पांढरा रंग सर्वसमावेशक असतो- इंद्रधनूतल्या सातही रंगांना कवेत घेणारा. मानवी भावभावना यापेक्षा अधिक वर्णांच्या असतात. त्या मनोरंजनविश्वावर रेघोट्या मारीत असतात- कितीएक पिढ्या आल्या आणि गेल्या तसतसा तो पडदा संपन्न, समृद्ध होत गेला. चित्रपटगृहातला कल्लोळ शांतपणे पचवत, निरपेक्ष स्थितप्रज्ञासारखा पार्श्वभूमी देणारा हा पडदा! याने काय पाहिले असेल, किती दाखविले असेल याची गणना केवळ अशक्य! पात्रे बोलली, गायली, व्यक्त झाली पण हा एके जागी स्थिर. त्याच्या आत सामावलेली खळबळ तो कधीच सांगत नाही. अबोलपणे ताठ उभा- त्याला भेटायला अतिरथी-महारथी येतात पण हा जागेवरूनच त्यांना कुशीत घेतो.
लहानपणापासून याची संगत लागली आणि ती अजूनही हिरवीगार आहे. त्याचे गूज बरेचदा स्तिमित करते, कधी गोंधळात टाकते पण प्रत्येक नवसर्जनकाराला याची दाद मिळाल्याशिवाय सार्थक वाटत नाही. तो नातं जोडतो, प्रत्येक पात्राशी, प्रत्येक वाद्याशी, प्रत्येक भूमिकेशी,प्रत्येक स्वराशी आणि हो -आतल्या खुर्च्यांशी, त्यांवर बसलेल्या प्रेक्षकांशी, चित्रपटगृहातील भिंतींशी आणि बाहेर असलेल्या परिसराशी. ही एकरूपता, तादात्म्यता निःसंदेह वाखाणण्याजोगी असते. असं तदाकार होणं सोपं नसतं, पण याची तपश्चर्या अलौकिक! तिथे सारे नतमस्तक.
लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही.
काही कलाकारांचे चित्रपट याने शंभर आठवडे चालविले आणि काही लोकांना पहिल्याच दिवशी रिकाम्या खुर्च्याही दाखविल्या. कोठे मुकुट चढविले, कोठे हाती करवंटी दिली.
पुढे याला पर्याय म्हणून दूरचित्रवाणीचा काळा पडदा आला, पण याचे गारुड तसूभरही कमी झालेले नाही.
हा दाखवतो, पण भाष्य प्रेक्षकांवर सोपवतो. हा देतो पण समोर रिती ओंजळ असेल तरच!
मी आज त्याच्याकडून घेतलेल्या, शिकलेल्या ओंजळीची किंचित परतफेड करतोय- ही बिदागी देऊन!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply