ‘जाऊ दे झालं, असेल कुणीतरी भुकेजलेला गरीब बापडा. आपण काही एक दिवस सकाळी भाकरी खायला मिळाली नाही तर मरणार नाही. त्या गरिबाला गरज होती. खाऊ दे. भलं होऊ दे बिचाऱ्याचं.’ असं म्हणून मग तो जवळच्या झऱ्यावर गेला, पोटभर पाणी प्याला, जरा वेळ सावलीत लवंडला आणि मग उठून पुन्हा नांगर जुंपून कामाला लागला.
भुताची मात्र निराशा झाली. शेतकऱ्याला पाप करायला भाग पाडू शकलं नव्हतं ते. आता सैतानाकडं जाऊन काय सांगणार?
जायला तर पाहिजेच होतं. मग ते प्रधान पिशाच्च्याकडं गेलं आणि आपण कशी ती भाकरी चोरली पण शेतकरी शिव्याशाप द्यायच्या ऐवजी ‘भलं होऊ दे बिचाऱ्याचं’ कसं बोलला ते सविस्तर सांगितलं.
प्रधान पिशाच्च रागावलं. म्हणालं, “अरे मूर्खा, त्या माणसानं तुला हरवलं. यात चूक तुझी आहे. कळत नाही तुला? अरे जर सगळेच शेतकरी आणि त्यांच्या बायका अशा प्रकारे वागायला लागल्या तर आपला कारभारच आटोपला ! असं व्हायला नकोय. परत जा आणि कसून प्रयत्न कर. आणि हे बघ, मी तुला तीन वर्षांची मुदत देतो. तेवढ्यात जर तू त्या शेतकऱ्याला मार्गावर आणलं नाहीस तर तुलाच मी देवांच्या पवित्र पाण्यात बुडवून टाकीन. याद राख.”
त्या कल्पनेनेच भूत पार घाबरलं. परत पृथ्वीवर जाऊन काय करावं असा विचार करत बसून राहिलं. बराच वेळ डोकं खाजवल्यानंतर त्याला एक अफलातून कल्पना सुचली. स्वत:चं रूप बदलून त्यानं शेतमजुराचं रूप घेतलं आणि त्या शेतकऱ्याकडं जाऊन त्याच्या शेतात मोलमजुरीचं काम मागून घेतलं.
पहिल्या हंगामात त्यानं शेतकऱ्याला शेताच्या पाणथळ भागात मका लावायला सांगीतलं. ते वर्ष कमालीच्या उन्हाळ्यानं भाजून निघालं. पाऊस पडला नाही. बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांची पिकं करपून गेली. फक्त या शेतकऱ्याचं पीक मात्र पाणी मिळाल्यानं भरघोस पिकलं. त्याच्या वर्षभराच्या गरजेपेक्षा जास्त मका पिकला.
दुसऱ्या वर्षी भुतानं शेतकऱ्याला शेतातल्या टेकडीवरील जमिनीत, उतारावर, मका लावायचा सल्ला दिला. ते वर्ष अतिवृष्टी घेऊन आलं. बाकी सगळ्यांची पिकं कुजून गेली पण या शेतकऱ्याचं पीक मात्र पाण्याचा निचरा झाल्यानं तरारून फुलून आलं. कणसांमध्ये चांगले टपटपीत दाणे भरले. त्या वर्षीदेखील गरजेपेक्षा खूपच जास्त मका मिळाला. त्या जास्तीच्या मक्याचं काय करायचं हे शेतकऱ्याला समजेना.
मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला.
भुतानं प्रधान पिशाच्च्याकडं जाऊन आपल्या कामाचा सविस्तर वृत्तांत दिला. मागल्या वेळेच्या चुकीची भरपाई पूर्णपणे केल्याची फुशारकीही मारली. प्रधान पिशाच्च्यानं स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायचं ठरवलं. ते शेतकऱ्याच्या घरी स्वत: अदृश्य स्वरूपात गेलं. तिथं शेतकऱ्यानं आपल्या मित्राना दारूपानासाठी बोलावलेलं होतं. त्याची बायको त्या सगळ्यांना दारूचे पेले भरून देत होती. अचानक एकाला भरलेला पेला देताना तो हिंदकळला आणि दारू सांडली. शेतकरी भडकला. बायकोला रागावून ओरडला, “काय गं? आंधळी झालेस का? नीट चालता येत नाही? ही किंमती दारू आहे. डबक्यातलं पाणी वाटलं की काय तुला असं भुईवर सांडायला? आं ?”
भुतानं प्रधान पिशाच्च्याला कोपरखळी दिली, “बघितलंत? हाच माणूस होता ना जो आपल्या वाटणीची भाकरी हरवली तरी नाराज झाला नव्हता?”
शेतकरी अजूनही बायकोवर गुरकावत स्वत:च दारूचं वाटप करायला लागला. तेव्हा एक गरीब शेतकरी, ज्याला आमंत्रण नव्हते असा, कामावरून घरी परत जाता जाता आत आला. सगळ्यांना हसून नमस्कार करून बसला. शेतीतल्या दिवसभराच्या कामाने थकलेला होता आणि आपल्यालाही घोटभर दारू मिळेल प्यायला अशी इच्छा होती त्याच्या मनात. वाट बघत राहिला. पण घरमालक शेतकऱ्यानं त्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि वर पुटपुटला, “कुणीही आगंतुक आला तर मी काय त्याला माझी दारू द्यायची? जमणार नाही.”
हे दृश्य बघून प्रधान पिशाच्च्याला आनंद झाला. पण भुतानं डोळा मारून त्याला सांगितलं, “जरासं थांबा. बघा पुढं काय होतंय ते.”
आलेले सगळे पैसेवाले मित्र आणि स्वत: शेतकरी भरपूर प्याले आणि एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लागले. ते सगळं ऐकून प्रधान पिशाच्च आणखीच खुश झालं. भुताला शाबासकी देत म्हणालं, “अरे हे लोक असेच पीत राहिले आणि एकमेकाला नावं ठेवत बसले तर लवकरच त्यांच्या मनावर आपला कबजा होईल.”
“एवढ्यानं काय होतंय? अजून पुढं बघा. अजून एक एक पेला रिचवू द्यात, मग बघा कसे वागायला लागतील. आता कुठं कोल्ह्यासारखं लबाडीचं पण सावधगिरीनं बोलतायत. जरा वेळानं मग त्यांच्यातली जनावरं जागी होतील. तेव्हा आणखी मजा येईल.”
सगळ्या मंडळींनी आणखी एकेक पेला रिचवला. मग त्यांचं बोलणं मोठ्या आवाजात लांडग्यासारखं आणि शिवीगाळीचं व्हायला लागलं. प्रधान पिशाच्च बघत राहिलं आणि मनोमन खुश होत राहिलं. “हे एक नंबरचं काम झालं बघ.”
पण भुताची खात्री होती परिस्थिती अजून हाताबाहेर जाणार याची. “थांबा, थांबा. याचा कळस व्हायचाय अजून. अजून एक फेर होऊ द्या दारूचा. मग बघा. यांची डुकरंच होतील.”
मग पेयपानाचा तिसरा फेर सुरु झाला. आणि सगळेच एकमेकावर लांडग्यासारखं गुरगुरत, दुसऱ्याचं न ऐकता अकारण शिवीगाळी करत हातापायीवर येऊन एकमेकाना मारहाण करायला लागले. आपला शेतकरी स्वत:देखील त्यात सामील झाला आणि पिटला गेला चांगलाच.
आता पार्टी संपायला आली. मित्रमंडळी घारी जायला निघाली. कुणी एकेकटे गेले तर कुणी दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेत, गळ्यात गळे घालत, ‘तू माजा भाऊ, मी तुजा भाऊ’ असं बरळत निघाले. शेतकरी त्या सगळ्याना निरोप देऊन बाहेरपर्यंत पोचवायच्या प्रयत्नात स्वत:च एका चिखलाच्या खड्ड्यात पडला आणि तिथंच डुकरासारखा लोळत राहिला.
प्रधान पिशाच्चाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
“वारे पठ्ठे!” भुताची पाठ थोपटत ते म्हणालं. “फार भारी काम केलंस गड्या तू. हे असं अफलातून पेय बनवून तू मागे केलेल्या चुकीचं परिमार्जन केलंस खरं. पण मला सांग हे जे काही पेय आहे त्यात काय काय मिसळलं होतंस तू? मला वाटतंय सगळ्यात आधी कोल्ह्याचं रक्त घेतलं असशील ज्यामुळं ही माणसं लबाड झाली, त्यात तू समभाग लांडग्याचं रक्त मिसळलं असशील, म्हणून ती क्रूर बनली आणि सगळ्यात शेवटी तेवढ्याच प्रमाणात घातलंस डुकराचं रक्त. त्याच्यामुळं त्याचं वागणं डुकरासारखं झालं. होय ना?”
“नाही,” भूत म्हणालं. “मी असं काहीच मिसळलं नाही. एवढंच केलं की शेतकऱ्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त धान्य – मका – कसं मिळेल ते बघितलं. मुळात जनावरांचे गुण माणसाच्या रक्तात असतातच. पण जोपर्यंत त्याला आवश्यक असेल इतकंच धान्य तो पिकवतो तोपर्यंत हे गुण सुप्त असतात. आणि ते सुप्त असतात तोपर्यंत माणूस त्याच्या हरवलेल्या भाकरीसाठी अस्वस्थ होत नाही. पण जेव्हा त्याच्याकडे जास्तीचं धान्य – मका – उरतो तेव्हा तो त्यापासून अनावश्यक असे चैनीचे पदार्थ बनवून जिभेचे चोचले पुरवायला बघतो. त्याच चोचल्याना मी मार्ग दाखवला – दारू पिण्याचा. आणि मग जेव्हा शेतकऱ्यानं देवाच्या देणगीपासून म्हणजे मक्यापासून दारू बनवायला आणि प्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या शरीरात असलेलं कोल्ह्याच्ं, लांडग्याचं आणि डुकराचं अशी सगळी रक्तं जागी झाली आणि त्यांनी माणसाच्या रक्तावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. माझी शंभर टक्के खात्री आहे, जोपर्यंत माणूस असा नशेचे पेय – दारू – पीत राहील तोपर्यंत तो असा पशूच बनत राहील.”
प्रधान पिशाच्च्यानं भुताचं कौतुक केलं, त्याची पूर्वीची चूक माफ केली, आणि शिवाय त्याला ‘भूतभूषण’ या मानाच्या पदावर बढतीही दिली.
— मुकुंद कर्णिक
Leave a Reply