८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे.
मोठं अचंबित करणारे दृश्य बघता-बघता आमच्या नजरेसमोर उभं राहिलं. त्या मुलींनी कात टाकली आणि वेगळंच रूप धारण केले. पार्श्वसंगीत नाही, वेशभूषा नाही, रंगभूषा नाही. फक्त उत्कट सादरीकरण, विषयाला लगडून आलेलं मनस्वीपण ! मी बघतच राहिलो. कोणी पोलीस, कोणी दारुडा, कोणी हेल्मेट, कोणी रस्ता- सरसर अंगावरच्या कपड्याप्रमाणे भूमिका बदलत त्या उन्मनीपणे सादर करीत होत्या.
मनाच्या कुपीत जन्मभर जपून ठेवण्यासारखा हा अनुभव !
त्यांच्या दिग्दर्शिका ( न्यूट्रीशन फाउंडेशन च्या कर्मचारी) अभिमानाने आणि निश्चिन्तपणे सगळं नाट्य कितव्यांदा तरी अनुभवत होत्या.
” कां करता तुम्ही हे? ” या माझ्या प्रश्नाला एकीने उत्तर दिलं –
“आम्हांला समाधान मिळतं.”
नक्कीच हे स्क्रीप्टेड उत्तर नव्हतं. तिचा निरागस चेहेरा तिच्या उत्तराची यथार्थता सांगत होता.
तिच्या दिग्दर्शिका म्हणाल्या-
“सर, ही मुस्कान ! हिचे वडील पूर्वी खूप दारू प्यायचे. आता हिच्या धाकामुळे त्यांनी दारू सोडलीय.”
तिचे दाहक तेजाळते डोळे आता मला कळले. बेवडा नवरा आपल्या पत्नीला अनेकवार लाथाडून जाऊ शकतो, पण पोटच्या पोरीला ओलांडून जाण्याचे धैर्य असलेला बाप अजून पैदा व्हायचा आहे.
नितीशकुमारांच्या दारूबंदीवर गेले दोन आठवडे गहजब उडालाय. मुस्कान त्यांना जणू सांगतेय-
“अहो, हे काम घरच्या लेकरांवर सोपवा.यशस्वी व्हाल.”
मग मला एकेकीचे किस्से कळत गेले. या साऱ्या सर्वसामान्य मुली- कंपनीशी त्यांचा काही संबंध नाही. पण फाऊंडेशनने त्यांना स्वतःच्या अभियानाशी जोडून घेतले. आठवड्यातून एकदा त्या दिलेल्या विषयावरचे प्रबोधन पर पथनाट्य सादर करतात वैशाली जिल्ह्याच्या एखाद्या शाळेत !
हळूहळू खडक विरघळायला लागलेत.
कुपोषणासाठी संस्था लोहयुक्त बिस्किटांचे मोफत वाटप करतेय. बालकांसाठी न्यूट्रीशन सप्लिमेंट देतेय.वर्षातून एका आठवड्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ” पुस्तक दानाचे ” आवाहन झाले की गोळा झालेली पुस्तके घरोघरी वाटली जाताहेत. कंपनीच्या आवारात, फाउंडेशन च्या आवारात वाफारे आहेत, तिथे पिकलेले मुळे, भेंडी, पालेभाज्या आसपास मोफत वाटल्या जातात. कंपनीतल्या पाण्याचा पुनर्वापर त्या शेतीसाठी केला जातो.
प्रभू श्रीरामाला मदत अशा खारींच्या वाट्यातून होतेय. या मुली स्वतःच्या घरी ” सुरक्षा घर पे ” हा प्रकल्प राबवितात आणि असुरक्षित कृतींपासून घरातल्यांचे रक्षण करतात.
नितीशकुमारजी “तुमच्या बिटीया आगे बढताहेत.”
They are simply unstoppable.
कारण कंपनीने आपल्या पाच कर्मचाऱ्यांना अशा प्रत्येकी दहा जहाल दुर्गामातांचा गट सोपवलाय आणि पाच जिल्ह्यातील प्रत्येकी पन्नास अंगणवाड्या आणि पन्नास शाळाही ! पुनरुत्थानासाठी एवढे रग्गड !
” अभी अगले साल हम दायरॉ बढ़ा रहे हैं ” हे एच आर चे आश्वासन खऱ्या अर्थाने आश्वस्त करणारे होते.
गेस्ट हाऊस च्या आठव्या मजल्यावरून मला पाटण्यात सभोवार पसरलेले धुकेच दिसतेय, पण ग्राऊड रिएलिटी डोळे स्वच्छ करणारी आहे. आता पाटण्याला बाय करतोय आणि पुढील आठवड्यात पुन्हा येतोय- जमलेच तर काही प्रेरक पाने अध्यायाला जोडायला.
त्या मुलींनी मला विचारले-
“कुछ सुझाव हैं आपके ? ”
पांढऱ्या केसांना स्मरून मी म्हणालो-
” ज्यासाठी मी येथे आलोय, त्या पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे काहीतरी नाट्य बसवा, कारण विद्रुप निसर्ग आम्ही तुमच्या पिढीला सुपूर्द करून जाणार आहोत. आणि कोरोना जागृतीही तुमच्या यादीत असो.”
“अगली बार जब आप आओगे, तब जरुर करके दिखायेंगे ! ”
मी आवंढा गिळला. रायपूरच्या वनवासी कल्याण आश्रमातील पूर्वोत्तर राज्यांमधील मुली अशाच लाघवी आग्रह मला आणि माझ्या पत्नीला करीत.
वालचंद ला असल्या पासूनचे माझे आवडते तत्वज्ञान यानिमित्ताने पुन्हा आठवले-
” वस्त्या-वस्त्या हिंडून काळवंडलेले, राख साचलेले
कोळसे शोधून आण
आणि तू फक्त भाता हो-
बघ ,निखारे पुन्हा कसे रसरसतात ! ”
त्या मुलींच्या दोन ओळी घेऊन मी परततोय –
” छोटी छोटी बातोंमे विचार होना चाहिए
हमें अपनी जिंदगीसे प्यार होना चाहिए ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply