नवीन लेखन...

जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

अमिनो आम्लं ही अमोनिआ, फॉर्माल्डिहाइड, मिथेनॉल, पाणी, अशा छोट्या रेणूंपासून, आकाशातील विजेच्या मदतीशिवायसुद्धा निर्माण होऊ शकत असल्याचं योको केबुकावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही काळापूर्वी केलेल्या प्रयोगांतून दिसून आलं. अशनींमध्ये आढळणारी अमिनो आम्लंसुद्धा अशाच प्रकारे निर्माण झाल्याची शक्यता आहे. मात्र या रासायनिक क्रिया घडून येण्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते. अशनीच्या आत ही उष्णता कुठून निर्माण होत असावी, हे शोधण्याचा प्रयत्न योको केबुकावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. या उष्णतेचा स्रोत हा, या अशनींतलाच किरणोत्सर्ग असल्याची एक शक्यता दिसून येत होती. कारण अनेक कॉन्ड्रॉइट अशनींमध्ये अल्युमिनिअम या मूलद्रव्याचे किरणोत्सर्गी अणू सापडतात. हे अणू या अशनींतील सिलिकॉन आणि अ‍ॅल्युमिनिअम या मूलद्रव्यांवर होणाऱ्या वैश्विक किरणांच्या माऱ्यातून निर्माण होतात. सुमारे दहा लाख वर्षांचं सरासरी आयुष्य असणारे हे अणू तीव्र ऊर्जेचे गामा किरण उत्सर्जित करतात. याच गामा किरणांद्वारे मिळणाऱ्या उष्णतेमुळे अशनींतील अमोनिआ, फॉर्माल्डिहाइड, मिथेनॉल, पाणी, यासारख्या विविध रेणूंत रासायनिक क्रिया घडून येत असाव्यात व अमिनो आम्ल तयार होत असावीत. योको केबुकावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या अलीकडे केलेल्या प्रयोगांतही उष्णता निर्माण करण्यासाठी गामा किरणांचा वापर केला.

कॉन्ड्रॉइट अशनींतील अमिनो आम्लाच्या निर्मितीत भाग घेणाऱ्या या सर्व रसायनांचं मूळ प्रमाण किती होतं, ते आज सांगता येत नाही. परंतु त्यांचं एकमेकांच्या सापेक्ष प्रमाण हे धूमकेतूंत आढळणाऱ्या यांच रसायनांच्या एकमेकांसापेक्ष प्रमाणाच्या आसपास असावं. त्यानुसार धूमकेतूतील या रसायनांचं प्रमाण लक्षात घेऊन, या संशोधकांनी अमोनिआ, फॉर्माल्डिहाइड, मिथेनॉल आणि पाणी यांचं मिश्रण तयार केलं आणि ते काचेच्या नळ्यांत भरून त्यावर नियंत्रित पद्धतीनं गामा किरणांचा मारा केला. हा मारा वेगवेगळ्या तीव्रतेचा होता, तसंच तो वीस तासांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीचा होता. हा मारा केल्यानंतर या विविध नळ्यांतील द्रवांचं रासायनिक विश्लेषण केलं गेलं. या विश्लेषणांत या द्रवांत, अनेक प्रकारची अमिनो आम्लं निर्माण झाल्याचं आढळलं. यातली काही आम्लं ही, सजीवांतील विविध प्रथिनांच्या निर्मितीत भाग घेणारी अमिनो आम्ल होती. किरणोत्सर्गाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर, या सर्व अमिनो आम्लांची निर्मितीही वाढत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या संशोधकांनी आपल्या प्रयोगांत निर्माण झालेल्या अमिनो आम्लांच्या प्रमाणाची, १९६९ साली ऑस्ट्रेलिआतील मर्चिसन येथे आदळलेल्या कार्बनयुक्त कॉन्ड्रॉइट प्रकारच्या अशनीतील अमिनो आम्लांच्या प्रमाणाशी तुलना केली. या तुलनेवरून, या अशनीत आढळलेली अमिनो आम्ल निर्माण होण्यास किती काळ जावा लागला असावा, याचं गणितही त्यांनी मांडलं. हा काळ दहा हजार वर्षांपर्यंत दीर्घ असू शकतो, असं या गणितावरून दिसून आलं.

अशनींमध्ये अमिनो आम्ल तयार होण्यात किरणोत्सर्गानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं योको केबुकावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयोगावरून स्पष्ट झालं आहे. पृथ्वीवरच्या जीवोत्पत्तीत जर या अशनींत तयार झालेल्या अमिनो आम्लांचा सहभाग असला, तर पृथ्वीवरच्या जीवोत्पत्तीला किरणोत्सर्गाचा हातभार लागल्याचं, स्पष्टंच दिसून येतं आहे. अर्थात या पद्धतीनं होणारी अमिनो आम्लांची निर्मिती म्हणजे, अनेक पर्यायांपैकी एक पर्याय असू शकतो. यापैकी कोणता पर्याय जीवोत्पत्तीसाठी किती प्रमाणात उपयोगी ठरला, हे सांगणं कठीण आहे. तरीही हा पर्याय नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण पृथ्वीच्या जन्मानंतर काही कोटी वर्षं पृथ्वीनं असंख्य अशनींचा मारा झेलला होता. कदाचित या प्रचंड माऱ्याद्वारेच पृथ्वीवर पुरेशा प्रमाणात अमिनो आम्लं पोचली असावीत व त्यातूनच पृथ्वीवरच्या जीवोत्पत्तीला सुरुवात झाली असावी!

– अशनींचा मारा

(छायाचित्र सौजन्य :earthspacecircle.blogspot.com)


-ऑस्ट्रेलिआतील मर्चिसन येथे आदळलेल्या अशनीचा तुकडा
(छायाचित्र सौजन्य : Basilicofresco/Wikimedia)

 

1 Comment on जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..