कोकणातली काळी अंधारी रात्र आणि त्यात वीजा चमकत होत्या. त्या उजेडात नदीवरचा पूल आणखीनच भयानक दिसत होता. इतक्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागली. त्याची पाऊलं झपाझप पडत असल्याने साचलेल्या पाण्यात पाय पडून त्याचा आवाज होत होता. पुन्हा एकदा वीज चमकली आणि त्या व्यक्तीचा चेहरा त्या प्रकाशात दिसला. चेहऱ्याच्या हावभावांवरून तो खूप घाबरला आहे असं दिसतं. वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा वेग वाढलेला असतो. त्याचा एक वेगळाच ध्वनी निर्माण होत असतो. हा आवाज वातावरण आणखीनच गूढ बनवत असतो. व्यक्ती घाबरत – घाबरतच नदीचा पूल पार करत असतो. पूल संपणार इतक्यात त्याला मागून पैंजणांच आवाज ऐकू येतो आणि तो आपल्या जवळच येत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. इतक्यात एका स्त्रीचा आवाज त्याच्या कानी पडतो आणि तो आवाज ऐकून त्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहतो आणि तो अंगात आहे नाही तेवढ्या शक्तीनिशी धावू लागतो. हा जेवढया वेगाने पळतो तेवढ्याच वेगाने मागून ती स्त्री धावण्याचा आणि पैंजणांचा आवाज त्याला येत असतो. हा मागे न वळता जोरात पळतच रहातो. धावण्याच्या नादात त्याला त्याच्या मागून येणारा आवाज हा बंद झालाय हे पण लक्षात येत नाही. तो घराच्या फाटकाजवळ पोहोचतो इतक्यात त्याला आतून कोणीतरी गुरगुरण्याचा आवाज येतो. तो कण देऊन ऐकतो तर तो मांजरीच्या गुरगुरण्याचा आवाज आहे हे त्याच्या लक्षात येते व तो दार उघडून आत जाणार इतक्यात दरवाज्यामागून एक काळी मांजर त्याला दिसते. तिचे डोळे अंधारात पण हिऱ्यांसारखे चमकत असतात. ती एक टक त्याच्या स्वयंपाक खोलीत पहात असते. काळ्या मांजरीला पाहून त्याचं होतं नव्हतं ते अवसान गळून जातं. तो घरात न जाण्याचा निर्णय घेऊन बाहेरच थांबतो. त्याला बराचवेळ आतमध्ये फिसकारण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज येत असतो. आतमध्ये नक्की काय चालू आहे हे त्याला कळत नसत. एवढया गोंधळात त्याला थकल्यामुळे केव्हा झोप लागते हे त्याच्या लक्षातच येत नाही. पुन्हा त्याला पैंजणांचा आवाज ऐकू यायला लागतो आणि तो उठून बघतो तर सकाळ झालेली असते. मग आवाज कुठून येतोय हे पहाण्यासाठी तो उठतो. इतक्यात आतून एक तरुण मुलगी बाहेर येते आणि तिला पाहून तो आश्चर्यचकित होतो. ती मुलगी येऊन त्याला मारू लागते, मारताना त्याला बोलू लागते , ” गाढवा ! एकतर अनोळखी ठिकाणी बोलवायचं आणि परत receive करायला पण यायचं नाही ? ” तो म्हणतो , ” अग मी आलो होतो , पण तुझाच काही पत्ता नव्हता. तू कुठेस हे कळवायला पण तुला सुचलं नाही ? मी तुला कॉल करत होतो पण तुझा कॉल लागतच नव्हता. मी दोन तास तिथे वेड्यासारखा उभा होतो तरीही तुझा पत्ता नाही. शेवटी मी निघालो घरी यायला. तुझा फोन लागत नाही म्हणून आधीच घाबरलो होतो आणि त्यात मी चालत असताना मागून कोणीतरी स्त्री मला आवाज देत होती. पैंजणांचा आवाज आणि एवढ्या रात्री? म्हणून मी घाबरलो आणि जोरात पळत सुटलो.” ती जोरजोरात हसत बोलते , ” तो फट्टू तू होतास तर ! अरे मूर्खा ती आवाज देणारी स्त्री मीच होते. ते पैंजण पण माझेच वाजत होते. मी स्टँडवर उतरले आणि आसपास पाहिलं तर तू कुठेच दिसेना. तुला कॉल करावा तर तुझा फोन बंद. मग मी थोडी पुढे चालत आली आणि मला गावची वेस दिसली. मग विचार केला की इथे थांबण्यात काहीच पॉईंट नाही. वाटेत तुझा पत्ता विचारता येईल कोणालातरी. तूच दिसला पण माकडा तू तर घाबरून पळालास. नशीब वाटेत एक शेतकरी काका भेटले ते म्हणाले तुला उद्या सकाळी लवकर उठून सोडतो तुझ्या घरी. मग मी थोडा वेळ विचार करून त्यांच्या घरी गेले आणि आता थोड्यावेळापूर्वी इथे आले. तू मस्त झोपला होतास. मनात आलं की खूप मारावं तुला पण विचार केला की उठल्यावर बघू.” तिचं बोलणं संपल्यावर दोघे ही खूप हसायला लागतात. इतक्यात आतमधून भांडी पडण्याचा आवाज येतो. ही उठून आत निघणार इतक्यात हा तिला थांबवतो आणि म्हणतो , ” आत नको जाऊ. तिथे ती काळी मांजर आहे. काळी मांजर दिसणं चांगलं नसतं.” त्याच बोलणं ऐकून ती त्याच्या हाताला धरून त्याला स्वयंपाक खोलीच्या बाहेरच्या बाजूला घेऊन जाते तिथे त्याला एक भलामोठा आग्या विंचू मरून पडलेला दिसतो. ती त्याला म्हणते , ” आज जर ती नसती ना तर तू जिवंत नसतास. मी जेव्हा आले तेव्हा ती तिथेच बसून राहिली होती. मी येताना तिला घरात घेऊन आले.” तिचं बोलणं ऐकून त्याला फार वाईट वाटतं आणि तो आतमध्ये जातो. त्याला बघून ती मांजर उडी मारून धावत त्याच्याजवळ येते आणि पायात पायात घुटमळायला लागते. त्याला लगेच आठवतं की आपल्याकडे असलेल्या मांजरीचं हे पिल्लू. पण ते काळं म्हणून आपण त्याला लांब सोडलं. तरीही हे पुन्हा आपलं घर शोधत परत इथे आलं आणि माझ्या नकळत आसपास फिरून माझं आणि घराचं रक्षण करत राहिलं? बाकीची पिल्लं आणि आई निघून गेली पण हे मला कधी विसरू शकलं नाही. मी एवढा वाईट वागलो तरीही त्याने त्याचा इमानीपणा दाखवून देऊन माझ्या अंधश्रध्दा पार मोडीत काढल्या. आता मात्र काही झालं तरी मी ह्याला माझ्याजवळच कायम ठेवणार. विचार करत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळू लागतात. ते बघून ती त्याला विचारते कशाला रडतोयस? तो फक्त एकच बोलतो सांगेन कधी सावकाश.
मंडळी आज दिनांक १७ ऑगस्ट. ह्या तारखेला परदेशात काळ्या मांजरीचा कौतुक दिन साजरा करतात. म्हणूनच तिचं कौतुक करण्यासाठी ही कथा.
फक्त एकच सांगू इच्छितो. काळी मांजर दिसायला भयानक जरी असली तरी ती खूप खेळकर आणि प्रेमळ असते. जरा अंधश्रद्धेला बाजूला ठेवून तिचाही विचार करा. बिचारी ती मुकी , ती आपल्या भावना आपल्याकडे कशा व्यक्त करणार? तिच्या मुकेपणाची शिक्षा तिलाच देऊ नका. काळी मांजर आपल्या मालकाला कधीच सोडून रहात नाही. झोपताना देखील ती आपल्या मालकाच्या पायाशी जाऊन झोपते. इतर मांजरींपेक्षा ही खूप वेगळी असते. अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही नक्की तिला पाळून बघा , निश्चितच तुम्हाला चांगला अनुभव येईल.
– आदित्य दि. संभूस.
#Black Cat Appreciation Day #17th August
मला वाचनाची अतिशय सवय आणि आवड आहे.