नवीन लेखन...

सर्वंकष संदर्भमूल्य ग्रंथ दर्शनिका (गॅझेटिअर)

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न असा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे. यादृष्टीने दर्शनिका (गॅझेटिअर) विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ दर्शनिका विभाग हा एक स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत असून या विभागाचे फक्त मुंबई येथे एक मुख्य कार्यालय आहे. विभागाद्वारे खालील संदर्भमूल्य प्रकाशनाचे काम करण्यात येते. ब्रिटिश जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) तसेच ब्रिटिश राज्य गॅझेटिअर (इंग्रजी) यांचे पुनर्प्रकाशन करणे, उपरोक्त गॅझेटिअरच्या सुधारित आवृत्ती प्रकाशित करणे, विविध जिल्ह्यांचे (मराठी) गॅझेटिअर काढणे, स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य या विषयी गृह विभाग व अभिलेखागारामधील अप्रकाशित कागदपत्रे या संकलनावर आधारित खंड प्रकाशित करणे, स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश प्रकाशित करणे, जिल्हा पुरवणी गॅझेटिअर तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विशेष पुरवणी गॅझेटिअर प्रकाशित करणे, उपरोक्त सर्व गॅझेटिअर ग्रंथाची ई-बुक आवृत्ती (सी.डी.) स्वरूपात तयार करणे, तसेच सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगाच्या अनुषंगाने हे ग्रंथ पेनड्राईव्ह स्वरूपामध्ये तयार करणे, महात्मा गांधी संकलित वाङ्मय एकूण 98 खंडांपैकी खंड 1 ते 50 भाग-1 पेनड्राईव्ह स्वरूपात प्रकाशित तर खंड 51 ते 98 भाग-2 पेनड्राईव्ह स्वरूपात निर्मिती करण्याच्या दृष्टीने काम सुरू, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ व महाविद्यालये येथे ‘गॅझेटिअर ः महत्त्व व उपयुक्तता’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करणे तसेच गॅझेटिअर ग्रंथ व ई-बुकचे प्रदर्शन भरवणे, तसेच जनसामान्य व विद्यार्थी, अभ्यासक यांना विभागाच्या कार्यालयात सेतू माधवराव पगडी संदर्भ ग्रंथालय स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उपरोक्त कार्य हे ब्रिटिश काळापासून ते आजतागायत सातत्याने सुरू असून आजपर्यंत 85 पेक्षा अधिक ग्रंथ निर्मिती या विभागाने केली आहे. याच ग्रंथाची ई-बुक आवृत्ती देखील तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य पृष्ठावर ‘जलद दुवे’ या अंतर्गत दर्शनिका या शीर्षाखाली हे महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर विभागाचे www.maharashtra.gov.in तर दिव्यांगांसाठी विशेषत्वाने http://mahagazetteers.com या वर विभागाची माहिती, कार्य व प्रकाशने उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या इंडियन कल्चर या पोर्टलवर देखील ही प्रकाशने उपलब्ध करण्या हेतू प्रयत्न सुरू असून आजपर्यंत 35 पेक्षा अधिक ग्रंथ ई स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. मूलतः ब्रिटिश कालखंडापासून जिल्हा गॅझिटिअरमध्ये एकूण 12 प्रकरण निहाय प्रकाश टाकण्यात येतो. जसे की भूगोल, इतिहास, लोक, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यवसाय व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे तसेच ग्रामनिर्देशिका या विविध प्रकरणनिहाय संबंधित जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती व आनुषंगिक छायाचित्रे, नकाशे, आरेखणे देऊन अभ्यासकांना आणि वाचकांना तसेच प्रशासनाला एक दर्जेदार प्रकाशन उपलब्ध करून देण्यात येते.

राज्य गॅझेटिअर मालिकेत ज्या विषयांवर जिल्हा पातळीपेक्षा राज्य पातळीवर उत्तम लेखन होऊ शकते अशा वैशिष्ट्यपूर्ण विषयांसाठी राज्य गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. या मालिकेंतर्गत इंग्रजी राज्य गॅझेटिअरमध्ये बॉटनी, महाराष्ट्र लँड अ‍ॅण्ड इटस पिपल, लँग्वेज अ‍ॅण्ड लिटरेचर, हिस्ट्री एन्शंट पिरीअड, मेडिवल पिरिअड, मराठा पिरिअड, तर मराठी राज्य गॅझेटिअरमध्ये भूमी व लोक, इतिहास प्राचीन काळ, स्थापत्य व कला, औषधी वनस्पती, मध्ययुगीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील वनस्पतीशास्त्र व वनसंपदा आणि प्रवरा खोरे हे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत.

या ग्रंथांची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणात असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सदर गॅझेटिअर ग्रंथांचा बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही या ग्रंथांची उपयुक्तता आहे हे लक्षात घेऊन विभागानी सदर ग्रंथ अगदी सहजपणे उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 06 महत्त्वपूर्ण स्थळांच्या केंद्रावर अशा प्रकारच्या ई-बुक उपलब्ध करून दिल्या आहेत. कोकण विभाग व गॅझेटिअर विभागाचे प्रकाशनविषयक कार्य महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न अशा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे असा हा भू-प्रदेश म्हणजेच महाराष्ट्राला लाभलेली एक देणगीच आहे. यादृष्टीने गॅझेटिअर विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे. तर राज्य गॅझेटिअर मालिकेतूनही या भू-प्रदेशाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण विषयावर आधारित गॅझेटिअर प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यातच विविध विभागवार यात्रा व उत्सव, गड व किल्ले हा विषय घेऊन गॅझेटिअर निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये यात्रा व उत्सव (कोकण खंड) लवकरच प्रकाशित होणार असून या ग्रंथामध्ये विशेष करून एकूणच कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात परंपरागत रूढीचे पालन करून व नावीन्यपूर्ण पद्धतीने हे यात्रा-उत्सव साजरे केले जातात. याची माहिती सदर ग्रंथात देण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता अनादी काळापासून ती निसर्गाची पूजक आहे. या संस्कृतीच्या धार्मिकच नव्हे, तर निसर्ग पूजनाच्या दृष्टिकोनातून यात्रा व उत्सव या ग्रंथात महत्त्व नोंदविलेले आहे. या मागील एकच उद्देश की येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती व परंपरेची महती कळावी व यापुढेही अनेक वर्षे ती अबाधित रहावी, सदर ग्रंथामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई-उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेकडो यात्रा उत्सवांची नोंद घेण्यात आली. हे उत्सव देवतांच्या किंवा संतांच्या किंवा महापुरुषांच्या निमित्ताने साजरे केले जातात. यात यात्रा व उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या देण्यात येत आहे. उत्सव हे स्थानिक, राज्य किंवा देशपातळीवर होतात. त्यानुसार उत्सवाचे स्वरूप याबाबतही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ग्रंथामध्ये या उत्सवांचे छायाचित्रेही देण्यात आली असून ग्रंथात शेवटी विविध जिल्ह्यातील ग्रामदेवता यांचीही माहिती परिशिष्टामध्ये देण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र ः गड व किल्ले (कोकण विभाग)’ या ग्रंथाचेही काम प्रगतीपथावर असून साधारणपणे कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यातील गड व किल्ल्यांच्या माहितीवर आधारित हे राज्य गॅझेटिअर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये छायाचित्रे व नकाशे देण्यात येणार असून येणाऱ्या पिढीस कोकण भागातील गड किल्ल्यांविषयी जनजागृती या ग्रंथाद्वारे होईल अशी अपेक्षा आहे.

याशिवाय विभागाने कोकण प्रदेशातील विविध जिल्ह्यांविषयी वस्तुनिष्ठ माहितीआधारे खालील संदर्भमूल्य असलेले गॅझेटिअर्स ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सदर गॅझेटिअरच्या ई-बुक आवृत्ती आपणास पर्यटन केंद्राच्या तारकर्ली केंद्रावर पहावयास मिळतील.
* विभागाचे जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) सुधारित आवृत्ती – रत्नागिरी डिस्ट्रीक्ट गॅझेटिअर 1962, कुलाबा डिस्ट्रीक्ट गॅझेटिअर 196, ठाणे डिस्ट्रीक्ट गॅझेटिअर 1982, बृहन्मुंबई भाग 1 – 1986, बृहन्मुंबई भाग 2 – 1987 व बृहन्मुंबई भाग 3 – 1986
* जिल्हा पुरवणी गॅझेटिअर, कुलाबा डिस्ट्रीक्ट 1981
* मुंबई इलाख्याचे गॅझेटिअर्स, गॅझेटिअर ऑफ बॉम्बे सिटी अ‍ॅण्ड आयलंड (भाग 1,2,3) (1909) रत्नागिरी अ‍ॅण्ड सावंतवाडी खंड 10 – 1880
* ठाणे डिस्ट्रीक्ट गॅझेटिअर भाग 1,2,3 – 1882, कुलाबा डिस्ट्रीक्ट – 1883
* ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे ग्रंथ विभागाकडून प्रकाशित करण्यात येणार आहेत.
* आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेटिअर दोन खंडांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. याहूनही अधिक कामे विभागाने हाती घेतली आहेत. तथापि, या ठिकाणी लेखनास पूर्णविराम देऊन सदर लेख इथेच संपवतो.

-डॉ. दिलीप बलसेकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..