नवीन लेखन...

भुताचे झाड : सप्तपर्णी वृक्ष

सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. सदाहरित आणि आकर्षक ठेवण इत्यादींमुळे या वृक्षाची लागवड बाग-बगीचे, निवासी संकुल, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, रस्त्याच्या दुतर्फा, इ. ठिकाणी मुद्दामहून केलेली आढळते.

सप्तपर्णी हा वृक्ष ॲपोसायनेसी कुलातील असून भारतात सामान्यपणे ॲल्स्टोनिया स्कोलॅरिस या शास्त्रीय नावाची जाती आढळून येते. ॲल्स्टोनिया प्रजातीत एकूण ५० जाती असून भारतात त्यांपैकी सहा जाती आढळतात.

अन्य भाषिक नावे:
वेगवेगळ्या भाषांमधून वेगवेगळ्या नावाने हा व्रुक्ष ओळखला जातो.
• संस्कृत-सप्तपर्णी/सप्तच्छद
• हिंदी-सातविन/सतिआन
• बंगाली-छातीम
• कानडी-हाले/कडूसले
• गुजराती-सातवण
• तामिळ-एळिलाप्पाले
• तेलुगू-एडाकुलरिटिचेट्टू
• इंग्रजी-Indian devil tree, Ditabark

हा वृक्ष पश्‍चिम बंगाल या राज्याचा “राज्य वृक्ष’ म्हणून मानला आहे.

आढळ:
सप्तपर्णी हा वृक्ष उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. भारतीय उपखंड आणि दक्षिण- पूर्व आशियामध्ये कमी अधिक प्रमाणात हा वृक्ष पसरलेला आहे. काही खंडात आणि देशात या वृक्षाची मुद्दामहून लागवड केलेली आढळते. भारत, जपान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इ. ठिकाणी निमसदाहरित आर्द्र पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. उंच वाढणारा हा वृक्ष ४० ते ६० फुटांपर्यंत वाढतो. या वृक्षाच्या वाढीसाठी आर्द्रतेचे वातावरण जास्त असलेले ठिकाणे, जास्त पाऊसमान, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आणि जास्त तापमान नसलेली ठिकाणे उत्तम असतात. समुद्रसपाटीपासून ते १२५० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळून येतो.

भारत, श्रीलंका, फिलिपीन्स, म्यानमार, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत सप्तपर्णी आढळून येतो. महाराष्ट्रात पूर्व आणि पश्चिम घाटातील ओलसर दाट वनात सस. सु. १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात तो दिसून येतो.

सप्तपर्णी १२–१८ मी. उंच वाढतो. काही ठिकाणी हा वृक्ष सु. ४० मी. पर्यंत उंच वाढलेला दिसून येतो. खोडाचा पृष्ठभाग खरबरीत असतो आणि साल करड्या रंगाची असते. खोडाचा घेर सु. २.५ मी.पर्यंत वाढतो. पाने साधी व आंब्याच्या पानांसारखी असून त्यांची टोके निमुळती असतात. पानांचा वरचा भाग गर्द हिरवा, तर खालचा भाग पांढरट असतो. पाने वृक्षाच्या फांद्यांवर झुबक्याने व गोलाकार रचनेत (मंडलात) येतात. पानांची संख्या एका मंडलात तीन ते दहा, परंतु बहुधा सात असते. यामुळे या वृक्षाला सप्तपर्णी हे नाव पडले असावे. फुले डिसेंबर ते मार्च महिन्यात येतात. फुले पांढरी किंवा हिरवट पांढरी, सुगंधी व फांद्यांच्या टोकाला झुबक्याने येतात आणि बिनदेठाची असतात. फळे पेटिका स्वरूपाची असून ती झुबक्याने लटकतात. बिया लहान, लांबट व सपाट असून बियांच्या दोन्ही टोकांना केसांचे झुबके असतात. वाऱ्यामार्फत त्यांचा प्रसार होतो.

सप्तपर्णीचे लाकूड सुरुवातीला पांढरे नंतर फिकट तपकिरी होते. ते चकचकीत, गुळगुळीत, हलके व टिकाऊ असते. लाकडाचा उपयोग बुचे, पेन्सिली, आगकाड्या, प्लायवुड, खोकी, धूळपेट्या बनविण्यासाठी करतात. साल (व्यापारी नाव डिटा-बार्क) कडू शक्त‍िवर्धक व स्तंभक असून हिवताप, आमांश आणि अतिसार यांवर उपयुक्त असते. पूर्वी बेरीबेरी रोगाच्या उपचारासाठी सप्तपर्णीच्या पानांचा काढा दिल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे. साल त्वचारोगावर वापरतात. बागांमध्ये व रस्त्यांच्या कडेला शोभेसाठी तसेच सावलीसाठी या वृक्षाची लागवड करतात.

फुले:
पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने व गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.
या वृक्षास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर या महिन्यांत फुले येतात. शेंगा मार्च महिन्यापर्यंत परिपक्व होतात. फुले रातराणीसारखी सुवासिक असतात. सप्तपर्णीचे हे महत्वाचे वैशिट्य वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ शोधल्यावरच सापडतात. फुले आलेली असतात पण ती सहजपणे दिसत नाहीत. पण फुलांच्या सुगंधावरून कळते. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर,उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ सहजपणे दिसत नाहीत. ह्यांचा सुवास मादक असतो. अजून काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या मिशा असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.

काही वर्षांपूर्वी गुलमोहोर, रेन ट्री ही झाडे अचानक चर्चेत आली होती. ही झाडे परदेशी आहेत, त्यांच्यावर पक्षी घरटी करत नाहीत, भुंगेऱयांनाही ती उपयोग नाहीत, त्यामुळे सगळी झाडे काढून टाका. अशी जोरदार टीका झाली होती. हळूहळू वाद ओसरला आणि आता सप्तपर्णी किंवा सातवीण हे झाड वादाच्या भोवऱयात सापडलय. अनेक गैरसमजांमुळे सह्याद्रीतलं अस्सल देशी असूनही सप्तपर्णीच्या जीवावर लोक उठले आहेत. गुजरातमध्ये त्यांची कत्तलही सुरू झाली आहे तर कोल्हापूर, सांगली भागात लोक प्रशासनाला आम्हाला हे झाड नको म्हणून निवेदन देत आहेत.

सप्तपर्णी बद्दल नेमकी काय गडबड झाली आहे?
राजकीय मंडळी, चित्रपट सृष्टीतील लोकांना समाज माध्यमांवर त्यांच्या नावाने होणाऱया मिम्सची, विनोदांची सवय झालेली असते. पण एखाद्या झाडावर मिम्स तयार व्हावेत, नवीन विनोदांची निर्मिती होणे जरा अतिशयोक्तीच वाटते. पण सह्याद्रीतील अतिशय सुंदर पर्णसांभार असलेला बहुगणी सप्तपर्णी वृक्ष सध्या चांगल्या आणि वाइट अर्थाने व्हायरल झाला आहे.

या मागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे या झाडाला येणारी फुले आणि त्यांचा सुंगध अथवा दुर्गंध. गेल्या काही वर्षात पुण्या मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात गल्ली बोळात सप्तपर्णीची लागवड झाली आहे. सोसायट्यांच्या आवारात, रस्त्यांच्या दुतर्फा सप्तपर्णी वृक्षांची रांग अनेक ठिकाणी बघायला मिळते. पानगळती होत नाही, पण संपूर्ण झाड बारीक, रेखीव पांढरट हिरव्या रंगाची फुले लगडतात. बघता बघता फुलांचे गुच्छ संपूर्ण झाड व्यापतात आणि सुंगध दूरवर पसरतो. दुर्दैवाने हा वासच वादग्रस्त ठऱला आहे. सप्तपर्णीच्या फुलांच्या वासाने श्वसनाचे आजार होतात, कॅन्सरचा धोका अशा गैरसमजांमुळे हा वृक्ष तोडून टाकण्याची ठिकठिकाणी मागणी सुरू आहे. तर सप्तपर्णी हा अस्सल देशी वृक्ष असून, त्याची फुले विषारी नाहीत, असे स्पष्टीकरण वनस्पती अभ्यासकांनी दिले आहे.

सार्वजनिक ठिकणी दिसणाऱया प्रमुख देशी झाडांमध्ये सप्तपर्णी अग्रणी आहे. आता ही झाडे मोठी झाल्याने त्यांना फुलांचा बहर सुरू झाला आहे. शहरात हवा कोरडी असल्याने सप्तपर्णीचा वास दूरवर जातो. या फुलांचा वास वेखंड, दालचिनीच्या जवळ जाणारा आहे.

‘सप्तपर्णी’ ही वनस्पती विषारी आणि विदेशी आहे. फुलांच्या वासामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी होते.कफ, श्वसनाचे आजार बळ‌तात, कर्करोग होतो. स्थानिक वनस्पतींच्या वाढीसाठी सप्तपर्णी घातक असल्याची चर्चा रंगली आहे.

ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द महाजन यांनी या टीकेचे खंडन केले आहे. तिचा वास काहींना उग्र वाटतो. हा वृक्ष भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करतो. नागरिकांना फुलांचा त्रास होत असेल, तर त्यांनी वृक्ष तोडू नयेत. पंधरा दिवसांच्या हंगामासाठी झाडाचे नुकसान योग्य नाही. त्यापेक्षा फुलोरा येणाऱ्या फांद्यांची काही प्रमाणात छाटणी करावी, असा पर्याय महाजन यांनी दिला आहे. वनस्पती अभ्यासक केतकी घाटे यांनीही महाजन यांच्या स्पष्टीकरणाला दुजोरा दिला आहे.

त्या म्हणतात, ‘सप्तपर्णी हा स्थानिक वृक्ष असून, पश्चिम घाटात अनेक ठिकाणी ही झाडे बघायला मिळतात. काही देवरायांमध्ये दोनशे-तीनशे वर्षे जुनी धिप्पाड सप्तपर्णी झाडे आहेत. वास ही मूळ समस्या नसून, ‘मोनो कल्चर प्लान्टेंशन’ यास कारण ठरते आहे. एकाच प्रकारची अनेक झाडे कमी जागेत लावल्यास फुलोरा आल्यावर एकत्रित वासाने त्रासदायक होऊ शकतो. हा वास आवडणे अथवा त्रासदायक ठरणे ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे. वास विषारी नाही; पण अपवादाने एखाद्याला अॅलर्जी असू शकते. अवघ्या १० ते १५ दिवसांच्या फुलोऱ्यासाठी झाड तोडणे हा पर्याय नाही. सप्तपर्णीच्या निमित्ताने नागरिकांनी, प्रशासनाने मोनो कल्चरचे तोटे समजून घेतले पाहिजेत, असा सल्ला घाटे यांनी दिला आहे.

एकूणच काय तर सध्या सप्तपर्णीचे समर्थक आणि विरोधक अशा दोन बाजू आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत.

औषधी उपयोग: रासायनिक घटक:
या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यापैकी ३ मुख्य रासायनिक घटक Ditamine, Echitenine, Echitamine की जे अल्कलॉइड आहेत. त्यांचा वापर मलेरियावरील प्रसिद्ध औषध क्विनाईनचा पर्याय म्हणून केला जातो. क्विनाईन हे सिंकोना या वृक्षापासून प्राप्त केलं जाते. म्हणून सप्तपर्णी या वृक्षास “इंडियन सिंकोना” असेही म्हणतात. आधुनिक विज्ञानात ह्याच्या सालीपासून डिटेइन व डीटेमीन हे ही रासायनिक द्रव्ये क्विनाईन पेक्षा परिणामकारक आहेत असे मानले जाते.

अल्स्टोनियाचा वापर पारंपारिकपणे जुनाट अतिसार, पोटदुखी, साप चावणे, दातदुखी आणि आमांश यावर उपचार करण्यासाठी केला जातो. वेगवेगळ्या आजारांवर सप्तपर्णीच्या पानांचा काढा वापरतात.अल्स्टोनियाच्या पानांचा वापर बेरीबेरी (व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेमुळे) उपचार करण्यासाठी केला जातो.

ह्या खोडाची साल कडवट तुरट असते. खोडाची साल आणि पाने विविध रोग, व्याधी बऱ्या करण्यासाठी आयुर्वेद, युनानी, सिद्ध इत्यादी परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते. खोडाची साल हगवण, जुलाब, मलेरियातील ताप, फीट, अस्थमा, कातडी विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. खोडाची साल दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यांवर आणि विषाणू प्रतिबंधक (ॲन्टी-वायरस) म्हणून वापरली जाते. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. पातालकोट येथील आदिवासींच्या मान्यतेनुसार बाळंतपणानंतर स्त्रीस ह्याच्या सालीचा रस दिल्यास तिची दुधाची मात्र वाढते. डाँग- गुजरात आदिवासींच्या अनुभवानुसार सर्दी व पडश्यावर ह्याच्या सालीचा गुळवेल व कडुलिंबाच्या पानाचा काढा बनवल्यास काढा रोग्याला त्वरित आराम पडतो.

सप्तपर्णी झाडाच्या सालीच्या चूर्णाचा वापर एका भारतीय औषध कंपनी “भारवी फार्मास्यूटिकलस्” ने “सिंकोना कंपाउंड टॅबलेट” या आयुर्वेदिक उत्पादनामधे केलेला आढळतो.

उपयोग:
‘सप्तपर्णी अस्सल देशी झाड असून, प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्येही तिचे संदर्भ आढळतात. लाकडाचा उपयोगी पेपर निर्मितीसाठी, खोकी बनविण्यासाठी आणि पेन्सिल, आगकाड्या व पेटी, शाळेच्या पाट्या इत्यादी बनविण्यासाठी केला जातो. ही बहुउपयोगी वनस्पती आहे. तिचे लाकूड चकचकीत, गुळगुळीत, हलके आणि टिकाऊ असते. लाकडाचा फळ्यांच्या चौकटी तयार करण्यासाठी वापर केला जातो. अनेक जण हौसेने बंगल्याच्या आ‌वारात सप्तपर्णी लावतात.

घरात सप्तपर्णीचे झाड लावता येईल का?
सूर्यप्रकाश: चांगल्या वाढीसाठी पूर्ण सूर्य ते आंशिक सावली असलेल्या ठिकाणी लागवड करा . पाणी पिण्याची: सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात नियमितपणे पाणी; एकदा स्थापित झाल्यानंतर, ते दुष्काळ-सहिष्णु आहे आणि कमीतकमी पाणी पिण्याची गरज आहे.

छाटणी: आकार राखण्यासाठी आणि मृत किंवा खराब झालेल्या फांद्या काढण्यासाठी वेळोवेळी छाटणी करा.

वृक्ष त्याच्या विषारी स्वभावामुळे प्राणी टाळतात आणि म्हणूनच त्याला डेव्हिल्स ट्री भुताचा वृक्ष म्हणतात. तळहाताच्या आकाराच्या पानाच्या देठाच्या टोकापासून सात भाल्याच्या आकाराची पाने तयार होतात म्हणून याला सप्तपर्णी म्हणतात. सप्तपर्णी वृक्षाभोवती अनेक वदंता प्रचलित आहेत. झाडाखालून गेल्यास माणूस मूर्च्छित होतो, झाडाखालून गेल्यास त्या माणसास भूत झपाटते वगैरे. परंतु तसे कांही नाही. ज्या माणसास झाडाच्या मादक सुगंधाची अलेर्जी आहे त्यांना त्रास होतो, गुंगी आल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. ह्या सर्व किंवदन्ता आहेत.

हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. परंतु अजूनही सामान्य माणसाच्या मनात सप्तपर्णी विषयी भीती ही आहेच. म्हणून अजूनही त्यास भुताचे झाड असेच नाव प्रचलित आहे.

संदर्भ :
1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948.
2. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968.
3. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.
४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.
५. देसाई, वा. ग. ओषधी संग्रह, मुंबई, १९७५.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
दिनांक: १०. १२. २०२४    

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 80 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..