नवीन लेखन...

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ३

आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा. मन भ्रमिष्ठ व्हायचं. देह ठाण्यात आणि मन चौखूर गावाकडे धावायचं. मी ज्या ठिकाणी रहायचो, त्या पोलीसलाईनच्या बाजूला पोस्ट ऑफीस होतं. मग सरळ पोष्ट ऑफीसात जायचं. पंधरा पैशाचं पोष्ट कार्ड घ्यायचं आणि पोष्टात बसूनच घरी पत्र लिहायचं. आठवड्यातून किमान चार पत्रं मी घरी पाठवित असे. त्यावेळी मोबाईल, फोन ह्या सुविधा नव्हत्या. एक पत्र पाठवलं की, गावाकडून येणाऱ्या पत्राची चातकासारखी वाट पहायची.

पहिले दोन-तीन महिने असेच गेले. येतांना आईने मला दहा रुपये खर्चायला दिले होते. त्या दहा रुपयांतले अर्धे पैसे मी पत्रांकरीता खर्च केले. पत्र लिहितांना कधी कधी वाटायचं, जावं परत गावाकडे, पुन्हा अंतर्मन विचारायचं, ‘काय करशील गावाकडे जावून?’ तेच शेतीकाम, जनावरांचे शेणघाण काढणं, जास्तीत जास्त माधवनगर सुतमिलमध्ये नोकरी?

मी स्वतःला समजावत असे. ‘अरे थांब, वेड्या सर्व दिवस सारखे नसतात. नशिबानं, तुला ठाण्यात येण्याची संधी दिली आहे. या संधीचं सोनं कर.’

अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही, मी स्वतःला समजावत होतो तर कधी स्वतःला अनेक प्रश्न विचारत होतो. दरम्यानच्या काळात मला एक खूप चांगला मित्र भेटला. तो म्हणजे, ‘विजय काटकर’ खरंच काय मित्र होता माझा? लाखांत एक, पण दुर्दैव, तो आज माझ्या सोबत नाही. एका अपघातात त्याने माझीच नाही तर सर्व जगाची साथ सोडून इहलोकीचा मार्ग धरला.

मी नाराज असलो की, मला म्हणायचा, ‘ए व्यंक्या, चलरे, आपण तलावपाळीला चक्कर मारुन येऊया’.

मी म्हणायचो, ‘नको रे विजू, तलावपाळीला नको आपण सेंट्रल मैदानात बसूया.’

त्याला माहिती होतं, माझ्याकडे पैसे नसायचे. मग माझ्या आग्रहाखातर तो आणि मी मैदानात थोडावेळ गप्पा मारत असू.

एके दिवशी गप्पा मारता मारता मारता मी म्हणालो, ‘विजय, मी होईन का रे पोलीस खात्यात भरती?”तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणायचा, ‘व्यंकट, तुझ्यासारखा जिद्दी माणूस मी बघितला नाहीय रे, तू नक्की होणार बघ पोलीस.’

खरंच, त्याचा हा आधार मला लाख मोलाचा होता. आणि त्या नोकरीच्या आशेने मी अधिक जोशाने मैदानी सराव करीत होतो.

मला सुरुवातीला ठाण्यातील रस्त्यांची, एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादींची माहिती नव्हती. ती मला विजयनेच करुन दिली.

माझ्या जीवनात अशीच एक झालेली गंम्मत व्यक्त केल्याशिवाय रहावत नाही. एके दिवशी असंच मन भरकटलं होतं, काही केल्या करमेना, उठून सरळ गाव गाठावं, असं वाटू लागलं. अशा अवस्थेतील तंद्रीतच तडक चालत रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर आलो खरा, पण खिशात एकही दमडी नसल्याची जाणीव झाली. विजयचे शब्द आठवले, ‘तू होणार भरती, तू जिद्दी आहेस.’ त्याच्या शब्दांनी दिलेल्या विश्वासाच्या बळाने, दृढ निश्चय करुन स्टेशनवरुन मागे फिरलो. पण स्टेशनवरुन बाहेर येताच, दोन काळ्या कोटवाल्या तिकीट तपासनिसांनी अडवले. म्हणाले, ‘तिकीट दाखवा.’

मी जरी रेल्वेतून प्रवास केला नव्हता, तरी स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट हे लागतं. तेही माझ्याकडे नव्हतं. काढणार कसं? खिशात दमडी नव्हती.

मी त्यांना विनवणी करीत म्हणालो, ‘मी मुंबईत नवीनच आलो आहे. मी काही रेल्वेतून प्रवास केलेला नाही, माझ्याकडे तिकीट नाही.’

त्यांनी दरडावत विचारलं, ‘नांव काय तुझं? कुठं राहतोस?” मी त्यांना माझं नांव सांगितलं. माझे काका पोलीस लाईनमध्ये राहतात असं सांगितलं. मी, चूक कबूल करुन व त्यांना विनंती करुनही, ते मला त्यांच्या ऑफीसमध्ये घेऊन गेले. माझ्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकू लागले. मी त्यांना पुन्हा विनंती करुन पुन्हा कधीही तिकीट घेतल्याशिवाय प्लॅटफॉर्मवर येणार नाही, असं सांगितलं. मनात गणपतीचा धावा सुरुच होता आणि माझ्या देवाने माझा धावा ऐकला.

त्या तिकीट तपानिसांनी ‘उद्या येवून दहा रुपये दंड भर’ असा दम देऊन मला सोडून दिलं. मी सुटकेचा निःश्वास सोडत, मनात देवाचे आभार मानत स्टेशनबाहेर आलो. सरळ घर गाठलं आणि त्याच वेळी मनाशी एक खुणगाठ बांधली, ‘पुन्हा रेल्वे स्टेशनवर विनातिकीट जायचं नाही.’

घरी आलो, पण रात्री काही केल्या झोप लागेना, उद्या दहा रुपये कोठून आणायचे? घरी काय सांगायचं? हे प्रश्न सतत भेडसावत होते. सकाळी उठल्याबरोबर प्रथम विजयला भेटायचे, तोच यातून काहीतरी मार्ग दाखविल, असं ठरवून झोपी गेलो. सकाळी उठलो, प्रातर्विधी आटोपून प्रथम विजयला जाऊन भेटलो. तो म्हणाला, ‘चल, कोर्ट नाक्यावर जाउन येऊया.’

मी त्याला स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगण्यापूर्वीच आम्ही चार पावलं चालतो ना चालतो तोच, समोर दोन काळे कोटवाले येतांना दिसले.

त्या दोघांना पाहून वाटलं, ‘हे दोघे बहुधा मलाच शोधायला आलेत’ मी पटकन विजयला म्हणालो, ‘विज्या, दोन मिनिटं थांब मी आलोच.’ मला काय झालं हे विचारण्यासाठी विजय तोंड उघडतच होता, तोपर्यंत मी पळतच बाजूच्या पोष्ट ऑफीसमध्ये घुसलो. थोडा वेळ आत थांबून, ते टीसी गेल्याची खात्री झाल्यावर बाहेर आलो. विजय सोबत चालू लागलो.

तोच पुन्हा दोन टीसी दिसले, मी हैराण झालो. हे सगोळे टीसी मलाच शोधायला निघालेत की काय? अशी शंका मनात आली. मी विजयला काहीही न सांगता, मागच्या मागेच बाजूच्या ड्रायव्हर लाईनच्या कंपाऊंडच्या आत लपून बसलो. विजय मला शोधत असल्याचं मी लपून पहात होतो.

काही वेळाने मी कंपाऊंडच्या बाहेर आलो. मी खुप घाबरलो होतो. विजयनं माझ्या चेहेऱ्याकडे पाहुनच ओळखलं की काही तरी प्रॉब्लेम आहे. त्याने मला विचारलं, ‘काय व्यंकट झालंय काय तुला? असा इकडे तिकडे लपतोयस?’ मला देखिल त्याला सगळं सांगून माझं मन मोकळं करायचं होतं. मी विजयला कालची रेल्वे स्टेशनची सर्व घटना सांगितली आणि म्हणालो, ‘मघाशी ते दोन काळे कोटवाले टीसी आडवे आले आणि आता पुन्हा दुसरे दोन टीसी समोर आले, ते नक्की मलाच शोधत असणार.’

‘अरे, कुठे आहेत टीसी?’ विजयने विचारलं.

‘ते काय, ते चाललेत दोघे.’ मी विजयला म्हणालो.

ते ऐकून विजय मोठमोठ्याने हसू लागला. मी त्याच्या हसण्याकडे पहातच राहिलो. मनात म्हणालो, ‘मी कसला टेन्शनमध्ये आलोय, आणि ह्याला हसणं सुचतयं?” तो हसत हसतच म्हणाला, ‘अरे, व्यंकट ते टीसी नाहीत.’ समोरच्या इमारतीकडे बोट दाखवित तो म्हणाला, ‘हे बघ, इथं कोर्ट आहे आणि ते काळे कोटवाले टीसी नसून कोर्टातले वकील आहेत वकील. समजलं?’ ते ऐकून माझा चेहरा बघण्यासारखा पांढरा फटक झाला होता. मग मात्र मी त्याच्यासोबत ठाण्यातील सर्व परिसर फिरुन माहिती करुन घेतली.

बघता बघता सहा महिने निघून गेले. सन – १९८१ नववर्षातील जानेवारी महिना सुरु झाला. नवीन वर्षातील नवीन ‘गूड न्यूज’ माझ्या कानी आली. ती म्हणजे, ‘१० जानेवारीला ठाणे पोलीस मैदानावर पोलीस भरती होणार!’ माझ्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार उरला नाही. मी पुन्हा नव्या जोमाने मैदानी सरावाला सुरुवात केली. शेवटी तो दहा जानेवारीचा दिवस उगवला. पहाटे पाच वाजता उठून, तयारी करुन, भरतीसाठी लागणारी प्रमाणपत्रे बरोबर घेतली आणि जांभळी नाक्यावर येऊन सर्वात प्रथम श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले व बरोबर सात वाजता मैदानावर हजर झालो.

सकाळी प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यानंतर पुन्हा दिवसभर शारीरिक चाचणी स्पर्धा पार पडल्या. मैदानी चाचणी पूर्ण झाल्यावर, मी शारीरिक चाचणी परिक्षा नक्की उत्तीर्ण होणार याचा मला आत्मविश्वास निर्माण झाला. लेखी परिक्षा आणि तोंडी मुलाखत जानेवारी महिन्यात घेण्यात आली.

दोन महिने वाट पाहिल्यानंतर, सोमवार, ३० मार्च १९८१ रोजी मला पोलीस अधिक्षक कार्यालय, ठाणे येथे हजर होण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. त्यावेळी ठाणे ग्रामिण आणि शहर एकच होते. १ मे १९८१ रोजी ठाणे जिल्हा स्वतंत्र होऊन ठाणे शहराकरीता वेगळ्या पोलीस आयुक्त कार्यालयाची स्थापना झाली.

हातात आदेश घेवून, ३१ मार्च १९८१ रोजी ठाणे मुख्यालयातून सर्व तयारीनीशी मी आणि माझे इतर १८१ सहकारी यांची पोलीस प्रशिक्षणाकरीता जालना येथे रवानगी करण्यात आली.

वयाच्या १९व्या वर्षी जीवनाची नवीन वाटचाल सुरु झाली होती. आज त्या एका सर्वसामान्य मुलाचे रुपांतर एक सुजाण नागरीक आणि जनतेचा रक्षक असं झालं आहे. पोलीस वर्दी अंगावर चढवून नऊ महिन्यांचं प्रशिक्षण जालना येथे सुरु झालं.

श्री. व्यंकटराव पाटील
सहायक पोलीस आयुक्त
(निवृत्त)

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 18 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..