मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो.
त्या दरम्यान एक भाडोत्री टॅक्सी त्या ठिकाणी येऊन थांबली. त्यातून चारजण खाली उतरले. मी आवाज दिला, ‘कोण आहे?’ त्यातला एकजण म्हणाला , ‘हा ड्रायव्हर मेला आहे, त्याचे आम्ही नातेवाईक आहोत.’
त्यांनी ते प्रेत पाहिलं. त्यातील एकजण ओक्साबोक्सी रडू लागला. ते थोडा वेळ थांबले नंतर टॅक्सीत बसून निघून गेले.
मी, सारखा माझ्या घड्याळाकडे आणि जंगलात जाधव ज्या दिशेने गेला, त्या दिशेला बॅटरीचा प्रकाश टाकून बघत होतो. आयुष्यातला पहिला पोलीस खात्यातला दिवस. इतक्या भयानक परिस्थितीत अडकलो होतो. अनुभव नसल्यामुळे भीती वाटत होती. पण सांगणार कोणाला? त्या घनदाट अरण्यात, एकटाच कर्तव्यावर होतो. एका हातात काठी आणि एका हातात बॅटरी घेऊन सारखा देवाचा जप करीत एकाच जागी फेऱ्या मारत होतो.
तीन वाजले असतील आणि अचानक मागून आवाज आला, ‘काय रे पाटला?’ अचानक आलेल्या आवाजाने मी दचकून मागे पाहिले.
जाधवला समोर उभा बघून माझ्या जिवात जीव आला.
‘जाधव, अहो, किती उशिर केलात?’ मी विचारलं.
‘मी काय फिरायला गेलो होतो की, गोट्या खेळायला? जाधवनं विचारलं.’
‘तसं नाही हो जाधव, रात्रीची वेळ आणि आज माझा पहिलाच दिवस आहे.’ – मी म्हणालो.
‘आता सवय करायची. कधी कधी मसणात झोपावं लागतं, ते देखील प्रेत उशिला घेवून, मनात भीती ठेवायची नाय, समजलं का? अरे राजा, माझी २० वर्षे नोकरी झाली आणि ती देखील या ग्रामिण भागात. हे सगळं बघून बघून मन मेलंय रे! ‘ग्रामिण भाग हा असाच आहे. काही सुविधा नाहीत, गाड्या नाहीत. अशी प्रेतं सांभाळत रस्त्यावर उभं राहायचं. आठ आठ दिवस घरी जायचं नाही. रजा मागितली तर, मिळणार नाही. गप-गुमान न बोलता पोलिसानं आपलं काम करत रहायचं. चोवीस तास ड्युटीला बंदोबस्त करायचा. अर्धा तास उशिर झाला की शिक्षा मिळणार आणि घरी जायला उशिर झाला किंवा जायला मिळालं नाही की घरच्या लोकांची बोलणी खायची. ‘ जाधवचं बोलणं बराच वेळ चालूच होतं. त्याच्या प्रत्येक ते मला भविष्याकरीता खूप उपयोगी पडलं आहे आणि अजुनही मी त्या ज्ञानाचा उपयोग करीत आहे.
वाक्यातच नाही तर शब्दाशब्दातून व्यथा बाहेर पडत होती. तो बोलत होता आणि मी ऐकत होतो.
त्या रात्रीत जाधवने पोलीस खात्याची माहिती व अनुभव एवढे सांगितले की, मी मनाशी ठरवून टाकलं, ‘यापुढे आपण आपल्या कर्तव्यात कधी कसूर करायची नाही. आणि कर्तव्य बजावतांना कधी रडगाणं गायचं नाही.’
जाधवने रात्रभर मला अनेक घटना, बंदोबस्ताची माहिती, वरिष्ठ आणि सर्वात महत्त्वाची आपली जनता आपल्याशी कशी वागते याबाबतचे अनेक अनुभव सांगितले.
त्यांचं बोलणं ऐकण्यामध्ये रात्र कशी सरली हे मला समजलं नाही. पण पोलीस खात्यातील पुढील प्रवासासाठी उपयुक्त असे पोलीस खात्यातले अनुभव आणि घटना यांची शिदोरी मात्र एका रात्रीत भरपूर मिळाली होती.
खरचं, त्या रात्री जाधव मला एकट्याला सोडून गेला, तेव्हा त्याचा खूप राग आला होता. पण परत आल्यानंतर रात्रभर त्यानं मला जे ज्ञान दिलं, ते मला भविष्याकरीता खूप उपयोगी पडलं आहे आणि अजुनही मी त्या ज्ञानाचा उपयोग करीत आहे.
सकाळी दिवस उजाडल्यानंतर जाधवनं माझ्याकडून पंचनामा व इतर कागदपत्रं तयार करुन घेतली. तो सांगत होता, मी लिहीत होतो. पहिल्याच दिवशी मला खूप काही शिकायला मिळालं.
आम्ही दोघांनी सर्व कागदपत्र तयार करुन घेतले. त्या ठिकाणावरुन सात-आठ किलोमीटर अंतरावर वसई येथे सरकारी हॉस्पिटलामध्ये बॉडी बैलगाडीतून घेऊन गेलो. आमचा सर्व प्रवास पायी चालू होता. हॉस्पिटलमधील प्रक्रिया पार पडायला सायंकाळचे सहा वाजले. मग ते प्रत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.
दिवसभर ना आंघोळ, ना चहा, ना जेवण. आम्ही दोघे उपाशीच होतो. संध्याकाळी सात वाजता आम्ही दोघांनीही एक एक मिसळपाव खाल्ला आणि आठ वाजता विरारला परत आलो. मग त्या अपघातातील ड्रायव्हर विरुध्द गुन्हा दाखल करणं, आरोपी अटक करणं, हे सर्व सोपस्कार करता करता रात्रीचे दहा वाजले होते.
दहा वाजता मला त्या कामातून मुक्त करुन जाधव निघून गेला. मग मी बाजूच्या रुममध्ये कपडे बदलले. नळावर जाऊन थंड पाण्याने आंघोळ केली. समोरच्या खानावळीत जाऊन दोन घास पोटात घातले आणि पोलीस स्टेशनच्या रुममध्ये आडवा झालो.
माझा पोर्ला स खात्यातला पहिला दिवस असा अविस्मरणीय ठरला होता.
पहिल्या दिवसाने जशी सुरुवात करुन दिली, तशीच गेली ३९ वर्षे मी या अशा पोलीस खात्यात नोकरी करीत आहे. पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करीत असतांना अनेक वेळा असे अविस्मरणीय प्रसंग अनुभवले. परंतु तो अनुभव हाच माझ्या आयुष्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडला आहे. त्या अनुभवाची शिदोरी घेवूनच, मी खात्यात यशस्वी वाटचाल करीत आहे.
एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.
नोकरी करतांना मी माझं लेखन सुरु ठेवलं. तीन पुस्तकं लिहिली. त्याला एकुण ११ पुरस्कार मिळाले. राष्ट्रपती पदक मिळाले. तसेच खात्यात ३९ वर्षात पोलीस महासंचालक इनसिग्निया व राष्ट्रपती पदकासह एकुण ३७५ ॲवॉर्ड मिळाले. हे सर्वाच्या सदिच्छा व खात्यातल्या सहकारी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे. त्यात पत्नीची मिळालेली साथ. राष्ट्रपती पदक मिळाल्यानं बिसुर गांवाचं नांव देश पातळीवर घेऊन जाण्याचा योग आला. सन १९७४ ला शिक्षणासाठी गाव सोडला. आज ४५ वर्षे झाली गाव सोडून, पूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात काम करण्याचा योग आला. देशभर नोकरी निमित्त फिरलो पण गड्यांनो शेवटी आपला गावच बरा वाटतो.
लहानाचं मोठा कधी झालो कळलं नाही, मुलं मोठी झाली ती सुध्दा आमच्यासारखी भविष्यात मोठ्या पदापर्यत जातील ही खात्री आहे.
ह्या सगळ्या संघर्षमय जिवनाच्या प्रवासात अनेकांचे आशिर्वाद व सदिच्छा लाभल्या पण आमच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे सुमाकाकी, म्हातारी आई, बापू, बब्बा (बोधलेकाका) बाबी व तरणी आई आम्हा सर्वाना सोडुन ओढ्याच्या कडेला असलेल्या वडाला तोरण बांधण्यासाठी निघुन गेले.
घरच्यांच्या नशिबात काय होतं माहित नाही.
त्यांच्या मागोमाग सौ. शुभांगी, राजू, विनोद, बाळू व श्रीनिवास हे वडाला बांधलेलं तोरण सांभाळण्यासाठी निघून गेले आणि आमच्या कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
ह्या सर्व प्रसंगातुन व दुःखातुन सावरण्याची ताकद त्या विधात्यानं आम्हाला सर्वांना दिली म्हणुन आज आमचं कुटुंब प्रगती पथावर आहे.
आज आमच्या पाटील कुटुंबातील जेष्ठ श्री. भिमाभाई हे एका घट्ट धाग्यासारखे असुन त्या धाग्यात आमच्या कुटुंबातील सौ. सुलाकाकी, सदाभाऊ, कमलकाकी, मी स्वत: गुलाब, जयसिंग, अनिल, संजय, सौ. वृषाली, सौ. जयश्री, सौ. सुनंदा, आशा, वंदना, लता, दिपाली, शुभांगी, विशाखा, अक्षय, अक्षता, पूजा, वेदांत, प्रयाग, शुभम, वैष्णवी, श्रेयस, ओम, बबली, दुर्गेश, अवधुत, अनु, श्रीदिप, अमेय अशी अनेक मण्यांची माळ मजबुत प्रेमात व घट्ट नात्यात गुंफली आहे. ही माळ अशीच दिवसें दिवस वाढत जावो हिच परमेश्वर व कुलस्वामी चरणी प्रार्थना.
आज ३९ वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होताना माझे हे मनोगत संपवून या ठिकाणी थांबत आहे.
श्री. व्यंकटराव पाटील
सहायक पोलीस आयुक्त
(निवृत्त)
Leave a Reply