नवीन लेखन...

सांगली आकाशवाणी केंद्राचा वाढदिवस

६ ऑक्टोबर १९६३ रोजी सांगली आकाशवाणी केंद्राची स्थापना झाली. आज सांगली आकाशवाणी केंद्र अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करत आहे. दूरदर्शन,विविध वाहिन्या, रेडिओमधीलच एक प्रकार असलेल्या एफएम यांच्या आक्रमणांना ठमपणे तोंड देत आकाशवाणी उभी आहे. तरुणपिढीच्या बदलेल्या आवडी-निवडीचा वेध घेत हवे ते बदल करून घेताना येथील संस्कृतीला तसूभरही धक्का न लागण्याची काळजी घेणारी सांगली आकाशवाणी कौतुकास पात्र आहे. ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांपर्यंत मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्रसाराचे काम करण्याची किमया आकाशवाणीने केली आहे. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर वसंतदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सांगलीची जडणघडण सुरू झाली. उद्योग,व्यापार,शेती या क्षेत्रात सांगलीच्या प्रगतीला सुरुवात झाली होती.परंतु थकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला.

सांगली जवळच्या तुंग येथे या केंद्राची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला पुणे येथील केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित होत होते. परंतु सांगलीला केंद्र आल्यानंतर मात्र प्रत्येक खेड्यांपर्यंत कार्यक्रमांचे प्रसारण होऊ लागले. चित्रपट गीतांबरोबरच लोककला,सुगम संगीत, आरोग्य सल्ला, ग्रंथ परिचय, दिनविशेष, ग्राहक जागर, विज्ञान परिचय,कायद्याचा सल्ला, प्रतिबिंब, सप्रेम नमस्कार, प्रगतीचे रंग, शेतीविषयक सल्ला, हवामान वृत्त, बाजारभाव असे कितीतरी कार्यक्रम आकाशवाणीने तयार केले आणि ते प्ररसारित करीत आले.ज्येष्ठ निवेदक वामन काळे, चित्रा हंचनाळकर यांच्या आवाजातील प्रगतीचे रंग या घटना, माहितीवर आधारित कार्यक्रमातून ज्ञानाचा खजिना उघडला जायचा. ताई,दादांच्या रुपाने जो काही संवाद घडायचा, तो जणू काही आपल्याच घरामध्ये असल्याचा भास व्हायचा.श्रोतावर्ग अगदी तल्लीन होऊन कार्यक्रम ऐकायचा.

१९८५ साली सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीची इमारत उभी राहिली. त्यानंतर मात्र सांगली जिल्ह्याबरोबर सातारा,कोल्हापूर,सोलापूर आदी जिल्ह्यातही सांगली आकाशवाणीचे प्रसारण होऊ लागले. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म.द. हातकणंगलेकर, कवी सुधांशु, डॉ. तारा भावाळकर, कवलापूरचे लोक कलावंत काळू-बाळू आदींना श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात सांगली आकाशवाणीचा मोठा वाटा आहे. प्रा.हातकणंगलेकर चिंतन मालिकेतून भेट होते. तर कवी सुधांशु रविवारच्या मुलाखतीतून श्रोत्यांशी गप्पा मारत कथाकार शंकर पाटील यांच्या अस्सल ग्रामेण ढंगातल्या कथांचे सादरीकरण ऐकताना श्रोते हास्यरसात बुडून जायचे. कधी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, निळू फुले, अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार श्रोत्यांच्या भेटीला यायचे. तर कधी संपूर्ण नाटकाचे सादरीकरण व्हायचे. बाळगोपाळांना सामावून घेण्यासाठी त्यांच्यासाठी छान छान गोष्टींची आखणी करण्यात येत होती. पंतप्रधान इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, ज्येष्ठ नेते,अभिनेते यांच्या मृत्यूची वार्ता थेट आकाशवाणीवरूनच तात्काळ मिळाली होती.

सांगलीच्या आकाशवाणी केंद्राने अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आज सांस्कृतिक,साहित्यिक माहिती असणारी मंडळी येथे काम करत आहेत. आजही प्रत्यक्ष घटना स्थळावरून प्रसारण करण्याची सुविधा राबवण्यात येते. निवडणुकीच्या काळात निकाल ऐकताना श्रोत्यांच्या कानापासून रेडिओ हलत नाही दूरदर्शन , विविध चॅनेल्स,एफएमसारखी आक्रमणे आली,परंतु सांगली आकाशवाणीचा बाज कुणालाही आला नाही. व्यवसायात कोणताही उथळपणा न आणता संस्कृतीचा मान राखत सांगलीची आकाशवाणी अजूनही डौलाने उभी आहे.

सांगलीची आकाशवाणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आकाशवाणीचे सांगली केन्द्र आता मोबाईलवर ऐकु शकता.

Listen to AIR Sangli Radio live on Prasar Bharati’s NewsOnAir App. Download the App from

https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ: इंटरनेट/ मच्छिंद्र ऐनापुरे.

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on सांगली आकाशवाणी केंद्राचा वाढदिवस

  1. सांगली आकाशवाणीचे पूर्वीचे प्रसिद्ध निवेदक वामन काळे यांचे दोन-तीन आठवड्यापूर्वी (९ ऑक्टोबर २०२२) दु:खद निधन झाल्याची बातमी आज वाचायला मिळाली. वाईट वाटले. लहानपणी खूप खूप ऐकलेला आणि परिचित आवाज. स्वच्छ सुस्पष्ट उच्चार, अतिशय परिणामकारक निवेदन. अतिशय लोकप्रिय निवेदक होते. श्रोत्यांच्या ह्रदयावर त्यांनी अनेक दशके अधिराज्य गाजवले.

    त्यांनीच एका मुलाखतीत एक ह्र्द्यस्पर्शी आठवण सांगितली होती. एका वयोवृद्ध चर्मकाराने त्यांना पत्र पाठवले होते आणि त्या पत्रात लिहिले होते “तुमचा आवाज आणि तुम्ही सादर केलेले कार्यक्रम ऐकणे हाच आयुष्यातला आनंद आता माझ्यासाठी शिल्लक राहिला आहे. केवळ त्यावरच आता जगण्याची उमेद मिळत आहे. तुमच्या पायाचा आकार एका कागदावर काढून पाठवा, तुमच्यासाठी माझ्या हाताने पादत्राणे बनवून ती तुम्हाला भेट म्हणून पाठवण्याची आयुष्यातली अखेरची इच्छा आहे”.

    अजून एका प्रसंगी त्यांनी आकाशवाणीचा प्रोटोकॉल ब्रेक करून कोल्हापूरच्या सिव्हील हॉस्पिटल मधील एका मुलीस ठराविक रक्तगटाची तातडीने गरज असल्याची उद्घोषणा रेडिओवरून “आपली आवड” या कार्यक्रमात केली होती. वास्तविक अशी उद्घोषणा करता येत नाही आणि तातडीने काही करायचे असेल तर त्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते. पण हाताशी तितका वेळ नव्हता. पण त्या मुलीच्या पित्याचा सतत येणारा फोन आणि एकूण परिस्थितीचे गांभीर्य पाहून काळेसाहेबांनी परस्परच हा निर्णय घेतला होता. त्यावर आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी नाराज झाले होते. सगळेच तणावात होते. पण दुसऱ्याच दिवशी त्या मुलीच्या पित्याचा फोन आला. काळे साहेबांमुळे आपल्या मुलीला वेळेत रक्त मिळाले व तिचे प्राण वाचल्याचे त्याने फोनवर रडतरडतच सांगितले.

    लोकांचे इतके प्रेम मिळालेला निवेदक विरळाच. आज गुगलवर सहज म्हणून वामन काळेंचे नाव शोधले आणि हिच बातमी दिसली वाईट वाटले 🙁

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..