मला शंभर टक्के खात्री आहे आजच्या लेखाचं नाव तुम्ही नुसतं वाचणार नाही तर गुणगुणार. या गाण्याची आणि शब्दांची मॅजिकच इतकी जबरदस्त आहे की विसरू म्हटलं तरी विसरणार नाही याची खात्री आहे. एक तर राजेंद्रकृष्णचे मनावर चटकन ताबा घेणारे शब्द, मदनमोहनची अगदी सहज सोप्पी चाल आणि मी ही गाऊ शकतो की हे किंबहुना मी असाच गातोय हा आत्मविश्वास देणारा मुकेशचा आवाज. गाण्याचा कुठलाही प्रकार गाऊ शकणारी रफीची रेंज नाही, आवाज कसाही फिरवण्याची किशोरसारखी दैवी देणगी नाही किंवा शास्त्रीय संगीताने दिलेला मन्ना डे सारखा आत्मविश्वास नाही. सरळ सोप्प्या सुटसुटीत चाली गाणारा मुकेश तरीही प्रत्येक गानरसिकांच्या हृदयात वेगळी जागा स्थापन करून आहे.
तसं पाहिलं तर रफी, मुकेश आणि किशोर इंडस्ट्रीत आले ते सैगल बनण्यासाठी. प्रत्येकाच्या पहिल्या गाण्यावर सैगलची पुरेपूर छाप होती. त्यातही मुकेशने गायलेलं पहिली नज़र मधलं दिल जलता है तो जलने दे इतकं हुबेहूब सैगल सारखं वाटतं की काय सांगू. एक असा किस्सा आहे की साक्षात सैगलने हे गीत पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्याने विचारलं म्हणे की अरे ये गीत मैने कब गाया. इस बात से याद आया माझे वडील सैगल आणि पंकज मलिकचे भक्त. त्यांच्या शेवटच्या आजारपणात एकमेव विरंगुळा म्हणजे सैगलच्या रेकॉर्ड्स ऐकायच्या. ते झोपून असल्याने रेकॉर्ड बदली करणे हे काम माझ्याकडे. त्यामुळे माझ्या कानावर संस्कार झाले ते सैगलचे. वडीलसुद्धा मुकेशचं दिल जलता है हे एकच गाणं ऐकायचे.
या एका गाण्यामुळे मुकेश म्हणजे प्रति सैगल म्हणजेच रडकी गाणी गाणारा एक गायक हाच माझा अनेक वर्ष समज होता. या समजाला खतपाणी घालायला अर्थात मुकेशची काही गाणी पण आहेत. रविवारी दूरदर्शनवर जुने हिंदी सिनेमे लागायचे. त्यात हिरो कोणीही असो हिरॉइनशी गैरसमज झाला की दाढी वाढवून किंवा पियानो देऊन मुकेशच्या आवाजात एक दर्दभरं गाणं हवंच हवं. आता बघा ना दिवाना मस्ताना हुआ दिल असं गाणारा गुलछबू देव आनंद बम्बई का बाबूच्या शेवटी चल री सजनी अब क्या सोचे (भले बॅकग्राऊंड मध्ये) किंवा ये जो मोहब्बत है म्हणणारा राजेश खन्ना कटी पतंग मध्ये जिस गली मी तेरा घर न हो बालमा साठी मुकेशचा आधार घेतो. तेव्हढाच काय गोड गुळगुळीत शशी बाबा सुद्धा वक्त करता जो वफा आप हमारे होते साठी मुकेशचाच आसरा घेतो.
एक गैरसमज होता तो म्हणजे मुकेश फक्त राजकपूर साठी गातो किंवा प्रेमभंग झालेल्या कुठल्या हिरोसाठी. मुकेश सगळ्यात जास्त गाणी गायलाय राज कपूर साठी आणि नॅचरली शंकर जयकिशन कडे. राज आणि मुकेश या हिट समीकरणामुळे झालेला हा मोठ्ठा गैरसमज आहे. माझ्या मते मुकेश सगळ्यात जास्त गाणी गायलाय मनोज कुमार साठी आणि कल्याणजी आनंदजींकडे. फिल्मी संगीत तज्ञ् यावर जास्त माहिती देऊ शकतील.
एक गम्मत झाली २५ जून १९८३ ला. फेमस वर्ल्ड कप फायनल. त्यावेळी ठाण्यात आराधना थिएटरला राज कपूर वीक होता. त्या दिवशी होता खूप दिवसापासू.न बघायचा असलेला संगम. आपला बॅटिंग मध्ये सुपडा साफ झाल्यावर माझा क्रिकेट कीडा आणि हिंदी म्युजिक दर्दी मित्र राजू जोगळेकरने वैतागून साद घातली चल रे बाब्या या भिकारXX मॅच पेक्षा संगमला जाऊन बसू. त्यातलं हर दिल जो प्यार करेगा, बोल राधा बोल संगम आणि खास करून ओ मेहबुबा ऐकून एकदम फ्लॅटच झालो. च्यायला भारीच रोमॅंटिक गातो की हा भाऊ. त्यानंतर खरं कबुल करायचं तर रफीच्या नावाने कपाळावर लावलेला बुक्का पुसून हळू हळू तलत, किशोर आणि मुकेश यांची पण गाणी ऐकायला सुरुवात झाली.
परत एकदा कामी आले आमचे बंधुराज आणि ठाणा कॉलेजचा व्हॉइस ऑफ मुकेश अरविंद गडियार. मदनमोहन वरच्या ब्लॉग मध्ये सांगितलेला यादों की मंजिल हा कॅस्सेटचा अल्बम अरविंदने मला गिफ्ट दिला . त्यात फिर कब मिलोगी मधलं कहीं करती होगी वोह मेरा इंतेजार ऐकलं आणि खरं सांगू तर मुकेशच्या प्रेमातच पडलो. एक तर हे गाणं आर डी बर्मनची धून आहे यावर अजून विश्वास बसत नाही. आरडी म्हणजे किशोर किंवा रफी. पण एकदम मुकेश. ते ही एकदम रोमॅंटिक. त्या दिवसापासून आज पर्यंत हे गाणं किती वेळा ऐकलं त्याचा नेमच नाही.
पण तेव्हा पासून मुकेशच्या दुःखी आवाजाचा गायक हा भ्रम चांगलंच दूर झाला. आपल्या पप्पू पालेकरांच्या रजनीगंधा मधलं कईं बार यूं भी देखा है आणि छोटी सी बात मधलं येह दिन क्या आये किंवा अनिल ढवण वर चित्रित केलेलं अन्नदाता मधलं नैन हमारे सांज सकारे ही तीन अवीट गोडीची गाणी म्हणजे मुकेशच्या टॉप टेनची लिस्ट करायला घेतलं तर नक्की येणार. फार कमी गाणी नशीबी आलेला गुणी गीतकार योगेश (गौड) आणि तुफानी टॅलेंटेड सलील चौधरी यांची ही तिन्ही गाणी आहेत. त्यातही मुकेशला त्याच एकमेव नॅशनल अवॉर्ड मिळवून देणार गाणं म्हणजे कईं बार यूं भी देखा है. सलील चौधरीनीच मुकेशला अजून दोन जबरदस्त गाणी दिली. चित्रपट आनंद. कहीं दूर जब दिन ढल जाये आणि मैने तेरे लिये हि सात रंग के. ह्यातला कहीं दूर मधली चुटपुट तर जीवघेणीच. आणि मैने तेरे लिये मध्ये ज्या स्टाईलने मुकेश मैने म्हणतो आणि मै नंतर किंचित आणि ने नंतर किंचित मोठा पौज घेतलाय तो खरंच महान गायकाची ओळख सांगणारे आहेत.
थोडंसं विषयांतर. म्हणजे मुकेशच पण एका फॅनच्या माध्यमातून. सत्तरच्या दशकातल्या क्रिकेटची त्रिमूर्ती चंद्रा-बेदी-प्रसन्ना पैकी बी एस चंद्रशेखर हा खरा पोलिओ पेशंट पण आपल्या शारीरिक व्यंगाचं त्याने सामर्थ्याच्या रूपांतर केलं होतं. त्याचा बॉलिंग आर्म वाकडा होता त्यामुळे फिल्डिंगला चंद्राला नेहमी बाउंड्रीवर ठेवायचे. एक मॅच आपण हरणार हे निश्चित होतं. चंद्रा बाउंड्रीवर उभा. मागे एका प्रेक्षकाने वैतागून कंमेंटरी ऐवजी विविध भारती लावली आणि गाणी ऐकत बसला. रेडिओवर मुकेशची दोन गाणी लागली. चंद्रा म्हणजे मुकेशच्या जबरा फॅन. तो फुल्ल मूड मध्ये येऊन त्याने कॅप्टनकडे बॉल मागितला. आणि त्या नंतर फुल्ल फॉर्म मध्ये खटाखट विकेट काढल्या म्हणे.
मुकेशच्या रोमँटिक गीतांमध्ये माझी आवडती गाणी म्हणजे क्या खूब लगती हो, किसी कि मुस्कराहटोंपे हो निसार, चंदन सा बदन, सजन रे झूठ मत बोलो, चांद आहें भरेगा, जिस दिल में बसा था प्यार तेरा, चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी, आया है मुझे फिर याद वो जालीम गुजर जमाना बचपन का, बहोत दिया देनेवाले ने तूझको, सावन का महिना, फुल तुम्हे भेजा है खत में, चांद सी मेहबूबा मेरी तुम, तुम बिन जीवन कैसे बीता, मैं पल दो पल का शायर हूँ, आणि प्रत्येक पुरुषाच्या सुखी संसाराचे रहस्य असलेलं जो तुमको हो पसंद वोही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे
एक छोटा सा किस्सा. वाचलाय पण खरा खोटा कल्पना नाही. मुकेश कधी कधी बेसूर होतो हा आरोप पूर्वापार चालत आलाय. बॉबी साठी आपल्या सारखा मुकेशची आठवण करून देणारा पण तरुण आवाज राज कपूर शोधत होता. जेव्हा अल्बम ऐकला जेव्हा शैलेंद्र सिंगचा आवाज ऐकून मुकेश म्हणाला म्हणे कि राजभाई ये लडका कहाँ से ढुंढा. यह भी मेरी तरहा बेसूरा गा राहा है.
सच्चा, प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा माणूसच हे म्हणू शकतो.
मुकेशने रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं म्हणजे चंचल शीतल कोमल निर्मल (चित्रपट सत्यम शिवम सुंदरम)
देवाने आणि त्याच्या फॅन्स नि हे शब्द मुकेशसाठीच राखून ठेवले जणू. शीतल, कोमल, निर्मल.
माणूस आणि आवाज. दोन्हीही.
अभय गडियार
९८३३५७०५७५
Leave a Reply