मैत्री टिकविणे, अधिक मजबूत करणे आपल्यासाठी हितकारक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १७-१८-औगस्ट्ला दोन दिवस भूतान दौरा केला. या दौऱ्यात नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात जलविद्युत प्रकल्प, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, नॅशनल नॉलेज नेटवर्क, उपग्रह, रुपे कार्ड यांचा समावेश होतो.भारताने ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानने शाब्दिक दहशतवाद चालवल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि लष्कराचे प्रतिनिधी सातत्याने भारताविरोधात माहिती युध्द लढत आहेत. भारताला विस्तारवादी, युद्धखोर ठरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
भारताला जर युद्धाची खुमखुमी असती तर पाकिस्तानप्रमाणेच जगातील मोठ्या देशांत जाऊन त्यादृष्टीने पावले उचलली असती. परंतु, भारताने भूतानचा पर्याय निवडला. म्हणजेच भारत आपल्याबरोबरच शेजाऱ्यांनाही भविष्यातील विकासाच्या, प्रगतीच्या, समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो. भूतान हा कितीही छोटा देश असला तरी त्याच्या हातात हात घालून पुढे जाण्याचा भारताचा मनोदय आहे.
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील संबंध अनेक क्षेत्रांत आणखी दृढ करण्यासंबंधी उभयतांत चर्चा झाली. ‘दोन्ही देशांमधील संबंधांत नवी ऊर्जा आणि विश्वास तयार झाला आहे.पंतप्रधान मोदींचे थिम्फूमधील ताशिछोझाँग राजवाड्यात भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावरदेखील भूतानच्या पंतप्रधानांनी रेड कार्पेट घालून त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी मानवंदना देण्यात आली; तसेच पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. भूतानचे राजे या वेळी उपस्थित होते. ‘भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग आणि इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. पारो विमानतळापासून थिम्फू शहरापर्यंत रस्त्यारस्त्यांवर जमून नागरिकांनी भारताचा आणि भूतानचा ध्वज फडकाविला.
या दौऱ्यामध्ये मोदी किंग खेसर नामग्येल वांगचुक यांची भेट घेतली; तसेच प्रतिष्ठित ‘रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ भूतान’च्या विद्यार्थ्यांनाही ते भेटले.
ऑपरेशन ऑल क्लिअर फार यशस्वी
भारत – भूटानची 669 किती लांब सीमा असून सशस्त्र सीमा बल आणि रॉयल भुतान आर्मीकडे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. ईशान्येकडील उल्फा, नॅशनल डेोमक्रॅटीक फ्रंट ऑफ बोडोलॅंड आणि कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन या संटघनांचा भूटानमधील भूटान कम्युनिस्ट पार्टी, भुतान टायमर फोर्स, भूतान माओवादी पार्टी यांच्याशी संपर्क होता आणी त्यांची ट्रेनिंग शिबीरे तिथे होती. डिसेंबर 2003 मध्ये भारत आणि भूटानने “आपॅरेशन ऑल क्लिअर’ या संयुक्त कारवाईद्वारे भूटानमधील या सर्व गटांना हुसकावून लावले होते. भारत – भूटान संबंधांचा तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला. सीमेच्या पलीकडच्या बाजूने रॉयल भुतान आर्मीने आक्रमण केले तर या बाजूने भारतीय लष्कराने सक्रीय होते. एकूण 30 तळ या कारवाईचे लक्ष होते.त्यामध्ये 13 “उल्फा’चे, 12 “एनडीएफबी’चे तर 5 तळ “केएलओ’ या संघटनांचे होते. भारतीय लष्कराने मारले गेलेल्या व पकडल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या 656 होती. .ऑपरेशन ऑल क्लिअर फार यशस्वी मानले जाते.मात्र दुर्गम खडतर प्रवेश व घनदाट जंगले यामुळे तिथे पुन्हा अतिरेकी शिबीरेयेउ नये म्हणुन नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
भुतान भारताचा सच्चा मित्र
भुतानची लोकसंख्या फक्त 8-9 लाख आहे. सेनादलची संख्या 8000-9000 आहे. भुतानचे 65 टक्के लोक बुद्धीस्ट आणि 24 टक्के हिंदु आहेत.भूतानमध्ये भारतीय रुपयाचा मुक्तपणे वापर होतो भारताच्या संरक्षणाकरता हा देश फार महत्त्वाचा आहे. भुतान आणि भारत हेच दोन देश आहेत ज्यांच्याशी चीनचा आजपण सिमा विवाद चालु आहे. भुतानच्या सैन्याला ट्रेनींग देण्याकरता भारतीय सेनेने आपली एक संस्था (IMTRAT) भुतानमध्ये ठेवली आहे. भारतीय सेनादल भुतान जवळ चीनच्या हरकतीवर लक्ष ठेवुन असते. भुतान सैन्य फार कमी असल्यामुळे भुतानचे रक्षण भारतीय सेनेला करावे लागते. भारतीय सेनेचे इंजीनियर्स (BORDER ROAD TASK FORCE) भुतानमध्ये संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते बांधत आहेत. भुतानमधील बहुतांश तरुण उच्चशिक्षणासाठी भारतात येतात. भारतातील सैन्याच्या एनडीए सारख्या संस्थांध्ये भुतानच्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना भारताबद्दल विशेष आस्था असते.अन्य शेजाऱ्यांनी आदर्श घ्यावा असेच भारत – भुतानचे परस्पर संबंध आहेत.
भूतानच्या विकासासाठीही कटिबद्ध
भारत भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. त्याआधीही भारताने तिथे या क्षेत्रात काम केलेले आहे. भूतानची भौगोलिक रचना जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त आहे, मात्र, आर्थिक,तांत्रिक मर्यादांमुळे त्याचा पुरेपूर वापर भूतानला करता येत नाही. अशा परिस्थितीत भारताने केलेली मदत भूतानसाठी महत्त्वाची ठरते, जेणेकरून तो देशही अधिकाधिक ऊर्जा उत्पादन, त्याची विक्री किंवा औद्योगिक वापरातून आपले हित साधू शकेल. आगामी दहा वर्षात 12000 मेगॅवॅटच ऊर्जेची निर्निती करण्याची भुतानची योजना असून यासाठी भारताची मदत होणार आहे. मोदी यांच्या हस्ते हायड्रोलेक्ट्रिक पावर प्लांटचेही उद्घाटन करण्यात आले.
भारताने ‘आयुष्मान भारत’ सारखी जगातली सर्वात मोठी आरोग्य क्षेत्रातील योजना लागू केली. आता भूतानच्याही आरोग्यविषयक आवश्यकतांच्या परिपूर्तीसाठी भारताने सहकार्य देऊ केले आहे. तिथे भारताच्या सहयोगाने उभारण्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उघड्ले जाणार आहे. भारताच्या अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने ‘चांद्रयान’, ‘मंगळयान’, एकाचवेळी १०० उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. आता भारत अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूतानच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे. ‘इस्रो’चे भूतानमधील ग्राऊंड स्टेशन त्याकरता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूतानमध्ये ‘रूपे कार्ड’ सुरू करण्यात आले. ‘भारत आणि भूतानचे संबंध पूर्वीपासून निकटचे असून रूपे कार्डमुळे ते आणखी दृढ होतील; तसेच या कार्डामुळे दोन्ही देशांतील व्यापारास मदत मिळेल,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले.या समारंभानंतर मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग यांनी संयुक्त निवेदन जाहीर केले. दोन्ही देश एकत्र मिळून पुढे जात आहेत,’ असे मोदींनी म्हटले आहे.
छोट्या देशांची पाठराखण
“भूतान भौगोलिकदृष्ट्या भारतालगत आहे व भूतानशी भारताची सीमा तर भिडलेली आहेच. पण, दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, पारंपरिक रिती-रिवाज सामायिक पातळीवर आहेत. भारत आणि भूतानमध्ये झालेल्या करारानुसारही हे दोन्ही देश मैत्रीच्या धाग्यात बांधले गेले. २०१७ साली भारत, भूतान आणि चीनमधील डोकलामवरून उद्भवलेल्या वादात भारताने भूतानची साथ देत चीनच्या बळजोरीला अटकाव केला. यातून भूतानच्याही मनात भारताबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला.
चीन छोट्या देशांवर स्वतःचे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, दक्षिण चीन समुद्रातील बेटे घशात प्रयत्न करत आहे, भारत मात्र तसे काही न करता छोट्या देशांची पाठराखण करत आहे. भारताची सौहार्दाने, सलोख्याने, सामंजस्याने राहणारा देश, ही ओळख अतिशय महत्त्वाची आहे.
चीनच्या आक्रमक हालचालींवर लक्ष ठेवायला हवे
भूतानने जगाला “ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ नावाचा सिद्धान्त दिला आहे. त्यानुसार केवळ आर्थिक विकासच महत्त्वाचा नाही, तर जनता किती सुखी आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. भौगोलिकदृष्ट्या भूतान हा चारही बाजूंनी भूप्रदेशांनी वेढलेला देश आहे. भारत आणि चीनमधील “बफर झोन’ हा देश आहे. भूतानचे क्षेत्रफळ 47 हजार चौरस किलोमीटर आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावामुळे चीन मोठ्या प्रमाणात शेती व दूरसंचार क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनचे रस्ते भूतानच्या सीमेपर्यंत पोचत आहेत. भूतानमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत सुरू झालेली चीनची घुसखोरी, आपण भुतान सरकारची मदत घेउन थांबविली पाहिजे. पाकिस्तान किंवा “आयएसआय’ला भूतानमध्ये शिरकाव करणे अद्याप जमलेले नाही. तसेच सत्तेवर आलेल्या सरकारचे धोरण आधीच्या सरकारसारखे(म्हणजे चीनच्या बाजुने) असणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. हा देश भारताचा सच्चा मित्र आहे. ही मैत्री टिकविणे आणि अधिक मजबूत करणे आपल्यासाठी हितकारक आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर भूतानने भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे. भूतानला आपल्याकडे ओढण्याचा चीनचा डाव लक्षात घेऊन भारताने या देशाबरोबरील संबंध मैत्रीपूर्ण राहतील असे धोरण ठेवले पाहिजे.
Leave a Reply