एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.
आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. ” डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. ” त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –” रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? ” आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.
मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. ” बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? ”
ते निरखून बघू लागले. ” मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. ”
” बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.
शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.
चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.
मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply