डोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता. पहिल्या दिवशी त्याच्या बायकोला घराच्या गेट जवळ मेलेला साप दिसला. दुसऱ्या दिवशी घराच्या दारात. तिसऱ्या दिवशी किचन मध्ये सुद्धा मेलेलाच साप दिसला. चौथ्या दिवशी तर मोठा विचित्र प्रकार घडला होता, एक जिवंत साप त्याच्या बायकोच्या समोर येऊन तडफडत मरून गेला. दोघेही शेतकरी कुटुंबातील असल्याने पहिले दोन दिवस त्यांना काही वाटले नव्हते पण चौथ्या दिवसाच्या प्रकारानंतर त्याची झोपच उडाली होती.
व्हाट्सअँप वर पहिल्या तीन दिवसात मेलेल्या सापांचे फोटो पाहिल्यावर चौथ्या दिवसाचे बायकोने फोनवर केलेले वर्णन ऐकून त्याचा चांगलाच थरकाप उडाला होता. कॅप्टन आता विचार करू लागला होता आणि त्याला हळू हळू आठवायला लागले होते. दहा दिवसा पूर्वी जेव्हा पंपमॅन एखाद्या राक्षसा सारखा मोठं मोठ्याने ओरडत होता आणि त्याच्याजवळ जायला खलाशी आणि अधिकाऱ्यांपैकी कोणीच धजावत नव्हता त्यावेळेला चीफ ऑफिसर त्याच्या जवळ गेला आणि त्याला शांत करण्यासाठी त्याच्या जोरात कानाखाली वाजवून आला होता.
कानाखाली पडल्यावर तो एकदम शांत होऊन गेला. पुढील अर्धा तास सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवून होते हळू हळू तो माणसात परत आला. मी कुठे आहे सगळे जमा का झालेत असे विचारून घेतले. पण मागील तासाभरात तो एखाद्या हिस्त्र पशूसारखा सगळ्यांच्या अंगावर धावून जात होता एखाद्या राक्षसा सारखा ओरडत होता हे त्याला सांगण्याची कोणामध्येच हिम्मत नव्हती. दोन तासानंतर त्याला जेवण वगैरे देण्यात आले आणि त्याला त्याच्या केबिन मध्ये पाठवण्यात आलं. त्याच्या बाजूच्याच काय पण संपूर्ण डेकवरच्या केबिन मध्ये सगळे खलाशी त्याचा भयानक अवतार बघून रात्रभर जागे राहिले होते. ह्याला अचानक काय झाले कधी कोणाशी जास्त न बोलणारा कामात परफेक्ट आणि फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवणाऱ्या ह्या माणसाला नेमकं झालं तरी काय या विचाराने प्रत्येक जण अस्वस्थ झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा वगैरे करुन बरोबर आठ वाजता तो कामावर हजर झाला होता.
चीफ ऑफिसर सुद्धा काही घडले नाही अशा अविर्भावात त्याला काम सांगत होता आणि तोसुद्धा त्याप्रमाणे मान हलवून काम समजून घेत होता. ह्या सगळ्या प्रकारावर कॅप्टनचे बारीक लक्ष होतं. आपले त्यांच्याकडे लक्ष नाही असे कॅप्टन भासवत होता. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, दहा दिवस सगळं व्यवस्थित आणि सुरळीत सुरु असताना चीफ ऑफिसरला जे होतय ते पाहून आज कॅप्टनलाच दरदरून घाम फुटला होता. मागील दहा दिवसात घडलेल्या सगळ्या घटना तो एक एक करुन आठवू लागला.
पंपमन चे त्यादिवशीचे वागणे मग चीफ ऑफिसरने त्याच्या कानाखाली वाजवणे. दोन तीन दिवस सगळं नॉर्मल आहे असे वाटणे. चौथ्या दिवशी पंपमन शिप्स ऑफिस मध्ये कोणी नसताना गेला होता पण नेमका कॅप्टन ऑफिस चे मेल चेक करायला आत आला व कॅप्टनला पाहून त्याने अभिवादन केले. कॅप्टनने त्याला विचारले आता यावेळेला इथे काय करतोस तर तो म्हणाला की चीफ ऑफिसर झेरॉक्स मशीन मध्ये एक डायग्राम विसरून गेला ती नेतोय. त्याच्या हातात एक कागद होता पण त्याच्यावर चार टाचण्या लावलेल्या कॅप्टनला दिसल्या.
चीफ ऑफिसरला या बाबतीत विचारू करता करता कॅप्टन ही गोष्ट विसरून गेला होता. दुसऱ्या दिवशी तोच पंपमन चीफ कुक चपात्या बनवत असताना कॅप्टनला गॅली मध्ये दिसला होता. कॅप्टन कडे जहाजावर प्रत्येक केबिन किंवा लॉकला लागेल अशी एक चावी असते त्या चावीने जहाजावरील प्रत्येक लॉक उघडता येतो. कॅप्टन ला जहाजावर कार्यालयीन कामकाजाकरिता कागदपत्रे आणि संपर्क करताना मास्टर म्हणून संबोधले जाते. त्यामुळेच सगळे कुलूप उघडू शकेल अशी एक चावी मास्टर की म्हणून जहाजाच्या मास्टर कडे म्हणजेच कॅप्टन कडे असते. कॅप्टन त्याची मास्टर की घेऊन खालच्या डेक वर एकटाच चालला होता, जिन्यावर चीफ इंजिनियर दिसला, कॅप्टनला बघून त्याने अभिवादन केले आणि विचारले सर कुठे चाललात मी पण येऊ का.
कॅप्टन ने त्याला नका येऊ सांगितले आणि जाऊन हॉस्पिटल रूम मध्ये चीफ ऑफिसर आणि जमा झालेल्या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती केली. चीफ इंजिनियर केबिन मधून नुकताच बाहेर आला होता त्याला चीफ ऑफिसरचा प्रकार माहिती नव्हता. कॅप्टन ने थोडक्यात त्याला सांगितल्यावर चीफ इंजिनियर घाई घाईने हॉस्पिटल रूम कडे गेला. कॅप्टन खालच्या डेकवर असलेल्या पंपमन च्या केबिन समोर उभा होता केबिन लॉक असेल तर मास्टर की सोबत होतीच पण केबिनचा दरवाजा फक्त ओढलेला होता लॉक नव्हता केला.
जहाजावर एखाद्या गरीब देशातील बंदरात जिथे चोऱ्या होण्याचा धोका असतो तिथेच शक्यतो सगळे खलाशी आणि अधिकारी केबिनचे दरवाजे लॉक करतात. जहाज चालू असताना किंवा खोल समुद्रात असताना केबिनचे दरवाजे त्या केबिन मध्ये असणारे खलाशी आत असतील तरच आतून लॉक असतात. कामाला जाताना किंवा सुट्टीच्या वेळेस जेवायला किंवा स्मोक रूम मध्ये जाताना प्रत्येक जण दरवाजे फक्त बाहेरून ओढून घेतात. कॅप्टन ने हॅण्डल दाबून दरवाजा आत ढकलून दिला. अतिशय नीटनेटकी आणि जिथली वस्तू तिथे असलेली रूम पाहून कॅप्टनला नवल वाटले अधिकाऱ्यांच्या रूम स्टीवर्ड रोज साफ करतो तरी पण एवढ्या नीटनेटक्या नसतात.
कॅप्टन त्याला हवं ते शोधू लागला सगळे ड्रॉवर उघडून बघितले कपाट पण उघडून बघितलं, बेड च्या खाली बाथरूम मध्येपण काही सापडले नाही. केबिनच्या बाहेर पडता पडता त्याला कचऱ्याचा डबा दिसला त्या डब्यात प्लास्टिक आणि कागदाच्या कपट्याखाली एक पुडके दिसले. कॅप्टनला अंदाज आला की त्यात काय असाव. त्याने ते पुडके उघडलं तर त्यात अपेक्षे प्रमाणे पिठाचे साप दिसले त्यापैकी तीन सापांना टोचून टोचून भोके पडली होती. पिठाच्या एका सापाला टाचण्या टोचून ठेवल्या होत्या. कॅप्टन हॉस्पिटल रूम कडे निघाला होता हातातले पिठाचे साप आणि ते पुडकेचं त्याने समुद्रात फेकून दिले वर येताना. चीफ ऑफिसर कडे सगळे लांबून बघत होते कोणाची जवळ जायची हिम्मत होत नव्हती. त्याने पंपमनला मागील वेळेस कानाखाली मारली म्हणून पंपमन च्या शरीरातील भूताने चीफ ऑफिसर च्या शरीरात प्रवेश केला अशी कुजबुज सुरु झाली होती. तेवढ्यात कॅप्टन वर आला होता, तो सगळ्यांना बाजूला सारून चीफ ऑफिसर जवळ गेला आणि त्याने खाडकन चीफ ऑफिसरच्या कानाखाली मारली. सगळे अधिकारी आणि खलाशी अवाक होऊन कॅप्टन कडे पाहू लागले. हे सगळं काय घडतंय आता कॅप्टनला भूतबाधा होईल या विचाराने सगळे हादरून गेले. पण कॅप्टन चीफ ऑफिसरला उद्देशून जोराने ओरडला, नालायका बंद कर तुझे नाटक.
तुझा खेळ संपलाय आता. कॅप्टन ने पंपमन कडे बघून विचारले त्यादिवशी तुला नेमके काय झाले होते. तू असा राक्षस का झाला होतास. आता पंपमन ला रडू फुटले हुंदके देत देत तो सांगू लागला, साहेब माझ्या प्रेयसीचे तिच्या इच्छे विरुद्ध तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिले म्हणून तिने आत्महत्या केली. ही बातमी मला पंधरा दिवसांनी कळली आणि कळल्यावर आपण किती हतबल आहोत हे लक्षात घेऊन देह भान विसरून ओरडत सुटलो. पण चीफ ऑफिसर ने कानाखाली मारली आणि मी भानावर आलो. त्यानंतर आजपर्यंत दुःख गिळून काम करतोय कारण प्रेयसी तर परत येणार नाही माझ्या दोन लहान बहिणी लग्नाच्या आहेत त्यांनाच डोळ्यासमोर आणतो. हे ऐकून सगळ्यांच्या नजरा चीफ ऑफिसर कडे वळल्या. सगळेजण त्याच्याकडे बघू लागले पण त्याची नजर खाली पडली होती. कॅप्टन सांगू लागला ह्याने मला तीन दिवस मेलेल्या सापाचे बायकोने पाठवलेले फोटो दाखवले. कोणीतरी काळी जादु करतय असे भासवले. पंपमन ला ऑफिस मधून टाचण्या आणायला यानेच सांगितले.
चीफ कुक कडून चपात्यांचे पीठ यानेच पंपमन कडून मागवले पण हा खरं तर माझा अंदाज आहे. चीफ ऑफिसर कडे बघून कॅप्टन म्हणाला नालायका आता तरी खरं खरं सांग नाही तर तुझे लायसन्स रद्द करायला लावून कायमचे आयुष्यभर घरी बसवेन. चीफ ऑफिसर मग बोलू लागला की मला येऊन पंधरा दिवस झाले होते आणि मला घरी माझ्या चुलत बहिणीचे लग्न जे अत्यंत घाई घाईत ठरले गेले त्यासाठी आणखी पंधरा दिवसात येणाऱ्या ब्राझील मधील बंदरातुन घरी परतायचे होते. तुम्हाला सहज विचारले तर तुम्ही म्हणालात की ब्राझीलला रिलीवर येईल पण सुमारे 1800 ते 2000 यू एस डॉलर्स कापले जातील तुझ्या पगारातून कंपनी पॉलिसी नुसार. मला हे मान्य नव्हत एवढी वर्ष काम करुन फायदा नाही म्हणून मी विचार करता करता हा मार्ग निवडला.
खलाशी व अधिकाऱ्यांची मला भूतबाधा झालीय यावर विश्वास बसायला लागला होता. आता चार दिवसांनी आपण बंदरात पोचल्यावर तुम्ही मला घरी पाठवाल याची खात्री होती म्हणून आज मी भूतबाधा झाल्याचे नाटक केले. शेवटी न राहवून चीफ इंजिनियरने कॅप्टनला विचारले की कॅप्टन साब तुमच्या हा प्रकार कसा काय लक्षात आला. कॅप्टन म्हणाला की ह्या नालायकाने पिठाचे साप आणि टाचण्या ज्या पुडक्यात बांधल्या होत्या तो कागद मी ह्याला आजच सकाळी दिला होता. त्याला म्हटलं की केबिन मध्ये जाऊन वाच आणि मला संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट कर . पण याने तो कागद वाचला तर नाहीच पण त्याचे पुडके मात्र बांधले.
ब्लॅक मॅजिक काळी जादू वगैरे असले काही प्रकार आजपर्यंत तरी जहाजावर अनुभवायला नाही मिळाले.
परंतु काली जुबान हा प्रकार नेहमी अनुभवायला मिळतो म्हणजे एखाद दिवशी कोणी म्हणाला जहाजावर मस्त दिवस जात आहेत फारशी कामे निघत नाहीत, की नेमकं त्याच दिवशी असं एखाद मोठं काम निघते की ते करता करता मस्त मस्त करणाऱ्यांची मस्तीच उतरून जाते.
एक वरिष्ठ अधिकारी तर त्याचे मागील जहाजावरील किस्से टि ब्रेक मध्ये सांगायचा की तिकडे त्या जहाजावर जनरेटर बंद पडला, की मग लगेच त्याच किंवा पुढल्या दिवशी आमच्या जहाजावरचा जनरेटर बंद पडायचा. अमुक एका जहाजावर एअर कंडिशन सिस्टिम बंद पडली होती, की लगेच आमच्या जहाजावरची पण बंद पडायची. हे असे तीन चार वेळा झाल्यावर टि ब्रेक मध्ये त्या अधिकाऱ्याला काही बोलायला सुरवात केल्यावर सगळेजण मागील जहाजावरील प्रॉब्लेम सोडून दुसरं काही तरी बोलावे म्हणून हात जोडून विनवणी करायचे. आजही जहाजावर सगळं व्यवस्थित सुरु आहे काही प्रॉब्लेम नाही असं कोणीच बोलताना दिसत नाहीत ते यामुळेच. आता ही अंधश्रद्धा आहे की अनुभव हे ज्याचे त्यालाच माहिती. जहाजावरील कामाचा जेवढा ताण आहे त्यामागील थ्रिल आणि अनुभव प्रत्येकाला वेग वेगळाच आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply