नवीन लेखन...

बिरबलाची माकडीण

तसं पाहता शोभाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे म्हणता येण्यासारखे प्रसंग मोजकेच होते… वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं… त्यानंतर -ती आणि तिची आई- एवढंच तिचं विश्व ! घरची परिस्थिती बेताचीच. शोभाचे वडील एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या मृत्युनंतर कंपनीतर्फे मिळालेली खोलीदेखील सोडावी लागली होती. त्यामुळे दोघी मायलेकी अक्षरशः रस्त्यावर आल्या होत्या. पण शोभाच्या मामाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने त्याच्या घरालगत असलेल्या एका छोट्या खोलीत दोघींची राहायची सोय करून दिली. ‘मी यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत त्याने दोघींची बोळवण केली होती.

डोक्यावर छप्पर मिळालं होतं; पण पोटातल्या भुकेचं काय ? शोभाच्या आईने मिळेल ते काम करून संसाराचा एकखांबी तंबू कसाबसा सावरून धरला. सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीत थोडा जम बसल्यावर त्यांनी घरूनच जेवणाचे डबे बनवून द्यायला सुरुवात केली. आपल्या आईची धडपड बघून शोभाच्या जीवाची तगमग व्हायची. रोज रात्री आई झोपल्यावर शोभा तिचे हात आपल्या हातात घेऊन बसायची. आईच्या तळहातांवरचे घट्टे चाचपून बघायची … तिच्या डोळ्यांतले अश्रू आईच्या हातांचा अभिषेक करायचे.

म्हणूनच शोभाला लवकरात लवकर नोकरी करायची होती. नगरपालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर तिने शिवणकलेचा कोर्स केला. लवकरच तिला एका कपड्यांच्या फॅक्टरीत नोकरी मिळाली… शोभाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो !! आता तिच्या आईला कष्ट करायची गरज नव्हती. हळूहळू त्या दोघींच्या आयुष्यात थोडी उसंत यायला लागली.

लवकरच शोभाच्या आईने तिच्या लग्नासाठी धडपड सुरु केली. लग्नाला शोभाचा विरोध नव्हता….फक्त तिची एक अट होती…’लग्नानंतर तिची आई तिच्याबरोबर राहील.’ …पण या अटीमुळेच तिचं लग्न ठरत नव्हतं. आईने कितीही समजावलं तरी शोभा आपल्या निर्णयावर ठाम होती. हळूहळू तिचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं.. शेवटी कंटाळून – ‘ तिच्या नशीबात असेल तर होईल सगळं व्यवस्थित !’… अशी स्वतःचीच समजूत काढून तिची आई गप्प बसली. पण त्या मायलेकींच्या नशिबाचे चित्रविचित्र खेळ चालूच होते. शोभाच्या आईची प्रकृती हळूहळू खालावू लागली. डॉक्टरांनी ‘अल्झायमर’चं निदान केलं ….शोभा पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत सापडली. त्या गोष्टीलाही आता दहा वर्षं उलटली होती. आता शोभाच्या आईची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. ती स्वतःच्या वेगळ्याच विश्वात जगत होती. तिच्या मनाची आणि मेंदूची पाटी आता पूर्णपणे कोरी झाली होती.

शोभाचं आयुष्य – आई आणि नोकरी या दोन वास्तवांत विभागलं गेलं होतं ! पण अडीच वर्षांपूर्वी अचानक सुधीर तिच्या आयुष्यात आला आणि शोभाच्या बेरंग आयुष्यात रंग उमटायला लागले. सुधीर तिच्याच फॅक्टरीत आकाउंट्स सेक्शनमधे कामाला होता. सुरुवातीला कामानिमित्त झालेल्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. दोघांना एकमेकांचा सहवास आवडायला लागला. शोभाप्रमाणेच सुधीरही परिस्थितीने होरपळलेला होता. घराची आणि घरातल्या सदस्यांची जबाबदारी सांभाळताना त्याच्या स्वतःच्या आयुष्यातली उमेदीची वर्षं त्याच्या हातातून निसटून गेली होती.

साहजिकच दोन समदुःखी जीव एकमेकांकडे ओढले जाऊ लागले. अगदी हळुवारपणे त्यांच्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाने प्रवेश केला. या नव्या नात्याला आता लग्नाच्या बंधनात बांधायला दोघंही उतावीळ झाले होते, सुधीरला शोभाची अट मान्य होती; पण त्याच्या घरच्यांचा मात्र त्यासाठी विरोध होता. एका आजारी स्त्रीचं लोढणं गळ्यात अडकवून घ्यायला त्यांची तयारी नव्हती. सुधीरने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

सुधीरचा परिवार मोठा होता. म्हातारे वडील, लहान भाऊ आणि दोन बहिणी….वडिलांना दम्याचा त्रास होता…त्यामुळेच त्यांची नोकरीसुद्धा सुटली होती..साहजिकच परिवाराची सगळी जबाबदारी सुधीरवर येऊन पडली; त्यानेही ती समर्थपणे सांभाळली होती. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून लहान भावंडांची शिक्षणं, लग्नं ….सगळं काही व्यवस्थित पार पाडलं होतं. पण हे सगळं करत असताना त्याचं स्वतःचं म्हणता येईल असं काहीच उरलं नव्हतं त्याच्याजवळ !
त्याची एकच खंत होती…’ ज्यांच्या सुखासाठी आपण एवढे झटलो ; त्यांनाच आज आपल्या सुखाची जराही पर्वा नाहीये!’
एखाद्या बंडखोर क्षणी सुधीरला वाटायचं- घर सोडून लांब कुठेतरी निघून जावं आणि शोभाबरोबर नवं आयुष्य जगावं ! पण ….त्या दोघांकडेही स्वतःची हक्काची जागा नव्हती. शोभाचा मामा त्या दोघींशिवाय अजून कोणालाही त्या खोलीत ठेवून घ्यायला तयार नव्हता… ‘आपली जागा कोणी बळकावली तर’ अशी भीती वाटत होती त्याला.

आणि शोभाचं मत होतं की सुधीरने त्याचं राहतं घर सोडू नये…. त्या चाळीच्या जागी लवकरच नवीन अपार्टमेंट बनणार होती. प्रत्येक भाडेकऱ्याला स्वस्तात फ्लॅट मिळणार होता. जर सुधीर आत्ता ते घर सोडून आला असता तर त्या फ्लॅटला मुकला असता. सुधीरने आपल्या घरच्यांचं मन वळवायचे त्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते.शेवटी एक दिवस त्याच्या घरच्यांनी स्पष्टच सांगितलं..” तुमच्या लग्नाला आमचा विरोध नाहीये. पण तिच्या आईची जबाबदारी नकोय आम्हाला.”

लौकिकार्थाने जरी अजून शोभा आणि सुधीरचं लग्न झालं नसलं तरी शोभाने मनोमन सुधीरला आपला पती मानलं होतं – मागच्या वर्षांपासून ती त्याच्यासाठी हरितालिका आणि वटपौर्णिमेचे उपासही करत होती . खरं तर तिला घराजवळच्या वडाची पूजा करायची होती; पण तिथल्या भोचक बायका हजार प्रश्न विचारून भंडावून सोडतील हे माहित असल्यामुळे ती तिकडे गेली नव्हती. पण तिने मनोमन प्रार्थना केली होती -‘ देवा, पुढच्या वर्षी मलासुद्धा इतर सवाष्ण बायकांसारखा पूजेचा हक्क दे. माझ्या मनातल्या आमच्या पती-पत्नीच्या नात्याला जगाची मान्यता मिळू दे.’

कधी कधी शोभाला अशा जगण्याचा मनस्ताप व्हायचा…’आजपर्यंत हुलकावण्या देत असलेलं सुख समोर दिसत असूनही त्याला आपलं म्हणता येत नाही’ – या जाणिवेमुळे तिच्या मनाचा जळफळाट व्हायचा. तिचा होणारा त्रागा बघून एकदा तिची फॅक्टरीमधली मैत्रीण- जया- तिला म्हणाली,”उगीच असा त्रास करून घेऊन काय फायदा होणार आहे शोभा? त्यापेक्षा तू तुझ्या आईला वृद्धाश्रमात का ठेवत नाहीस? तुझे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील !” हे ऐकून शोभाच्या जीवाचा अजूनच संताप झाला होता. कसाबसा आपला राग गिळत ती म्हणाली,” ज्या आईने माझ्यासाठी तिचं सगळं आयुष्य खर्ची घातलं… तिला मी वृद्धाश्रमात ठेवू ? केवळ माझ्या सुखासाठी मी तिला असं बेवारशी म्हणून वाऱ्यावर सोडून देऊ? इतकीही स्वार्थी नाहीये मी ! आणि सुधीरला सुद्धा नाही पटणार हा विचार… एक वेळ आमचं लग्न नाही झालं तरी चालेल ; पण जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत मी तिला अंतर देणार नाही.”

त्यावर खांदे उडवत जया म्हणाली,” ठीक आहे …. मग तुझी आई हे जग सोडून जायची वाट बघ!” शोभाने कितीही प्रयत्न केला तरी जयाचं ते शेवटचं वाक्य तिच्या डोक्यातून जात नव्हतं. तिचा राग थोडा शांत झाल्यावर तिच्या मनात आलं ,’ बरोबरच म्हणतीये ती…. कटू असलं तरी शेवटी हेच सत्य आहे- आई असेपर्यंत माझं आणि सुधीरचं लग्न होणं अशक्य आहे .’ आभाळाच्या दिशेने बघत शोभाने एक सुस्कारा टाकला आणि म्हणाली,” देवा, तुझ्या मनात नक्की काय आहे ? माझी अशी परीक्षा का घेतोयस ? आई आणि सुधीर…. दोघंही माझ्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत… माझ्या भावविश्वातली दोन सुंदर नाती !!! एका नात्याचा दोर धरावा तर दुसरं सुटून जातंय…. काय करू ? काही सुचत नाहीये मला….आता तूच काय तो मार्ग दाखव !”

दोन दिवसांनंतर संध्याकाळी फॅक्टरीतून बाहेर पडताना जया शोभाला म्हणाली,” माझ्या सासूच्या ओळखीत एक ज्योतिषी आहेत ; हात बघून अचूक भविष्य सांगतात आणि जर काही अडचणी असतील तर त्यावर तोडगाही सुचवतात. तुला त्यांना भेटायचं असेल तर सांग- आपण जाऊया .” जयाचं बोलणं ऐकून शोभाने लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशी अनायासे फॅक्टरीला सुट्टी होती ; त्यामुळे सकाळी लवकरच त्यांना भेटायचं ठरलं.

शोभाच्या निराश मनात आशेचा किरण डोकावला. ‘सुधीरला सांगू का ? त्यालाही घेऊन जाते उद्या. ‘ शोभा मनात म्हणाली..पण पुढच्याच क्षणी तिने तो विचार झटकला…’ नको, सुधीरचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. त्याला सांगितलं तर तो मलाही नाही जाऊ देणार.… त्यापेक्षा एकटीच जाऊन बघते ते ज्योतिषी काय सांगतायत ते…मग पुढचं पुढे बघू. आणि तसंही उद्या सुधीरच्या बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ; त्यामुळे पुढचे दोन दिवस त्याला वेळच नसेल बाकी काही करायला.”

आता शोभा अगदी आतुरतेने दुसऱ्या दिवसाची वाट बघायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाई आल्यावर शोभा स्वामीजींना भेटायला गेली…राधाबाई म्हणजे शोभाच्या आईच्या केअरटेकर !! शोभा कामावर गेली की त्या दिवसभर तिच्या आईजवळ थांबायच्या. थोड्याच वेळात शोभा आणि जया स्वामीजींच्या राहत्या जागी जाऊन पोचल्या. जयाने शोभाची ओळख करून दिली. ती पुढे काही सांगणार इतक्यात स्वामीजीनी हाताच्या इशाऱ्याने तिला गप्प केलं आणि शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाले,” बाकी सगळं यांच्या हातावर दिसेल मला.”

शोभाच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर दाटून आला. त्यांची सात्विक मुद्रा, स्वच्छ तरीही तीक्ष्ण नजर आणि त्यांचा आश्वासक आवाज – सगळं काही खूपच धीर देणारं होतं. मनातल्या मनात देवाला नमस्कार करून शोभाने आपले दोन्ही हात त्यांच्यासमोर धरले . बराच वेळ झाला – स्वामीजी काहीही न बोलता नुसतंच तिच्या हातांकडे बघत होते… आधी शांत दिसणारा त्यांचा चेहेरा हळूहळू चिंताग्रस्त होत होता…. खोलीतली ती जीवघेणी शांतता आणि स्वामीजींच्या चेहेऱ्यावर दिसणारी काळजी…. हे सगळंच शोभाला अस्वस्थ करायला लागलं . तेवढ्यात स्वामीजींनी तिला विचारलं….” तुमच्या घरात, तुमच्या परिवारात अजून कोणकोण आहेत?” “माझी आई आणि मी…आम्ही दोघीच राहतो….म्हणजे मामा आहे, पण तो…..” शोभा सांगायला लागली.

“तो तुमच्या extended familyमधे येतो… ” स्वामीजी आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाले… काही क्षण थांबून ते म्हणाले,” म्हणजे तुमच्या घरात तुमच्या आईशिवाय दुसरं कोणीही नाहीये …” आता मात्र शोभा खूप अस्वस्थ झाली आणि म्हणाली, “काही प्रॉब्लेम आहे का? स्पष्ट सांगा ना प्लीज.” त्यावर तिच्या डोळ्यांत बघत स्वामीजी म्हणाले,” बरं, स्पष्टच सांगतो…येत्या चोवीस तासांत तुम्हाला वियोगाचं दुःख सहन करायला लागणार आहे… म्हणजेच येत्या चोवीस तासांत तुमच्या परिवारातली तुमची प्रिय व्यक्ती हे जग सोडून जाणार आहे. ” हे ऐकून शोभाला भोवळ आली… तिचा चेहेरा पांढरा पडला…तिच्या डोळ्यांसमोर घरी कॉटवर लोळागोळा होऊन पडलेली आई दिसायला लागली. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. शेवटी जया म्हणाली,” स्वामीजी, पुन्हा एकदा नीट बघा ना… कदाचित बघण्यात काहीतरी चूक…”
जयाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वामीजी म्हणाले,” माझं हे भविष्य खोटं ठरलं तर मला आनंदच होईल; पण माझी इतक्या वर्षांची साधना मला सांगते आहे- यांच्या नशिबात येत्या चोवीस तासांत वियोगपीडा आहे !!”
त्यांचं हे शिक्कामोर्तब ऐकून शोभा अजूनच हवालदिल झाली. कसेबसे त्यांचे आभार मानून ती घरी जायला निघाली. तिच्या मागोमाग जयाही बाहेर पडली. तिची समजूत काढत म्हणाली ,” अगं, शेवटी स्वामीजीही माणूसच आहेत ना… त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते… तू नको टेन्शन घेऊ..” त्यावर तिचा हात घट्ट पकडत शोभा म्हणाली,” पण जर त्यांचं भाकीत खरं ठरलं तर ??” “जर खरंच तसं झालं तर एका दृष्टीने चांगलंच होईल शोभा…” जया बोलून गेली. आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण देत ती पुढे म्हणाली,” तू स्वतः एकदा सगळ्या भावना बाजूला ठेऊन, अगदी प्रॅक्टिकली विचार करून बघ… तुझ्या आईची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललीये. त्यांचे बरं होण्याचे चान्सेसही शून्य आहेत. रोज असं थोडंथोडं मरण्यापेक्षा एकदाच्या सुटतील तरी बिचाऱ्या या त्रासातून !! आणि आपण आज स्वामीजींना भेटलो म्हणून हे सत्य आपल्याला आधीच कळलं… पण कधी ना कधी तर हे होणारच होतं ना!!” जयाच्या बोलण्यातला प्रत्येक शब्द शोभाला पटत होता; पण तरीही तिचं मन हे सत्य स्वीकारायला घाबरत होतं.

आपला मुद्दा पटवून देण्याच्या दृष्टीने जया पुढे म्हणाली ,” आणि या वाईटातून चांगलं म्हणजे….आता तुला आणि सुधीरला लवकरच लग्न करता येईल.” जयाचा निरोप घेऊन शोभा धावतपळत घरी पोचली. दार उघडायला आलेल्या राधाबाईंना अक्षरशः बाजूला ढकलतच ती आईच्या कॉटपाशी जाऊन उभी राहिली. तिची चाहूल लागताच तिच्या आईने मान वळवून तिच्याकडे पाहिलं … आणि शोभाच्या जीवात जीव आला. तिने राधाबाईंना घरी जायला सांगितलं. शोभाने इतका वेळ सांभाळलेलं उसनं अवसान क्षणार्धात गळून पडलं आणि ती आपल्या आईचा हात हातात धरून हमसून हमसून रडायला लागली. राहून राहून तिला स्वामीजींचे शब्द ऐकू येत होते…. ‘चोवीस तासांत… पण त्यातलाही जवळजवळ एक तास संपला होता ! शोभाला काहीच सुचेना. तिचं शरीर जणूकाही गोठून गेलं होतं. डोळे आईच्या चेहेऱ्यावर खिळून राहिले होते….पण मन मात्र तिच्या बालपणात जाऊन पोचलं होतं. तिच्या आईने तिच्यासाठी खाल्लेल्या खस्ता तिला दिसत होत्या. बिचारीचं अर्धं आयुष्य कष्टात आणि दुःखातच संपलं होतं. आणि शोभाला नोकरी लागल्यावर जेव्हा तिच्या आईचे आराम करण्याचे दिवस आले तेव्हा या जीवघेण्या आजाराने तिला ग्रासलं होतं. गेली दहा वर्षं आपल्या आईला असं हळूहळू मरताना बघून शोभलाही कधीतरी वाटायचं- ‘या अशा जगण्यापेक्षा मरण बरं….निदान आईच्या मागचे भोग तरी संपतील.’ पण आता जेव्हा तिचे हे विचार वस्तुस्थिती बनून समोर आले होते तेव्हा मात्र शोभा त्या सत्याचा स्वीकार करायला घाबरत होती.

शोभा बराच वेळ तशीच आईशेजारी बसून होती. अचानक तिला भुकेची जाणीव झाली..तिच्या मनात आलं, ‘ आईलाही भूक लागली असेल का? तिला काय खावंसं वाटत असेल?’ शोभा डोळ्यांतले अश्रू पुसत उठली. आईचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत म्हणाली,” आई, तुला आवडतं ना माझ्या हातचं पिठलं ! आज मी स्वतः तुझ्यासाठी पिठलं भात करणार आहे. आपण दोघी एका ताटात जेवू …मी शाळेत असताना जेवायचो ना तसंच…. पण आज मी तुला घास भरवणार !”

स्वैपाक करत असताना शोभाच्या मनात उलटसुलट विचारांचं द्वंद्व चालू होतं. मगाचचा भावनांचा आवेग थोडा ओसरला होता. तिला जयाचं बोलणं आठवलं आणि ती थबकली. “खरं म्हणजे जयाचं म्हणणं अगदीच चुकीचं नाहीये. त्रयस्थपणे विचार केला तर तिचे मुद्दे पटण्यासारखेच आहेत. स्वामीजींची भविष्यवाणी खरी ठरली तर खरंच या नरक यातनांतून कायमची सुटका होईल आईची; आणि….

आणि माझ्या आणि सुधीरच्या नात्यावर सामाजिक मान्यतेची – लग्नाची मोहोर लागेल. पुढच्या वर्षी मीदेखील हक्काने इतर बायकांबरोबर वडाची पूजा करेन..” नुसत्या कल्पनेनीच शोभाचं मन प्रफुल्लित झालं. ‘खरंच, वाईटातून चांगलं म्हणतात ते हेच…” शोभाने घाईघाईत सुधीरला फोन लावला. कधी एकदा त्याला ही बातमी सांगते असं झालं होतं तिला .. पण त्याचा फोन बंद होता. “अरेच्या, आज तर तो हॉस्पिटलमधे असणार- त्याच्या बाबांबरोबर… कशी विसरले मी !” शोभा स्वतःशीच बोलत होती. तिने त्याला एक मेसेज पाठवला… ‘ वेळ मिळाल्यावर फोन कर…महत्वाचं बोलायचं आहे.’

“जेव्हा फोन स्विच ऑन करेल तेव्हा बघेलच की माझा हा मेसेज”… शोभा स्वतःचीच समजूत घालत म्हणाली. आता तिच्या मनातल्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलली होती. थोड्या वेळापूर्वी आईच्या दुःखाने पाझरणारे तिचे डोळे आता तिच्या सुखी नवजीवनाची स्वप्नं रंगवायला लागले होते. काहीतरी लक्षात आल्यासारखं तिने कपाट उघडलं. आणि अगदी हळुवार हातांनी वरच्या कप्प्यात ठेवलेली एक साडी बाहेर काढली. सोनसळी पिवळ्या रंगाची ती रेशमी साडी बघून तिच्या चेहेऱ्यावर हसू फुललं… सुधीरने तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी घेतली होती ती साडी.. पण शोभाने ठरवलं होतं- त्यांच्या लग्नाच्या दिवशीच त्या साडीची घडी मोडायची ! आणि आता लवकरच तो दिवस येणार होता. शोभा तिच्याही नकळत तिच्या वैवाहिक जीवनाचा विचार करायला लागली. इतके दिवस परिस्थितीमुळे जी स्वप्नं मनाच्या तळाशी गाडून टाकली होती; ती आता तिच्या डोळ्यांसमोर फेर धरायला लागली.

आईच्या पलंगाजवळ जाऊन शोभाने तिला एक खूप घट्ट मिठी मारली . अर्थात ती मिठी आणि त्यामागचा आनंद तिच्या आईपर्यंत पोचलाच नव्हता .. ती नेहेमीप्रमाणे निर्विकार नजरेने शोभाकडे बघत होती. आणि नेहेमीप्रमाणेच तिच्या नजरेने शोभाला प्रश्न केला ,” कोण तुम्ही ?” आईचा हा प्रश्न टाळायला म्हणून रोज तिची नजर चुकवणारी शोभा…आज मात्र हसत हसत म्हणाली ,” मी सौ. शोभा सुधीर …” बोलता बोलता ती क्षणभर थबकली – उभ्या जागी तिच्या अंगावर रोमांच फुलले… ही कल्पनाच किती सुखद होती !! शोभा मनाने सुधीरपाशी जाऊन पोचली… त्याच्या अगदी जवळ…त्याच्या छातीवर डोकं ठेवून आपल्या हातांचे पाश त्याच्या गळ्यात टाकून त्याच्या मिठीत विरघळून गेली…गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा तिने हे स्वप्न बघितलं होतं…कधी झोपेत; तर कधी उघड्या डोळ्यांनी !! पण आता लवकरच हे स्वप्न पूर्ण होणार होतं… लवकरच ती तिच्या हक्काच्या जागी पोचणार होती .. सुधीरच्या आयुष्यात – त्याची पत्नी बनून !!!
भिंतीवरच्या आरशात आपलं लोभसवाणं रूप न्याहाळत असताना अचानक तिची नजर आरशात दिसणाऱ्या तिच्या आईच्या चेहेऱ्यावर गेली…. आणि ती खाडकन् जागी झाली… स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आली….आपल्या आईची ती केविलवाणी अवस्था बघून तिला स्वतःचीच लाज वाटली… “छे ! हे कसले विचार करतीये मी ? इथे माझी आई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतीये …आणि मी ? तिच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य कसं सुंदर होईल याचा विचार करतीये ? म्हणजे… म्हणजे मी नुसती तिच्या मरणाची इच्छाच करत नाहीये ; तर तिचं ‘नसणं’ साजरं करतीये ? इतकी हृदयशून्य कधीपासून झाले मी ?” तिला स्वतःचाच राग आला- अचानक खूप अपराधी वाटायला लागलं….’आपल्या मनातले भाव चेहेऱ्यावर झळकले तर नसतील ना ? आईला माझ्या आधीच्या आनंदामागचं आणि आत्ताच्या या अपराधी भावनेमागचं खरं कारण कळलं असेल का?’ नुसत्या विचारांनीच शोभाच्या मनात धस्स् झालं… ‘अरे देवा! काय वाटेल आईला ? मला स्वतःलाच अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतंय…. दुसऱ्याच्या जीवावर स्वतः आनंद उपभोगायचा? दुसऱ्याच्या श्वासांवर आपल्या सुखाचे इमले बांधायचे? मी इतकी स्वार्थी कशी झाले ?’ शोभाच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं.
आता शोभाला स्वतःची, स्वतःच्या विचारांची किळस वाटायला लागली. आईचे पाय धरून तिने मनोमन तिची क्षमा मागितली. तिला लहानपणी आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली – अकबर बिरबलाची गोष्ट ! एकदा अकबर बिरबलला विचारतो – “माणसाला सगळ्यात प्रिय काय असतं?” त्यावर बिरबल म्हणतो,”स्वतःचा जीव!” आणि हे सिद्ध करायला तो एका रिकाम्या हौदात एक माकडीण आणि तिच्या पिल्लाला सोडतो. नंतर हळूहळू तो हौदात पाणी भरायला लागतो. सुरुवातीला ती माकडीण आपल्या पिल्लाला पाण्यापासून वाचवण्यासाठी त्याला वर उचलून धरते. पण जेव्हा तिच्या स्वतःच्या नाकातोंडात पाणी जायला लागतं तेव्हा ती शेवटचा उपाय म्हणून आपल्या पोटच्या पिल्लाला आपल्या पायाखाली घालून हौदातून बाहेर निघायचा प्रयत्न करायला लागते…… शोभाला आजपर्यंत या गोष्टीचा खरा अर्थ कळलाच नव्हता. पण आज तिला जाणीव झाली- तिच्यात आणि त्या माकडीणीत काहीच फरक नाहीये… दोघीही स्वतःच्या स्वार्थासाठी; आपल्यावर पूर्णतः अवलंबून असणाऱ्या असहाय जीवाचा बळी द्यायला जराही कचरत नाहीत…. तिला आता स्वतःचीच घृणा वाटायला लागली…. “माझ्या संसाराची इमारत उभी करता यावी म्हणून मी माझ्याच आईच्या मृत्यूची इतक्या आतुरतेने वाट बघतीये ?” शोभा विचारांच्या गर्तेत अडकत होती… तिच्या डोळ्यांतल्या पश्चात्तापाच्या अश्रूंनी आईची पावलं धुवून निघत होती. त्यानंतर दिवसातला प्रत्येक क्षण शोभाने आईच्या सेवेत घालवला. तिला आपल्या हातांनी जेवायला घातलं, तिच्याशी खूप गप्पा मारल्या, स्वतःबद्दल, सुधीरबद्दल…. अशातच संध्याकाळ झाली. शोभाने देवापुढे दिवा लावला, हात जोडून प्रार्थना केली -” माझ्या आईच्या आयुष्यात अजून किती क्षण शिल्लक आहेत ते मला माहित नाही…पण एक कृपा कर आमच्यावर… आता तिला अजून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको… तिचं ‘जाणं’ सुसह्य कर – तिच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा !” आईच्या चेहेऱ्याकडे एकटक बघत शोभा तिच्या कॉटशेजारी बसून होती…. त्या अटळ क्षणाची वाट बघत… मधे एकदा सुधीरचा मेसेज आला – ‘ अजून हॉस्पिटलमधेच आहे. एकटाच असल्यामुळे धावपळ चालू आहे. नंतर निवांतपणे बोलूया.’

“बिचारा, किती झटतोय त्याच्या घरच्यांसाठी …पण त्यांना कदरच नाहीये !” शोभा चुटपुटली.. तिच्या मनात आलं….उद्या सुधीरला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? मामाला हे सगळं सांगावं का? पुढे काय आणि कसं करायचं? एक ना अनेक…. या विचारांच्या गर्दीतच मध्यरात्रीनंतर कधीतरी शोभाला झोप लागली.
जेव्हा जाग आली तेव्हा उन्हं वर आली होती. खिडकीतून उन्हाची एक तिरीप बरोब्बर तिच्या आईच्या चेहेऱ्यावर पडली होती. शोभाने अश्रूपूर्ण नजरेने आईकडे बघितलं…. किती शांत, सोज्वळ दिसत होती ती … आणि तितकीच विरक्त !! शोभाने घड्याळात वेळ बघितली. स्वामीजींनी दिलेली मुदत नुकतीच संपली होती. तिने देवाकडे बघून हात जोडले..” देवा, माझं मागणं ऐकलंस… जाताना आईला काही त्रास नाही झाला…. खूप मोठी कृपा केलीस !” क्षणभर शोभाला वाटलं- आईच्या चेहेऱ्यावरून, डोक्यावरून मायेचा हात फिरवावा… तिला शेवटचा निरोप द्यावा ! पण त्या निर्जीव, थंडगार स्पर्शाची नुसती कल्पना करूनच तिचा जीव खालीवर झाला…. “नकोच ते… आईचा प्रेमळ, मृदू स्पर्शच लक्षात ठेवायचाय मला…” असं म्हणत, एक मोठा सुस्कारा सोडून शोभा उठली; तेवढ्यात….. तेवढ्यात तिला कॉटवर काहीतरी हालचाल जाणवली. तिने चमकून त्या दिशेने बघितलं…. तिची आई मान वळवून तिच्याकडे बघत होती. शोभाला सत्य समजायला काही क्षण लागले.. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती आनंदाने अक्षरशः किंचाळली…” आई, तू आहेस अजून …. मला सोडून नाही गेलीस…. ” तिने आईला घट्ट मिठी मारली. जयाने म्हटल्याप्रमाणे स्वामीजींचं भविष्य खोटं ठरलं होतं.

शोभाच्या आनंदाला पारावर नव्हता…”.पण,” … तिच्या मनातली बिरबलाची माकडीण पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागली….” पण यामुळे माझं आणि सुधीरचं लग्न पुन्हा लांबणीवर पडणार…अजून किती दिवस वाट बघायची? दिवस… महिने…का वर्षं ?” त्या माकडीणीचा उद्वेग वाढायला लागला. काही क्षणांपूर्वी आईला प्रेमाने जवळ घेणाऱ्या शोभाच्या नजरेत आता तिच्याबद्दल राग, दुस्वास गोळा होऊ लागला. जितक्या आवेगाने तिने आईला जवळ घेतलं होतं तितक्याच द्वेषाने तिला दूर ढकललं. आता तिच्या आतली माकडीण पाण्याबाहेर येण्यासाठी मार्ग शोधायला लागली.

जवळच पडलेली उशी उचलून ती आईच्या दिशेनी पुढे सरसावली. तेवढ्यात घराची बेल वाजली आणि शोभा भानावर आली. एखादं झुरळ झटकल्यासारखी तिने हातातली उशी झटकून दूर फेकली आणि आईचे हात हातात घेऊन ती शून्य नजरेने आईकडे बघत बसली. पण आईच्या त्या निर्विकार नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य आता शोभामधे नव्हतं. तिच्या डोळ्यांतून झरणारे अपराधाचे अश्रू तिच्या आईचे हात भिजवत होते. तेवढ्यात पुन्हा एकदा घराची बेल वाजली. आईच्या चेहेऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत शोभा उठली; दार उघडून पहाते तर समोर जया उभी होती. शोभाने तिला सगळं काही सांगितलं…. स्वामीजींची खोटी ठरलेली भविष्यवाणी… अजूनही जिवंत असलेली तिची आई…. सगळं !
जयाने शांतपणे ऐकून घेतलं. काही क्षण थांबून ती शोभाला म्हणाली,”स्वामीजींची भविष्यवाणी खोटी ठरली हे बरंच झालं. पण…एक वाईट बातमी आहे…. काल रात्री हॉस्पिटलमधून घरी जाताना सुधीरच्या स्कूटरला एका ट्रकने धडक मारली आणि सुधीर जागेवरच……” जयाला पुढे काहीच बोलवेना.

जयाचं बोलणं ऐकून शोभा सुन्न झाली. बराच वेळ ती निःशब्दपणे शून्यात बघत होती… तिच्या डोळ्यांसमोर तिने मनोभावे पूजलेली हरितालिका दिसत होती… वटपौर्णिमेचा उपास आठवत होता….तिने मनोमन जपलेलं त्यांच्यातलं ते पती-पत्नीचं नातं आठवत होतं .काही नाती अशी मनानेच जुळतात… जन्मजन्मांतरासाठी . त्यांना कोणत्याही शिक्कामोर्तबाची गरज नसते.

ती नकळत बोलून गेली, ” स्वामीजींची भविष्यवाणी खरी ठरली…..”
बिरबलाच्या त्या माकडीणीला आता कशाचंच भान उरलं नव्हतं…ना पाण्याबाहेर येण्यासाठी धडपणाऱ्या पिल्लाचं ; ना हौदात वाढणाऱ्या पाण्याचं !

लेखिका : प्रिया जोशी

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप च्या लेखिका

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..