बोल कैसें ते स्तुतीचे
बसल्या गोड मूर्तीचे
अंतरंगी ते पहावे
भक्ती चे दान मागावे
स्वर, सूर नाही चांगला
परी भक्त रस हो चांगला
कोण म्हणतो सुरातला
खरा भक्त होय!!
अर्थ–
स्तुती करताना मनापासून केली की त्याला कोणत्याही बंधनात आणता येत नाही तसेच शब्दांना भावनिक जोड मिळाली की सुरांना सुद्धा शरण यावं लागतं. सुश्राव्य संगीत आणि हृदयापासूनचे सूर यांना देवापुढे वेगळं स्थान आहे. श्री गणेशाचे स्तुती करताना किंवा कोणत्याही भगवंताची स्तुती कौतुक करताना त्याला श्रद्धेची जोड मिळावी म्हणजे त्यातून खरा भक्तिरस निर्माण होतो आणि मग त्याच्या वाटेत कोणतेही व्यत्यय येत नाहीत.
मला गाताच येत नाही, माझा आवाज चांगला नाही, छे छे गाणं आणि मी दूर दूर वर संबंध नाही हो अजिबात, मी कानसेन आहे तानसेन नाही. मी गायला लागलो तर सभागृह रिकामे होईल या अश्या प्रकारच्या टोलवाटोलवी आपल्या आजूबाजूला बरेचदा ऐकायला मिळतात. पण जेव्हा तीच व्यक्ती मनापासून एखादा अभंग सांगते, गाते तेव्हा मात्र ते बोल ते शब्द हृदयाला स्पर्श करतात कारण भावना या घशातून नाही तर हृदयातून येतात.
काय सुंदर गातात हे महाराज, वाह एकदम सुरात, एकदम ताल लय अशी हलत नाही हो कुठे. देवाची कृपाच म्हणायची यांच्यावर. अहो हो पण तांब्यात नक्की काय आहे हे मला माहित्ये, जगाला नाही. असे भक्त देखील रसात(भक्तीच्या) बुडालेले असतात. पण यांच्या पेक्षा खरा भक्त हा बेसूर जरी असला तरी मनापासून भक्ती करणारा असतो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply