२ मे २००५ या दिवशी सकाळी अभिषेक बच्चन यांचा मला फोन आला. ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्स या दिल्ली येथील संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून ते बोलत होते. २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्कारासाठी माझी निवड झाली होती. मला अतिशय आनंद झाला. त्यांचे पुढील वाक्य होते. “हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते तुम्हाला दिला जाणार आहे.” मला काय बोलावे तेच सुचेना. जो माझा सर्वात आवडता अभिनेताच नव्हे, तर आमच्या पिढीचे रोल मॉडेल होता. ज्याचा मी डाय हार्ड फॅन होतो, त्याच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार होता. त्यांच्या सोयीसाठी या समारंभाचे आयोजन मुंबईतच केले जाणार होते. ही बातमी लवकरच सगळीकडे पोहोचली आणि माझ्या आप्तेष्टांनी, मित्रांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. लवकरच २६ मे २००५ रोजी मुंबईच्या हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या दिमाखदार समारंभात सुपरस्टार श्री. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार मी स्वीकारला. समारंभाला अभिनेत्री राणी मुखर्जी यांचीही विशेष उपस्थिती होती. हा दिवस माझ्यासाठी एक अविस्मरणीय दिवस होता. या समारंभातील भाषणात अमिताभ बच्चन म्हणाले, “कलाकार की ऊँचाईयों पे कभी पाबंदी नहीं होती। आप एक मंजिल पा लेते हो तो और कई मंजिले दिखाई देती हैं। और इस सफर में आप हमेशा लोगोंको खुशियाँ बाँटते हो, इसलिए कलाकार होना बड़े नसीब की बात हैं।” त्यांच्या चिरपरिचित धीरगंभीर आवाजातील ते शब्द मी कधीच विसरू शकणार नाही. अशा महान कलाकाराच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचे मला लाभले. या पुरस्कारासाठी मी काहीही केले नव्हते. काहीही न मागता ईश्वराने मला अनेक गोष्टी दिल्या. त्यापैकी ही एक! त्या रात्री मी झोपू शकलो नाही. झोपणार कसा? स्वप्नवत तर आत्ताच घडून गेले होते. या पुरस्काराने मला प्रचंड ऊर्जा दिली होती. रात्रभर बसून मी पुढील कार्यक्रमांची आखणी सुरू केली. संपूर्ण रात्रभर तेच शब्द कानात घुमत होते, ‘कलाकार की ऊँचाईयोंपे कभी पाबंदी नही होती।’
लवकरच माझे हितचिंतक प्रकाशजी गुप्ते यांच्यासाठी कार्यक्रम केला. तसेच माझे मित्र प्रकाश दामले यांनी स्टेट एक्साईजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर ‘आंबा महोत्सव’मध्ये मी गायलो. काही दिवसांनी अंकुर प्रॉडक्शन्सने आयोजित केलेल्या ‘गजरा’ या विविधरंगी कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मी भाग घेतला. माझ्याबरोबर त्यागराज खाडिलकर, सुधीर गाडगीळ, स्मिता तळवळकर आणि रामदास फुटाणे असे प्रथितयश कलाकार होते.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply