नवीन लेखन...

भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५

आपल्या किमती सूटवर डियोचा स्प्रे मारुन, रा.रा.भुजंगराव घराबाहेर पडले. आज ते अत्यंत महत्वाच्या आणि नाजूक कामगिरीवर निघाले होते.
हे भुजंगराव कोण? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.
‘एकदम फडतूस आणि कंडम माणूस!’ शेजाऱ्यांचे दोन पेग पोटात गेल्यावरचे प्रामाणिक मत.
‘तोंडच बोळकं झालंय! पण अजून टाळूला कलप लावून, चौकात उभारतो, थेरडा!’ गल्लीतल्या पोक्त बायकांचे, बीसीच्या गप्पातले ‘एक मत!’
तर असो. लोक कोणालाच चांगले म्हणत नाहीत. प्रभू रामचंद्राला सोडला नाहीतर, या भुजंगाची काय गत? तेसे ते सुज्ञ आहेत. असल्या भूंकण्याकडे लक्ष देत नाहीत! त्यांचे लक्ष्य त्यांच्या ‘लक्ष्या’वर असते! आम्हास हे ठाऊक आहे. या माणसाच्या चातुर्यावर आम्ही फिदा आहोत!
आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’
‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.)
ठरल्या प्रमाणे भुजंगराव चार्मीने दिलेल्या वेळेपेक्षा, वीस मिनिटे उशिरा रेस्टोरेंटच्या लॉनवर पोहंचे.
“सॉरी चार्मी डार्लिंग, थोडा लेट झालोय!” आल्याबरोबर त्यांनी कानाच्या पाळीला हात लावत, नाटकी आवाजात त्यांनी, त्या लावण्यवतीची क्षमा मागितली.
साला बुढावु! पैशेवाला नसता तर, कशाला तडमडले असते या ठिकाणी? हा आलाच आहे आता आपल्या कचाट्यात तर, हा त्याचा ‘लेट’ एनकॅश करून घेऊ!
“जानी! मी तुला आज बोलणारच नाही! स्टुपिड सारखी मी तुझी वेट करतीयय अन तू मात्र —”
“सॉरी, म्हणालो ना यार! बट, तुला रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे! कारण तुझा राग घालवण्याची गोड ‘संधी’ मला मिळणार आहे!”
“काही नाही! तू मला, ते ड्राय फ्रुटच आईस्क्रीम नाहीतर, कोल्ड कॉफी वर लोळवणारं!”
“यार असे, रुसू नकोस! काय करू? तो बँकेचा मॅनेजर खनपाटीलाच बसला. ‘मार्च एन्ड आहे! काही तरी डिपॉझिट बँकेत ठेवा’ म्हणून. दिले दहा लाख त्याला आणि तडक तुझ्याकडे आलो!”
दहा लाखाचा आकडा एकूण ‘चार्मी’च्या घशाला कोरड पडली.
“जानी! ऍव्हरेज किती बॅलन्स तुझ्या अकाउंट मध्ये ठेवतोस?”
“यार चारू, मलाही माहित नसत! कायम इनफ्लो चालू असतो ना! चारसहा लाख असतात पडेल! पण ते जाऊ दे! आपण आता कॉफी घेऊ. मग एका ज्वेलरी मॉल मध्ये जाऊ! तुझ्या साठी काही तरी घेऊ! म्हणजे तुझ्या रागाने लाल झालेल्या नाकाच्या शेंड्यावरचा रंग, गालवर येतील, लाली होऊन येईल!”
वॉव! चलो चार्मी! ज्वलरी शॉप! म्हातारा खुश दिसतोय. घबाड हाती लागणार बहुदा!
००००
त्या चकचकीत ज्वेलरी दुकानाच्या, काचेला लाजवणाऱ्या टाइल्सवर चार्मीचे हायहिल्सचे शूज एखाद्या महाराणीच्या ऐटीत पडत होते! असल्या दुकानाच्या चेनचे आपण मालक आहोत, अश्या थाटात दमदार पावले टाकत भुजंगराव मागून आले. आदराने त्यांना स्थानापन्न करून, सेल्समन ने प्रश्नार्थक मुद्रा केली.
“मॅडम साठी काही तरी दाखवा!”
त्या सेल्समनने एक सोन्याची आंगठी मखमली कपड्यावर समोर ठेवली. डोळ्याच्या कोपऱ्यातून भुजंगा चार्मीचा अंदाज घेत होता. ती आंगठीकडे लक्ष नसल्याचं दाखवत होती!
“अरे, मॅडम साठी काही तरी स्पेशल दाखव!”
“हो, मॅडमला शोभेलस एक कानातले, आत्ताच आलेत! लेटेस्ट डिझाईनचे! ते दाखवतो!”
“मॅडम इतक्या सुंदर आहेत कि, त्यांना काहीही शोभून दिसत! तरी बघुत ते इअरिंग्ज!”
त्याने तो इअरिंगचा सेट चार्मी समोर ठेवला. चार्मीचे डोळे चमकत होते!
“किती?”
“सर, फक्त पंचेवीस हजार!”
“मित्रा, एव्हाना तुझ्या लक्षात आलेच असेल! कि या मॅडम, माझी स्पेशल माणूस आहे! आता स्पेशल ‘माणसा’साठी तुझ्या कडे काहीच स्पेशल नाही?”
क्षणभर त्या सेल्समनने भुजंगरावकडे रोखून बघितले. असामी मालदार दिसत होती.
त्याने डाव्या खणातून एक गळाभर असा नेकलेस बाहेर काढला! आतामात्र चार्मीची नजर त्या वरून हटेना! हे– हेच घ्यायचं!
“चारू, हे पहा तुला कस वाटतंय?”
चार्मीने तो नेकलेस गळ्यात घालून मिरर मध्ये आपली छबी न्याहाळली. माय गॉड! एखाद्या राजकन्ये सारखी दिसत होती!
“मॅडम, एकदम प्रिन्सेस वाटतायत सर!”
भुजंगाने एक वार चार्मीकडे पहिले.
“काय प्राईज आहे?”
“फक्त पंचाहत्तर हजार! सर!”
“काय चारू? घेऊयात?”
“बघ ह, तुला आवडले असेल तर — घे!”
“मला? अग, वापरणार तूच ना? म्हणून विचारतोय! माझं मत विचारशील तर ——नको घेऊ!”
चार्मी आणि तो सेल्समन दोघेही उडालेच! भुजंगाने आपला मोहरा त्या सेल्समन कडे वळवला.
” हे बघ मित्रा, मी केव्हाच ‘स्पेशल’ म्हणतोय! नुस्ता नेकलेस आम्हास नकोय! सोबत मॅचिंग इअरिंग्स आणि नाजूक खड्याची आंगठी असा सेट असेल तर दाखव! मॅडमला काहीही छानच दिसत. माझ्या इभ्रतीला पण, नको का शोभायला?”
मग मात्र तो सेल्समन जागचा हलला. मुख्य तिजोरीतून त्याने भुजंगरावांना अपेक्षित असलेला, एक सुंदर सेट घेऊन आला. चार्मी भुजंगरावांचा हात घट्ट पकडून पकडून त्यांना बिलगून बसली! काय दिलदार माणूस आहे! या एका भेटीवर सगळी जिंदगी याच्या सोबत राहीन!
तो सेट खूप देखणा होता. चार्मीने ट्राय केला. घातलेला अंगावरून तिला काढावा वाटेना!
“चारू! हॅपी? गेला ना तो मघाचा राग?”
चार्मी गोड लाजली.
“ओके! डन! हा सेट आम्ही घेतोय! किती?’
“फक्त एकलाख पन्नास हजार! सर!”
“ठीक! आज आहे शुक्रवार. आता बँका बंद झाल्या असतील. शिवाय इतकी मोठ्या खरेदीसाठी, पॅन कार्ड तुम्हाला लागणार ते आत्ता माझ्याकडे नाही! मी तुम्हास, आत्ता दीडलाखचा चेक देतो! सोमवारी तो चेक तुमच्या अकाऊंट मध्ये क्रेडिट करा. दुपारपर्यंत क्लियरन्स मिळेल. आम्ही सोमवारी संध्याकाळी तुमच्या दुकानी येऊ, सेट आणि रिसीट घेऊन जाऊ. आणि हो पॅन झेरॉक्स पण देतो. पहा तुम्हास चालत असेल तर! नसता आम्ही दुसरीकडे—”
“नो! सर, तुम्ही म्हणता तो सरळ व्यवहार आहे. पूर्ण पैसे मिळाल्यावरच आम्ही माल देणार! तेव्हा आमची काहीच हरकत नाही! फक्त तुमचा मोबाईल नंबर मात्र देऊन जा.”
“ओ, शूयर!”
भुजंगाने कोटाच्या खिशातून चेकबुक काढले. चेक लिहला. झोकात लफ्फेदार सही ठोकली. चेकच्या मागे मोबाईल नंबर टाकून तो त्या ज्वेलरीला देऊन टाकला!
ते जोडपे दुकानाबाहेर पडले.
०००
सोमवारी तीनच्या सुमारास भुजंगरावांचा फोन वाजला.
“हा, बोला!”
“सर, मी xxx ज्वेलर्स कडून बोलतोय. आपण एक नेकलेस सेट आमच्या कडून खरेदी केला होता.”
“बर. मग?”
“मग? तुमचा चेक बाऊन्स झालाय! उद्या पुन्हा भरू का बँकेत, सर?”
“नको! उद्याच काय, कधीच भरू नकास! अरे माझ्या बापजन्मी सुद्धा इतके पैसे, कधी पाहिलेले नाहीत! मला तो सेट कधीच विकत घ्यायचा नव्हता, मित्रा! तरी, तुझे आभार मानावे तितके थोडेच आहेत!”
“घ्याचाच नव्हता?! आणि वर माझे आभार?! अरे, मग कशाला आला होतात पेढीवर?”
“कशाला? मित्रा, अरे त्यामुळेच तर, माझा कालचा विकेंड काय भरदार झाला म्हणून सांगू!!! त्याबद्दलच तुझे आभार मानतोय!”
भुजंगाने अतीव समाधानाने मोबाईल कट केला. आणि तो घराबाहेर पडला. भाड्याचा सूट परत करायचा होता ना! उगाच भाडे वाढायला नको!

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून )

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..