
भुलभुलैय्या …. A Labyrinth…
बडा इमाम बारा …. अवध …लखनौ
वास्तुशास्त्राची कमाल …. Marvel of Architecture…

आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे …. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत … सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त. कोणीही तिथे आला तर सुरक्षा यंत्रणेला किंवा आपल्या लोकांना कळलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला अजिबात कळणार नाही. असं म्हणतात की भूलभुलैयाच्या या वास्तूत एक हजार चोवीस मार्गिका आहेत, ज्या आपल्याला इमारतीच्या गच्चीवर घेऊन जातात. मात्र परतीची मार्गिका मात्र एकच आहे. त्यातल्या अनेक फसव्या आहेत आणि नवीन आलेला माणूस त्यात फसत जातो आणि अलगद सुरक्षा यंत्रणेच्या जाळ्यात अडकतो. यातल्या अनेक मार्गिका काळाच्या ओघात बंद झाल्या आहेत. यात फिरतांना किंवा यातल्या अनेक योजना समजून घ्यायच्या असतील तर स्थानिक जाणकार मार्गदर्शक घ्यावा लागतो. मग मात्र त्यातल्या अनेक खुब्या, तंत्रज्ञानाच्या खास गोष्टी कळतात आणि आपण दिग्मूढ होऊन जातो…
हा वेगवेगळ्या शेकडो मार्गिकांचा ‘भुलभुलैय्या’ म्हणजे आपलं ‘मन’च ना …. खरंच मनाला किती दारं…दालनं…दृश अदृश मार्गिका …. या मनावर …. कविवर्य सुधीर मोघे यांच्या कविता … रुबाया फार सुंदर आहेत … ते इतकं विलक्षण लिहितात … ते म्हणतात … मनाला पण मन असतं …
मी किती मनवुनी
मन माझे वश केले
मन परी मनाचे
तरिही फितूर झाले
ही कशी उमटती वलयामधुनी वलये
हृदयास हृदय
त्या हृदयालाही हृदये ….
ते म्हणतात मनाच्या या मनाला अजिबात कहयात ठेवता येत नाही … त्याचा अंदाज देखील बांधता येत नाही … त्यांच्या या रुबाया आपलं मन वेधून घेतात … ते किती सुंदर म्हणतात बघा …..
मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना –
ओंजळ रितीच ठेवुन गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण – पुसट … कोवळे
नाव कोरूनी गेलो ….
ही तर फारच सुंदर आहे ….. ते म्हणतात
ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
‘कळण्या’चा चाले
‘कळण्या’शी संवाद ….
मात्र हे गीत निव्वळ अफाट असंच आहे …
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?
मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले…..
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ…..
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?
चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?
-सुधीर मोघे
गाण्याची लिंक :
https://www.yutube.com/watch?v=RX6Dm2n6OQA
— © प्रकाश पिटकर
Leave a Reply