व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख
कष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते.
देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी, सोमवारी रात्री शके १८०५, वैशाख कृष्ण षष्ठी या तिथीला नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. दीड-दोन वर्षांचा बालविनायक कसा दिसत असेल याचे वर्णन खालील पद्यपंक्तीत सापडते.
कर्णी सुंदर डोलावे डूल दुडूदुडू चालता।
होई आपणाची प्रेमे घास आईस घालता ।।
घोडा खेळवाया ताता कामा जाऊ मुळी न दे ।
वस्त्रची लपवी, राही दाराच्याच उभा मधे ।।
जसा जसा गेला तिचा बाळ वाढत सद्गुणी ।
श्रेय प्रेय तिच्या जाती एक होऊनि जीवनी ।।
एखाद्या सर्वसामान्य बालकाप्रमाणेच बालविनायक हट्टी, खोडकर आणि निरागस होता. वडील दामोदरपंत आणि आई राधाबाई सावरकर यांनी त्याच्या जन्मानंतर मोठ्या हौशीने बारशाचा कार्यक्रम केला होता. विनायकराव, ज्येष्ठ बंधू गणेश, कनिष्ठ बंधू नारायण आणि भगिनी माई या सर्व भावंडात देखणेपणा, बोलकेपणा आदि गुणांमुळे बालविनायक सर्वांचा लाडका होता. आपल्या अंगी असलेली तल्लख बुद्धी आणि हजरजबाबीपणा यामुळे ‘छोटे जहागीरदार’ म्हणजे छोटा विनायक सर्वांचा लाडका होता. सावरकर कुटुंबीय अष्टभुजा देवीची पूजा-अर्चा, षोडशोपचार पूजन, रोज सायंकाळी पुराणादि ग्रंथांचे वाचन, संध्यादि आन्हिकाचे आचरण, शुचिर्भूतपणाचे पालन यांमुळे घर सुसंस्कृत असल्याचे स्पष्ट होते.
बालपणीचा काळ सुख–दुःखांचा !
बालविनायक शाळेत अभ्यासामध्ये उत्तम गतीने प्रगती करत होता. त्याची स्मरणशक्ती उत्तम असल्याने मुंजीनंतर श्री. दाजी धोपावकर गुरुजींनी शिकवलेली संध्या विनायकाने सहा दिवसांत मुखोद्गत केली, हे खरोखरच कौतुकास पात्र होते. नवरात्रात दुर्गासप्तशतीचे पठण हा विनायकाचा आवडता उपक्रम! या श्लोकांच्या पठणातून विनायकास धार्मिक व आध्यात्मिक दृष्टी लाभली. त्याच्या बालमनावर या गुणविशेषाचा दूरगामी परिणाम झाला, हे भविष्यात स्पष्ट झाले. जणू त्याच्या अंगी दिव्य शक्तीच संचारली होती.
परमेश्वराची भक्ती मनोभावे करणाऱ्या बालविनायकाचे ज्ञान आणि आत्मविश्वास वाढला होता. तो रोज ‘पुणे वैभव’, ‘जगतहितेच्छु’, ‘गुराखी’ आणि ‘केसरी’ यांसारखी प्रखर राष्ट्रभक्ती जागवणारी वृत्तपत्रे वाचू लागला. त्यातील उतारे मुखोद्गत करून तो मित्रांसमोर म्हणून दाखवायचा. यातूनच त्याला लेखन आणि काव्याचा छंद जडला. त्याने पेशव्यांची बखर वाचल्यानंतर सवाई माधवराव पेशवे काळाबद्दल पद्य वर्णन केले.
पागे पथके मानकरी आणि कारभारी हे सरदार।
श्रीमंत प्रभू माधवरायासहित आले दरबारा।
ज्यानी रोवूनी महाप्रतापे । जरी पटाक्याशी अटकेला ।
त्यांची स्वारी तिथे आली श्रीमंतांना न्यायला ॥
बालविनायक खोडकर होता; पण आई त्याचे खूप लाड करायची. वडिलांचा मात्र त्याच्यावर प्रेमळ अंकुश होता. गणेशराव आणि विनायकराव एकमेकांसाठी जीव की प्राण होते. एकदा विनायकाने केलेल्या खोडीबद्दल मारण्यासाठी वडील त्याला शोधात होते. गणेश उर्फ बाबारावांनी त्याला तिजोरीत लपवून त्याची मार खाण्याची वेळ टाळली. पुढेही बाबारावांनी सतत विनायकरावांच्या कृतीचे समर्थन आणि शिक्षा भोगणे यात पुढाकार घेतला, हे दिसून आले. ही जोडी जणू भरत आणि रामाचीच होती. विनायकरावांनी वडिलांना आपण कधीही असत्य बोलणार नाही असे वचन दिले होते. मात्र क्रांतिकार्यात झोकून दिलेल्या विनायकाला हा शब्द किती वेळा पाळता आला असेल, याचा प्रश्न पडतो. मात्र, ज्या असत्याने राष्ट्रहित साधले जाते, ते सत्यापेक्षा श्रेष्ठ असते, हे तत्त्व वीर सावरकरांनी जन्मभर पाळले. याच क्रांतीचे बीज त्यांच्या लहानपणी पेरले गेले.
समाजसुधारणेचे बीज
सन १८९२ मध्ये मातोश्री राधाबाई सावरकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वडील दामोदरपंत (अण्णा) यांनी दुसरे लग्न न करता कर्तव्यनिष्ठेने तीन मुले व एका मुलीचे संस्कारमय संगोपन केले. त्यावेळी तात्या अवघ्या नऊ वर्षांचा होता. त्याच्याभोवती सतत मित्रांचा घोळका असायचा. भगूर गावचे राणुशेठ शिंपी यांचे दोन सुपुत्र परशुराम व राजाराम हे विनायकाचे परममित्र. तात्यारावांच्या रत्नागिरी येथील समाजसुधारणा जगप्रसिद्ध आहेत. मात्र या समाजसुधारणांचे बीज भगूर येथे पेरले गेले होते. बालविनायकाचे सवंगडी सर्व जातीतले होते. तो त्यांच्याबरोबर खेळायचा, धावायचा, जेवायचा आणि एकरूप व्हायचा. त्याने दलितांना दूर लोटले नाही.
क्षात्रतेज जागृत ठेवण्यासाठी अण्णांनी घरात बंदुका, तलवारी, धनुष्य-बाण सांभाळले होते. गणेशरावांबरोबर तात्या याचा सराव करीत असत. इंग्रज राणीचे सरकार आपल्यावर जबरदस्तीने लादलेले आहे हे या भावंडांना कळले होते. १८८३ मध्ये देहान्त झालेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र तात्यांनी वाचायला घेतले. तात्यांना क्रांतीचे पडघम ऐकू येत होते.
१८९६ च्या प्रारंभी बाबारावांचे यशोदाबाई उर्फ ‘येसूवहिनी’ यांच्याशी लग्न झाले. आपला धीटपणा, बोलकेपणा, या सद्गुणांमुळे अवघ्या १३ वर्षांच्या विनायकाने वधूपक्षाकडील कुटुंबियांवर आगळीच छाप पाडली. येसूवहिनींसोबत विनायकाचे बालवयीन खेळ रंगायचे. त्या विनायकाच्या समवयीन असल्याने रांगोळ्या काढणे, कविता वाचून दाखवणे या विनायकाच्या लीला पाहून त्या थक्क व्हायच्या. तात्यारावांना मातृशोक झाल्यावर फार दुःख झाले होते. अशा स्थितीत त्यांच्या संवेदनशील मनाने येसूवहिनींमध्ये मातृतुल्य वात्सल्याचा शोध घेतला.
पूर्वीच्या काळात स्त्रियांना मर्यादित शिक्षण प्राप्त व्हायचे. तीच गोष्ट येसूवहिनींची. विनायकाने त्यांना अंक-ओळख, अक्षर-ओळख, वाचन-लेखन शिकवून
सुशिक्षित केले. महिलांना शिक्षण देण्यात फुले, आगरकर यांच्या नावांबरोबर सावरकरांचेही नाव कृतज्ञतापूर्वक घेणे अगदी आवश्यक आहे. तात्यारावांच्या भगिनी माईंच्या विवाहास काही महिने उरले असता येसूवहिनींनी त्यांना अंक-ओळख, अक्षर-ओळख, वाचन-लेखन शिकविले. समाजसुधारक वि. दा. सावरकरांच्या येसूवहिनींचे नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत स्त्री-शिक्षण अध्यापनात घेणे उचित ठरेल.
बाणेदार विनायक!
एका वक्तृत्व स्पर्धेसाठी नाशिकला गेला असताना आपल्या ओघवत्या, उत्स्फूर्त शैलीत शाळकरी विनायकाने उत्तम भाषण केले. त्याच्या भाषणाने मरगळलेल्या श्रोतृवर्गात व परीक्षक मंडळींमध्ये चैतन्य संचारले. मात्र, हे भाषण या लहान मुलाने लिहिलेले नसून ते दुसऱ्या कोणाचे दिसते, त्यामुळे प्रथम पारितोषिक त्याला देता येणार नाही, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. यावेळी स्पर्धेला श्री. अशोक बर्वे (विनायकाच्या शाळेचे प्राचार्य) उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘हा विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहे. त्याने म्हटलेले भाषण हे त्याचे स्वतःचेच आहे.’ त्याचे लेख विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. तो प्रथम क्रमांकासाठी सर्वार्थाने पात्र आहे. विनायकाच्या चेहऱ्यावर घटनेदरम्यान आणि देहबोलीत प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. त्यास सन्मानपूर्वक प्रथम पारितोषिक देण्यात आले.
लहान मुलांनी घ्यावी प्रेरणा
आजकालच्या शाळकरी मुलांना खरोखरच एका प्रेरणास्थानाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ होत्या! पुढे या शिवाजी महाराजांनी बाल संभाजीला आकार दिला. भगूर येथे राधाबाई आणि दामोदरपंत यांच्या संस्कारात वाढलेले विनायक, गणेश, नारायण ही भावंडं राष्ट्रभक्तीच्या रसात न्हाऊन निघाली होती.
विनायकाच्या लहानपणीच त्यांच्यात क्रांतीचे बीजारोपण केले. इंग्रज शत्रूशी लढताना निवृत्तीची बुद्धी म्हणजे आत्मघात, आक्रमण करून शत्रूस संपवावे, या प्रवृत्तीच्या लढ्याचा प्रारंभ जणू या भगूर पर्वात झालेला आढळतो. कर्मयोगाच्या सात सूत्रांपैकी एक असलेली प्रवृत्तीची लढाई, हे सूत्र येथे सिद्ध होते.
– प्रा. गजानन नेरकर
व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख
Leave a Reply