नवीन लेखन...

ब्लु मुन

कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता.

संपूर्ण ऑईल कार्गो डिस्चार्ज झाल्यावर पोर्ट मधील सगळं पेपेर वर्क आणि फॉर्मलिटी पुर्ण करुन दुपारी तीन वाजता जहाज पोर्ट बाहेर पडले आणि अर्ध्या तासात ब्रीज वरुन फोन आला की 1536 hrs RFA.

RFA म्हणजे रनिंग फुल अहेड. ज्याचा अर्थ आम्हा इंजिनीअर्स साठी असा असतो की आता जहाज याच स्पीड मध्ये पुढे चालू राहणार आहे. आर एफ ए ची सूचना मिळाल्या नंतर इंजिन चा स्पीड कमी जास्त होत नाही तसेच जहाज खोल समुद्रात गेलेले असते. त्यामुळे इंजिन चे कुलिंग वॉटर आणि फ्युएल यांचे प्रेशर व टेंप्रेचर सेट करून ठेवावे लागतात. मग पुन्हा जेव्हा पुढील पोर्ट आल्यावर किंवा मध्येच जहाज थांबवावे लागले तर इंजिनचे स्पीड कमी करण्यापूर्वी फ्युएल आणि कुलिंग वॉटर अडजस्ट करून इंजिनशी संबंधित इतर मशीनरी सुरू कराव्या लागतात.

चार वाजेपर्यंत फ्रेश वॉटर जनरेटर सुरू केला. इंजिन फुल स्पीड मध्ये असल्याने इंजिनच्या धुराद्वारे बाहेर पडणाऱ्या उष्णतेवर एक्झॉस्ट गॅस बॉयलर मधुन पुरेशी स्टीम बनायला लागल्याने. मेन बॉयलर बंद केला. चिफ इंजिनियर खालीच इंजिन कंट्रोल रूम मध्ये होता. मी थर्ड इंजिनियर असल्याने माझा बारा ते चार वॉच होता. चार वाजता सेकंड इंजिनिअर वॉच वर आला.

चिफ इंजिनिअर त्याला म्हणाला सेकंड साब आज इंजिन रुम यू एम एस कर दिजिये. त्या दिवशी यू एम एस ड्युटी माझीच असल्याने अलार्म माझ्या केबिन मध्ये वाजेल अशी सूचना इंजिन कंट्रोल रूमच्या कम्प्युटरला दिली आणि आम्ही सगळे वर आपापल्या केबिन मध्ये गेलो.

संध्याकाळी साडे चार ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत इंजिन रूम मध्ये अलार्म वाजल्यावर माझ्याशिवाय कोणीच जायची गरज नव्हती. रात्री दहा वाजता इंजिन रुम मध्ये आम्ही दोघे जात आहोत आणि रात्री अकरा किंवा राऊंड घ्यायला उशीर झाला तर त्या वेळी आम्ही दोघं राऊंड घेऊन इंजिन रुम बाहेर पडत आहोत असं नेव्हीगेशन ऑफिसर ला ब्रीज वर फोन करून कळवावे लागते. खाली इंजिन कंट्रोल रूम मधून एक बटण दाबून तो सिग्नल ब्रीज वर जातो जो सिग्नल पुन्हा बटण दाबून ब्रिजवरील नेवीगेशनल ऑफीसर इंजिन रुम यू एम एस वर गेल्याची खात्री करतो. रात्री अकरा वाजता मी बटण दाबले आणि ब्रिजवर फोन केला, पलीकडून थर्ड मेट ऐवजी चिफ इंजिनिअरचा आवाज आला, अरे तीन साब थर्ड मेट वॉश रुम गया हैं. यू एम एस डाल दिया ना? सब ठीक है ना ? मी म्हटले जी सर ऑल इज वेल.

पलीकडून चिफ इंजिनिअर बोलला , ओ के, गुड गुड.
तीन साब अभी क्या करेगा, सोयेगा?
मी म्हणालो,
नही साब बोलिये कुछ काम हैं क्या?
पलीकडून चिफ इंजिनिअर बोलला,
उपर ब्रीज पर आ जाओ, आज ब्लू मुन नाईट हैं.
त्याला फोन ठेवतांना ओ के साब म्हणून , मनात विचार करत करत मी जिना चढू लागलो.
ही ब्लू मुन नाईट काय भानगड असेल बरं, बघु या जाऊन ब्रीज वर.

वर ब्रिज वर गेलो, रात्री ब्रीज वर संपुर्ण अंधार असतो. नेवीगेशनल उपकरणांची लाईट सुद्धा एकदम डिम केलेली असते. नाहीतर ती लाईट ब्रीज च्या काचेवर पडून बाहेर अंधारात जहाजाच्या पुढे काही दिसत नाही. रात्री जहाजाला विमान किंवा इतर वाहनांसारख्या हेड लाईट नसतात.

समोर एक नेवीगेशन लाईट मागे दुसरी आणि पोर्ट साईड ला हिरवी तर स्टारबोर्ड साइडला लाल लाईट. पण ह्या लाईट समोरून किंवा मागून येणाऱ्या जहाजांना दिसतील अशाच असतात ब्रीज वरुन त्या चालु आहेत ह्या इंडिकेटर वर समजतात. त्या लाईट गेल्या असतील तर इंडिकेटर वर बंद दाखवतात.

खालून लाईट मधून वर ब्रिजवर एकदम अंधारात गेल्यामुळे दोन मिनिटं काहीच दिसत नव्हते. चिफ इंजिनिअर ने हाक मारली त्या दिशेने हळू हळु अंदाज घेत अंधारात गेलो. चिफ इंजिनिअर म्हणाला बघ बाहेर ब्रीज विंग वर जाऊन. ब्रीज विंग म्हणजे नेवीगेशनल ब्रीज बाहेरील जागा जी दोन्ही बाजूला जहाजाच्या बाजू पर्यंत बाहेर निघालेली असते आणि त्यावर छप्पर नसते अशी.

मी दरवाजा उघडून बाहेर गेलो. समुद्र शांत होता, मंद पण थंड असा झोंबणारा वारा होता. वर आभाळात नजर गेली तर पुर्ण चंद्र होता.
पौर्णिमेची रात्र होती ती. निरभ्र आकाशात मस्तपैकी झकास चांदणे पडले होते. अथांग समुद्रावर दुधाळ प्रकाश पडला होता. जहाज सुद्धा त्या दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघत होते. सव्वा दोनशे मीटर लांब असलेला जहाजाचा पुढील भाग, मिड शिप म्हणजे मध्ये असलेली जहाजाची पांढरी क्रेन उजळल्या सारखी दिसत होती.

चिफ इंजिनियर सुद्धा बाहेर ब्रीज विंग वर आला. बोलायला लागला तीन साब देखा कितना सुंदर नजारा हैं बाहर. मी बोललो, साब आप बोल की ब्लु मुन नाईट हैं, लेकीन मुन तो व्हाईट ही हैं, ब्लु मुन कभी दिखाई देगा. चिफ इंजिनियर हसायला लागला आणि म्हणाला त्याला पण दहा बारा वर्षांपुर्वी एका कॅप्टन ने रात्री ब्लु मुन बघायला बोलवले होते. तेव्हा त्याने पण कॅप्टन ला मी जसे प्रश्न केले तसेच प्रश्न केले होते. त्यावर कॅप्टन ने त्याला सांगितले होते की, ब्लू मुन नाईट म्हणजे एका महिन्यात दुसऱ्यांदा पौर्णिमा आली की त्या पौर्णिमेला ब्लू मुन नाईट म्हणतात. ब्लू मून ही कॅलेंडर महिन्यातील दुसरी पौर्णिमा असते आणि एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी सुमारे 29 1/2 दिवस असतो. तर, जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा पहिला नेहमी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी असतो आणि दुसरा 30 किंवा 31 व्या दिवशी असतो.

चिफ इंजिनिअर म्हणाला आपल्याला जहाजावर फक्त रविवार अर्धा दिवस सुट्टी मिळाली तर लक्षात राहतो आणि नाही मिळाली तरी आज रविवारी पण दिवसभर काम करावे लागले म्हणून लक्षात राहतो. बाकी वार आणि तारीख आपण कुठे एवढं रोज रोज बघत असतो. मला रोज ऑफिसला रिपोर्ट पाठवावे लागतात म्हणून लक्षात तरी राहते. पण मी सुधा सेकंड इंजिनिअर होतो तेव्हापर्यंत जहाजावर आला दिवस घालवायचा एवढंच माहिती होतं. आजपण रात्री डिनरला तुम्ही सगळे निघून गेल्यावर बोलता बोलता कॅप्टनच्या तोंडून निघून गेले बडा साब आज ब्लु मुन नाईट आहे. माझ्या करिअर मधली तिसरीच ब्लू मुन नाईट आहे. नेव्हिगेशन वॉच वर असल्यामुळे लक्षात राहते. दोन तीन वर्षांतून एकदा येते त्यावेळी आपण जहाजावर असतो नसतो पण जहाजावर असल्यावर मात्र नक्कीच लक्षात राहते.

चिफ इंजिनियर म्हणाला मला दहा वर्षांपुर्वी कॅप्टन ने बोलावून दाखवली आणि आज पण कॅप्टन ने सांगितले म्हणून बघतोय. कोण जाणे जहाजावर असताना अशा किती ब्लू मुन नाईट आल्या असतील आणि गेल्या असतील. खाली पाण्यातून कसला तरी आवाज येऊ लागला होता. आम्ही दोघांनी त्या दिशेकडे पाहिले. डॉल्फिन ची एक जोडी जहाजाच्या वेगासोबत स्पर्धा करत होती.

पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात ते नर मादी एका मागोमाग एक पाण्यातून डुबक्या मारत निघाले होते. पाण्यातून बाहेर वर उडी मारल्यावर चमकणारे त्यांचे काळे शरीर आणि पोटाकडील पांढरा भाग दिसत होता. उडी मारताना होणारा डुबुक आवाज ऐकू येऊन उडणारे फेसाळ पाणी दिसत होते. समुद्र शांत होता, हलक्या हलक्या लाटा तरंगताना दिसत होत्या त्यांच्यावर निळ्या आभाळाचे प्रतिबिंब पडले होते. संथ पाण्यात बघितल्यावर पौर्णमेच्या चंद्र आणि चांदण्या जहाजा सोबत प्रवासाला निघाले आहेत की काय असा भास होत होता.
ब्लु मुन शुभ असतो, गुड लक घेऊन येतो, नकारात्मक विचार सोडून देऊन चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून मागणं करायचे असते असं चिफ इंजिनिअर बोलत होता. दहा वर्षांपूर्वी त्याने त्याला समजलेल्या पहिल्या ब्लु मुन नाईट शिपिंग मधील नोकरी लवकर संपू दे असं मागणं मागितल्याचे सांगितले होते असं बोलला. त्यावेळी तो थर्ड इंजिनियर होता, त्याची नोकरी लवकर संपली नाही पण थर्ड पासून सेकंड आणि सेकंड पासून चिफ इंजिनियर तो लवकर बनला होता हे मात्र हसत हसत सांगत होता.

मी सुद्धा जहाजवरील नोकरी लवकर संपु दे अशी मनोकामना व्यक्त केली. थर्ड इंजिनियर म्हणून माझे पण ते शेवटचे जहाज ठरले होते. पुढील जहाजावर जेव्हा मी जॉइन झालो तेव्हा मला सेकंड इंजिनिअर म्हणून प्रमोट करून पाठवण्यात आले होते. (यू एम एस म्हणजे अन अटेंडेड मशीनरी स्पेस ज्यामधे संपूर्ण इंजिन रुम मध्ये सलग आठ तास कोणीही नसताना संपूर्ण जहाजाची मशीनरी आणि इंजिन सतत चालु असते. काही बिघाड झाला किंवा फ्युएल टँक ची लेवल कमी झाली, कुलिंग वॉटर चे टेंप्रेचर वाढले किंवा कमी झाले यासारखे शेकडो अलार्म त्या दिवशी ज्या इंजिनियरची यु एम एस ड्युटी असेल त्याच्या केबिन मध्ये वाजतात. जर त्याने तीन मिनिटात अलार्म म्यूट केला नाही तर सगळ्या इंजिनियर्सच्या केबिन मध्ये अलार्म वाजतात. अलार्म वाजल्यावर ड्युटी इंजिनियर केबिन मध्ये नसेल तर तो केबिन सोडून जिथं असेल अशा स्मोक रुम, मेस रुम, जिमन्याशियम आणि नेवीगेशनल ब्रीज अशा प्रत्येक ठिकाणी हे अलार्म वाजत असतात.
फक्त आठ तासांपेक्षा जास्त इंजिन रुम अन अटेंडेड ठेवता येत नसल्याने रात्री दहा ते अकरा असा एक तासाचा राऊंड ड्यूटी इंजिनिअर आणि ड्यूटी मोटारमन मिळून घेतात. ज्यामधे कुठे लिकेज आहे का, कुठला अलार्म रात्री वाजू शकेल का हे सगळं तपासणे संपूर्ण इंजिन आणि सगळ्या मशीनरी व्यवस्थित चालतात का याची तपासणी करणे हे तासाभरात बघून पुन्हा इंजिन रूम यू एम एस मध्ये टाकून ड्यूटी इंजिनिअर केबिन मध्ये परत येतो. )

-प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन, भिवंडी, ठाणे.
200923

काहीशा अपरिचित आणि अनभिज्ञ अशा रोमांचक आणि आव्हानात्मक मर्चंट नेव्ही या करिअर संदर्भातील महत्वाचे व मानाचे पुरस्कारप्राप्त माझी पुस्तकं,
सृजन संवाद प्रकाशन, ठाणे, प्रकाशित,
(अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध)
१) “द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही ”
( मराठी वाड्मय परिषदेचा अखिल भारतीय अभिरुची गौरव आणि
सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
२) “सातासमुद्रापार ”
( ठाणे ग्रंथंग्रहालयातर्फे वा. अ. रेगे पुरस्कार ,
दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा राज्य स्तरीय पुरस्कार आणि
सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
संपर्क: 8928050265

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..