आज माझ्या नातेवाईकाचा फोन आला. फोनवरून त्याच्या आवाजातील हुडहुडी जाणवली.
” अहो, गेले ४-५ दिवस भुसावळचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या आतबाहेर आहे. यंदा खूप वर्षांनी दिवाळी हिवाळ्यात आलीय.”
त्याच्या या वाक्याने मलाही १९७४ पूर्वीचे भुसावळचे दिवस आठवले. गांव सोडण्यापूर्वी सगळ्या आठवणी बोचक्यात भरल्या आहेत की नाही हे एकदा तपासून बघितलं होतं आणि मगच (सोलापूरला जाण्यासाठी) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाऊल टाकलं होतं.
आज सकाळीच पुण्यातील थंडी अनुभवत पत्नीला म्हणालो होतो- ” बिते हुए दिन वापस आए I ” गेली कित्येक वर्षे हे सण आणि ऋतुचक्रामधील समन्वय यंत्र बिघडले होते, ते यंदा (कदाचित लॉक डाऊन मुळे ) पुन्हा पूर्वपदावर आले असावे.
मागील वर्षी अशीच दिवाळी शुभेच्छांची देवाण घेवाण भुसावळमधील शाळू सोबत्याशी करत असताना मी त्याला आशाळभूतपणे विचारले होते- ” अजूनही दिवाळी तशीच असते का रे तिथे ?”
तो (बहुदा तोंड वाकडं करीत- पण मला दिसलं नाही कारण व्हिडीओ कॉल नव्हता, तेव्हा फक्त अंदाज !) उत्तरला होता- ” नाही रे ! आता ती मजा गेली. आजकाल गावात थंडीही नसते आणि दिवाळी साजरी करायला वेळही नसतो. ”
वयाबरोबर सणही आयुष्यातून काढता पाय घेतात की काय?
दिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा.
भुसावळला आमची दिवाळी कार्तिक महिना सुरु झाला की सुरु व्हायची. आजी पहाटे उठून, स्नान करून मुरलीधर मंदिरात काकडा आरतीला नेमाने जात असतं. आम्ही नातवंडं ( बहुदा मीच ! बाकीची पांघरुणात गुडूप्प असतं ) त्यांचे शेपूट बनून मंदिरात जायचो. तो मुरलीधरही भल्या सकाळी सुस्नात होऊन आमच्या प्रतीक्षेत असायचा. तेथून बालाजी मंदिर, राम मंदिर, शंकर मंदिर आणि शेवटी मारुती मंदिर करत आम्ही घरी परतायचो तेव्हा साडे सात वगैरे वाजलेले असायचे.
दिवाळीची सुट्टी जवळपास आलेली असायची. सणाची गाफीलता अंगांगावर लोळत असायची. त्या लांबलचक सुट्टीची प्रतीक्षा आणखी एका कारणासाठी असे- वडील दोन रुपये वर्गणीचे भरून महिनाभरासाठी लायब्ररी लावत. त्याकाळी दिवाळी अंकांची क्रेज नव्हती, पण अधाशासारखे वाचनाचे बॅकलॉग भरून काढण्याचे व्यसन होते. त्यातल्या त्यात अर्नाळकर, धारप, गुरुनाथ नाईक आदींच्या रहस्यकथांचा षौक होता. क्वचित चंद्रकांत काकोडकर आणले तर डोळे वटारले जायचे. वडिलांचे असे वाचन व्यसनावर (?) डोळ्यात तेल घालून लक्ष असायचे. त्यांनाही वाचनाचा प्रचंड नाद ! तो माझ्यापर्यंत झिरपत आला आणि अजूनही काळ्यावरच्या पांढऱ्या अक्षरांचे खूळ डोक्यातून गेलेले नाही.
आकाश कंदील घरी आणि मित्रांसमवेत बनविण्याचे प्रयत्न आम्ही असोशीने करायचो. विमान किंवा चांदणी हे आवडते प्रकार ! जिलेटीन कागद, बांबूच्या काठ्या, चिकटवायला डिंक किंवा सोप्पी गव्हाची /तांदळाची पेज – बस्स ! दोन एक दिवस आरामात जायचे या कारागिरीत पण तरीही निर्मितीचे समाधान क्वचितच मिळायचे. बल्ब आणि विजेची लक्झरी नसल्याने कंदिलात पणती किंवा मेणबत्ती ठेवीत असू. त्यामध्ये स्पर्धा वगैरे नसायची. सगळं निकोप !
दिवाळीच्या आठ दिवस आधीपासून फटाक्यांचे स्टॉल्स लागत. सकाळ-संध्याकाळ विंडो शॉपिंग ! नुसते नयनसुख, कारण आवाजाच्या फटाक्यांवर घरातून बंदी होती. बिल्डिंग मधील एका तरुणाचा डोळा पेटलेले रॉकेट वाट चुकून चेहेऱ्यावर आदळल्याने कायमचा गेला होता. त्याचे “जिवंत” उदाहरण आसपास वावरत असताना आईला ते पुरेसे असायचे आम्हांला दाबण्यासाठी ! जास्तीत जास्त लवंगी फटाक्यांचे पाकीट, एखाद-दुसरी लाल फटाक्यांची “ताज महाल” माळ ! त्यामुळे फटाके सुटे करून उडवावे लागत. त्याकाळी दिवाळीचा मुक्काम चार पूर्ण दिवस असायचा. आतासारखी २-३ दिवसात घाईने काढता पाय नाही घ्यायची ! बाकी मग फुलबाज्या, झाड, भुईचक्र, टिकल्या, नागाच्या गोळ्या आणि वायर ! असे आतीषबाजीचे बारके आणि चिल्लर सदस्य ! मग गुपचूप आईच्या मागे लागून (वडिलांच्या नकळत) २-३ पोपट छाप छोटया बॉम्बची पाकिटे आणायचो आणि वडिलांचे लक्ष चुकवून उडवायचो.
मात्र कोणी कोणी काय काय फटाके आणलेत यावर घमासान चर्चा जरूर झडायची. नर्कचतुर्दशीला पहाटे लवकर उठण्याचे मनसुबे यासाठी व्हायचे की पहिला मोठ्ठया आवाजाचा फटाका कोण उडविणार ! त्यामुळे त्या रात्रीची झोप अस्वस्थ असायची आणि पहिला आवाज आला की डोळे खाडकन उघडायचे. कुडकुडत कशीबशी आंघोळ, औक्षण आणि गल्लीत फटाक्यांसाठी धाव ! त्यानंतर देवदर्शन आणि रस्ताभर दिवाळीच्या गप्पा. सगळे फराळाचे पदार्थ घरी करण्याचा आणि तेही बक्कळ असा तो जमाना.
रोजचे गोड जिन्नस ठरलेले आणि तेही शक्यतो पिताश्रींच्या हातून बनलेले ! संध्याकाळ पुन्हा फटाक्यांच्या आकर्षणाची. आमच्या घरासमोर प्रशस्त गच्ची होती पण तेथे फक्त डोळ्यांना सुखावणारे फटाके उडवायला घरमालकांची परवानगी होती. बाकी सगळे खाली रस्त्यावर जाऊन उडवावे लागायचे. त्यांत पुन्हा काळजीपोटी आजी सोबत यायच्या. फारच कानकोंडे वाटायचे- एवढेसे फटाके आणि तेही निगराणीत उडवायचे ( तेही गल्लीतील सारे बघत असताना) म्हणजे अतीच. पण इलाज नसायचा आणि कंठात आवाजही !
आम्हां लिंबू टीम्बुंचे उडवून झाले की जणू ट्रेलर संपून मुख्य चित्रपट सुरु व्हायचा. आमचे घरमालक अशोक चौधरी त्याकाळी लोखंडी पेटी भरून फटाके आणायचे आणि त्यातील वैविध्याने गल्ली दणाणून सोडायचे. दारू, सट्टा याव्यतिरिक्त त्यांचा हा एकमेव षौक. सगळी घरे रस्त्यावर जमून त्या रोषणाईचा मनःपूत आस्वाद घेत. आसपासच्या गल्ल्याही त्याला अपवाद नसत. पुढील दिवाळीपर्यंत हे स्मरणरंजन पुरायचे.
भाऊबीजेला बहुधा जळगावला मामांकडे जाणे व्हायचे. किंवा एखादे मामा (शक्यतो मोठे) आमच्या घरी यायचे. क्वचित वडिलांच्या मामेबहिणी एदलाबादहून औक्षणाला येत असत. क्वचित सख्ख्या आत्याचीही फेरी होत असे.
बघता बघता सण पसार व्हायचा. सुट्टी संपून शाळा सुरु ! पण सुट्टीत अभ्यास किंवा शाळा सुरु झाल्यावर ” सुट्टी कशी घालवली ” यावर निबंध असले दानवी अत्याचार त्याकाळी शिक्षकांच्या /शाळेच्या मनातही येत नसत त्यामुळे सुट्टी सुशेगात संपत असे. पुन्हा दैनंदिनी सुरु – पुढच्या दिवाळीपर्यंत !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply