नवीन लेखन...

बिघडलेल्या आठवणी

स्मरणाशी संबंधित सर्व बिघाड गंभीर नसतात. ‘गाड्यांच्या गर्दीत आपण कार कुठे पार्क केली ते आठवत नाही’ ही काही मोठी बाब नाही, पण आपण पार्किंग लॉटमधे कसे आलो हे आठवत नसेल तर ती गंभीर समस्या असते. आपल्याला एखादी गोष्ट आठवली नाही वा चुकीची आठवली तर आपण कावतो, कधी अपराधी वाटतं, तर कधी खजिल व्हावयास होतं. असा अनुभव सर्वांना येत असतो आणि वयाच्या सर्व टप्प्यांमधे येतो.

आपली स्मृती सात प्रकारे दगा देऊ शकते हे Dr. Daniel Schacter यांनी सविस्तर सांगितले आहे. विसरणे (Transience), दुर्लक्ष (Absent Mindedness), अडखळणे (Blocking), चुकीची जुळणी (Misattribution), सूचनीयता (Suggestibility), पूर्वग्रह (Bias) व सतत आठवणे (Persistence) असे ते प्रकार आहेत. माझ्या ‘स्मृती-विस्मृती’ या लेखात याची माहिती आहे. नव्या तंत्रांचा आंधळेपणाने केलेला वापर स्मृती बिघडण्यास कारणीभूत ठरतो असे Dr. Richard Restak यांनी सांगितले आहे. त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत. ‘तंत्र तुम्हाला आंधळे करते.’

1) Technological Distortion – तांत्रिक शोधांमुळे आपल्याला अनेक सुविधा, उपकरणं उपलब्ध झाली आहेत. आपले शारिरिक श्रम वाचावेत, कामे अचूक व्हावीत, वेगाने व्हावीत ही त्या शोधांमागची काही उद्दिष्टे आहेत. काही गोष्टी मानसिक कष्ट कमी व्हावेत यासाठी वापरणे योग्य आहे. पण एखाद्या कामासाठीची मानसिक प्रक्रिया जर पूर्णपणे थांबणार असेल तर त्याचे दुष्परिणाम अनेक क्षमतांवर होऊ शकतात. उदाहरणार्थ, Calculator चा अतिवापर मेंदूला चालना देणे थांबवतो. क्लिष्ट गणितांसाठी Calculator ची जरूर मदत घ्यावी. पण साध्या साध्या बेरीज-वजाबाक्यांसाठी आपण स्वतःलाच समजावतो, ‘कॅल्क्यूलेटर आहे ना? मग कशाला आकडेमोड करायची?’ यामुळे मेंदूच्या काही भागातील जुळण्या बळकट होत नाहीत. कालांतराने ती क्षमता आपण गमावतो. एखाद्या कामाच्या पध्दतीशी निगडित जुळण्या घोटल्या जातात त्या पुनर्वापराने (Repetition) . यासाठी सराव आवश्यक असतो व आपण तो अनेकदा नाकारतो. एकदा तुम्ही सायकल चालवायला शिकलात की मधे कितीही काळ गेला तरी तुम्हाला ते जमते, कारण याच्याशी संबंधित सर्व स्मृती वेगळ्या प्रकारे साठविल्या जातात. ते आकडेमोड करण्याच्या प्रकारासारखे नसते. ‘एखाद्या घटनेची सविस्तर माहिती मी मनात का साठवू? माझ्याजवळील मोबाईलचा कॅमेरा टिपून घेईल’ असे मानणारा आपल्या डोळ्यांद्वारे होणारी रेकॉर्डिंगची क्षमता क्षीण करतो. घटना डोळ्यांनी पहात असताना भावनिक घटक त्या घटनेसोबत साठविले जातात. कॅमेर्‍याला हे नाही जमत. अपघाताचे रेकॉर्डिंग करण्यात अनेक जण गुंतलेले असतात पण त्यातील एकालाही अपघातग्रस्ताचे प्राण वाचविण्यासाठी वेळ नसतो. ही भावनाशून्यता आहे. प्रत्येक जण भावना बाजूला ठेवत असेल तर समूहाची विचारसरणी अशीच दिसेल. हा आहे तंत्र वापरण्याच्या हव्यासाचा शाप. सेल्फीच्या नादात जीव गमावणारांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष झालेले असते. आणखी एक उदाहरण बघू. दोन गटांना दिलेल्या पत्यावर जाण्यास सांगितले गेले. एका गटातील लोक GPS वर विसंबून राहणारे होते, तर दुसर्‍या गटातील लोक आपल्या आठवणींच्या भरवशावर. नंतर या सर्वांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. GPS वर विसंबून राहणारांमधे ‘संज्ञानात्मक घट’ (Cognitive Decline) दिसून आली. स्मरणातील रस्त्याचा नकाशा वा खाणाखुणा वापरणे हा विस्मरण कमी करण्याचा उपाय होऊ शकतो. एखादी नवीन रेसिपी पाठ करणे वा त्याची उजळणी करणे हा रोजच्यासाठी मेंदूचा व्यायाम ठरू शकतो.

2) Technological Distraction – आपले चित्त एखाद्या कामावरून विचलित होणे, एकाग्रता भंग पावणे, दुसर्‍या विचाराकडे वा कृतीकडे ओढले जाणे हे Distraction आहे. यामुळे स्मृती तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. घटनेची नोंद (Encoding of memory) होत असतानाची आपली मनःस्थिती महत्वाची असते. जसे एखादे काम पुरेशा साधनांशिवाय चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही तसेच विचलित मनाकडून योग्य तपशीलाची नोंद होत नाही. नंतर ती घटना आठवताना आपल्यासमोर चुकीची माहिती येते. विचलित करणार्‍या घटना व दृश्य आपल्या आसपास असतात. त्यांना टाळता येणं किंवा वळसा घालून जाणं जमलं तर ठीक असतं. टीव्ही वरील जाहिराती, गेम्सचे आकर्षण, भडक बातम्या ही काही उदाहरणं आहेत. तुम्ही हाती घेतलेल्या कामापासून ती तुम्हाला विचलित करतात. काही क्षणांसाठी तुम्ही वर्तमानापासून ढळता आणि चुकीच्या स्मृतीची नोंद होते. एखाद्या व्यक्तीशी तुमची ओळख करून दिली जात असताना जर तुम्ही अनेकांशी बोलत असाल तर तुम्ही विचलित होता व त्या व्यक्तीशी संबंधित काही तपशील निसटतो. सभागृहातील कार्यक्रमा दरम्यान जर कोणाचा फोन वाजला तर कार्यक्रमाचा बेरंग होतो. आपण हव्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. दृक्श्राव्य माध्यमांद्वारे अशा भरकटविणार्‍या गोष्टींचा मारा होत असतो.

3) Depression – एखादी घटना कशी नोंदली जाईल हे तुमचा ‘मूड’ ठरवतो. मनःस्थिती बिघडलेली असेल वा नैराश्य आले असेल तर मन फक्त दुःखद घटनांची नोंद घेते. Depression ने बाधित असलेल्यांच्या हिप्पोकँपस या स्मरणाशी संबंधित भागाची व्याप्ती (Hippocampal Volume) कमी असते. हिप्पोकँपस व ऍमिग्डाला (भावनांशी निगडित भाग) या दोन्हींचा सहभाग स्मृती तयार करण्यात होत असतो. घटनेतील सकारात्मक वा चांगला भाग नोंदणे राहून जाते व दुःखद भावना जोडल्या जातात. स्मृती परत मिळवताना (पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करताना) नकारात्मक भाग आठवतो. अशा व्यक्ती समुपदेशन व औषधोपचाराने बर्‍या होऊ शकतात व स्मरणातील नोंदी योग्य प्रकारे पुनःस्थापित होऊ शकतात. तज्ञांच्या सल्ल्याने धोक्याच्या जागा माहित होतात व त्याचबरोबर तो धोका टाळण्याच्या उपाययोजना समोर येतात. मनःस्थिती सुधारली तर मनाला सर्व प्रकारच्या मूडमधे घटनांची नोंद करण्याची सवय लागते. म्हणून आपल्या आवडी, छंद यासाठी वेळ काढणे फार गरजेचे असते. ध्यानधारणा व व्यायाम हे Depression हा अडथळा दूर करण्यास मदत करतात.

डॉ. रेस्टाक यांनी स्मरणाला बाधित ठरणारी जी तीन कारणे शोधली, त्यापैकी तंत्रज्ञानाच्या आहारी किती जायचं याचा विचार आपला आपण करायला हवा नाही का? Depression या कारणासाठी तज्ञांची मदत आवश्यक आहे. तेव्हा आता आपला सामना आहे सुरुवातीला सांगितलेल्या स्मृती बिघडविणार्‍या एकूण दहा घटकांशी.

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

2 Comments on बिघडलेल्या आठवणी

  1. अप्रतीम खूपच छान आणि अभ्यास करून सुंदर विवेचन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..