सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली.
त्यांना लहानाचं मोठं करतांना मला कधी वेळ मिळाला नाही. कधी २४ तास तर कधी चार चार दिवस घराच्या बाहेर राहिलो. पण कधी तक्रार केली नाही तिनं. माझा संसार सांभाळताना तिनं घरच्या माणसाकडं कधी दुर्लक्ष केलं नाही. प्रत्येक सुख दुःखात तिनं हिरीरीनं भाग घेतला. कधी मान अपमानाला थारा दिला नाही. म्हणुनचं ती आज सगळ्याची लाडकी सून व वहिनी आहे. अनेक कटु गोड आठवणी मध्ये दिवस महिने व वर्षे सरत होती. शिपाई पदापासुन सुरूवात करून मी सहाय्यक पोलीस आयुक्त पदापर्यंत पोहोचलो.
पोलीस खात्यात नोकरी करीत असताना गावांकडची नाळ कधीच तोडली नाही. गावातील गरजू लोकांना मदत करणं त्याच बरोबर बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यामध्ये सातत्यानं प्रयत्न केले आहेत.
नोकरीच्या ज्या ज्या ठिकाणी नेमणुक झाली त्या ठिकाणी गरजे नुसार दुरूस्ती करणे किंवा नविन इमारत बांधून सुसज्य पोलीस स्टेशन व पोलीस लाईन करण्या बरोबरच पोलीस ठाण्यात व पोलीस लाईन मध्ये वाचनालय, खुली व्यायाम शाळा बांधलेल्या आहेत. तसेच पोलीस पाल्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये अॅडमिशन मिळवून देण्या मध्ये नेहमीच पुढाकार घेतला. पोलीस दल हे एक शासन व जनता यांच्या मधला सुंदर दुवा असल्यानं मानव सेवा हिच ईश्वर सेवा मानून अतिशय मेहनतीने खात्यांत सेवा केली, आणि त्याचीच परिणीती म्हणून खात्यात यशस्वी होऊ शकलो.
खात्यात काम करताना सुरूवातीला दक्षता मासिक व पोलीस टाईम्स मध्ये लेखन केलं. त्यावेळी माझे संपर्कात एक जेष्ठ लेखक श्री. अरुण हरकारे हे आले. त्यांनी माझं लेखन वाचून मला लिखाण करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं.
त्यांनी आता पर्यंत १८२ पुस्तकं लिहिली आहेत. ते आजही बसमधून, रेल्वेमधून व मुंबईच्या लोकल मधून प्रवास करून पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेऊन पुस्तकं लिहितात. त्यांचा उत्साह आम्हा तरुणांना लाजवणारा आहे. अशा लेखकाने माझी दोन पुस्तकं प्रकाशित करून माझ्यातल्या लेखकाला अतिशय उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांचे वय व उपकार मी कधीही विसरू शकत नाही. आज श्री. हरकारे यांच वय ७७ आहे हे कोणाला सांगून खरं वाटणार नाही.
पोलीस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघादोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होऊन त्या सासरी गेलेल्या होत्या. आम्ही तीन भाऊ, आता दोन लहान भाऊ आपापले व्यवसाय व नोकरी करीत आहेत.
सन १९८० सालात रयत शिक्षण संस्थेतून आदरणीय कै. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद वाक्य,’ या विचारांनं प्रेरीत होऊन बारावी उत्तीर्ण झालो. जीवनातला हा काळ कसोटीचा होता. पुढे शिक्षण की नोकरी? फक्त शिक्षण घेऊन चालणार नव्हतं. उद्योगधंदा किंवा नोकरीची जोड आवश्यक होती. त्यासाठी पोलीस खात्यात काम करणारे माझे चुलते (काका) श्री. भिमराव भाऊ यांच बोटं पकडून ठाणे शहर गाठलं. तेव्हा माझं वय अवघं १८ वर्षे होतं.
आम्ही शाळेत जात असू, त्यावेळी बुधगांव मधील पोलिसवसाहती समोरुन सायकलवर डबलसिट बसून जाण्यास सुध्दा कचरत होतो. तेथून जातांना मागच्याला खाली उतरवित असू. कारण लहानपणा पासूनच पोलिसांबद्दल भीती तर होतीच, पण एक प्रकारचा आदरही वाटत होता. पोलीस खात्यात नोकरी करण्याचं ध्येय उरात बाळगून सन- १९८०च्या जून महिन्यात आपलं गांव, गोतावळा, गणगोत यांना गावी सोडून छातीच्या डाव्या बाजूच्या हृदयाच्या कप्प्यात त्यांच्या आठवणी ठेऊन ठाणे शहरात दाखल झालो.
१९८० जून ते डिसेंबर या कालावधीत ठाण्यात मध्यवर्ती मैदान, त्याच्या बाजूचे पोलीस मैदान व पोलीस खात्याची ओळख करुन घेतली. पहाटे पाच वाजता उठून, उन असो, वारा असो वा पाऊस असो धावण्याचा व इतर शारीरिक व्यायाम करण्याचा नियमित सराव केला. पोलिसांची परेड पहाता पहाता, स्वतःला पोलीस वर्दी घालून धावतांना पहात होतो. डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे, ‘पोलीस खात्यात भरती व्हायचं.’
याच ध्येयाने प्रेरीत होऊन मी सहा महिने मैदानी सराव केला. सरावासोबत टेंभी नाक्यावरील ग्रंथालयात जाऊन अभ्यास सुरु केला. त्यानंतर बाजुलाच फडके यांच्या टाईपिंग क्लासेसमध्ये टायपिंग शिकायला सुरुवात केली. राहिलेल्या वेळात घरातली कामं करायची असा नित्यक्रम सुरु होता. सकाळी पाच वाजता सुरु झालेला दिनक्रम रात्री अकरा वाजता संपायचा.
पहाटे, पाच ते सहा वाजेपर्यंत मैदानावर सराव, त्यानंतर प्रातर्विधी. सकाळी सात वाजता माझं आराध्य दैवत श्री. सिध्दीविनायक गणपती मंदिर, जांभळीनाका येथे आरतीला हजर राहायचो.
माझ्या आयुष्यातील प्रगतीची सुरुवात ह्या श्री गणपती मंदिरातून सुरु झाली. आजपर्यंत त्याच माझ्या लाडक्या गणरायाच्या आशिर्वादाने माझ्या आयुष्याचा रथ प्रगतीपथावरुन चालतो आहे.
श्री. व्यंकटराव पाटील
सहायक पोलीस आयुक्त
(निवृत्त)
Leave a Reply