भूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे. थोडक्यात काळा समुद्र हा एका प्रचंड मोठ्या तालावसारखा आहे ज्यामध्ये पावसाचं पाणी आलं की ते ओव्हरफ्लो होऊन भूमध्य समुद्रात जाऊन मिसळलं जात. इस्तंबूल ओलांडून पहिल्या वेळेस काळ्या समुद्रात जात असताना वाटलं होतं की आता सगळीकडे नितळ निळ्या पाण्याऐवजी काळ पाणी पाहायला मिळेल. पण इस्तंबूल जाऊन दोन तास मग चार तास झाले तरी पाणी एकदम नितळ आणि निळं. मग शेवटी न राहवून मी आमच्या मोटरमन ला विचारलं की काळ्या समुद्रात येऊन एवढा वेळ झाला तरी पाणी एवढं निळं आणि नितळ कस काय. त्यावर तो जोरात हसायला लागला. त्याने मला विचारलं रेड सी मध्ये जाऊन आलास का कधी. मी म्हणालो कि अजून रेड सी मध्ये नाही गेलोय पण ब्राझीलच्या ऍमेझॉन नदीमध्ये रिओ निग्रो नावाची नदी संगम पावते ती पहिली आहे. त्या नदीचे पाणी अक्षरशः काळ्या रंगाचे असते म्हणून तिला रिओ निग्रो असे नाव ठेवले आहे. मोटोरमन वयस्कर होता आणि त्याने बहुतेक सगळ्या समुद्रातून सफर केली होती. तो म्हणाला प्रत्येक समुद्रात किनाऱ्यापासून जस जसे दूर जाऊ तसतसा पाणी नितळ आणि निळं दिसायला लागत. तांबडा , श्वेत आणि ह्या काळ्या समुद्राच पाणी पण निळंच आहे.
मी विचार करून आठवण्याचा प्रयत्न केला की भूगोलात समुद्रांची नाव शिकलो पण त्यावेळेला शाळेत शिक्षकांना कोणी विचारलं कस नाही की या समुद्रातील पाणी पण त्याच रंगाचं आहे का.
तसं पाहिलं तर पाण्याला नेमका रंग तरी कुठला असतो. पाणी फक्त स्वच्छ आणि नितळच तर असत. आपण पाण्याला रंगाच्या उपमा देतो पण कुठल्या रंगाला पाण्याची उपमा देताना ऐकलं नाही. फारफार तर पाण्यासारखं स्वच्छ किंवा नितळ आहे असेच नेहमी ऐकतो.
काळा समुद्र हा आकाराने लहान असला तरी इतर कोणत्याही मोठ्या समुद्राच्या मानाने सर्वात जास्त अपघात किंवा जहाजे बुडण्याच्या घटना या काळ्या समुद्रात जास्त घडल्या आहेत. हवामान अचानक खराब झाल्यामुळे उसळणाऱ्या लाटा, वादळ आणि पाण्यामुळे समोर एकदम काळा कुट्ट अंधार पसरल्यासारखा होतो कदाचित म्हणूनच या समुद्राला काळा समुद्र अस नाव दिलं गेलं असावं. तसंच या समुद्रातल्या पाण्यामध्ये एखादी वस्तू पडली कि काही काळाने त्या वस्तूवर काळ्या रंगाचे आवरण तयार होतं म्हणून सुद्धा या समुद्राला काळा समुद्र असं नाव देण्यात आल्याच्या कथा आहेत.
युक्रेन, रशिया, जॉर्जिया, रोमानिया या देशातल्या बंदारांवर आमची जहाज बऱ्याचवेळेला ये जा करतात. रशियातील नोव्हारोसिस्क आणि तोप्से या बंदारांमध्ये किमान दोन तीन वेळा तरी माझं जहाज जाऊन आलंय. नोवोरोसिस्क पोर्ट मध्ये रशियन नेव्हीचा तळ आणि म्युझियम सुद्धा आहे. अत्यंत देखण्या अशा या पोर्ट मध्ये मला प्रत्येक वेळेला बाहेर जायला मिळायचं. पहिल्या वेळेस ज्या जेट्टी वर जहाज लागलं होतं ती शहराच्या जवळ होती त्यामुळे पायी चालत जाऊन शहराची चक्कर मारून व्हायची. रुबेल्स हे रशियन चलन तिथल्या बँकेत अमेरिकन डॉलर्स च्या बदल्यात ताबडतोब बदलून मिळायचं त्यामुळे खरेदी आणि फिरण्याचा प्रश्न नसायचा. मोठं मोठे रस्ते आणि दुतर्फा लावलेली झाडं त्यामुळे शहराच्या सौंदर्य खुलून आल्यासारखं वाटायचं. रस्ते एवढे सुटसुटीत स्वच्छ आणि मोकळे असायचे कि पायी चालताना बिलकुल भीती वाटायची नाही. रस्त्यांवर विजेवर धावणाऱ्या बस दिसायच्या आपल्या लोकल ट्रेन ला असतो तसा पण जरा लांब असे पेंटोग्राफ या बसच्या टपावर बसवलेला असायचा. या बस रस्त्यावरून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला गेल्या तरी वरच्या ओव्हरहेड वायरशी या पेंटोग्राफ चा संपर्क कायम असायचा. महत्वाचं म्हणजे या विजेवर चालणाऱ्या बसेस बहुतेक करून स्त्रिया चालवताना दिसायच्या. स्टॉप आला की ऐटीत पण तेवढ्याच सफाईदारपणे बस थांबवायच्या. मग ऑटोमॅटिक दरवाजे उघडणार आणि परत बंद झाल्याशिवाय या बस निघायच्या नाहीत. मार्केट आणि मॉल जवळ सिग्नल वर रहदारी असायची पण आपल्याकडे वाहने ज्या दिशेने धावतात त्याच्या विरुद्ध दिशेने धावत असल्याने रस्ता ओलांडताना नेहमी गोंधळ उडायचा. पण रस्त्यावरच्या गाड्या झेब्रा क्रॉसिंग असो व न असो आम्ही किंवा इतर कोणीही रस्ता ओलांडताना दिसलो कि शांतपणे थांबवल्या जायच्या. जोपर्यंत रस्ता ओलांडला जात नाही तोपर्यंत तशाच शांतपणे हॉर्न वगैरे न वाजवता किंवा चेहऱ्यावर कोणताही त्रासिक भाव उमटू न देता उलट स्मितहास्य करतच तुम्ही रस्ता ओलांडा असे इशारे करताना प्रत्येक ड्रायवर बघून नवल वाटायचं. एकदा तर रस्ता ओलांडताना वेगाने येणाऱ्या गाडी कडे लक्षच नव्हते जोरात करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आल्यावर कळले की आपली चुकी आहे आणि आता त्या ड्रायवरची बोलणी निमूटपणे खायची मनाशी तयारी सुद्धा केली. पण तो ड्रायव्हर त्याचीच चुकी असल्याप्रमाणे स्वतःवरच नाराज झाला होता आणि माझा उडालेला गोंधळ पाहून बाहेर येऊन विचारपूस करायला गाडी बाहेर आला. त्याला काही इंग्रजी समजेना आणि मला काही रशियन कळेना मग शेवटी एकमेकांना हसून हातवारे ओके नो प्रॉब्लेम असे इशारे केले आणि आप आपल्या रस्त्याला लागलो.
नोव्हरोसिस्क च्या नेव्ही म्युझियम मध्ये रशियन नौसेनेची जहाज बघायला मिळाली पण प्री सी ट्रेनिंग मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये झाल्याने आणि आपल्याकडील जुनी रशियन जहाज बघितली असल्याने त्यामध्ये एवढं काही विशेष नाही वाटलं. दुसऱ्या जेट्टी वरून शहर लांब होत तिथून बस पकडून शहरात यायची सोय होती. पण त्यामध्ये वेळ जायचा खूप. एकदा शहरात जाण्याऐवजी तिथल्याच परिसरात पायी पायी भटकत होतो. रस्त्यावर पिच ची झाडे होती आणि त्याला फळे पण लागली होती. हाताने तोडून पिच खायला मजा येत होती. तोडू नका म्हणून बोलणारं किंवा अडवणार कोणीच दिसत नव्हतं.
तोप्से शहर सुद्धा अत्यंत सुंदर आहे. तिथली जेट्टी तर एकदम शहराला लागूनच होती. समुद्राला लागून टेकड्या आणि टेकड्यांच्या पायथ्याशी असलेला रेल्वे मार्ग. समुद्राला लागून जाणाऱ्या रेल्वेतुन प्रवास करताना किती छान वाटत असेल तिथल्या लोकांना, असे विचार मनात येत होते. तोप्से शहरात एका बागेमध्ये स्केटिंग आणि बोर्ड च्या प्रॅक्टिस साठी भरपूर मोठ्या मोकळ्या जागेत मार्बल आणि ग्रॅनाईट लावला होता. तिथे लहान मोठी मुलं मस्त पैकी स्केटिंग करत होते. काही मुलांचे घोळके आडव्या तिडव्या उड्या मारून रॅप गाण्यांवर एक झाला की एक अशाप्रकारे एका हातावर किंवा डोकं खाली पाय वर करून गोल गोल फिरुन नाचत होते.
एकदा तोप्से शहरात लोंडिंग सुरु असताना हवामान एकदम खराब झाले एवढे खराब झाले की आमचं जहाज जेट्टीवरून बाहेर न्यायला सांगितलं. समुद्रात किनाऱ्यापासून लांब जाऊन घिरट्या घालायला सांगण्याच्या सूचना मिळाल्या त्यानुसार जवळपास 12 ते 13 तास आम्ही घिरट्या घालायला लागलो. अत्यंत खराब हवामानात पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटांमध्ये हेलकावे खात जहजाचे इंजीन फुल स्पीड मध्ये चालू होत तरीपण जहाज मात्र अत्यंत संथगतीने पुढे पुढे सरकत होत. जेव्हा हवामान बऱ्यापैकी असतं तेव्हा तासाला 14 सागरी मैल अंतर जहाज इंजिन फुल स्पीड मध्ये असताना कापत असतं. पण अशा या खराब हवामानात दोन मैल सुद्धा एका तासात पूर्ण होत नव्हते एवढा वाऱ्याचा आणि लाटांचा जोर वाढला होता.
काळ्या समुद्रात युक्रेन मधील निकोलेव्ह या बंदरात सुद्धा दोन तीन वेळा जायला मिळाले पहिल्या वेळेला विचारत विचारत शहरातील मार्केट मध्ये पोचलो पण दुसऱ्या वेळेला फारसा त्रास नाही झाला. शहर एवढं काही मोठं नव्हतं. या शहरातील रस्ते खूपच रुंद आहेत दोन्ही बाजूकडच्या रस्त्याच्या मध्ये जवळपास 40 फुटांचे अंतर त्यामध्ये भरपूर मोठी मोठी झाडे आणि बरोबर मधोमध ट्राम चे ट्रॅक. एवढं नियोजनबद्ध शहर आणि तिथला नेटनेटकेपणा आणि स्वच्छता पाहून आश्चर्य वाटायचं.
काळ्या समुद्रातील बहुतेक सगळ्याच पोर्टवर आम्ही कार्गो घेण्यासाठी लोंडिंगला जायचो फक्त रोमानियातील कॉन्स्टेन्झा या पोर्टमध्ये आम्ही कार्गो घेऊन डिसचार्जिंग साठी गेलो होतो. कॉन्स्टेन्झा या शहराची आठवण राहण्याचे कारण म्हणजे तिथे घेतलेली चॉकलेट्स तिथली चोकलेट्स चवीला जेवढी छान होती त्या पेक्षा त्यांची पॅकिंग आणि सजावट खूपच छान आणि कोणालाही आवडेल अशीच होती. कॉन्स्टेन्झा मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसत होत्या. आपल्या मुंबई किंवा पुणे या शहरात फिक्स रूट आहेत, पर्यावरण आणि प्रदूषणाच्या समस्या भेडसावत असताना चालवण्यास सर्वात स्वस्त आणि मेन्टेनन्स फ्री इलेक्ट्रिक बसेस का lनाही चालवत तेच कळत नाही. प्रत्येक रस्त्यावर रोड लाईट साठी खांब उभे असतात अशा खांबांवर बस साठी इलेक्ट्रिक केबल टाकणे सहज शक्य आहे. कदाचित पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे किंवा साचणाऱ्या पाण्यात इलेक्ट्रिक बसच्या मोटर बुडून शॉर्ट सर्किट होईल म्हणूनही कोणी विचार केला नसेल.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे
Leave a Reply